•mr•

गोष्ट एका बॅरीची

गोष्ट एका बॅरीची.

गोष्ट एका बॅरीची.

पुष्कळ कथा अशा असतात ज्या सांगितल्या गेल्या नाहीत तर कोणताही मागमूस न ठेवता काळाच्या प्रवाहामध्ये तशाच लुप्त होऊन जातात. आज या अशा कथांपैकीच एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. कथेचं नाव आहे : गोष्ट एका बॅरीची.

बॅरी. बॅरी एव्हान्स. बॅरीचा जन्म ९ जुन १९४३ चा- इंग्लंड मधल्या सरे परगण्यातला. लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांनी त्याला टाकून दिलं. आपल्याला टाकून दिल्याचं दु:ख मनात बाळगत तो अनाथालयात वाढू लागला. त्याच्या अनाथालयाने चालवलेल्या शाळेतच तो शिक्षण घेत असे. लहानपणासूनच बॅरी अभिनयात निपुण होता. त्याच्या अभिनयाचे गुण त्याने शाळेत आणि कॉलेजमध्ये वेळोवेळी केलेल्या नाटकांमधल्या भूमिकेमधून दिसून येत. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी बॅरीला शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. पुढे तो लंडनस्थित रॉयल सेन्ट्रल स्कूल ऑफ स्पीच अँड ड्रामा इथे शिकण्यासाठी गेला.

बॅरी अत्यंत देखणा होता. त्याचा चेहरा निरागस तर होताच शिवाय तो वयाच्या मानाने तो पुष्कळ लहान दिसे. वयाच्या चाळीसाव्या वर्षीदेखील तो विशीमध्ये असल्याचा भास होई. या अशा ‘गोंडस’ बॅरीचं चित्रसृष्टीमध्ये आगमन झालं ते साल होतं १९६१.

१९६१ साली अभिनयाची कारकीर्द सुरु केलेला बॅरी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला तो ‘हिअर वी गो राउंड द मलबेरी बुश (१९६४)’ या सिनेमामुळे. तांत्रिक दृष्ट्‍या सरस असलेल्या या चित्रपटामध्ये त्याने जेमी मक्ग्रूगर नावाच्या एका उत्साही तरुणाची भूमिका साकारली होती. अत्यंत चोख निभावलेल्या या भूमिकेसाठी त्याचा गौरव करताना अमेरिकास्थित ‘फोटोप्ले’ या नियतकालिकाने बॅरीला “ब्राईट अँड एक्साइटिंग न्यू अॅक्टर” असे संबोधले होते. ‘संडे टेलिग्राफ’ या ब्रिटीश साप्ताहिकानेही त्याची भूमिका ‘ब्रिलियंट’ या विशेषणाने गौरविली होती. या चित्रपटाने त्याला चित्रसृष्टीमध्ये त्याची अशी ओळख तर निर्माण करून दिलीच शिवाय या चित्रपटाचा दिग्दर्शक 'क्लाईव्ह डॉनर' नावाचा एक नवा घनिष्ट मित्र देखील जोडून दिला. पुढे एका मुलाखतीमध्ये बॅरीने क्लाइव्हचा उल्लेख काही जवळच्या मित्रांपैकी एक असा केला होता. हा चित्रपट १९६८ सालच्या कान्स फिल्म फेस्टिवलसाठीच्या शर्यतीमध्ये निवडला गेला; पण क्लाइव्ह आणि बॅरीच्या दुर्दैवाने त्या वर्षीचे कान्स फिल्म फेस्टिव्हलच रद्द झाले.

