एक प्रश्न
एखाद्या न्यूनगंडानं पछाडलेली माणसं जेंव्हा बाकीच्या लोकांना त्यांच्या प्रिव्हिलेज्ड असण्यावरून सुनावतात आणि त्यांची संवेदनशीलता बेगडी आहे असं सुनावून त्या सुनावणीला येणाऱ्या उग्र दर्पामध्ये काही क्…
एखाद्या न्यूनगंडानं पछाडलेली माणसं जेंव्हा बाकीच्या लोकांना त्यांच्या प्रिव्हिलेज्ड असण्यावरून सुनावतात आणि त्यांची संवेदनशीलता बेगडी आहे असं सुनावून त्या सुनावणीला येणाऱ्या उग्र दर्पामध्ये काही क्षणांसाठी मनमुक्त लोळून घेतात तेंव्हा त्यांच्या वृत्तीची किळस वाटते.
कुठल्या तरी भलत्याच वेदनांची चटक लागलेल्या यांच्या संवेदनांना आणि केवळ काळोखातच भिरभिरणाऱ्या ह्यांच्या डोळ्यांना आमची भर उन्हात चालेलेली मरमर म्हणजे कोवळ्या उन्हातला पोरकट खेळ वाटतो आणि तो पाहून, 'वेदना काय त्या फक्त आम्हालाच माहिती' असं म्हणून फणा काढून कुठल्या तरी अगम्य संदर्भांचा फुत्कार टाकत ही मंडळी हिरिरीने त्यांच्या त्यांच्या त्यांच्या बिळातून बाहेर येतात.
वेदना कोणा एकाची मक्तेदारी नाही. दुःख कोण्या एकाच्या बापाचा माल नाही. काळवंडलेल्या न्यूनगंडाच्या नावाखाली हिणकस अहंगंड पोसणाऱ्या ह्या सगळ्यांच्या थोतरीत एक एक आणि ढुंगणावर चांगल्या दोन चार हाणाव्या वाटतात संयम संपतो तेंव्हा; पण शेवटी ह्यांच्या तकलादू संवेदनेचा सांभाळ आम्हा प्रिव्हिलेज्ड मंडळींनाच करायचा असतो, यांना 'समजून' आम्हीच घ्यायचं असतं नाही तर यांच्या भटकण्याला सुमार तरी रहावा का?
अशा लोकांची तथाकथित कलात्मक अभिव्यक्तीसुद्धा आमच्या आयुष्यांवर उगवलेल्या बांडगुळापेक्षा वेगळी नसते. आमच्या आनंदावर खार खाल्ल्याशिवाय, आमचा उपभोग कसा हिणकस आहे हे दाखवून दिल्याशिवाय, आमच्या दुःखांशी त्यांच्या दुःखाची साग्रसंगीत 'तुलना' केल्याशिवाय यांना पाणी सुटत नाही. त्यात असं व्यक्त होताना समस्त दुःखी आणि शोषित वर्गाच्या सार्वत्रिक आणि सार्वकालिक दुःखाचे आपणच वाहक वगैरे असल्याच्या जाणिवेची पांढरी-पिवळी फुलपाखरं यांच्या पोटात खेळत असतात ती वेगळीच.
जगापासून स्वतःच स्वतःला तोडून घेऊन वर आम्हाला कोणी जोडून घेतच नाही अशा ढोंगी क्रंदनाचा उठताबसता टाहो फोडणाऱ्या लोकांना जवळ करावं तरी कसं? आमचं प्रिव्हिलेज्ड आयुष्य जगणं सोडून आम्ही 'यांच्यामते' ज्या 'खऱ्या' वेदना असतात त्या वेदनेच्या चिखलात उठता बसता लोळत रहावं का जेणेयोगे समदुःखाचे ओलसर सैलसर निसटते धागे-बिगे आम्हाला एकत्र आणतील? की ह्यांच्या प्रत्येक पिचकारीमध्ये विश्व हलवून सोडणाऱ्या वेदनेच्या हुंकारांचं प्रतिबिंब कसं सुंदर दिसतं आणि आम्हाला यांच्यात उद्याच्या बंडखोराची प्रतिकृती दिसते असं म्हणत यांची चाटत रहायची?
प्रश्न पडतो मग मला! माझ्यासारख्या सुखवस्तू लोकांबद्दल पराकोटीचा तिटकारा, हेवा, राग, पोटशूळ, आकस आणि चिड असणाऱ्या अशा लोकांना जवळ करायचंच तरी का? पण मग वाटतं की त्यांच्या या अपभ्रमित मनोवस्थेला कारण असणाऱ्या समस्त परिस्थितीपासून मी कोणी वेगळा नाही, यांची तथाकथित बंडं माझ्या असण्याभोवतीच गुंफलेली आहेत, किंबहुना माझ्या असण्यापासूनच मुळात यांच्या भावविश्वाची सुरुवात होते आणि माझं 'असणं' यांच्या 'असण्याला' उठसुठ सुरुंग लावतं बसतं.
