•mr•

दोन वर्षं. (एक मुक्त-चिंतन)

दोन वर्षं !! बापरे !!

दोन वर्षं !! बापरे !!

काल-परवाच लिहिलं आहे हे असं वाटतंय मला !!

लिहिणाऱ्या व्यक्तीनं भूतकाळात विशेष रमू नये असं म्हणतात, पण राहवत नाही कधी कधी. विशेषतः त्या लेखांच्या बाबतीत ज्या लेखांनी लेखनाच्या नव्या प्रांताचं आपल्याला दर्शन घडवलं. स्वतःच्या मर्यादा ओलांडून पुढं जाण्याचं बळ आपल्याला दिलं. 'एक गोष्ट' ह्या लेख मालिकेचं असंच काहीसं स्थान माझ्या आयुष्यात आहे.

'एक गोष्ट' ह्या चार भागांच्या (अद्यापही) अर्धवट राहिलेल्या लेखमालेनं मला स्वतःच्या मर्यादा ओलांडून पुढं जाण्याचा विश्वास दिला. कथा किंवा कथानक म्हणून 'एक गोष्ट' तशी पुष्कळ अपरिपक्व आणि कच्ची आहे खरी, पण एखादी कथा लिहिण्याचा किमान प्रयत्न तरी करायला आता हरकत नाही ही खूणगाठ माझ्या मनाशी पक्की करण्यात ह्या लेखमालिकेचा बहुमूल्य वाटा आहे.

मनुष्य, त्याचा स्वभाव, नाती, नात्याचं व्यक्तीपरत्त्वे बदलत जाणारं स्वरूप, बदलत्या काळाचा नात्याच्या स्वरूपांवर होणारा परिणाम, त्या परिणामांचं मनोव्यावहारात उमटणारं प्रतिबिंब ह्या आणि मनुष्य आणि त्याच्या नातेसंबंधांच्या ओघाने येणाऱ्या कित्येक अशा गोष्टी माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा. ह्या जिव्हाळ्यापोटी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातुन आणि भोवतालच्या निरीक्षणातून आपसूकच मनामध्ये नोंदवल्या गेलेल्या किती तरी गोष्टी केवळ निरीक्षणंं म्हणून न नोंदवता त्याला मी कथेचं कोंदण देऊ शकतो हा आत्मविश्वास ही ह्या मालिकेने मला दिलेली अत्यंत छोटी पण तेवढ्याच मोलाची देण.

माझ्या जवळच्या मित्रांनी मला अनेक वेळेला ह्या कथेमध्ये पुढं काय होतं, पुढचा भाग कधी लिहिणार आहेस असे प्रश्न विचारले. काही प्रसंगी काही जणांनी पुढचा भाग लिहीच अशी विनंतीवजा प्रेमळ आज्ञाही केली. लेखनकलेचे प्राथमिक धडे गिरवत असतानाच (खरं तर दोन वर्षांनंतर अजूनही मी तेच प्राथमिक धडेच गिरवतो आहे), दोन वर्षांपूर्वी असा प्रतिसाद माझ्यासाठी खचितच प्रोत्साहनकारक होता. दुर्दैवानं ह्या कथेला मी पुढे नेऊ शकलो नाही, वीणाला उचित न्यायही देऊ शकलो नाही हे खरं आहे आणि त्याचं शल्य आजही माझ्या मनात आहे, पण अखेर काही गोष्टींचे योग जुळून यावे लागतात हेच खरं. 'एक गोष्ट' ह्या मालिकेच्या, पर्यायानं माझ्या आणि कथेतल्या पात्रांच्या नशिबी तो योग नव्हता असंच आता म्हणावं लागेल.

