•mr•

कोव्हिड-१९ | भाग १: कोरोना आणि कॉन्स्पिरसी थिअरीज्

कॉन्स्पिरसी थिअरीज् आपल्याला नव्या नाहीत. उत्क्रांतीने आपल्याला न कळणाऱ्या गोष्टींमध्ये, घटनांमध्ये कळेल असा, ओळखू येईल असं एखादा पॅटर्न शोधण्याची क्षमता बहाल केली जेणेकरून अनोळखी गोष्टींना समजून घ…

कॉन्स्पिरसी थिअरीज् आपल्याला नव्या नाहीत. उत्क्रांतीने आपल्याला न कळणाऱ्या गोष्टींमध्ये, घटनांमध्ये कळेल असा, ओळखू येईल असं एखादा पॅटर्न शोधण्याची क्षमता बहाल केली जेणेकरून अनोळखी गोष्टींना समजून घेणं आणि गरज पडली तर त्यांचा सामाना करणं आपल्याला शक्य व्हावं. या शक्यतेची निकड मनुष्याच्या सुरक्षिततेशी संबंधित होती, किंबहुना आजही ती आहे. माहिती नसणाऱ्या, ज्यांचा अंदाज बांधता येणार नाही अशा किती तरी शक्यता आणि त्यातून निर्माण होणारे धोके आणि विशेषत: सध्याच्या माहितीयुगात सर्वसामान्य मनुष्याला पदोपदी जाणवणत राहणारी हतबलता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अनेक गोष्टी विशेषत: वाईट गोष्टी कोणी तरी विशिष्ट हेतु ठेवून घडवतं आहे अशी स्वभाविक प्रतिक्रिया मनामध्ये उमटते आणि मग अशा प्रतिक्रियांमधूनच विविध कॉन्स्पिरसी थिअरीज् जन्माला येतात.

अशातच मनुष्य समुहप्रिय प्राणी असल्यामुळं आपल्या विचारांशी जुळवून घेणाऱ्या, साधर्म्य असणाऱ्या समूहासोबत राहणं त्याच्यासाठी एक नैसर्गिक बाब असते आणि कदाचित तिथेच अशा थिअरीज् वर विश्वास ठेवणाऱ्या बिलीफ सिस्टिम्सचा जन्म होतो. मात्र ही बिलीफ, किंवा अशी एखादी थिअरी रॅशनल किंवा तर्कशुद्धच असावी असं आग्रह इथे धरला जात नाही. मनुष्याचा भावनाशील स्वभाव सहसा तर्कशुद्धतेपेक्षा सेन्स ऑफ बिलाँगिंग म्हणजेच आपण समूहात आहोत या भावानेमधून येणाऱ्या सुरक्षिततेला आपसूकच प्राधान्य देतो आणि फ्लॅट अर्थ कम्युनिटी, इल्युमिनाटी सारख्या संस्थांचं अस्तित्व किंवा केमट्रेल सारख्या थिअरीज् पुढे येतात आणि त्यांना बळ मिळतं जातं.

एसएआरएस-सीओव्ही-2 म्हणजेच कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाच्या आणि त्यामुळं उद्भवलेल्या वैश्विक संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण कॉन्स्पिरसी थिअरीज् वर विश्वास का ठेवतो, त्या विश्वासामधून आपण कोण-कोणत्या कृती करतो हा ऊहापोह होणं स्वाभाविक आहेच, पण कोरोना संदर्भात ज्या कॉन्स्पिरसी थिअरीज् सध्या चर्चेत आहेत त्यांची शहानिशा करणंही तेवढंच आवश्यक आहे.

कोरोना विषयी सर्वात पहिली आणि कदाचित स्वाभाविक कॉन्स्पिरासी थिअरी अशी आहे की कोण्या औषध कंपनीनं त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून प्रथम हा विषाणू पसरवला आणि थोडया दिवसांनी त्यावरचं औषध निर्माण करून चढ्या किमतीनं ते आता बाजारात विकलं जाईल. दुसरी थिअरी अशी आहे की मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अमेरिकन सैन्यानं मिलिटरी ऑलिंपीक गेम्सचं निमित्त साधून तो व्हायरस वुहान मध्ये आणला. चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असणारं व्यापारयुद्ध ही या थिअरीची पार्श्वभूमी होती. तिसरी थिअरी असं सांगते, की चीनच्या सत्ताधीशांनी पेन्शनचा खर्च कमी व्हावा यासाठी जाणूनबुजून हा व्हायरस बनवला आणि तो लोकांमध्ये पसरवला आणि त्यायोगे पेन्शनर लोकांची संख्या कमी केली.

या तीनही थिअरीज् बद्दल पुष्कळ उहापोह झाला, विशेषत: कोणती थिअरी खरी, कोणती खोटी या दृष्टीनं; पण या तिनही थिअरीज् मधला एक समान धागा 'नेचर मेडिसीन' या जर्नलमध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या, 'द प्रॉक्झिमल ओरिजिन ऑफ एसएआरएस-सीओव्ही-2' या रिसर्च पेपरच्या निष्कर्षांनी खोडून काढला.

