दप्तर
तू खूप मोठा हो, असं नाही सांगणार मी तुला. चौकस आहेस तू. मलाच विचारशील- आई खूप म्हणजे किती गं?
तू खूप मोठा हो, असं नाही सांगणार मी तुला.
चौकस आहेस तू. मलाच विचारशील-
"आई खूप म्हणजे किती गं?"
चार घरची धुणी-भांडी करते मी.
मी बापाडी काय सांगणार-
खूप म्हणजे किती ते?
तू खूप पैसा मिळव, असंही नाही सांगणार मी.
बघ ना, आपल्याच घरची तिजोरी तरी कुठं भरलेली असते सदानकदा?
अडतं कधी कधी पैश्यावाचून आपलं, नाही असं नाही..
पण निभावून नेतोच की नाही आपण सगळं ?
आनंदानं भरलेलं घर केंव्हाही बरं भरलेल्या तिजोरीच्या काळजीपेक्षा.
तू छान आनंदी रहा, बघ, काहीच अपुरं नाही पाडायचं मग.
तू शाळेत पहिला नंबर काढ, असं सुद्धा मी नाही सांगणार.
मलाच जेमतेम अक्षर ओळख, मग कुठल्या अधिकारानं सांगू मी?
पण बाळा एवढं कळतं बघ मला, आपल्या प्रगतीचं बीज शिक्षणात दडलंय.
तुला जेवढं शिकायचंय तेवढं शिकवेन मी, पण तू मात्र पूर्ण मन लावून शिक बरं !
न शिकलेल्या माणसांनी सुद्धा आयुष्यात खूप प्रगती केलीये, आपल्या मामाचंच
बघ की! पण तो सुद्धा म्हणतो कसा, "शिकलो असतो तर अजून पुढे गेलो असतो!"
बाळा, तुला माहितिये, मालकीणबाईची मुलं रोज शाळेतून येतात ना,
तेंव्हा बाई काय काय करून खाऊ घालतात त्यांना !
तुलाही वाटत असेल ना रे आपल्याला पण आईनं असं करून खाऊ घालावं काही तरी?
मालकीण बाईंनी काही केलं नाही खायला तर मुलं नाराज होतात त्यांची.
मग तू रे कसा एवढासा गुळ, चार शेंगदाणे खाऊन पाणी पिऊन निमूट खेळायला निघून जातोस कुठलीच तक्रार न करता ?
तुझा वाढदिवस येईल आता पुढच्या महिन्यात.
काय घ्यावं तुला ? विचारलं तर सांगतोस काहीच नको!
पण असं कसं? घ्यायला तर हवंच ना काही तरी!
मालकीणबाईंनी मागच्या वर्षी सायकल घेऊन दिली होती मुलाला.
तूझ्याएवढाच की तो पण. त्याची सायकल बघून मला वाटलं तू पण हट्ट धरशील !
पण तू चकार शब्द नाही काढलास त्याबद्दल ! कसं रे!
तुला जन्म देऊन, दुसऱ्या बाईसाठी परागंदा झालेल्या दारुड्या बापाच्या
आणि माझ्यासारख्या अडाणी आयेच्या पोटी असं लेकरू कसं जन्मावं?
कसं रे!?
तुला खरंच कळतं का रे सगळं? अगदी सगळं?
असं असेल तर केवढा मोठा झालायेस तू , हे तुला तरी माहितीये का?
की, की तुला काही कळतच नाहीये ह्या सगळ्यातलं, एवढा निरागस आहेस तू अजूनही?
पण काही असलं तरी मला तोच तो प्रश्न पुन्हा पडतो रे पुन्हा-
"माझ्या सारखीच्या पोटचा गोळा कसा एवढा शहाणा!?"
असं एकाएकी मोठं व्हायचं नसतं रे छोट्या मुलांनी!
नाही तर सांग ना- माझ्या मेलीच्या नशिबी तुझे बालहट्ट येणार कसे?
पण तुला तरी का सांगावं मी हे ! शेवटी दैवच बाळा ज्याचं त्याचं!
तेच बिघडवतं आणि तेच घडवतं! आपण सगळे निमित्तमात्र!
पण इतकंच वाटतं रे की माझ्या, तुझ्या बापाच्या- आयुष्याच्या नावानं वाट्याला आलेलं उष्टं जिणं तुझ्या वाट्याला नको यायला.
तू खूप मोठा हो, असं मी नाही सांगणार तुला.
तू खूप पैसा मिळव किंवा शाळेत पाहिला नंबर काढ,
असंही मी नाही सांगणार तुला.
पण बाळा, फक्त एवढंच कर की आपल्या परिस्थितीच्या ओझ्यामुळं
तुझ्यावरच्या जबाबदाऱ्यांनी भरलेलं दप्तर जेंव्हा जड होईल,
तेंव्हा पाय रेटत रेटत ते एकट्यानेच ते वाहून नको नेऊस.
थोड्या वेळासाठी मलाही घेऊ दे ते.
थोड्याच वेळासाठी का होईना,
मला घेऊ दे ते !
-सौरभ राघवेंद्र.