•mr•

आवाज हरवतो तेंव्हा

आवाज हरवतो तेंव्हा

आवाज हरवतो तेंव्हा,

गांगरून जातो आपण.

आपलेच शब्द परके वाटू

लागतात आपल्याला

आणि परक्याच्या शब्दांत शोधू लागतो

आपण आपलंच आपलेपण.

आवाज हरवतो तेंव्हा

सांगताही नाही येेेत-

“अहो ऐकलं का,

आवाज हरवला आहे माझा!”

असं काही तरी.

आणि सांगितलंच जर,

तर प्रश्न पडू लागतात-

सांगणारा कोण?

ऐकणारा कोण?

कोणाचा आवाज?

वगैरे वगैरे!

आवाज हरवतो तेंव्हा

तो काही सांगून हरवत नाही.

मूठ उघडल्यावर कळतं

वाळू निसटली आहे-

तसंच काहीसं होतं हे.

आणि त्यामुळं कणाकणानं

पुन्हा वेचू असं म्हणून

एकेका कणाच्या मागं धावताधावता

क्षितिजावर दाटलेली आयुष्याची संध्याकाळ

आपल्याला हाकारते तेंव्हा कळतही नाही-

वेळ कसा गेला, कुठे गेला, कधी गेला अन् काय!

मूठ रिकामी ती रिकामीच.

आवाज हरवतो तेंव्हा असंच

होतं काहीसं.

मनाचा गाभारा रिताहोऊन जातो.

रिकामा रिकामावाटतो

आणि तो रिकामपणा नकोनकोसा होऊ लागतो.

मग पराकाष्ठा सुरु होते

हा रिकामा गाभा

सुशोभित करण्याची.

कोणी त्या गाभाऱ्यात

कानाड्याचे सूर भरवतं

कोणी मल्हार आणि मारावा आळवतं

कोणी विचारांचे उसने रंग त्या भिंतींवर फटकारतं

तर कोणी पुस्तकंचे रकानेच्या रकाने भरून

त्या भिंतीच झाकून टाकतं.

कोणाला देव-देवतांचे आणि बुवांचे

फोटो सापडतात त्या भिंतीवर ठोकायला

आणि उद्घोष सुरु होतो मंत्रांचा

तर कोणी कार्य-कर्तव्याचं कारण देऊन

लांब-लांब पळून जातंत्रत्या रिकाम्या गाभाऱ्यापासून

मागं वळूनही न बघता.

आवाज हरवतो तेंव्हा असंच

होतं.

आवाज हरवतो,

तेंव्हा असंच होतं.

-सौरभ राघवेंद्र.