•mr•

घुसमट

तिथे तुझे ढग आणि इथे माझी घुसमट. पाहतोय बरं मी, तुझं वेळी अवेळी दाटून येणं. घे ना एकदाची बरसून! हो मोकळी.. माझ्यावर कडाडून घे हवं तर. काहीच तक्रार नाही माझी. जाऊदे तोल- गेला तर गेला. मी आहे सांभाळा…

तिथे तुझे ढग आणि इथे माझी घुसमट. पाहतोय बरं मी, तुझं वेळी अवेळी दाटून येणं. घे ना एकदाची बरसून! हो मोकळी.. माझ्यावर कडाडून घे हवं तर. काहीच तक्रार नाही माझी. जाऊदे तोल- गेला तर गेला. मी आहे सांभाळायला, मीच काय- आम्ही सगळेच आहोत. आम्ही घेऊ सावरून. तारेवरची कसरत पुरे आता. रक्त ठिबकतंय तुझ्या पावलांमधून!

बरं, माझं एक जाऊदे, नाही जाऊच दे माझं. माझी घुसमट माझ्या कडे, माझी तगमग माझ्यापाशी. माझं सगळं सगळं माझ्याकडे. माझ्याकडे नकोच पाहू तू. निदान स्वतःकडे तरी पहा! ओळखू येते आहेस का तू, तुझी, तुलाच? आरशासमोर उभी रहा आणि माझा एखादा घिसापिटा आणि बाष्कळ विनोद आठव. आठवून खुदकन हसशील तेंव्हा आरशात पहा. बीभत्स वाटेल तुला तुझंच हसणं. हसू येईल ना की हसणं सुद्धा विसरली आहेस तू?

बोल ना! तू गप्प असतेस म्हणून नाही तर म्हटलंच असतंस, 'हसणं सुद्धा म्हणजे? अजून काय विसरले रे मी?' ऐकायचंय अजून काय विसरलीस ते? वाढदिवस होता माझा काल. विसरलीस ना! अर्थात माझ्या वाढदिवशी गव्हर्नमेंट हॉलिडे वगैरे नसतो, त्यामुळे तो लक्षात राहण्याचं काही कारण नाही म्हणा, आणि मुळात मी तुला काय सांगतोय विसरलीस म्हणून, माझ्या तरी कुठं लक्षात होता! हां, नाही म्हणायला आज काही तरी आहे असं वाटत होतं मला दिवसभर, पण नेमकं काय ते आठवत नव्हतं मला.

नर्सनी गोळ्या दिल्या होत्या, ग्लानी आली होती त्याने. म्हटलं ती उतरली की थेट तुलाच गाठावं आणि विचारावं; पण अगं हे लोक मला हल्ली खोलीच्या बाहेर सोडतच नाहीत, बाहेरून कडी लावून ठेवलीये त्यांनी. मग दाराशीच जाऊन बसलो परवा मुद्दाम, कान लावून दाराला. माहितीये का, नर्सेस माझ्याबद्दलच बोलत होत्या. त्या म्हणे मला भास होतात आणि मी बरळत सुटतो एकपात्री करणाऱ्या नटासारखा. काहीही बोलतात अगं त्या! मला कसे भास होतील? मी ठीकठाकच असतो, त्या गोळ्या तेवढ्या देतात तेंव्हा मात्र थोडं विचित्र वाटतं मला. असं वाटतं की मला कोणी तरी खोलीत बंद करून ठेवलंय आणि बाहेरून कडी घातलीये.

पण ते जाऊदे, तुला एक गम्मत माहितीये का, त्यांना तुझं नाव पण माहितीये. ती नर्स म्हणे मी बरळत असतो 'अनु अनु' असं काही तरी. पण मी असं का करेन? स्वतःशीच तुझं नाव घेत बसण्याऐवजी तुला फोनच नाही का करणार? फोन!? फोन कुठंय माझा? अरे, हो ती नर्स घेऊन गेलीये चार्जिंग ला लावायला. एक मिनिट, बराच वेळ झाला तिला जाऊन. वेळ का, दिवसच झाला. बहुतेक काल घेऊन गेलीये ती, नाही, परवा बहुतेक. श्या, आठवत नाही. पण जाऊदे, तसाही हल्ली रेंज नसतेच तुझ्या फोनला. शेवटचा केला तेंव्हा तुझ्या बाबांनी घेतला होता फोन.

'अरे मूर्खां गेली ती, ठेव फोन आता. पुन्हा फोन केलास तर याद राख' असं ओरडले माझ्यावर. एवढं काय रागवायचंय यार त्यात? गेली तर येशील ना पुन्हा, फोन का बंद करून ठेवायचा? त्या नर्स सुद्धा, म्हणतात अनु गेली आणि काय तर म्हणे ऍक्सिडेंट मध्ये गेली! हद्द तर बघ त्यांची- त्या म्हणतात गाडी मी चालवत होतो!

अनु तू सांग ना- किती व्यवस्थित चालवतो मी गाडी. असो. तुझं एक बाकी खरंय. तुझं सगळंच खरं असतं म्हणा पण सध्या एकच. तू म्हणतेस ना मी सेल्फ सेन्टर्ड आहे, खरंय तुझं. माझ्या कोषातून बाहेर येतच नाही मी. आत्ता पण बघ ना.. तुला बोल असं सांगितलं आणि मीच बोलत बसलोय. ए, बघ ना इकडे, ऐक ना, मी बसतो ना शांत. हे बघ हवं तर ही मला शांत बसवणारी गोळी घेतो, मग तर झालं. बोल ना यार तू! तुझा आवाज ऐकला नाही ना, की कसंसंच होतं गं मला. बोल ना!

-सौरभ राघवेंद्र.