आणखी एक मृत्यू !
सुभाषनगर. दिल्लीमधला एक गजबजलेला भाग. त्या भागात एक मनुष्य त्याचं रात्रपाळीचं काम संपवून त्याच्या घरी निघाला होता. जाता जाता एका टेम्पोनं धडक त्याला दिली. तो रस्त्यावर पडला. त्याची शुद्ध हरपली.
सुभाषनगर. दिल्लीमधला एक गजबजलेला भाग. त्या भागात एक मनुष्य त्याचं रात्रपाळीचं काम संपवून त्याच्या घरी निघाला होता. जाता जाता एका टेम्पोनं धडक त्याला दिली. तो रस्त्यावर पडला. त्याची शुद्ध हरपली. रक्तस्त्राव सुरू झाला. त्याच्या बाजूनं अनेक वाहनं निघून जात होती, लोक जात होते. त्यातल्या काहींना तो दिसत नव्हता पण ज्यांना दिसत होता ते त्याच्याकडे पहातच नव्हते. त्याला तशा अवस्थेमध्ये पडून दहा मिनिटं झाली असतील, कदाचित वीसही- तेवढ्यात एक हात-रिक्षा चालवणारा मनुष्य थांबला. आपली रिक्षा बाजूला करून तो त्याच्यापाशी गेला. थोडं अंतर ठेवूनच त्याने त्या बेशुद्ध माणसाकडे पाहिलं. त्या दुर्दैवी माणसाचा फोन त्याच्या शरिराशेजारी पडला होता. त्याला पाहणाऱ्या हात-रिक्षावाल्याने तो फोन उचलला, चालू आहे का पाहिला. तो चालू असल्याची त्याची खात्री झाली. तो फोन त्याने आपल्या खिशांत ठेवला आणि तो जसा आला होता तसाच तिथून निघून गेला.
त्या माणसाला तिथे पडून एव्हाना दीड तास होत आला होता. अशाच कोण्या एका पादचाऱ्याने अखेर (पडलेल्या माणसाची कीव येऊन ?) शेजारच्या पी. सी. ओ. वरून पोलिसांना फोन केला. पोलीस आले. त्या माणसाला इस्पितळामध्ये नेण्यात आलं. दाखल केल्या केल्या तिथल्या डॉक्टरानी सांगितलं- “ही इज नो मोअर ! त्याचा मृत्यू झालेला आहे.” खरं तर त्याच्या मृत्यु तेंव्हाच झाला होता जेंव्हा त्याला पाहीलेल्या पहिल्या माणसाने त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले होते. अति-असंवेदनशीलतेने आधीच त्याचा गळा घोटला होता.
टोचते का हो ही कथा आपल्या मनाला ? हो ? नाही ? माहिती नाही ? आणि जर मी सांगितलं की ही कथा नाही- कालच पहाटे पाच ते सातच्या दरम्यान घडलेली खरी घटना आहे, तर फरक पडेल आपल्या प्रतिक्रियेमध्ये ? पहाच एकदा आत्मपरिक्षण करून. कारण ही अत्यंत दुर्दैवी घटना जगातल्या एकशे सत्त्याण्णव देशांमध्ये सातव्या क्रमांकावर असणार्या विश्वगुरु बनण्याचं गोड स्वप्न उराशी कवटाळून साखरझोपेत हरवलेल्या आपल्या सर्वांच्या ओळखीच्या भारत नावाच्या एका देशाच्या राजधानीमधल्या गजबजलेल्या भागात भल्या पहाटे घडलेली शोकांतिका आहे. या शोकांतिकेचा शेवट त्या बत्तीस वर्षांच्या मुळच्या पश्चिम बंगालच्या मतिबूल नावाच्या ई-रिक्षाचालकाचा दुर्दैवी अंताने झालाच पण हा अंत आपल्या समाजामधल्या माणुसकीची मरणासन्न अवस्था पुनश्च अधोरेखित करून गेला.
