भयकथा
माझ्या काही मित्र-मैत्रिणींना भयकथांचं भारी आकर्षण. कुठून कुठून अशा कथा जमवून छान रंगवून सांगणं त्यांना आवडतं. भयकथांशी माझी ओळख झाली ती माझ्या ह्या मित्रमंडळींमुळेच. मला भयकथा हा प्रकार विशेष आवडत…
माझ्या काही मित्र-मैत्रिणींना भयकथांचं भारी आकर्षण. कुठून कुठून अशा कथा जमवून छान रंगवून सांगणं त्यांना आवडतं. भयकथांशी माझी ओळख झाली ती माझ्या ह्या मित्रमंडळींमुळेच. मला भयकथा हा प्रकार विशेष आवडत नाही, त्यामुळे मी आपण होऊन त्यांच्या वाट्याला फार जात नाही, पण या मंडळींमुळे ज्या कथा माझ्या वाटेने आल्या, त्या सगळ्या कथांमध्ये कधी एखादा झपाटलेला वाडा असायचा, इच्छा अपूर्ण राहिलेलं एखादं भूत असायचं किंवा किंवा मग एखादा अतृप्त आत्मा तरी! ह्या गोष्टी काल्पनिक असल्या (किंवा नसल्या) तरी कथेची रचना आणि त्यांचं सांगणं ह्या गोष्टींमध्ये त्या क्षणी भय निर्माण करण्याची कमालीची क्षमता होती, धस्स व्हावं असा एखादा क्षणही या गोष्टीत होता, पण हे सगळं कल्पनांमुळं निर्माण झालेलं भय होतं.
मला आठवतं, आमच्या ओळखीचे एक गृहस्थ त्यांचे कामगार आणि कामाचं साहित्य घेऊन एका गावी गेले होते. ते गाव शहरापासून बरंच लांब होतं. काळ पंचवीस एक वर्षांपूर्वीचा, त्यामुळं वीज, पथदिवे या गोष्टी तिथे अद्याप पोहोचल्या नव्हत्या. बस किंवा रिक्षा वगैरे जे मिळेल ते घेऊन वाहनानं जाता येईल त्या शेवटच्या ठिकाणापर्यंत ते गेले आणि तिथून पुढे चालत निघाले. रात्र झाली होती, चंद्र-चांदण्यात जेवढं दिसत होतं तेवढ्याचा अदमास घेऊन जाता जाता थोड्या अंतरावर त्यांना शेकोटी दिसली. त्या शेकोटी भोवती निजावं आणि उजाडल्यावर पुढे जावं असं त्यांनी ठरवलं.
दुसऱ्या दिवशी ही मंडळी गावात पोहोचली तेंव्हा गावकऱ्यांनी त्यांना कधी आलात, कुठं थांबलात वगैरे वगैरे विचारलं. तेंव्हा या मंडळींनी सगळं सांगितल्यावर गावकऱ्यांनी डोक्याला हात लावला. ते म्हणाले की ती शेकोटी नव्हती, तर तिथे त्यांनी गावातल्याच एकाचं प्रेत जाळलं होतं. गावात स्मशानभूमी नसल्यानं त्यांना गावाच्या बाहेर हे असं करावं लागतं असं ते म्हणाले. आपण एक जळत्या प्रेताशेजारी झोपलो होतो या कल्पनेनं त्यांची कशी तंतरली असेल हे त्यांनाच ठाऊक!
पण या गोष्टीतही एक गम्मत आहे. त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं ते 'कल्पनेनं.' गावकऱ्यांनी त्यांना जर हे सांगितलंच नसतं तर ना त्यांना भीती वाटली असती ना त्यांनी त्याचा विचारही केला असता; पण प्रेत, मृत्यु, जळणं, रात्र अशा सगळ्याच गोष्टींबद्दलच्या विचार आणि कल्पनांनी जे चित्र त्यांच्या मानसमोर उभं राहिलं त्या चित्रानं त्यांना अस्वस्थ केलं.
