आनंदी..!
"काय चाललंय?" ती विचारते.
"काय चाललंय?" ती विचारते.
"काही नाही." माझं ठेवणीतलं उत्तर.
"असं कसं काही नाही? काही तरी असेल!" ती एरवी बिझी असते तेंव्हा मी फोन ठेवताना बाय म्हणतो ते ऐकायलाही वेळ नसतो तिच्याकडे, पण मग तिला थोडासा वेळ रिकामा मिळाला तर मात्र मला घेऊन ती सूतावरून स्वर्गात जाऊन चार फेऱ्या मारून येते.
"म्हटलं ना काही नाही." सकाळच्या सेशनमधलं काम आटपून मी आधीच कंटाळलेला असतो, अशावेळी उगाच लाडात येऊन म्हणलेलं 'काही तरी असेल' चांगलंच डोक्यात जातं माझ्या.
"बरं! राहिलं. काही नाही, तर काही नाही. तुला माहितीये का, आईस्क्रीम खातेय मी." ती काही तरी खात बोलते आहे हे तिच्या आवाजावरून मला एव्हाना लक्षात आलेलं असतं, पण ते आईस्क्रीम आहे आणि ते सांगण्यापाठी मला उगाचच चिडवण्याचा तिचा हेतू आहे हे न कळण्याएवढाही दुधखुळा मी नक्कीच नाही. अर्थात हे तिलाही माहितीच असतं, किंबहुना मी ह्यावर काय उत्तर देणार हे ही तिला माहिती असतं.
"खा की, पण नंतर मलाच विचारशील की मी जाड दिसतेय का आणि मी खरं सांगेन हो म्हणून तेंव्हा मात्र मग तोंड फुगवुन बसू नको." खरं तर तिच्याच काय कोणाच्याही जाड असण्यानं किंवा नसण्यानं मला विशेष फरक पडत नाही, पण मग मला चिडवशील तर हम भी किसिसे कम नही हे दाखवून द्यायला मी मागं पुढं पहात नाही.
"किती वाईट आहेस रे तू!" तिचं बोलणं खूप प्रभावी असतं. किती वाईट आहेस रे हे ती इतक्या काकुळतीने म्हणते की तिच्या हातातलं आईस्क्रीम विरघळून जायच्या आधी मीच विरघळून जातो आणि कुठलं आईसक्रीम, ऑफिस मध्ये ह्या वेळी कुठून आलं, कोणाचा बर्थडे आहे म्हणून कोणी पार्टी दिलीये का अशी काही तरी सर्वमान्य आणि सर्वसामान्य प्रतिक्रिया द्यायला हवी होती असं क्षणभर वाटून जातं, पण मग पुढच्याच क्षणी मी ठरवतो मारलीये ना उडी, जाऊदे- आता पोहयचंच.
"खूप वाईट आहे गं." मी म्हणतो.
"माहितेय मला." ती म्हणते. "म्हणूनच त्रास देतोस असा. तू विचारलं पण नाहीस मला कसलं आईस्क्रीम आहे ते आणि आत्ता का खातेय म्हणून." ती बऱ्याचदा मला विचारते की मला तिच्यात नेमकं काय आवडतं. त्यावर काय उत्तर द्यावं हे मला अजूनही समजलेलं नाही एखाद्या व्यक्तीमध्ये आपल्याला नेमकं काय आवडतं किंवा एखादी व्यक्ती आपल्याला का आवडते ह्याचं असं कारण कसं द्यायचं राव! एखाद्या मुलाच्या आजूबाजूला एक इतक्या मुली, मुलीच्या आजूबाजूला एवढी मुलं पण त्याला त्यांच्यातली तीच आणि तिला त्यांच्यातला तोच का आवडतो- हे असं ऑब्जेक्टिव्हली कसं सांगणार ? बरं, पण त्यातूनही खूप विचार करून सांगावं मला तुझ्यातलं अमुक आवडतं, तर मग 'अच्छा! तुला ते आवडतं म्हणजे मग हे आवडत नाही, असंच ना?' असा प्रतिप्रश्न तयारच असतो! म्हणजे मग सगळे बौद्धिक श्रम शेवटी पाण्यात! पण हे सगळं असं असलं तरी गेल्या काही दिवसात मला एक गोष्ट जाणवलीये- तिचं 'तू विचारलं पण नाहीस मला कसलं आईस्क्रीम आहे ते आणि आत्ता का खातेय म्हणून!' असं अत्यंत निरागसपणे तक्रार करणं आवडतंय मला. पण तिला मी हे सांगणार मात्र आजिबात नाहीये, इतक्यात तरी नाहीच.
