•mr•

चारशे शब्द

या फोटोविषयी लिहायला फार काही सुचलं नाही मला, सुचतही नाहीए. सुचायला हवं असा आग्रह नाहीए कोणाचा आणि खरं तर तसा आग्रह करणारंही कोणी नाहीए; पण आमचे चित्रकलेचे सर "लिहितांना शब्दांवर रेघा ओढत जा…

या फोटोविषयी लिहायला फार काही सुचलं नाही मला, सुचतही नाहीए. सुचायला हवं असा आग्रह नाहीए कोणाचा आणि खरं तर तसा आग्रह करणारंही कोणी नाहीए; पण आमचे चित्रकलेचे सर "लिहितांना शब्दांवर रेघा ओढत जा रे, शब्द बोडके वाटतात नाही तर!" असं सांगायचे आम्हाला. त्यांचं हे वाक्य मला फोटोबद्दलही तंतोतंत खरं वाटतं तुम्हाला सांगतो. त्यामुळे नुसताच फोटो शेअर करायचा म्हटलं की तो फोटो लै ओकाबोका वाटतो मला. माझ्या प्रत्येक फोटोविषयी काही तरी लिहिलंच पाहिजे ह्या अट्टहासाचं जन्म ह्याच ओक्याबोक्या वाटण्यातला आहे. (वाटण्यातला हा शब्द माझ्या किपॅडने 'वाटाण्यातला' असा लिहिला होता.) तर मंडळी, सांगायचं मुद्दा वगैरे काहीच नाहीए, सांगायला मुद्दाही नाहीए; पण प्रत्येक वेळी लिहायलाच हवं ही कंपल्सिव्ह नीड मला गप्प बसू देत नाही त्यामुळेच हे असे 'चार(शे?)" शब्द लिहिले जातातच माझ्याकडून! आता लिहायचंच म्हटलं तर लिहायला तसं पुष्कळ आहे माझ्याकडे. आय मिन, मी आज सकाळी किती वाजता उठलो, दिवसभर काय केलं, मी काल कुठला चित्रपट पाहिला, परवा कोणतं पुस्तक वाचलं, तेरवा कोणाला (व्हर्च्युअली) भेटलो इथपासून ते कोरोनामुळं हवालदिल झालेली अर्थव्यवस्था, मुसळधार पाऊस, भर पावसात तापलेलं राजकीय वातावरण, तळपायत चढलेला हा राजकीय ताप (गुडघ्यातल्या) मेंदूपर्यन्त पोहोचल्यावर "आय मिस माय कंपाऊंडर"वालं फिलिंग, राजकारणातले तीन छोटे-छोटे नातू आणि त्यांच्या परिपक्वतेच्या गोड-गोड गोष्टी, अख्खा रस्ता मोकळा असताना नेकम्या आमच्याच सोसायटीमध्ये येऊन बेसमेंट मध्ये माझीच गाडी शोधून आजूबाजूला मोकळे होणारे स्ट्रे भूभूज् आणि त्यांच्या पिलांच्या बाललीला.. एक ना अनेक तुम्हाला सांगतो! विषय कमी नाहीयेत आपल्याकडे, पण पांढऱ्या स्क्रीनवर ब्लिंक-ब्लिंक, ब्लिंक-ब्लिंक करणारा काळा कर्सर दिसायला लागतो तेंव्हा मात्र साला भेजा लॉक होता है अपुनका!!

आणि कसंय माहितिये का, सोशल मिडियावर लिहावंस वाटतच नाही मला हल्ली. एक तर ते सगळं टाईपत बसावं लागतं, त्यात शुद्धलेखनाच्या हजार चुका दुरुस्त केल्या तरी एक हजार एकावी चूक इनबॉक्सची घंटी वाजवत येतेच. त्यात करंट अफेअर्सवर लिहायचं तर तो करंट एखाद्याला नेमका नको तिथेच बसेल अशी भिती, त्यातून काही तरी लिहिलंच तर हजार पोस्ट्सच्या फीड मध्ये आपण लिहिलेलं कुठे तरी हरवून जाणार याची खात्री!!

पण हे असलं तरी आपण लिहिलेलं चार लोक नेटानं वाचतात, आपलेपणानं प्रतिक्रिया नोंदवतात तेंव्हा बरं वाटतं मला. वर आणि खाली शेकड्याने पोस्ट्स असूनही आपल्या काही शब्दांसाठी वेळ काढणारी चार लोकं आहेत या जाणिवेनं थोडंस समाधानही मिळतं. त्यामुळे शेवटी या समाधानासाठी लॅपटॉपवर कळांशी खेळ करण्याची इच्छा मला अधूनमधून अस्वस्थ करतच राहते. कळ म्हणजे बटण, बरं का! (गैरसमज नकोत म्हणून सांगितलं.) असो, झोपावं म्हणतोय आता. बघू, उद्या काही सुचतं का! गुड नाईट लोक्स!

-सौरभ राघवेंद्र

ता. क. - हे चार शब्द नसले तरी हा ताजा कलम धरून 'बरोब्बर' चारशे शब्द आहेत! नॉट दॅट एनिबडी केअर्स, पण तरी- हवा करायला काय जातं!