खरंच इतका कोडगा आहे आपला समाज? तिथून जाणाऱ्या एकाही माणसाला त्याच्यापाशी जाणं राहु दे एक वेळ, पण पोलिसांना एक साधा फोन करून त्याच्याबद्दल कळवावं असंही वाटू नये ? चरितार्थ चालवा या उद्देशानं पश्चिम बंगाल मधलं घरदार सोडून दिल्ली मध्ये येऊन राहिलेल्या त्या मतिबूलच्या आई-वडिलांचं, बायकोचं, लहानग्या मुलांचं आता कोणत्या तोंडानं सांत्वन करणार आपण ? आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत असं कोणत्या अधिकारानं सांगणार आपण ? कोणत्या अधिकाराने त्याच्या मृतात्म्याच्या सद्गतीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणार आपण ?
आपलं समाजमानस गढूळ होतं आहे हे आज पर्यंत मी अनुभवत आलो होतो, पण आज त्या बिचाऱ्याला मरणासन्न अवस्थेत तसंच सोडून देऊन त्याचा मोबाईल लंपास करणाऱ्या त्या निर्लज्ज माणसाला पाहिल्यावर आपलं समाजमानस फक्त गढूळच झालं नाहीये तर विकृतीच्या निम्न स्तराला जाऊन चिकटलं आहे याची अत्यंत बोचरी जाणीव मला सुन्न करून गेली. रस्त्यावर शेवटच्या घटका मोजत रक्ताच्या थारोळ्यात तळमळणाऱ्या माणसाचं आणि आपलं कुठलंच नातं नाही म्हणून सोयीस्करपणे दुर्लक्ष करून निघून जावं एखाद्याने ? हद्द आहे ! कुठे जाते अशा वेळी ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे गोडवे गाणारी आपली संस्कृती ? कुठे जातो समभाव ? कुठे जाते आपुलकी ? कुठे गेली बांधिलकी ? सहानुभूती ? माणुसकी ?
मतिबूल एक आपल्यासारखाच सर्वसामान्य नागरिक होता. मृत्यूशी झुंज देत रस्त्याच्या कोपर्यात पडलेला असताना त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता त्याच्या मृत्यूने आपल्या समाजाचे डोळे खाड्कन उघडतील, समाजाची संवेदनशीलता एकाएकी जागृत होईल आशा बाळगण्यात फार काही अर्थ नाही. त्याच्यासाठी काही झालंच तर सोशल मिडिया वर काही तासांसाठी त्याच्या नावाचा ट्रेंड निर्माण होईल, चर्चा घडेल आणि दोन दिवसांमध्येच आपण सगळे ही घटना विसरूनही जाऊ. पण आज जोपर्यंत ही घटना आपल्या स्मृतीमध्ये आहे, निदान तोपर्यंत तरी आपण किमान पाच मिनिटांसाठी का होईना, अंतर्मुख होऊन या घटनेबद्दल विचार करू. आपल्या दैनंदिन जीवनात थोडं अधिक संवेदनशीलतेने आणि सामंजस्याने वागण्याचा निर्धार करू. समोरचा कसाही वागला तरी आपण नैतिकतेच्या योग्य बाजूला उभे आहोत याची खात्री करून घेऊ. कारण शेवटी समाज समाज म्हणजे तरी कोण असतं ? आपणच ना ? आपण बदललो की समाज बदलतो. हा बदलच मतिबूलला खरी श्रद्धांजली असेल.
-सौरभ राघवेंद्र.
ता. क.: या घटनेसंदार्भातलं वार्तांकन वाचत असताना असाच आणखी एक दुर्दैवी प्रसंग माझ्या वाचनात आला. त्या प्रसंगाचा संक्षेप:जुलै २०१५. कस्तुरबा नगर ट्रॅफिक सिग्नल, विवेक विहार, पूर्व दिल्ली. विधवा आईसाठी औषधं आणायची म्हणून वीस वर्षांचा विवेक घराबाहेर पडला. एका गाडीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. परिणामी तो त्याच्या गाडीवरून उडून पडला. प्रचंड राक्त्रस्राव झाला. तो रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये बराच वेळ पडून होता. आजूबाजूने जाणाऱ्या गाड्या त्याला पाहून थांबत आणि वेग वाढवून लगेच निघून जात. अखेर त्या मुलाचा मृत्यू झाला. तो बिचारा आणखी दोन दिवस जरी जगाला असता तर त्याच्या ताईच्या लग्नाला उपस्थित तरी राहू शकला असता !