"माहितीये मला कसलं आईस्क्रीम आहे ते. तुमच्या टीमचं प्रेझेंटेशन छान झालं म्हणून जोशी मॅमनी दिलंय तुम्हा सगळ्यांना."
"तुला कसं माहिती?" ती चक्रावतेच. आमच्याच पिढीतल्या अनेक मुला-मुलींचं गणितच कळत नाही मला कधी कधी. त्यांना वाटतं सरप्राईज देणं म्हणजे भर रात्री तिच्या किंवा त्याच्या घराच्या खाली उभं राहून खिडकीत ये म्हणून फोन करणं, पुढच्या तीन जन्मांत अजिबात गरज नसलेल्या वस्तू गिफ्ट म्हणून देणं, तिच्या किंवा त्याच्या नकळत पाठलाग करून कुठे तरी जाऊन समोर एकाएकी दत्त म्हणून प्रकट होणं! फॉर या चेंज ह्या गोष्टी ठीक आहेत, नाही असं नाही; किंबहुना मीही एकदा असंच तिच्या घरखाली उभं राहून तिला फोन केला होता. मला बघितल्यावर तिला भारी वगैरे वाटेल असही मला वाटलं होतं! पण कुठंच काय! न बोलावता असं येत जाऊ नको, घरी सांगायला मला ऑकवर्ड होतं ह्या सबबीखाली त्या दिवशी तिने माझ्यावर चांगल्याच फैरी झडल्या होत्या. अर्थात ह्यात तिची काहीच चूक नव्हती आणि माझीही नव्हती. ही चूक कोणाची असेल तर आपल्याला रोमान्स विकणाऱ्या हॉलीवूड आणि बॉलिवूड मधल्या चित्रपटांची. त्यांना कुठं माहिती असतं की मिडलक्लास मधला एखादा मुलगा त्यांचं बघून जेंव्हा एखाद्या मुलीच्या घरी जातो नेमकं तेंव्हाच तिच्या मावशीला नाही तर आत्त्याला तिच्या घरी यायचं असतं!
"अगं कसं म्हणजे काय!" मी माझं बाळबोध लॉजिक तिला समजावतो. "तू मागच्या आठवड्यात सांगितलं होतंस की आज तुमचं प्रेझेंटेशन आहे. त्याची किती तयारी तू केली होतीस हे मी पाहिलंच होतं, त्यामुळं ते छान होणार तर होतंच. आणि राहता राहिला प्रश्न आईस्क्रीमचा. तुझ्या ग्रुप मधल्या सगळ्यांचे वाढदिवस मला माहितीच आहेत. झालं मग! आय कनेक्टेड द डॉट्स!" माझ्या मते तरी खरं सरप्राईज हेच असतं- बोलण्याच्या ओघात समोरच्याने सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं, योग्य वेळी योग्य प्रतिसाद देणं, आपण आता रागावणार अशी समोरच्या व्यक्तीची खात्रीच असते, तेंव्हा शांतपणे समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेणं, वगैरे वगैरे. बाकी सरप्राईजच्या नावाखाली भेट दिलेल्या वस्तू आयुष्यभर पुरतातच असं नाही. आपण थोडे मोठे झालो, नातं थोडं जुनं झालं की सरप्राईजच्या नावाखालची वेडीवाकडी अॅडव्हेंचर्सही तेवढ्याच प्रमाणात सुरु राहतील असंही नाही. त्यावेळी मग दोघांनी कितीही नाकारलं तरी नात्यामध्ये येणारा एकसुरीपणा, तोचतोचपणा साठून राहतो. अशावेळी मग अंगवळणी पडलेल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी मात्र आपसूकच आनंदाचा अनपेक्षित प्रवाह घेऊन येतात आणि ह्या साचलेपणाचा अपोआप निचरा होऊन जातो. आणि शेवटी सरप्राईज सरप्राईज म्हणजे नेमकं असतं तरी काय! एखादी अनपेक्षित गोष्टच ना? नातं कोणतंही असो, जेंव्हा त्या नात्याची वीण घट्ट होत असते, तेंव्हा एकमेकांना पदोपदी गृहीत धरताना मारलेल्या गाठीही आवळत गेलेल्या असतात. अशा अगणित गृहितकांच्या डोलाऱ्यावर उभ्या असलेल्या नात्यामध्ये एखाद्यानं आपण होऊन घेतलेली समंजस आणि विचारी भूमिका हेच मुळात ‘अ सरप्राईज इन इटसेल्फ’ नव्हे का?