ह्या छोट्याशा प्रयत्नानं मला माझ्या लिखाणाच्या क्षमता दाखवल्या, पण मर्यादासुद्धा दाखवून दिल्या, विशेषतः पात्रांच्या निर्मिती आणि विस्ताराच्या अनुषंगाने येणाऱ्या मर्यादा. ज्यांना माझ्या लेखनशैलीचा अनुभव आहे त्यांच्या साठी माझी ही मर्यादा आणि ती ओलांडून पुढे जाण्यासाठी माझी धडपड ह्या गोष्टी नव्या नसाव्यात. ह्या धडपडीचा श्रीगणेशा झाला तो 'एक गोष्ट' पासूनच. व्यक्ती आणि वल्ली ह्या पुस्तकात शब्दांनी रेखाटलेल्या व्यक्तीचित्रांबाबत पुल जसं म्हणतात की ह्या व्यक्ती खरंच माझ्यासमोर आल्या तर मी त्यांना कडकडून भेटेन, ह्या कथेतल्या पात्रांबद्दल माझंही काहीसं तसंच आहे.

कथेचा नायक दिनू तथा दिनेश, रविवारच्या एका सकाळी अनपेक्षित मेसेज पाठवून त्याची विकेट घेणारी त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी वीणा ही कथेत पहिल्यापासूनच असणारी दोन पात्रं, कथेच्या ओघात आलेली दिनूची आई, त्याच्या बिल्डिंग मध्ये राहणारा तो छोटा मुलगा, शिवाय माझ्या मनामध्ये असणारी पण पुढं नं लिहिल्यामुळं मनामध्येच राहिलेली अनुराधा, सई, अवि अशी काही पात्रं- मला माझ्या डोळ्यांसमोर दिसत होती, पण कल्पना आणि वास्तव ह्यांचा यथोचित संबंध जोडणाऱ्या अनुभवाची कमतरता असल्यामुळं ह्या पत्रांना माझ्या अननुभवी लेखणीमध्ये उतरण्यापेक्षा कल्पनेच्या महाली राहणंच योग्य वाटलं. ह्या गोष्टीचं वैषम्य मला खचितच नाही, पण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ह्या पात्रांची आणि माझ्या वाचकांची भेट होऊ शकली नाही हा खेद मात्र माझ्या मनात आहे.

ह्या प्रयत्नात मी अजून एक गोष्ट अत्यंत जवळून शिकलो. एक व्यक्ती म्हणून मला माझ्या वैयक्तिक आयुष्यात येणारे अनुभव हे मी वैयक्तिक पातळीवरच ठेवायचे असतात. ह्या अनुभवांमध्ये आणि कथेतल्या पात्रांच्या अनुभवांमध्ये सरमिसळ होऊ देणं हे माझ्या मते तरी लेखनकलेशी प्रतारणा करण्यासारखं आहे. हा मुद्दा खरं तर सखोल चर्चेचा आहे, एका वाक्यात निकाली काढण्याजोगा तो नक्कीच नाही. पण मी जे जाणलं ते इतकंच होतं, की लिहिताना एक व्यक्ती म्हणून वैयक्तिक आयुष्यात घडून गेलेल्या प्रसंगांचे अंतस्थ संदर्भ लेखनात उतरणं हे अत्यंत नैसर्गिक असतं, पण वैयक्तिक आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी स्वतःच्या नावावर सांगता येत नाहीत म्हणून पात्रांच्या आयुष्यात ते पेरणं आणि तो मी नव्हेच म्हणून नामानिराळं होणं हा कलेच्या शुचिर्भूतपणाचा अक्षम्य विपर्यास आहे

स्वतःच्या आयुष्यातले प्रसंग एखाद्याला मांडायचे असतील तर ज्याने त्याने खुशाल आत्मचरित्र लिहावं, पण काल्पनिक पात्रांच्या आडोशानं उभं राहून आपला स्वार्थ साध्य करून कलेच्या स्थायीभावाची गळचेपी करणं मात्र योग्य नाही.

