अनुभवातला जिवंतपणा
मगाशी, एका संदर्भासाठी संस्कृत भाषेतलं एक पुस्तक शोधत होतो मी ऑनलाईन, तेंव्हा दहावीच्या चालू अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या पीडीएफची एक लिंक मला दिसली. ‘पाहूया तरी काय आहे त्या पुस्तकात!’ असं म्हणून उ…
मगाशी, एका संदर्भासाठी संस्कृत भाषेतलं एक पुस्तक शोधत होतो मी ऑनलाईन, तेंव्हा दहावीच्या चालू अभ्यासक्रमाच्या पुस्तकाच्या पीडीएफची एक लिंक मला दिसली. ‘पाहूया तरी काय आहे त्या पुस्तकात!’ असं म्हणून उघडून पाहिलं ते पुस्तक आणि क्षणार्धात शाळेत असताना नवी इयत्ता सुरु होण्यापूर्वी पाठ्यपुस्तकं आणून ती चाळून पाहताना जशी एक्साईटमेन्ट मी अनुभवत असे तशीच एक्साईटमेन्ट मला अनुभवायला मिळाली!माझं शिक्षण मराठी माध्यमातलं, आमच्या शाळेची वेळ अकरा ते पाच; पण शैक्षणिक वर्षं संपत आलं आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या की मग शाळेची वेळ बदलत असे आणि शाळा एक तर मधल्या सुट्टीनंतर भरे किंवा मग सकाळी. मार्च महिन्यात तर आमची शाळा सकाळीच भरत असे.
सकाळची शाळा आवडायची मला. शाळा सुटल्यावर दुपारी घरी आलं की खेळता यायचं मनसोक्त, टाईमपास करता यायचा, केलाच कधी तर अभ्यासही व्हायचा. होता होता मग वार्षिक परीक्षेची चाहूल लागायची, यथावकाश परीक्षा संपायची आणि मग उन्हाळ्याची सुट्टी !! मग ती सुट्टी संपता संपता सुरु होणारा पाऊस, पावसासोबत सुरु होणारी शाळा आणि मागोमाग येणाऱ्या नव्या वह्या आणि नवी पुस्तकं!
एका लिंक वर क्लिक केल्यानं एखाद्याची कुठल्या कुठं लिंक लागावी त्याचा काहीच नेम नाही! डिजिटल पुस्तकाला नव्या छापील पुस्तकाचा वास नसतो खरं तर; पण कोई नाही. माध्यमं डिजिटल झाली म्हणून अनुभवातला जिवंतपणा कमी व्हायला हवा असं नक्कीच नाही. बाकी, आत्ता शाळेत असतो तर, “सहामाही तोंडावर आलीये तरी अभ्यासाला बसत म्हणून नाही हा मुलगा!!” असं काहीसं ओरडून घेतलं असतं आईकडून.
नॉट फेअर मॅन ! मनात येईल तेंव्हा लहान होता यायला हवं आपल्याला!
असो. पानं घेतलीयेत मातोश्रींनी. जातो जेवायला.
गुड नाईट!