सायकल
सायकलवर इतकी धूळ जमली होती तुम्हाला सांगतो, फडक्यानं पुसायची सोय तर नव्हतीच, शिवाय पाण्याने भारलेली बदली उपडी केली तर मातीचा छान वास आला मला पहिल्या पावसात येतो तसा !! .
सायकलवर इतकी धूळ जमली होती तुम्हाला सांगतो, फडक्यानं पुसायची सोय तर नव्हतीच, शिवाय पाण्याने भारलेली बदली उपडी केली तर मातीचा छान वास आला मला पहिल्या पावसात येतो तसा !! .
पुण्यात सप्टेंबरमध्ये जो जलप्रलय झाला त्यात सायकलनं मोठा ट्रॉमा सहन केला होता, त्यामुळं तिला वर आणून ठेवलेली. आधी आतल्या खोलीतल्या बाल्कनीमध्ये तिची जागा होती, पण एके दिवशी फरशी पुसताना आमच्या कामवाल्या मावशींचं डोकं त्या सायकलच्या हँडलवर बडवलं. .
आता सायकलचं हँडल ते. आमच्या मावशींनी धक्का दिला तर अख्खी बाईक खाली पडावी; पण नाही.. नाकापेक्षा मोती जड. गेली तक्रार मातोश्रींकडे आणि सायकल आली आतल्या बाल्कनीमधून बाहेरच्या बाल्कनीमध्ये. .
पण मग सायकलला आता तिथे ऊन लागायला लागलं. त्यात आमच्या मातोश्रींच्या शाब्दिक सरी, 'तुला असं उभं केलं उन्हात तर?' मी म्हणायचो, 'आई मी काय सायकल आहे का? काही काय?' त्यावर ठरलेलं उत्तर, 'एवढं उत्तर देण्यापेक्षा तेवढ्या वेळेत दोनदा सायकल ठेवून आला असतास खाली.' आता ते वाक्य बोलायला मलाच तीन सेकंद लागतात. तीन सेकंदात सायकल खाली कशी ठेऊन येऊ मी? लिफ्ट मध्ये एक तर मावत नाही ती, आणि मावली तरी लिफ्ट आमच्या मजल्यावर यायलाच पाच सेकंद घेते. दोनदा कशी खाली ठेऊन येऊ? .
आईला हे सांगावं तर पुन्हा तेच, 'बोलायला हुशार आहेस तू, पण त्याचं कौतुक लहानपणी असतं. मोठे झालात ना आता आपण? वागा की मग थोडं मोठ्या माणसांसारखं.. आणि ते आरशात बघ जरा.. काय केस, काय दाढी..' आता सायकलीशी संबंध तरी आहे का काही याचा ? नाही ना? जाऊदे, असंचे आयुष्य माझं .
पण असं असूनही तिला तशीच उभी ठेवली तिथे. अखेर आई आज म्हणालीच, 'तू ठेवतोस आता पार्किंग मध्ये नेऊन की मी ठेऊ?' हो, ठेव असं म्हणायची इच्छा अशी जिभेच्या टोकावर आली होती, पण मग म्हटलं असो! आलीया भोगासी असावे सादर, रागावतील उगाचच आमुच्या मदर! ठेवली नेऊन खाली. ती सुद्धा दोन मजले जिन्यावरून उतरवून. खांदा दुखावला हो माझा ! चढवूनच कशी आणली होती देव जाणे.. .
बाकी मग देवानं तीन लेन्सेस दिल्यात कॅमेराला.. काढले फोटो खापाखप.. वर यायला निघालो तेंव्हा आवाज ऐकू आला एक, 'फोटो निकालते हो आप बस! चलाते नही क्या?.' आमच्या नेपाळी वॉचमनची दोन फूट चार वर्षांची पोर शेम्बुड पुसत मला विचारत होती. निघून आलो मी तिथून. ऐकून न ऐकण्याची कला अशी कमी येते कधी कधी.. .
आता सायकल दिमाखात (पुन्हा धूळ खात) उभी आहे पार्किंग मध्ये. सोमवारपासून आम्ही रपेटीवर दिसलो तर आश्चर्य नाका वाटून घेऊ, पण शेवटी ऐकलं नाही असं दाखवलं तरी लागायचं ते लागतंच हो.. .
सौरभ राघवेंद्र.