या तिन्ही थिअरीज् कोरोना व्हायरस मानवनिर्मित आहे या गृहितकावर उभ्या आहे, पण ज्या संशोधनाअंती 'द प्रॉक्झिमल ओरिजिन' हा रिसर्च पेपर पब्लिश झाला त्या संशोधनात मात्र एसएआरएस-सीओव्ही-2 म्हणजेच कोरोना व्हायरस प्रयोगशाळेत बनवलेला आहे या विधानला पुष्टी देणारा कोणातही पुरावा नसल्याचं सिद्ध झालं, शिवाय मागच्याच वर्षी मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेल्या 'बॅट कोरोना व्हायरसेस इन चायना' या रिसर्च पेपरमध्ये, 'वाटवाघळामुळे होणाऱ्या एसएआरएस आणि एमएआरएस सारख्या कोरोनाव्हायरसच्या साथी पासरण्याची दाट शक्यता आहे आणि ही (घटना) चीन मध्ये होण्याची शक्यता वाढलेली आहे' असाही निष्कर्ष प्रसिद्ध झालेला होता.

'द प्रॉक्झिमल ओरिजिन' मधून पुढे आलेल्या संशोधनाचा निष्कर्ष हा संशोधनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावरून काढण्यात आलेला आहे. कदाचित म्हणूनच पेपरच्या शेवटी भविष्यातल्या संशोधनाची दिशा स्पष्ट करताना संशोधक, 'प्राप्त माहितीच्या आधारे एसएआरएस-सीओव्ही-2 हा व्हायरस जाणूनबुजून मॅनिप्युलेट केलेला नाही, त्याची निर्मिती उत्क्रांतीचा ‘नॅचरल सिलेक्शन’च्या नियमनुसारच झाली आहे असं जारी दिसत असलं तरी माणसांमध्ये तो नेमका कसा पसरला याविषयीच्या तर्काला पुष्टी देण्यासाठी अजून माहिती मिळणं आवश्यक आहे' असं सांगतात. याविषयीची आधिक माहिती आणि पुढचं संशोधन यथावकाश प्रसिद्ध होत राहिलच, आणि इतर गोष्टीही स्पष्ट होतील.

पण शेवटी एक सर्वसामान्य व्याक्ती म्हणून आपल्यापर्यंत पोहीचणारी माहिती क्वचितच फर्स्ट हँड असते. त्यामुळे अशा गंभीर विषयांची माहिती त्यातल्या त्यात विश्वासार्ह माध्यम शोधून शहानिशा करूनच घ्यावी लागते. या रिसर्च पेपरमध्ये हा विषाणू प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नसल्याचं सिद्ध केलेलं असलं, तरी या संशोधनाला छेद देणारा आणखी एखादा पेपर पब्लिश होणारच नाही असं मात्र आजिबात नाही. आणि भले तो झाला नाही तरी कोरोनाचा आंतरदेशीय प्रादुर्भाव ज्या प्रकारे झालेला आहे तो प्रकार अनेक ठिकाणी शंकांसाठी जागा ठेवतो हे नक्की. या शंकांच्या आधारावर अभ्यास करणारे, किंवा अभ्यास न करताच कथा रचणारे अनेक लोक आहेत, आणि त्या कथांमध्ये त कितीही तथ्य असलं किंवा नसलं तरी एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून आपला जो वर्तमान आहे त्यात विशेष फरक पडणार नाही. ही कॉन्स्पिरसी असो अथवा नसो, कोरोन आपल्या दारात येऊन उभा आहे हे धडधडीत सत्य स्वीकारून योग्य काळजी घेणं एवढं जरी आपण केलं तरी ते कार्य खूप मोठं आहे, कारण एका व्यक्तीचा प्रादुर्भाव टाळला तर त्याच्या जवळच्या किमान दोन व्यक्ती सुरक्षित राहतात असं विज्ञान सांगतं. या पॉडकास्टच्या पुढच्या एपीसोड मध्ये एसएआरएस, एमएआरएस म्हणजे काय, कोरोना व्हायरस म्हणजे नेमकं काय त्याची लागण होते म्हणजे काय होतं, हे जाणून घेऊच, पण त्याआधी आपल्यासाठी अविरत झटणारे डॉकटर्स, नर्सेस, पोलीस आणि शासन व्यवस्थेतल्या सर्वच कर्मचाऱ्यांच्या कार्याचा स्वतःची व्यवस्थित काळजी घेऊन सन्मान, आदर करू आणि आपल्या सर्वांचीच आयुष्य पूर्वपदावर येतील अशी प्रार्थना करू!

(क्रमश:)

-सौरभ राघवेंद्र