बेसनाचा लाडू
सगळ्यांचे हवे तसे, हवे तेवढे फोटो काढून दिल्यावर, डिएसएलआर धरून धरून हात भरून आल्यावर दोन क्षण शांत बसून , "तुझे पण एक-दोन फोटो काढू का?" असं कोणीच कसं विचारत नाही या प्रश्नांनं व्यथित झालेला एक स्…
सगळ्यांचे हवे तसे, हवे तेवढे फोटो काढून दिल्यावर, डिएसएलआर धरून धरून हात भरून आल्यावर दोन क्षण शांत बसून , "तुझे पण एक-दोन फोटो काढू का?" असं कोणीच कसं विचारत नाही या प्रश्नांनं व्यथित झालेला एक स्वयंघोषित हौशी फोटोग्राफर आपल्या आयुष्यात इतके फोटो काढून आपण नेमकं काय कमावलं याचा गहन विचार करतानाचं "अ-फोटो-नोबडी-आस्कड्-फॉर" टाईप क्षणचित्र. सदर विचार करता करता चेहऱ्यावर उमटलेला खिन्न भाव "केस कापायला नको होते" अशी कृती-पश्चात उपरती झाल्यानंतर आलेला आहे. बाकी, आपल्या रंग-रूपाची यथोचित जाण असल्यानं मी कॅमेराच्या अलीकडेच राहणं प्रेफर करतो, पण दिवाळीसारखं निमित्त आलं की वाहत्या गंगेत एक या न्यायानं मलाही हे असं डोकं वर काढायची इच्छा होते. एनिवे, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा!! मनसोक्त खा, सुट्टीचा आनंद घ्या, मजा करा!! (आणि कोणाला कुतूहल असलंच तर त्यांच्यासाठी- फराळात मला चकली आवडते आणि बेसनाचा लाडू आवडतो. फटाक्यांचं विचाराल तर, आयुष्यात माझ्या बरेच फटाके वाजलेत, पण मी मात्र फार तर एखादंच वर्ष ते वाजवले असतील. (अर्थात, त्याच्यापाठी असलेलं कारण फार उदात्त-बिदात्त नाहीए, इतकंचे की लहान असताना मला फटाक्यांची बालसुलभ भिती वाटायची, पण मग थोडासं मोठा झाल्यावर मी जेंव्हा ऍकच्युअली फटाके उडवले तेंव्हा माझ्या लक्षात आलं की यात इंटलेक्च्युअली चॅलेंजिंग असं काहीच नाहीए. वात पेटवायची, 'पेटली-पेटली' म्हणून पाळायचं, नसेल पेटली तर पुन्हा येऊन पेटवायची आणि पुन्हा 'पेटली पेटली' म्हणून पळायचं. बोअर झालं मला.) याचा अर्थ मी असंवेदनशील वगैरे असा आजिबात नाही, शिवाय धुराची ऍलर्जी आहे मला. नाकाला धूर लागला की लागलीच माझ्या नाकाला धार लागते. सो नो फटाके ऍट ऑल. याव्यतिरिक्त कोणाला काही शंका असले तर खुशाल मेसेज धाडा.)
असो. आज एवढंच सुचतंय मला. कधी कधी मला, "मी हे 'एवढंच' तरी का लिहितो?" असा प्रश्न पडतो, पण मग "कारकून असलो म्हणून काय झाले? मी चरित्र लिहू नये की काय?" असा खडा सवाल अत्यंत सौजन्याने विचारणारे 'असा मी असामी'वाले 'धोंडो भिकाजी जोशी' आठवतात आणि माझ्यातल्या बेमट्या 'का लिहावं?' ऐवजी 'का लिहू नये?' असा प्रश्न घेऊन थेट लिहायलाच बसतो. त्यामुळे हा, 'आपणही चार शब्द खरडू शकतो आणि ते शब्द अगदीच व्यर्थ-बिर्थ नसतात' या जाणिवेतुन माझ्या लिहिण्याविषयी मला जो थोडासा आत्मविश्वास वाटतो त्याचं बरंचसं श्रेय पुलंचं आहे.
आणि एक सांगू का! माझ्या आयुष्यात दोन व्यक्ती आहेत ज्यांच्याविषयी लिहिण्याची माझी मोठी इच्छा आहे. पुलं त्या दोनातली पहिली व्यक्ती. जुजबी अवसानापलीकडे जाऊन आपली लेखणी आता बऱ्यापैकी सशक्त आहे असं मला जेंव्हा वाटेल तेंव्हा पुलंविषयी, त्यांच्या साहित्याविषयी काहीतरी नक्की लिहीन असं ठरवलंय मी. असंच मी खरं तर भा. रा. भागवतांविषयीही ठरवलं होतं, पण ते लिहिलं गेलं नाही हा भाग निराळा.
भारा माझ्या आयुष्यात आले तेंव्हा मी पाहिलीमध्ये होतो. बाबांनी आणून दिलेलं "फुरसुंगीचा फास्टर फेणे" ही आमची पहिली ओळख. ती पुढे वाढतच गेली. भारांचं लिहिता लिहिता वाचकांशी संवाद साधणं आवडतं मला खूप. 'फास्टर फेणे' वाचताना आपण गोष्ट वाचत नाहीये, तर ती ऐकतोय असंच वाटत राहतं. अगदी परवाच मी बसल्या बसल्या "गुलमर्गचं गूढ आणि फास्टर फेणे"ची पहिली पन्नास-साठ पानं वाचली. आपलं बालपण असं छोट्या-छोट्या गोष्टींत अडकून पडलेलं पाहिलं की गंमत वाटते मला आणि या गोष्टी आपल्या हाताशी, रादर हातात आहेत याचा आनंद.
