•mr•

बोका

म्हातारी. आपल्या अंगणातल्या झाडाझुडूपांमध्ये तल्लीन झालेली, प्रत्येक झाडाची नीट निगा राखणारी, झाडाला नियमित खत पाणी करणारी. म्हातारी.

म्हातारी. आपल्या अंगणातल्या झाडाझुडूपांमध्ये तल्लीन झालेली, प्रत्येक झाडाची नीट निगा राखणारी, झाडाला नियमित खत पाणी करणारी. म्हातारी.

ती झाडं म्हणजे पोटच्या पोरीच्या लग्नात बसलेली सासरकडची मंडळीच जणू, त्यांना जातीनं विचारवं तिने काय हवं अन् काय नको ते. कुठल्या झाडावर कुठल्या पक्षाचं घरटं आहे हे तिला विचारवं. एखाद्या पक्षानं आपल्या घरट्यात अंडी घातलीन् किंवा एखाद्या पक्षिणीच्या घरट्यात नवजात पिलांची चिवचिव सुरु झालीन् की आजीचा त्यांवर करडा पहारा. हो ! नाही तर एखादा बोका येऊन मारेल की डल्ला ! केवढेसे ते जीव ! त्या पिलांकडे बोक्याची नजर जाते तोच बोक्याच्या मागे आजी केरसुणी घेऊन उभी !

फुलांचं तर या आजीला भारी वेड ! किती ती फुलझाडं तिच्या दारी ! गुलाब म्हणू नका, जास्वंद म्हणू नका, मोगरा म्हणू नका, पारिजाताच्या सड्याने तर अख्खं अंगण भरून गेलेलं ! किती ती झाडं अन् किती ती फुलं ! पण म्हणून म्हातारीनं कधी एकही फूल नाही तोडलं. अगदी देवासाठीही नाही. ती म्हणे, “देवाचंच तर फूल. झाडावर राहिलं काय आणि चरणी वाहिलं काय, एकच. झाडावरून तोडून त्या बिचाऱ्याच्या हत्येचं पातक आपल्या माथी कशाला !” आजीची सून तक्रार करत असे. म्हणे, “अहो सासूबाई ! शेजारणीचा देव्हारा पहा जरा कसा मढवते ती फुलाने !” मग म्हातारी म्हणे, “मी मेल्यावर मढवा काय मढवायाचं ते !”

बर. मिसळलं मातीत. जाताना सांगितलं सुनेला, “बाई गं, माझं काही खरं दिसत नाही आता, तेंव्हा मी सांगते तशीच जप गो बाय ती बाग आपली. खत-पाणी करीत जा ! बोक्यावर लक्ष ठेव- नजर असते मेल्याची घरट्यांवर ! आणि हो ते गुलाबाचं झाडं आहे ना तिकडे कुंपणाला लागून, ते तेवढं नीट जप हो जरा. यांनी दिलं होतं मला पंचाहत्तरीला. शेवटची आठवण आहे यांची. तेंव्हा जप ते नीट. आणि मी गेल्यावर माझ्या नावाने पण एक रोप लाव कुठले तरी. बरं का !” असं म्हणता म्हणता तिचा आवाज कापरा होई. पलंगाला लागून असणार्‍या खिडकीतून दिसणारी बाग धूसर होत.

म्हातारीचं अख्खं आयुष्य खपलं होतं या बागेत. लग्न करून ही सासरी आली तेंव्हा नाही म्हणायला अंगणात तुळस ती काय होती फक्त. पण बहरली ती खरी म्हातारीने ओढलेल्या पाण्यानेच. काय म्हणून नाही केलं तिनं तिच्या बागेसाठी ! पोटच्या पोराच्या मायेनं जपलं झाडांना. झाडावर रोग पडला तर म्हातारीला झोप नसे त्या झाडाच्या काळजीनं. एखादं झाड सुकलं, मेलं तर या म्हातारीची अवस्था अशी होई की पाहवत नसे. जीव लावला होता तिनं. माया होती तिच्या सुरकुतलेल्या थरथरत्या हातात.

म्हातारी जाऊन वर्ष लोटलं. बागेची काळजी घेण्याचं काम ओघाने सुनेकडं आलं होतं. म्हणायला ती म्हातारीकडे सगळं शिकली होती बागकामामधलं. अगदी सगळं- फक्त त्या मुक्या पाना-फुलांवर माया करणं सोडून. कुंपणाजवळच्या गुलाबाच्या झाडानं पावसाची वाट पहात केंव्हाच मान टाकून दिली होती. 

त्यावर्षीचा पाउस नाही म्हणायला अंमळ उशिराच आला. येता येता शहरीकारणाच्या वाऱ्याशी संगत करून आला. बक्कळ पैश्याची स्वप्नं घेऊन आला. लावला मग सुनेने तगादा. आपल्या नवऱ्याला म्हणते कशी, “अहो ! शेजारणीने विकलेन् घर त्यांचे त्या शहरातल्या बिल्डरास अन् गेलेन् ते शहरातल्या ब्लॉकात राहायला. आपण पण जाऊ की. अहो ! ऐकताय ना...! ” नवरा नुसताच हूं म्हणे. तो बिचारा तरी करणार काय ! सापडला होता कात्रीत. म्हातारीची बाग सोडवेना, बायकोचा हट्ट मोडवेना. पण शेवटी पैश्याने मोहिनी घातलीच त्याच्यावर. झाला करार.

मग काय... एका सकाळी शेठने गडी माणसं बोलावली चार. चालवली कुऱ्हाड. छोटीशीच बाग साफ व्हायला वेळही नाही लागला फार.

संध्याकाळ झाली. पक्षी घरी आले. पाहतात तो काय ! आमची पिले गेली कुठे ? आमचे घरटे गेले कुठे? आणि आमची, आमची म्हातारी गेली कुठे ? एकच हलकल्लोळ त्या पक्ष्यांचा. एक कावळा त्या कर्णकटु चिवचिवाटात ओरडत होता आकांताने- “झडप घातलीन् बोक्याने. झडप घातलीन् बोक्याने. झडप घातलीन् बोक्याने !”

-सौरभ राघवेंद्र.