'भाषा' मराठी
गाडी झाडाखाली उभी केल्यावर गाडीच्या सीटवर हटकून शी करणारी कबुतरं सोडली तर या जगात आपण कोणत्याच गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही. गोष्टी बदलतात, बदलत राहतात आणि जे बदलत नाहीत किंवा बदलू शकत नाहीत ते फा…
गाडी झाडाखाली उभी केल्यावर गाडीच्या सीटवर हटकून शी करणारी कबुतरं सोडली तर या जगात आपण कोणत्याच गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही. गोष्टी बदलतात, बदलत राहतात आणि जे बदलत नाहीत किंवा बदलू शकत नाहीत ते फार पुढे जाऊ शकत नाहीत. प्रवाही असणं जिवंतपणाचं लक्षण असतं. भाषेच्या बाबतीतही हे अभावानेच असत्य ठरेल. आपण आहोत, म्हणून भाषा आहे. आपण बदलतो तशी भाषाही बदलते.
गेल्या पन्नास-साठ वर्षांत आणि विशेषतः गेल्या वीस वर्षांत आपला सभोवताल अनेक अर्थांनी अमूलाग्र बदलून गेलेला आहे. या बदलाचा वेग मनुष्याच्या आकलनाच्या वेगाच्या तुलनेत खूप जास्त आहे. बादलांचं हे सत्र इतक्यात थांबणारं नाही. येत्या दशकभरात जग अजून बदलेल. होऊ घातलेल्या बदलांमधले काही बदल अपेक्षित असतील, काही अनपेक्षित, प्रसंगी अकल्पितही असतील.
आपल्यावरचे संस्कार आपल्याला बाहेरचं जग आणि आतलं जग असे दोन भाग पाडायला शिकवतात. बाहेरच्या जगाला आतल्या जगापासून आणि आतल्या जगाला बाहेरच्या जगापासून वेगवेगळं ठेवणारी 'मी' नावाची संकल्पना बहिस्थ प्रभाव आणि अंत:स्थ उर्मी या दोघांमध्ये होणाऱ्या व्यव्हरांगणिक सतत बदलत असते. या बदलांचा परिणाम म्हणून आपण गृहित धरलेल्या, तात्कालिक सत्य म्हणून स्वीकारलेल्या अनेक संकल्पनाही बदलतात, अभिव्यक्तीची परिभाषा बदलते आणि भाषाही बदलते.
आज, दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिवस आहे. मराठी भाषेमध्ये आपण रोज बोलतो, लिहितो, व्यवहार करतो, पण भाषेविषयी 'विचार' असा फार करत नाही, किंबहुना तो कसा करावा हे ही अपाण जाणत नाही. परिणामतः सरसकट मराठीकरण किंवा मराठीचं प्रमाणीकरण म्हणजे मराठीचं संवर्धन, मराठीचं शुद्धीकरण म्हणजे मराठीचं ब्राह्मणीकरण असे आणि यांच्यासारखे अनेक गैरसमज निर्माण होतात आणि त्यातून अनाठायी आग्रही भूमिका जन्म घेतात.
मराठी भाषा कोण्या एका जातीची, मनुष्याची, साहित्यिक-कलावंतांची, राजकीय पक्षाची, शासन दरबारी बसून भाषाविषयक धोरणं किंवा अभ्यासक्रम ठरवणाऱ्या मंडळी वा मंडळांची ज्याच्या-त्याच्या अट्टहासप्रमाणे चालणारी जहागीर नाही. मराठी भाषा ही मराठी बोलणाऱ्या स्थळ आणि काळाच्या चौकटीत त्या-त्या ठिकाणी उपस्थित आणि जिवंत असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनाची लघुत्तम सामायिक अभिव्यक्ती आहे, जी आजतागायत आपण जसे बदलत आलो, तशी बदलत आलेली आहे आणि इत:परही बदलत जाणार आहे.