मध्यंतरी मी काही 'कमिंग-ऑफ-एज' थिम असलेल्या काही सिरीज पहिल्या होत्या. त्या पाहिल्यापासून मी 'लहान असणं, मोठं होणं' या गोष्टीचा थोडा गांभीर्यानं विचार करतोय. माझी एक मैत्रिण बोलता बोलता मला, 'सौरभ, यु आर अ किड' असं म्हणाली होती एकदा. ते ऐकून मला तेंव्हा नेमकं काय वाटलं होतं हे आता आठवत नाही, पण आता थोडं मोठं झाल्यावर, जबाबदाऱ्यांची आणि त्या पुऱ्या पाडण्यात आपण कमी पडतो याची जाणीव झाल्यावर, किडकिडीत किड असणं किती सुखाचं असतं हे कळतं. बाकी या फोटोत मी बऱ्यापैकी जाड दिसत असलो तरी लहानपणी मी पुष्कळ काटक होतो. अजूनही आहे तसा, पण आता आळस वाढलाय थोडा.
एनिवे, तर मोठं होण्याच्या बाबतीत मला आता असं वाटतं की मोठं होणं आपण थांबवू शकत नाही पण म्हणून एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला 'यु आर अ किड' असं म्हणते तेंव्हा ती व्यक्ती 'म्हणते' म्हणून मोठं व्हायचं नसतं. मुळात कोणी असं एखाद्याला म्हणायचंही नसतं. अर्थात, काही वेडे असतात जे समोरची व्यक्ती म्हणते म्हणून स्वतःला बदलण्याचा मारे मोठा प्रयत्न-बियत्न करतात, पण त्याचा शेवट अखेर त्रासातच होतो. आणि कसंय, प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट शेवटी स्वतंत्र असते. स्वतंत्र ऍज इन त्या गोष्टीला स्वतःचं असं तंत्र असतं. प्रत्येकाचा गाभा निराळा, प्रत्येकाची धारणा निराळी. कोणत्याही नात्यात जे सो कॉलड समजून घेणं-बिणं असतं त्याला आयुष्यभराचं महत्त्व मिळतं ते याच स्वभाववैविध्यामुळं. असो. लिहायचंच म्हटलं तर नातं वगैरे विषय लै क्लिशेड् असतात असं वाटतं मला. त्यामुळे विद-आऊट ड्यू डिलीजन्स त्या विषयाला हात घातला तर फुकटच्या बकचोदीशिवाय त्यातून फार काही निष्पन्न होत नाही असा अनुभव आहे माझा.
बाय द वे, त्या- 'फुकट' या शब्दावरून मला आठवलं- मी मध्यंतरी एक जिम जॉईन केली होती. मध्यंतरी म्हणजे- लॉक-डाऊनच्या पुष्कळ आधी. त्या जिममध्ये एक ट्रेनर होता त्याला फुकट ऐवजी 'बिना-फुकट' असं म्हणायची सवय होती. त्याचं झालं असं होतं की त्याच्याकडे कुठल्याशा प्रोटीन सप्लिमेंटची एजन्सी होती. त्याच्याकडच्या प्रोटीनचा एक डबा घ्यावा असं म्हणून तो माझ्या मागे लागला होता. तो दरवेळी म्हणायचा, "या डब्यासोबत तुला प्रोटीन शेकर बिना-फुकट मिळेल." मला नतंर कळलं की बिना-फुकट म्हणजेच 'बिना पैसे देता फुकट.' भेंडी!! नुसतंच फुकट म्हणावं ना मग. कशाला किडा सोडावा बिना-फुकटचा! साप्लिमेंट घेतलं नाही मी त्याच्याकडून आजिबात. एनिवे!
जे आहे ते हे असं आहे. बघा.. पटलं तर लाईक वगैरे करा, नाही पटलं तर 'हाहा' करा, 'हीही' केलंत तरीही चालेल पण 'होहो' मात्र नका करू. त्याचं कसंय, मी जे सांगतो त्याच्यावर कोणी, 'होहो! अगदी बरोबर!' असं म्हणावं इतका मोठा मी आजिबात नाहीए, वयानं नाही, कर्तृत्वानं तर त्यातूनही नाही. बन्या उर्फ फुरसुंगीच्या फास्टर फेणेसारखा जाईल तिथं या न त्या भानगडीत अडकणारा, त्यातून दुखावून, खरचटवून घेऊन शहणपणाच्या दोन आणि वेडेपणाच्या चार गोष्टी शिकून बाहेर पडणारा आणि ज्याला ऐकायची इच्छा असेल त्याला त्या साहीच्या साही गोष्टी छान रंगवून सांगायची हौस असणारा त्याच्यासारखाच एक किडकिडीत मुलगा आहे.
त्यामुळं ऐका, हसा आणि सोडून द्या!! तूर्तास मी पळतो. बेसनाचा एक लाडू बोलवतोय मला.
आलोच.
-सौरभ राघवेंद्र.