•mr•

आजोबा

स्थळ: सदाशिव पेठेतलं आमचं घर. संध्याकाळचे सात आणि दारावरची बेल एकाच वेळी वाजली. दार उघडून पाहतो तो आजोबांचा प्रसन्न चेहरा समोर. आमच्या इथल्या संघाच्या शाखेतले आजोबा ! त्यांना त्यांचे नाव होते खरे पण तरीही आम्ही सारे आपुलकीने त्यांना फक्त'आजोबा'असंच म्हणत असू.

स्थळ: सदाशिव पेठेतलं आमचं घर.

संध्याकाळचे सात आणि दारावरची बेल एकाच वेळी वाजली. दार उघडून पाहतो तो आजोबांचा प्रसन्न चेहरा समोर. आमच्या इथल्या संघाच्या शाखेतले आजोबा ! त्यांना त्यांचे नाव होते खरे पण तरीही आम्ही सारे आपुलकीने त्यांना फक्त'आजोबा'असंच म्हणत असू.

“काय सौरभा ! येऊ का आत?”नेहमीच्या गोड आणि भारदस्त आवाजात त्यांनी विचारलं. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. माझ्यासाठी ते आमच्या घरी केंव्हाही येऊ शकत होते. आत येता येता त्यांनी सांगितलं की संघाच्या शाखेसाठी कुठल्याशा एका कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं होतं,त्याचंच निमंत्रण त्यांनी आणलंय. ते येऊन बसले,मी त्यांना प्यायला पाणी वगैरे दिलं आणि आमच्या गप्पा चालू झाल्या.

त्या संध्याकाळी बऱ्याच विषयांवर आमच्या गप्पा रंगल्या. त्यावेळी मी घरी एकटाच होतो मग माझ्याकडून त्यांनी आई-बाबांचं क्षेमकुशल जाणून घेतलं. माझ्या आणि माझ्या बहिणीच्या कॉलेजची,अभ्यासाची त्यांनी विचारपूस केली. मग सद्य राजकारणावर काही चर्चा झाली. त्यांनी मला त्यांचे सैन्यातले अनुभव सांगितले. त्यांच्या शाखेच्या आणि एकूण संघ्याच्या कामाविषयीही ते भरभरून बोलेले. या बोलण्याच्या भरात तास कसा उलटून गेला हे आम्हाला समजलंही नाही,पण जेंव्हा समजलं तेंव्हा ते म्हणाले, “बरं सौरभा ! आता उशीर होतोय,मी निघतो.”

मी त्यांना दारापर्यंत सोडायला गेलो आणि विचारलं, “लिफ्ट मधून खाली सोडायला येऊ का?”त्यावर मिश्कीलपणे हसून ते म्हणाले, “आता ऐंशी वर्षाचा झालो आहे हे खरंय,पण जसं जसं वय वाढतंय तसा तसा आणखी तरुण होतोय मी. जातो जिन्याने. वर येताना सुद्धा चार माजले पायीच चढून आलो आहे !”एवढे म्हणून ते जिना उतरू लागले. मी हसून म्हटलं, “बरं !”

ते गेले तसं मी दार लावून घेतलं आणि गॅलरीमध्ये येऊन उभा रहिलो. आमच्या बिल्डींगचं गेट बंद करून परतीची वाट धरलेल्या आजोबांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी वरून पहात होतो. का कोणास ठाऊक,पण त्यांची ती रुबाबदार आणि डौलदार खास मिलिटरी स्टाईल चाल त्या संध्याकाळी मात्र मला काहीशी संथ वाटत होती.. रस्त्यांवरच्या दिव्यांमुळे त्यांची सावली त्यांच्या पुढे पडली होती. त्यांच्याकडे पाहताना वाटत होतं की त्या सावलीमध्ये ते काही तरी शोधत आहेत. काही तरी हरवलेलं किंवा मग न सापडणारं काही तरी. एरवी अत्यंत उमदे वाटणारे आमचे आजोबा का कोणास ठाऊक त्यावेळी मला खूप एकटे वाटले आणि काहीसे एकाकी सुद्धा. रस्ता संपत आल्यावर त्यांनी त्यांचं नेहमीचं वळण घेतलं आणि ते दिसेनासे झाले...