"आय कनेक्टेड द डॉट्स म्हणे! वेडा!" तिच्या आवाजात कौतुक असतं, प्रेम असतं, थोडा हळवेपणा असतो आणि तिचं ते 'वेडा' हा शब्द उच्चारणं! आपल्या मध्यमवर्गीय लोकांमध्ये एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करताना येणारा अवघडलेपणा कधी कधी इतक्या मोहकपणे उलगडतो, की प्रेमाची थेट अभिव्यक्ती अगदीच कोरडी आणि फिकी वाटते. तिच्या 'वेडा' ह्या एका शब्दात केवढं काही दडलेलं असतं आणि ते जगातल्या सातशे कोटी लोकांपैकी फक्त आपल्या एकट्यासाठी आहे याच्यात कोण सुख आणि समाधान असतं! पण हे सगळं असं असलं तरी रोमान्स, रोमॅन्टिसिझम वगैरे मला मात्र अजिबातच पचत नाही. मळमळतंच मला.
"वेडा नाही गं, शहाणा. शहाणा किंवा हुशार म्हणावं माझ्या सारख्या मुलाला." एखाद्यच्या मधाळ बोलण्यानंतर त्यावर प्रतिक्रिया म्हणून समोरच्याने अशी करपट ढेकर दिली तर एखाद्याचा हिरमोडच व्हावा; पण तिचं तसं नाही होतं. ह्या बाबतीत मी कसाही वागलो तरी का कोण जाणे, माझं वागणं तिला रोमँटिकच वाटतं. आपला तो बाळ्या म्हणतात तसं असेल कदाचित पण नसलेला गुण उगाच माथी मारला की मला मात्र अपराधी वाटत राहतं. त्यामुळं मी तिला नेहमी म्हणत असतो- ‘बाई, रोमान्सची व्याख्या तपासून घे गं तुझी नाहीतर नंतर आंधळं आंधळं म्हणत प्रेमाला दूषणं देत बसशील!’
"बरं हं, शहाण्या- हुशार मुला. निघते मी आता. मिटिंग आहे. संध्याकाळी बोलू. बाय." तिनं टोमणा मारण्याचा कितीही प्रयत्न केलेला असला, तरी तिच्या आवाजातला आनंद मात्र काही केल्या लपत नाही. पाणी कसं एकीकडून अडवलं की दुसरीकडून खळाळतं नाही तर जमिनीत खोल झिरपून जातं, तसंच असतं तिचंही. तिचे डोळे बोलके आहेतच, पण एक वेगळीच चमक आहे त्यांत. झिरपलेल्या ह्या आनंदाचीच असावी बहुधा! अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद सापडतो तिला. अशावेळी अपेक्षांनी जड झालेल्या माझ्या भावविश्वाकडं पाहिलं की तिच्या सहजतेचा हेवा वाटतो मला कधी कधी. मी अर्थात हे तिला कधी बोलून दाखवलेलं नाही, किंबहुना न बोलण्याचीच गोष्ट आहे ही. पण काही असो, मी जेंव्हा जेंव्हा तिच्याबद्दल विचार करतो, तेंव्हा तिचा मूळचा पिंडच आनंदी आहे ह्या गोष्टीची मला पक्की खात्री पटते आणि कोणी त्याला योगायोग म्हणो वा गम्मत, तिचं नावही तिच्या स्वभावाला अगदी साजेसं असंच आहे- ‘आनंदी !’
