कंटेंट
Sourabh Raghavendra
October 18, 2021 • 5 min read
फोन हातात न घेता निवांत बसून आजूबाजूला पाहणारा, शांतपणे अवलोकन करणारा एखादा मनुष्य दिसला की याचं नक्कीच काही तरी बिनसलं असावं असं वाटतं! काहीच कारण नसताना फेसबुक आणि इंस्टाग्राम स्क्रोल करत बसणं, भस्म्या झाल्यागत बातम्या आणि युट्युबवरच्या व्हिडीओंचा फडशा पाडणं, काहीच नाही तर कानात इअरफोन चढवून गरज नसतानाही मेंदूला गाण्याचा खुराक देत राहणं या गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की मोबाईलशिवाय आयुष्य जगणं ही गोष्ट मुळातूनच अबनॉर्मल वाटते कधी-कधी!
माणसं एकत्र येऊन त्यांच्यात संवाद सुरू असेल तरीही हीच तऱ्हा! माझा एक मित्र तर इतका निर्लज्ज आहे की तुम्ही थेट त्याच्याशी बोलत असला तरीही त्याच्या हातातला मोबाईल आणि त्या मोबाईलशी सुरू असलेला चाळा तो थांबवत नाही.
दोनापेक्षा जास्त माणसं जमली तरी हे अजूनच वाढतं. बोलण्यातही मग विषय तेच- "अरे मी इंस्टावर ही रील पहिली, फेसबुकवर तशी कॉमेंट वाचली, युट्युबवरचा तो व्हिडिओ पाहिलास का? ट्विटरवर तू तिला फॉलो करत नाहीस!!??" मग लागलीच फोन बाहेर येतात आणि या उसन्या कंटेंटच्या कुबड्या घेऊन संवाद सुरू होतो. आपण नेमकं टाळतो कोणाला तेच कळत नाहीये मला!! समोरच्या व्यक्तीला, स्वतःला, आपल्या एकसुरी आयुष्याला- किंवा मग या सगळ्यांनाच. तरी व्हर्च्युअल रिऍलिटी आपल्याकडे मेन्स्ट्रीम व्हायची आहे म्हणून, नाही तर एकदा व्हर्च्युअल जगात घेऊन जाणारे गॉगल माणसं चढवायला लागली की एकमेकांचे डोळे दिसणंही बंद होईल असं वाटतं मला.
मोबाईलवर स्वस्तात- अलमोस्ट फुकटात मिळणाऱ्या कंटेंटच्या आहारी गेलेली आणि आपल्याला कंटेंट कंझंमप्शनचं व्यसन जडलंय याची पुसटशी जाणीवही नसलेली माणसं पहिली की मनापासून वाईट वाटतं त्यांच्यासाठी, बाकी काही नाही.