खरं सांगायचं तर संघाची विचारधारा मला पूर्णपणे फारशी कधी पटली नाही- आजही ती पटत नाही,आणि माझा स्वभाव काहीसा सिद्धांतवादी असल्याने संघाच्या कार्यक्रमांत मीही कधी फारसा रस दाखवला नाही;पण म्हणून आजोबांनी कार्यक्रमाची आमंत्रणं द्यायची बंद केली असं झाल्याचं मात्र मला स्मरत नाही. त्यांची बांधिलकी ही त्यांच्या कार्याशी होती हे ते ही जाणून होते आणि मी ही,पण आता मात्र मागं वळून पाहताना हे सगळं आठवलं की मला काहीसं वाईट वाटतं. संघाला किंवा त्यांच्या विचारधारेतल्या काही बाबींना विरोध ही गोष्ट संपूर्णपणे वेगळी होती,पण आजोबांनी बोलावलं म्हणून तरी मी त्या कार्यक्रमांना जायला हवं होतं असं आजही मला कधी कधी खूप प्रकर्षानं जाणवत राहतं.

ते सैन्यदलामध्ये होते. देशाच्या प्रति आत्मीयता,अभिमान त्यांच्या रक्तामध्ये भिनला होता. त्यांची शिस्त कडक होती,पण ती केवळ त्यांच्यापुरतीच मर्यादित होती- इतरांवर लादण्यासाठी नव्हती. जेंव्हा जेंव्हा ते आम्हा सर्वांना कार्यक्रमाला बोलावत तेंव्हा ते एक वेळ देत. ऊन असो,पाऊस असो किंवा कडाक्याची थंडी,त्या वेळेच्या किमान पाच मिनिटं आधी आजोबा स्वत: हजर. मग कोणी येवो न येवो- ठरलेल्या वेळी ठरलेला कार्यक्रम हा सुरु होणार म्हणजे होणारच.

आमंत्रणाला मान देऊन मग कधी कोणी येतही असे,कोणी उशिरा येत असे तर कधी कधी कोणीच येत नसे पण म्हणून आजोबा कधी रागावले किंवा चिडले आणि त्यांनी त्रागा केला असं झाल्याचं मात्र मला आठवत नाही. त्यांना वाईट नक्कीच वाटत असेल पण जेंव्हा जेंव्हा ते आमच्याशी संवाद साधायला यायचे तेंव्हा आपल्या शिस्तीचा हेका धरणारा एक्स-आर्मिमॅन किंवा संघाचा स्वयंसेवक असे न येता या पेक्षाही ते जसे होते तसेच– ‘एक प्रेमळ आजोबा’असेच येत आणि म्हणूनच कदाचित आमच्या-इथल्या शाखेच्या सगळ्या स्वयंसेवकांमध्ये तेच सर्वात प्रिय होते.

त्यांच्याबद्दल मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या उत्साह. तरुणांना अक्षरशः लाजवेल असा उत्साह त्यांच्या अंगात आणि चर्येवर असे. माझ्या- पावलोपावली या न त्या गोष्टीला कंटाळणाऱ्या तरुण देहाला मी आरशात पाहिलं की मला प्रथम त्यांचीच आठवण होते आणि त्यांच्या उत्साहाचा हेवा वाटतो. आणि प्रश्न पडतो की येतो कुठून हा उत्साह त्यांच्यात?वयाच्या ऐंशीव्या वर्षी बिल्डींग मध्ये लिफ्ट असताना शंभर पायऱ्या अजिबात न दमता चढून येऊन आपल्या गोड आणि पहाडी आवाजात आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणारे आजोबा कसे आणि कुठे घडले कोण जाणे?

त्यांच्या निस्वार्थी वृत्तीने तर मला खरच मोहवून टाकलंय. ते सैन्यात होते त्यामुळे त्यांना पुष्कळ पेन्शन मिळतं. देशाच्या सद्य परिस्थितीला नावे ठेवत आपल्या करड्या शिस्तीने सगळ्यांना वीट आणणाऱ्या सैन्यदलातल्या एखाद्या निवृत्त अधिकाऱ्याचं आयुष्य ते सन्मानानं जगू शकले असते किंबहुना आत्ताही ते जगू शकतात,पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही. ते आजही पहाटे पाच वाजता उठतात. योगासनं करून सगळं आवरून शाखेमध्ये येणारे ते पहिले गृहस्थ असतात. त्यांच्या सुस्वर आवाजामधली प्रार्थना ऐकली नाही अशी एकही सकाळ मला आठवत नाही. अगदी अपवादासाठी सुद्धा.