"बाय." मी बाय म्हटलेलं सवयीप्रमाणे तिनं ऐकलेलंच नसतं. त्याआधीच फोन कट झालेला असतो. फोन ठेवताना तिचा फोटो झळकतो फोन वर काही क्षण. तिला आजिबात आवडत नाही तो फोटो आणि हे एकमेव कारण पुरेसं असतं मला नेमका तोच फोटो तिचा कॉन्टॅक्ट आयकॉन म्हणून ठेवायला. मी स्वतःशी हसतो क्षणभर. आणि डोळे मिटून शांत पडून राहतो माझ्या खुर्चीत. पडल्या पडल्या तिची प्रतिमा तरळते डोळ्यासमोर- ती तिच्या ऑफिसमध्ये उभी आहे. मला फोन करायचा म्हणून एक शांत कोपरा तिने शोधलेला आहे. तिच्या हातात आईस्क्रीम आहे. त्या आईस्क्रीमच्या ट्रीटपाठीमागचं कारण मी ओळखलंय आणि आश्चर्य, आनंद, कौतुक, प्रेम असं सगळंच तिच्या डोळ्यात दाटून आलंय, गालावर छान हसू खुलतंय. बोलून झाल्यावर फोन ठेवताना ती सुद्धा तिच्या फोन मधल्या माझ्या फोटोकडे पाहतेय. मनातल्या मनात परत एकदा मला 'वेडा' म्हणतेय! फोन जीन्सच्या खिशात ठेऊन तिच्या क्यूबिकलकडे जातेय आणि जाताना दिवसभराच्या कामाचा थकवा तिच्या चेहऱ्यावर, देहबोलीमध्ये कुठेच दिसत नाहीये.
क्षणभर वाटून जातं मला- असं काय केलं मी? एक छोटं प्रेझेन्टेशनच तर होतं, ते लक्षात ठेवलं. ठेवलं म्हणावं तर ते ही अर्धसत्य. आपसूकच राहिलं. स्मरणशक्ती खूपच चांगली आहे माझी. बरंच काही लक्षात राहतं माझ्या. सांगायचंच झालं तर लहान असताना एकदा आई भाजी आणायला घेऊन गेली होती मला, तेंव्हा कांद्याचा दर किलोला किती होता हे आजही आठवतं मला. तसंच प्रेझेंटेशन. शिवाय प्रेझेंटेशनचा आणि आईस्क्रीमचा संबंध जोडणं फार कठीण नव्हतं, उलट अगदीच लॉजिकल होतं आणि त्यातही लौकिकदृष्ट्या मी बिझनेसमन वगैरे असलो तरी माझा मूळचा पिंड मात्र शास्त्रज्ञाचा. त्यामुळं हे एवढं सोपं लॉजिकल डिडक्शन जमलं नसतं तर मी घरीच बसायला हवं! मग गोंधळतो मी. इथे ग्लास हाफ फुल, हाफ एम्प्टी वाली अॅनॉलॉजी वापरावी की माझ्या अतिचिकित्सक स्वभावाला मुरड घालून फुलांच्या पाकळ्यांचं विश्लेषण न करता ते नाकाजवळ नेऊन एकाच दीर्घ श्वासात त्याच्या गंधाशी समरूप व्हावं असा प्रश्न पडतो. खोलवर जाऊन चिकित्सा करणं मला खूप छान जमतं, पण अस्तित्त्वानिशी एकरूप होणं-वगैरे- तो प्रांत माझा नव्हे, तिला जमतं ते, किंबहुना तिलाच जमतं ते!
( क्रमश: )
-सौरभ राघवेंद्र.