म्हणूनच माझ्या लेखनाच्या प्रवासात ही मालिका एक महत्वाचा टप्पा आहे. 'एक गोष्ट'चा पहिला भाग लिहिल्यानंतर लिहिलेल्या एकाही ललित लेखात लेखात मला सौरभ राघवेंद्र एक व्यक्ती म्हणून दिसणार नाही ह्याची खात्री झाल्यानंतरच ते लेख मी माध्यमांतून समोर येऊ दिले. वैचारिक लेखनाची गोष्ट वेगळी असते, तिथे मी माझे स्वतःचे विचार मांडत असतो, त्यामुळं तिथे माझं प्रतिबिंब अर्थातच पडतं, मात्र मी लिहिलेल्या कवितांचा नायक, कथेचा नायक भले प्रथमपुरुषी असतो पण तो कधीच सौरभ राघवेंद्र असत नाही, असणारही नाही आणि ज्या क्षणी तो तसा आहे असं मला आढळेल, त्याच क्षणी मी तो लेख, ती कविता, ती कथा लिहिणं बंद करेन

हे विशेष विस्तारानं सांगण्याचं कारण असं की ज्या लोकांना माझ्या लिखाणाचा पिंड ठाऊक नाही त्या लोकांचा माझ्याबद्दल अनाठायी गैरसमज होण्याची दाट शक्यता असते. मागे लिहिलेल्या 'डिटॉक्स' नावाच्या लेखामुळे हा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला. त्या लेखात उल्लेख केलेली गालावर खळी असलेली मुलगी कोण असं अनेकांनी मला विचारलं. ह्याही आधी मी लिहिलेल्या कवितांवरून तुझ्या कवितेतली ती नक्की कोण असं विचारणाऱ्या लोकांमध्ये काही लोक माझ्या जवळचे सुद्धा होते-आहेत.

फेसबुक म्हणा किंवा ब्लॉग म्हणा- ह्या माध्यमांना आपण सोशल मीडिया म्हणतो, पर्सनल मीडिया नाही. मग असं असताना माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या लिखाणामधून मांडतो असा ग्रह करून मला विचारणा होते तेंव्हा उत्तर देताना मला अत्यंत अवघडल्यासारखं होतं आणि कुठून आपण आपलं लिखाण प्रकाशित करून बसलो असं वाटायला लागतं. मला आठवतं, मागे एकदा असाच एक लेख मी लिहिला होता, तो वाचून माझ्या एक मैत्रिणीने, एवढा दुःखी नको राहात जाऊ, थोडं आनंदी काही तरी लिही असा 'मोलाचा' सल्ला दिला होता. त्या सल्ल्यापाठीमागची भावना मी समजू शकतो, पण ज्या पार्श्वभूमीवर तो सल्ला दिला जातो ती पार्श्वभूमी मात्र मला पटत नाही.

मला कधी कधी असंही वाटतं की कला आणि तिचे आविष्कार हे कुठे तरी कलाकाराला दिसलेल्या वास्तवाचं प्रतिबिंब असावं. मला दिसणारी एखादी गोष्ट वेदनादायी असेल आणि म्हणून मी व्यथित झालो आणि ती व्यथा मांडावी म्हणून काही तरी लिहिलं आणि त्यामुळं व्यथा हाच माझा स्थायीभाव आहे असं समजणं हे कितपत योग्य आहे ?

माणसाचे व्यवहार, त्याचे निर्णय, त्याची दुःख, त्याचे जय, त्याचे पराजय, त्याची वासना, त्याची लालसा, त्याची संवेदनशीलता- एक व्यक्ती म्हणून ज्या ज्या रंगाच्या छटांनी मनुष्य हे विश्व रंगवू शकतो, ते सगळे रंग हे 'आहेत'. त्यांचं असणं अत्यंत नैसर्गिक आहे. मला इतरांचं माहिती नाही, पण त्या असण्याला मी जेंव्हा माझ्या कलेतून मांडत असतो, तेंव्हा मी केवळ एक माध्यम ह्या पलीकडे तिथे असत नाही, आणि माध्यमाला स्वत:चं असं काहीच नसतं, भावनाही नाही.

