•mr•

धोरण

इंजिनिअरिंग, शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेविषयी पोटापुरतंही ज्ञान नसणाऱ्या आणि कोणत्याही विषयाची पूर्ण माहिती घेण्याविषयी किमान आस्थाही नसणाऱ्या अनेक लोकांचे इंजिनिअरिंगच्या नव्या धोरणाविषयीचे अन…

इंजिनिअरिंग, शिक्षण आणि शिक्षणव्यवस्थेविषयी पोटापुरतंही ज्ञान नसणाऱ्या आणि कोणत्याही विषयाची पूर्ण माहिती घेण्याविषयी किमान आस्थाही नसणाऱ्या अनेक लोकांचे इंजिनिअरिंगच्या नव्या धोरणाविषयीचे अनेक विनोद माझ्या वाचनात आले. एखादी गोष्ट व्यवस्थित वाचणं, नीट माहिती घेणं, मिळालेल्या माहितीवर स्वतंत्र विचार करून निष्कर्ष काढणं या गोष्टींच्या तुलनेत अर्धवट माहिती घेऊन एखादा उथळ विनोद करणं खूप सोपं असतं. सो, सांगणं इतकंच की 'हेडलाईन वाचून बातमी कळते' या मानसिकतेमधून आपण बाहेर यायला हवं.

इंजिनिअरिंगविषयीच्या नव्या धोरणाविषयी अनेक क्षेत्रज्ञ दोन्ही बाजूंनी बोलत आहेत. त्या चर्चेत तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला व्यक्त व्हायचंच असेल तर चर्चेच्या दोन्ही बाजू आधी नीट समजून घ्या, नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्या, त्यातल्या अडचणी आणि संधी समजून घ्या आणि मगच तुमच्या अभिव्यक्तीचं खरूज खाजवत बसा.

येत्या किती तरी वर्षांत इंजिनिअर होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी निर्णय घेणारं धोरण विनोदाचा विषय असू शकत नाही. ए.आय.सी.टी.ई.मध्ये काम करणारे लोक फेसबुकवर आपापल्या लिस्टमधल्या लोकांचे लाईक्स, वाहवा आणि खोचक कॉमेंट्स मधून मिळणारे चिप थ्रिल्स अनुभवण्यासाठी निर्णय घेत नाहीत, त्यापाठी किमान अभ्यास, विचार आणि चर्चा या तीन गोष्टी सहसा असतातच.

सो, फॉर व्हॉट इट्स वर्थ, मला इतकंच वाटतं की आपल्या देशात इंजिनिअरिंग हाच एक मोठा विनोद झालेला असताना, आता त्यात मूलभूत सुधारणा घडवून आणण्याची मूळ प्रक्रियाच ह्या विनोदवीरांनी विनोद म्हणून लोकांसमोर मांडू नये. सामाजिक संभाषणात विनोद जसा त्याच्या जागी महत्वाचा असतो, सारासार विचार करण्याची वृत्तीही तशीच आणि तितकीच महत्वाची असते. या दोन्ही गोष्टींना म्युच्युअली एक्सक्ल्यूझिव्ह ठरवून, 'आम्हाला ब्वा फक्त विनोदच कळतो' असं म्हणत (स्वतःचं) हसं करून घेण्यात नुकसान ज्या विषयाभोवती चर्चा होते त्या विषयाचं आणि पर्यायानं समाजाचं होतं याचं भान आलं तरी पुष्कळ आहे. इंजिनिअरिंग ही फार पुढची गोष्ट आहे.