त्यांच्यामधलं प्रखर देशप्रेम,राष्ट्राभिमान आणि स्वभावातला कणखरपणा पहिला आणि स्वत:कडे पाहिलं की स्वत:चीच कीव येते मला कधी कधी. कारण अशावेळी एकीकडे मला सकाळी आठ शिवाय डोळे न उघडणारा आणि देश आणि राजकारण वगैरे वगैरेंवर महागडी कॉफी रिचवत वायफळ चर्चा करणारा मी दिसत असतो,तर त्याचवेळी दुसरीकडे आयुष्यभर जपलेल्या या मूल्यांसाठी एकेकाळी ते प्राण पणाला लावून लढलेले,आणि आजही ऐंशीव्या वर्षी आपला स्वार्थ बाजूला ठेवून पदरमोड करून“विश्वगुरु भारत:”हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या परीने झटणारे आमचे आजोबा मला दिसत असतात.

रात्री जेंव्हा मी पोटभर जेवता जेवता चवीसाठी न्यूज चॅनेल वरच्या ‘जे. एन. यु’आणि तत्सम विषयांवरच्या डिबेट चघळत असतो तेंव्हा मला त्या गोंगाटात कधी कधी“सौरभा !”म्हणून त्यांनी मारलेली हाक ऐकू येते आणि आत कुठे तरी एक अस्वस्थता दाटू लागते. मग वाटायला लागतं की काय वाटत असेल त्यांना हे सगळे विषय पाहताना आणि वाचताना?ज्या देशाची सीमा शाबूत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य खर्च केलं त्या देशाचे तुकडे करण्याची भाषा करणारे ते पंचविशीतले उथळ तरुण आणि त्यांच्या आचरटपणाच्या आहारी जात त्यांना नकळत प्रसिद्धी देणारा आपला मिडिया !

त्यांना राग येत असावा याचा कदाचित. किंवा मग दु:खही होत असेल. एका मर्यादेनंतर कदाचित त्यांना आपण करत असलेले काम किती तोकडं आणि निरुपयोगी आहे हे जाणवून निराशही वाटत असेल... खरंच त्यांना असं वाटत असेल तर?आणि या विचारासारशी मात्र मी खरंच सुन्न होऊन जातो- वैचारिक पातळीवर आणि भावनिकही. पण मग वाटतं,नाही, आजोबा निराश होणार्‍यांपैकी नक्कीच नाहीत. स्वस्थ बसणाऱ्यांपैकी तर अजिबातच नाहीत. ते आता एका ऐवजी दोन कार्यक्रम घेतील. माझ्या वयाच्या आणि अनेक लहान मुलांना आग्रहाने पुन्हा पुन्हा बोलावतील. त्यांच्यावर देशप्रेमाचे नव्याने संस्कार करतील. उज्ज्वल भारताचे स्वप्न त्या सर्वांना दाखवतील. स्वत:च्या वयाचा विचारही न करता स्वत:कडून कडून जेवढे शक्य आहे त्याच्यापेक्षा किंचित जास्तच ते या देशासाठी देतील. शेवटी ते एक युद्धभूमी अनुभवलेले सैनिक आहेत. हरतील तर ते'आमचे'आजोबा कसले?

त्या रात्रीनंतर काही महिन्यांतच आम्ही सदाशिव पेठ सोडली. घर बदलण्याच्या आधी किमान एकदा तरी त्यांना भेटावं असं माझ्या मनामध्ये होतं,पण ते शेवटी राहून गेलं. त्यानंतर आमचा कधीच संबंध आला नाही आणि तो आता परत येईल की नाही हे ही ठाऊक नाही;पण त्यांचं ते हसतमुख,प्रसन्न आणि उत्साही व्यक्तिमत्व मात्र माझ्या कायम स्मरणात राहील आणि मला प्रेरित करत राहील हे नक्की. शेवटी इतकच वाटतं की स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाची आहुती देणारे स्वातंत्र्यसैनिक जवळून पाहण्याचं भाग्य जरी मला आणि माझ्या पिढीला मिळालं नसलं तरी सुदैवाने त्या स्वातंत्र्यवीरांच्या मनात पेटलेल्या ठिणगीची मशाल तितक्याच निस्वार्थीपणे आणि समर्थपणे तेवत ठेवणारे आजोबा मी पहिले आहेत हे अत्यंत आनंदाने माझ्या पुढच्या पिढीला मी सांगू शकतो.

सौरभ राघवेंद्र.