यांच्या वैचारिक आणि भावनिक शोषणात माझा स्वतःचा थेट सहभाग नसला, तरी यांच्या शोषणाला हातभार लावणाऱ्या बहिस्थ इकोसिस्टिमचा भाग म्हणून प्रामाणिक निस्वार्थी जबाबदारीनं आणि निर्मळ आपुलकीनं यांच्या जवळ जावं तर अंतस्थ वैचारिक शेणानं माखलेल्या यांच्या दुगाण्या सुरू होतात आणि त्यांना कंटाळून आम्ही दूर निघालो की आम्हालाच पळपुटे म्हणणारा यांचा टाहो सुरू होतात.
स्वतःला रमवण्यासाठी स्वतःच्या हातांनी आयुष्यात काहीच करता येत नाही म्हणून काचेच्या पलिकडचं आमचं कँडल लाईट डिनर पहात सर्वच अर्थांनी गरम होणाऱ्या आणि त्या उसन्या गर्मीमध्ये स्वतःची अभिव्यक्ती शोधून त्याला मूल्यं वगैरे चिकटवणाऱ्या किती तरी व्यक्तींच्या किमान दहा ते वीस पोस्ट माझ्या फेसबुकची भिंत रोज ओली करतातच. अशा लोकांशी संवाद साधण्याची, त्यांना समजून घेण्याची प्रामाणिक इच्छा आजही प्रत्येक वेळी माझ्या मनात जागी होते; पण अशा वृथा प्रयत्नांच्या आठवणीही त्याचवेळी जाग्या होतात आणि माझा गोंधळ होतो. तो गोंधळ मिटेपर्यंत संवाद साधण्याची वेळ निघून गेलेली असते आणि दरम्यानच्या काळात शांत असण्याचे त्यांच्या दृष्टीने सोयीस्कर अर्थ लावून त्याही वर होहल्ला करण्यात ही मंडळी यशस्वी होतात.
ही असली बांडगुळं मला स्वतःला कधी उमजणार आहेत कोण जाणे! जीव आहे म्हणून वाढू द्यावं तर वृक्षाला विळखे घालण्यात धन्यता मानणाऱ्या लोकांना- 'तुमच्या आयडेंटिटीचा क्रायसिस तुम्हाला लखलाभ' असं म्हणण्याच्या पलीकडे फारसं उरत नाही मग काही. ज्या व्यवस्थेकडून न्यूनगंड घ्यायचा त्याच व्यवस्थेला या गंडाचं पोषण करून त्याचा विखारी अहंगंड करण्यासाठी वापरून घ्यायचं आणि वर याच व्यवस्थेवरच दुगाण्या झाडायचा आतबट्ट्याच्या व्यवहार करणाऱ्या या कुपमंडुक लोकांची कुठलाही मूलभूत बदल घडवण्याच्या दृष्टीने उपयोगिता फक्त शून्यच असते.
पण तरीही यांच्या अतिरेकी अभिव्यक्तीला डिसप्रपोर्शनेट महत्व न देता, त्या अभिव्यक्तीपाठी दडलेली (वि)संवादासाठी हपापलेली व्यक्ती एकटी, एकाकी नाही शिवाय ती व्यक्ती स्वतः कितीही उपद्रवी असली तरी त्यांना सांभाळून घ्यायला आम्ही आहोतच हे आपापल्या परीनं होणारं किडुकमिडुक कृत्य करून सतत जाणवून देणारी आणि तरीही ते कृत्य वरवरचं, उथळ कसं आहे हे 'समजवणारी' यांची 'सार्थ,सखोल' बडबड निमूट ऐकून घेणारी, आपल्या आपल्या व्यापात अडकूनही यांच्या वेदनेचा प्रामाणिक जबाबदारीने विचार करून अत्यंत शुद्ध मनाने व्यथित होणारी, यांच्यासाठी काही करायला हवं असं मनापासून वाटणारी 'प्रिव्हिलेज्ड' मंडळी नसती तर ह्यांचे न्यूनगंड आणि फुकाचे उसने अहंगंड ह्यांना घेऊन भेलकांडत कुठल्या कुठे घेवून गेले असते हे यांच्या छिद्रान्वेषी कर्तव्यपराङमुख दैन्यमूलक व्यथोत्पन्न दुःखवस्तू प्रतिभेला आणि स्वयंघोषित प्रज्ञेला कधी तरी आकळेल का?
-सौरभ राघवेंद्र