आजपर्यंत मी केलेल्या लेखनाचा जो काही मोजका अनुभव माझ्या गाठीशी आहे त्या अनुभवावरून मी इतकंच सांगू शकतो, कुठल्याही कथेला, कवितेला, लेखाला स्वतःचं असणं असतं. ते असणं लिहिणाऱ्या व्यक्तीनं हिरावून घेणं हे फुलपाखराला चिमटीत पकडून त्याचे पंख कुस्करण्यासारखं आहे. कलाकार जाऊच दे पण सामान्य मनुष्यही हे असं कृत्य करणार नाही आणि यदाकदाचित जर त्याने तसं केलंच तर त्या कृत्याची विषबाधा त्याच्या मनाला होईल आणि त्याचं सगळं भावविश्वच कुरूप होऊन जाईल.

लिखाणाच्या बाबतीत मला कधी कधी असंही वाटतं की लिहिणं ही एका अर्थाने विवस्त्रीकरणाची आणि पर्यायनं आत्मनिरीक्षणाची प्रक्रिया असावी.

समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीला तत्त्वज्ञानाच्या दगडावर घासण्याची मला सवय आहे असं काही जणांचं माझ्याबद्दल मत आहे, आणि ते बहुतांशी खरंही आहे आणि लेखनाचा सुद्धा त्याच अंगानं विचार करून हे असे मजेशीर शोध मी माझ्यापुरते आणि माझ्यासाठी लावलेले असण्याची शक्यता आहे. शक्यता अशासाठी की आपल्या वागण्याचं नेमकं गणित हे खोलात जाऊन सोडवल्याशिवाय कळत नाही, आणि ते सुटावं एवढ्या खोलात मी अद्याप शिरलेलो नाही, पण हे असं असताना माझं तत्त्वज्ञान हे कुण्या पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य तत्त्वज्ञाच्या बोजड पुस्तकातून आलेलं नाही, गीता किंवा उपनिषदं आशा ग्रंथाच्या श्लोकातून आलेलं नाही. ते माझ्या रोजच्या अगदी रोजच्या आयुष्यातुन पाझरलेलं आहे.

त्यामुळं दैनंदिन आयुष्याशी विसंगत आणि परस्पर विरोधी संकल्पनांनी भरलेल्या शंभर पुस्तकांची बाडं अभिमानाने कंठस्थ करून ह्याने अमुक म्हटलंय, त्याने तमुक म्हटलंय असं सांगून झाल्यावर तुला स्वतःला तुझ्या स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहिल्यावर काय वाटतं ते मला सांग असं म्हटल्याबरोबर पुन्हा ह्याने अमुक म्हटलंय, त्याने तमुक म्हटलंय अशी सुरुवात करून ह्या चर्पटपंजारीला तत्वज्ञानावरची चर्चा म्हणणाऱ्या लोकांचं आणि माझं विशेष पटत नाही आणि खरं तर ह्या दुर्दैवी विसंवादाने मला विशेष फरकही पडत नाही.

माझं नातं माझ्या वास्तवाशी आहे. मार्क्सनं काय सांगितलं आहे, विवेकानंद काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले हे मला त्या व्यक्ती समजून घेण्यासाठी जाणून घेणं महत्वाचं वाटतं, पण माझ्या आयुष्याच्या वास्तवतेकडे त्यांच्या चष्म्यातून पाहणं मात्र मला इंद्रायणी तांदळाचा भात खाताना घासात आलेल्या खड्यासारखं खटकतं. माझ्या वास्तवाची, त्याचा शोध घेण्याची किंवा ते काय आहे हे सांगण्याची जबाबदारी माझ्या धर्माची, कोण्या तत्त्वज्ञाची किंवा फ्रॉइड आणि युंग नावांच्या मानसशास्त्रज्ञांची असूच शकत नाही, ती सर्वस्वी माझी आहे. आणि कदाचित स्वतः शोध घेण्याची भीती वाटते म्हणून इतरांनी लावलेल्या शोधांमध्ये आपण कुठे बसतो का हे शोधू पाहणाऱ्या माणसांसाठी मला मनापासून वाईट वाटतं.