एखाद्या प्रवासात आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा असतो तेंव्हा सोबतीला आपण कमीतकमी सामान ठेवतो, प्रवासाच्या ओघात आणि प्रवासाच्या विविध टप्प्यांत जिथे आणि जे जे मिळेल त्याचा स्विकार करतो. मराठी भाषेनेही तिच्या प्रवासात असाच लांबचा पल्ला गाठायला हवा असं एखाद्याला वाटत असेल, तर त्याने त्याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी आणि सुरुवातीदखल भाषेकडून आणि भाषेविषयी इतरांकडून असणाऱ्या अपेक्षांचं ओझं उतरवून ठेवायला हवं. लांबचे पल्ले गाठण्यासाठी आपण शरीरानं आणि मनानं सुदृढ आणि मोकळं असणं अपेक्षित असतं. त्याच न्यायानं भाषेच्या बाबतीतही भाषेला आकार देणारं व्याकरण निर्दोष आणि योग्य बदल आत्मसात करू घेण्यासाठी तत्पर असेल याची खात्री करून घेणं आवश्यक असतं आणि हे सगळं करताना 'मला' काहीतरी करायचं आहे म्हणून न करता मला 'काहीतरी' करायचं आहे या भावनेने हे 'काहीतरी' करणं गरजेचं असतं. कारण भाषा टिकवणं हे एका हयातीत होणारं काम नाहीच शिवाय तो अहंभूत मनिषा प्रक्षेपित करण्याचा सार्वजनिक कार्यक्रम तर त्याहूनही नाही.
या सगळ्या बदलांना आता तंत्रज्ञानाची किनारही मिळते आहे. तंत्रज्ञानाच्याच बाबतीत बोलायचं मी स्वतः माझ्या सव्वीस-सत्तावीस वर्षांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरं पाहिलेली आहेत. माझ्या आयुष्यातला पहिला (इंग्रजी) ब्लॉग मी वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे आजपासून साधारण बारा वर्षांपूर्वी लिहिला होता. बारा वर्षांपूर्वीच्या डिजिटल विश्वातल्या मराठीमध्ये आणि आजच्या युगातल्या डिजिटल विश्वातल्या मराठीमध्ये अनेक पातळीवर मूलभूत बदल झालेले आहेत, इथून पुढे अजून होणार आहेत, होत राहणार आहेत.
तेंव्हा सृजनच्या या डिजिटल युगाशी जुळवून घेताना भाषेत होणाऱ्या, बदलत्या भाषेमुळे आपल्यात होणाऱ्या आणि बदलत्या मनुष्यभावामुळे भाषेत होणाऱ्या बदलांना सामोरं जाताना आपण केवळ इंग्रजी शब्दांना प्रतिशब्द शोधून हे बदल थोपवू शकू आणि 'आपल्याला आवडणारी' भाषा आपण टिकवू शकू असं जर कोणाला वाटत असेल तर तो मनुष्य काल्पनिक विश्वात वावरतो आहे असंच म्हणावं लागेल. भाषेत होणारे बदल हे निव्वळ प्रतिकात्मक आहेत, खरा बदल आपल्यात होतोय- एक मनुष्य, एक मानव म्हणून.
तेंव्हा मराठी राजभाषा गौरव दिवस, मग त्या निमित्ताने घेतले जाणारे तेच ते उपक्रम, आग्रही भूमिका वगैरे गोष्टी ठीक आहेत- आपण जे आहोत, जसे आहोत त्याचीच ती अभिव्यक्ती आहे, पण आजच्या दिवसाचं निमित्त साधून नेमेची येतो पावसाळा या उक्तीच्या पुढे जाऊन आपण मराठी भाषेकडे बदल, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान या किमान तीन घटकांच्या पार्श्वभूमीवर पहायला हवं असं मला वाटतं आणि जर आपण खरंच निखळ मनाने असं पाहू शकलो तर आपल्या लक्षात येईल की राजभाषा किंवा गौरव वगैरे खूप लांबच्या गोष्टी आहेत, मराठी आणि मूळात भाषा म्हणजे काय हेच समजून घेण्यापासून आपणांस सुरवात करावी लागणार आहे!
- सौरभ राघवेंद्र.