हा सगळा विचार करून मला बऱ्याचदा असं वाटतं की काल्पनिक गोष्टींचंच आपल्याला एवढं भय वाटतं, की ज्या वास्तवाकडे पाहून आपाल्याला काळजी आणि खरोखरच भीती वाटायला हवी ते वास्तव आपल्या खिजगणतीतही नसतं. भयकथांमध्ये इमोशनल स्टिम्युलस देण्याची जबरदस्त क्षमता असते; पण वास्तवाचं तसं नाही, ते बोअरिंग असतं. त्यामुळे एका भल्या मोठ्या भयकथेचा आपण भाग असूनही त्या सहभागाबद्दल आपण अनभिज्ञच असतो शिवाय या अनभिज्ञ अवस्थेमधून घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करण्याबाबतही आपण कमालीचे उदासिन असतो आणि ही उदासिता हा निष्काळजीपणा आपल्या वर्तमानात भावी भयकथांची बीजं पेरत राहतो आणि जीव धरलेल्या बीजचं पोषण करत राहतो.
चीन मध्ये जेंव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की कोरोना नावाचा व्हायरस नव्या रुपात जन्माला आलेला आहे तेंव्हा ही बातमी दाबण्याचा सरकारदरबारी यथाशक्ती प्रयोग झाला होता. कोरोनाचा जन्म आणि तो त्याच्या पसरण्याची शक्यता हे वास्तव धडधडीत असूनही हे जगाला कळलं तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर तिचा विपरीत परिणाम होईल या कल्पनेतून निर्माण झालेली भिती त्या दबावापाठी होती. (ती कल्पना अखेर खरी ठरली हा भाग वेगळाच.)
कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात होऊ लागला तेंव्हाही आपल्याला असलं काही होत नाही या कल्पनेपासून आपल्याला झालाय आता पुढे काय! याविषयीचया हजार कल्पनांनी, क्वारंटाईनविषयीच्या अनेक कल्पनांनी जी अस्वस्थता इथल्या लोकांमध्ये निर्माण केली ती आपल्याला कोरोना झाला आहे आणि तो बरा होऊ शकतो या सध्या सरळ जाणिवेपेक्षा किती प्रलयंकारी होती! ह्या भिती आणि अस्वस्थतेपोटी त्या व्यक्तीनं रेल्वे मधून प्रवास केल्यानं आणि त्यामुळं त्या रेल्वेतल्या काही लोकांना जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर!? या शक्यतेचा विचार करता करता जे कल्पनाचित्र उभं होतं ते चित्र आणि वास्तवात येण्याची शक्यता आहे ही जाणिव या दोन्ही गोष्टी मूळातच किती भयप्रद आहे!!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून एका काल्पनिक भयानं पोल्ट्रीच्या व्यवसायाचा कणा अक्षरशः मोडला. कोण्या एका व्यक्तीला असं वाटलं की अंड्यातून आणि चिकन खाण्यामधून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्याने ती कल्पना शेअर करताच त्यातून निर्माण झालेल्या भयावर स्वार होऊन ती कल्पना एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशभर पसरली की पोल्ट्री उद्योग देशोधडीला लागण्याची पारिस्थती निर्माण झाली. बाकी शेअर मार्केटची तर कथाच निराळी!
आम्ही मित्र-मैत्रिणींमध्ये ज्या भयकथा एकमेकांना सांगतो त्या कथा त्यांच्या ठिकाणी परिणामकारक असतात पण तो परिणाम तत्क्षणिक असतो. मात्र 'ज्या गोष्टीची भिती होती तेच झालं' या वाक्यानिशी सुरू झालेल्या किंवा संपलेल्या कथांची धाटणी पूर्णपणे वेगळी असते. कारण इतर कथा तुम्हाला वास्तवातून कल्पनेकडे घेउन जातात, इथे हा प्रवास पूर्णतः उलट असतो. एका भयप्रद कल्पनेचं वास्तवामध्ये होत जाणार रूपांतर आपण पाहतो, तेंव्हा कल्पनांशी चाळे करणारा आपला स्वभाव अचानक वास्तवाला येऊन धडकतो. ही धडक पूर्णतः अनपेक्षित असते आणि नंतर जो केऑस होतो तो तर आपण पाहतोच आहोत!
वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ह्या भयाचा सामना करण्यासाठी आपण पुन्हा कल्पनांचाच आधार घेत आलो आहोत. मग त्यात देवादिकांबद्दलच्या कल्पना असतील, धार्मिक विधींमधून काही तरी बरं निष्पन्न होईल अशी कल्पना असेल, किंवा कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशा योगयोगातून निर्माण झालेल्या घटनेची आठवणआणि त्या आठवणीमुळे असं केलं तर तसं होतं हा त्यामुळं असंच करा किंवा तसं करू नका असा पायंडा असेल, बी कारेजिअस इन द फेस ऑफ फिअर असं सांगणारा कोणी काल्पनिक हिरो असेल, किंवा अगदी शेणाच्या गोवऱ्या जाळल्याने कोरोना बरा होतो अशी कल्पना असेल.. या कल्पनांची अभिव्यक्ती वेगवेगळी असते पण खोलवर जो मनोव्यापार सुरू असतो तो मात्र सगळीकडे समानच असतो.
याविषयीची आपली आणखी एक समस्या म्हणजे भयाचं स्वरूप समजून घेण्याबद्दल आपल्यातली कमालीची अनास्था. भयाला सामोरं जा असं आपल्याला सगळेच सांगतात, पण भय म्हणजे काय हे मात्र कधीच कोणीच सांगत नाही हे आपल्या कधी लक्षात आलं आहे का? नसेल ते यायला हवं. भिती, भय ह्या शब्दांच्या पुढे जाऊन अंतरंगात जे व्यव्हार होतात त्याबद्दलची सावधानता आपल्या ठायी यायला हवी, ती येणार नाही तोवर आपण कोन्स्पिरसी थिअरीज वर विश्वास ठेऊ, धर्माच्या-देवाच्या नावाखाली जे सांगितलं जातं ते मुकाट्यानं सहन करू, व्हाट्सऍप वर कोणी तरी सांगतं म्हणून तुळशीचं पान खाऊन कोरोना बरा होतो या संभ्रमात राहू आणि अखेर या सगळ्या गोष्टींमध्ये विसंगती दिसते म्हणून यावर विनोद बनवत राहू! अर्थात विनोद बनवणं आजिबातच अयोग्य नाही, पण केवळ हसण्यानं विसंगती दूर होत नाही.
या सर्व स्थितीला आपल्या समाजाची रचनाही काही अंशी कारणीभूत आहे असंही मला जाणवतं. आपण पलायनवादाला सांस्कृतिक घटक असल्याप्रमाणं जवळ केलंय. वास्तवाचं अळणी असणं आपल्याला मुळातूनच इतकं भंडावून, बिथरवून सोडतं की त्यावरचा उतारा म्हणून काही तरी चमचमीत शोधायला आपण जातोच आणि या शोधयात्रेतच आपलं भयाची पहिली ठिणगी पडलेली असते. ज्या गोष्टीपासून आपण दूर जातो आहोत ती गोष्टच आपला पाठलाग करत आली तर? ही कल्पना इथे जन्म घेते, आणि ती कल्पना जेंव्हा खरंच सत्यात उतरते तेंव्हा मात्र आपण पार सैरभैर होऊन जातो, कारण वास्तवाला सामोरं जाणं म्हणजे काय आपल्याला ठाऊकच नसतं आणि जे आपल्याला ठाऊक असतं, ते सगळंच काल्पनिक!
आजही कोरोना नावाचं जे वास्तव आपल्यासमोर धगधगतं आहे ते समजून घेणं आणि नीरक्षिरविवेकबुद्धीनं कल्पनांना त्या वास्तवापासून दूर ठेवणं ही एवढी कृती तरी आपण करूच शकतो, पण हेही आपल्याला अवघड वाटतं कारण कल्पना उसन्या मिळतात, फुकट मिळतात, कृती ही आपण होऊन करावी लागते. अशी कृती आपल्याच्याने होवो न होवो या आपत्तीच्या निमित्तानं आपण कल्पना उसन्या घेण्याच्या वृत्तीला ओळखू जरी शकलो तरी ते खूप मोठं सामाजिक कार्य होईल असं मला वाटतं. बाकी जे होऊ शकतं, ते होऊच शकतं!
-सौरभ राघवेंद्र.