धर्मानं सांगितलेलं काही, किंवा मोठ्या मनुष्यानं सांगितलेलं काही केवळ त्या सांगण्याचा स्रोत प्रसिद्ध आणि ज्ञात आहे म्हणून ते सत्य असेलच असं नाही आणि ते नसेल असंही नाही, पण आपल्या ठायी स्वयंप्रज्ञाच नसल्यानं आपण ते सत्य मानून समाधानी होतो. कोण काय तत्त्वं सांगतं ह्यापेक्षा माझ्या रोजच्या आयुष्याशी त्या तत्त्वाचा काही संबंध आहे का हे आपण तपासून पाहायलाच हवं. तो असला तर चांगलंच आहे, पण नसला तर ते नाकारण्याचं धाडस आपल्याठायी असायला हवं. आपल्यापाशी मुळातच आपल्या स्वतःच्या हक्काच्या म्हणाव्या अशा खूप कमी गोष्टी असतात मग असं असताना आपल्या जगण्याचं अधिष्ठान कोण्या व्यक्तीला किंवा धर्माला आंदण द्यावं का हा ज्याचा त्यांनं सोडवायचा प्रश्न आहे.

हा प्रश्न सोडवणं सोपं खचितच नाही. आपण ज्या गोष्टींना प्रमाण मानलं त्या सगळ्या गोष्टींची सत्यासत्यता तपासून पाहण्यापासून ह्या उत्तराच्या शोधाची सुरुवात होते आणि ही सुरुवातच मुळात कित्येकांना भयचकित करते.

सत्याच्या शोधासाठी आपण निर्भय असणं आवश्यक असतं, पण पहिल्यापासूनच भयग्रस्त असतो. आपण धर्माच्या, विचारसरण्यांच्या आडोशानं आपलं आयुष्य उभं करतो, व्यक्ती, वस्तू आणि पैसा ह्या गोष्टींशी असणाऱ्या संबंधामध्ये सुरक्षितता शोधतो. स्वतःच्या पायावर स्वतःचं आयुष्य उभं करण्यासाठी लागणारी कुवत आणि प्रज्ञा आपल्या ठायी नाही आणि सुरक्षिततेच्या हव्यासाने आपल्याला इतकं आंधळं केलं आहे की आपल्या समोरच असलेल्या ह्या ज्वलंत वास्तवाकडे उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही !

मात्र लेखन किंवा कलेची इतर माध्यमं ही क्षमता पुन्हा मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत करतात. आपण एखाद्या विषयाबद्दल लिहिताना काय लिहितो आणि काय लिहायचं टाळतो इथपासून सुरू होणारा हा सत्यशोधनाचा प्रवास निरंतर सुरूच राहतो.

ह्या प्रवासाची गोडी शब्दात नाही सांगता येत. हा प्रवास एकदा सुरू झाला की मग निर्मिती आणि सृजनाचं अधिष्ठान बदलतं आणि कलावंताचा दृष्टीकोन सुद्धा. म्हणूनच कदाचित अर्धवट राहिलेला एखादा लेख पूर्ण करण्याची इच्छा, लिहिलेला लेख माध्यमातून पोहोचवून प्रतिक्रियांची वाट पहात बसणं ह्या आणि आशा किती तरी सुलभ गोष्टींचं मला आता विशेष अप्रूपच राहिलेलं नाही शिवाय मला लिहायचं नाही, शोधायचं आहे म्हटल्यावर हे स्वाभाविकच असावं असं मला वाटतं.

'एक गोष्ट'चे पुढचे भाग मी कधी लिहीन किंवा मुळात लिहीन की नाही, मला ठाऊक नाही पण त्या लेखाला दोन वर्षं झाल्याच्या निमित्तानं हे मुक्त चिंतन मांडण्याची संधी मला मिळाली, ह्यातच काय तो खरा आनंद आहे.

-सौरभ राघवेंद्र.