बॅरीनं आपलं करिअर फक्त मोठ्या पडद्यापुरतं कधीच मर्यादित ठेवलं नव्हतं. तो नाटक आणि टी. व्ही. या माध्यमांमध्येही तितकाच सहज वावरला. ‘रिचर्ड गॉर्डन’ या लेखकाच्या कादंबरीमालेवर आधारित ‘डॉक्टर इन द हाउस (१९६९-७०)’ या टी. व्ही. सिरीज मध्ये त्याने निभावलेली ‘मायकल अपटन’ या तरुण डॉक्टरची भूमिका पुष्कळ गाजली. ‘डॉक्टर..” चा पहिला सिझन झाल्यानंतर “डॉक्टर अॅट लार्ज” या दुसर्‍या सिझन मध्ये सुद्धा त्याने प्रमुख भूमिका निभावली पण “डॉक्टर...” सिरीजच्या अत्यंत व्यस्त आणि दमवणाऱ्या वेळापत्रकामुळे त्याला अन्य कोणतीच भूमिका स्वीकारणे जवळ जवळ अशक्य होऊन बसले. मग त्याने नाईलाजाने “डॉक्टर...” पुढच्या भागांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला आणि तो या मालिकेतून बाहेर पडला. “डॉक्टर...” च्या वर्षांचा उल्लेख त्याने कालांतराने आयुष्यातली “सर्वोत्कृष्ट वर्षं” अशा शब्दात केला होता.

“डॉक्टर...” नंतर १९७१ सालच्या ‘डाय स्क्रीमिंग मॅरीएन’ या थ्रिलरपटापाठोपाठ त्याने ‘अॅडव्हेंचर्स ऑफ अ टॅक्सी ड्रायव्हर (१९७६)’ या चित्रपटामध्येही काम केलं. ‘अॅडव्हेंचर्स ऑफ अ टॅक्सी ड्रायव्हर (१९७६)’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा निर्णय देखील झाला, पण बॅरीनं मात्र या चित्रपटामध्ये भूमिका करण्याचं नाकारलं.

ज्या भूमिकेनं त्याला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळवून दिली ती भूमिका होती जेरेमी ब्राऊन या बी. ए. झालेल्या शिक्षकाची. ‘माइंड युअर लँग्वेज (१९७७-७९)’ या टी. व्ही. मालिकेत जेरेमी ब्राऊन- फ्रेंच, स्पॅनिष, इटालीअन, जर्मन, पाकिस्तानी, जॅपनीज, भारतीय आणि चायनीज अशा विविध पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवताना दाखवला आहे. तुफान विनोदी असणारी ही मालिका लोकप्रिय ठरली नसती तर नवलच. ही मालिका लोकप्रियतेच्या अशा शिखरावर पोहोचली होती की या मालिकेशिवाय शिवाय ब्रिटन मधल्या लोकांचा वीकेंड संपन्न होत नसे असे म्हणत.

पुढे ‘व्हॉट अ कंट्री (१९८६)’ या नावाने “माइंड...” चे अमेरिकन अडाप्टेशन बनवले गेले (अर्थातच त्याला “माइंड...” ची सर आजिबातच नव्हती.) अमेरिकेमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हॉट अ कंट्री (१९८६)’ च्या निमित्ताने १९८६ सालीच “माइंड युअर लँग्वेज” या मालिकेची इंग्लंड मध्ये १३ नव्या एपिसोड्स साठी पुन्हा एकदा निर्मिती केली गेली. या नव्या सिझनमध्ये बॅरीच लीड अॅक्टर होता.

तसं पहायला गेलं तर प्रसिद्धी, पैसा यांच्यामध्ये वावरणाऱ्या बॅरीच्या बाबतीत थोडं इकडचं तिकडचं काही वगळता सारं काही आलबेल असायला काहीच हरकत नव्हती. पण तसं प्रत्यक्षात मात्र अजिबातच नव्हतं. प्रसिद्धी आणि यशाचं शिखर अनुभवणारा बॅरी आतून खूप एकटा होता. त्याच्या अत्यंत चार्मिंग आणि इनोसंट चेहऱ्यापाठीमागं आई-वडिल आपल्याला अनाथालायाबाहेर एका खोक्यात टाकून गेले आहेत या गोष्टीचं दु:ख सतत खदखदत असे. आयुष्यभर एकट्या राहिलेल्या बॅरीच्या लैंगिकतेबद्दलही अनेक वावड्या उठवल्या गेल्या. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय कोण जाणे पण बॅरीला दारूचं व्यसन जडलं. त्याच्या कारकीर्दीच्या कैक टप्प्यांवर तो आर्थिक डबघाईला देखील आला.

त्याच्या या करुण-कथेत लवकरच नवी भर पडणार होती. ज्या निरागस आणि तरुण चेहऱ्याने बॅरीला आजपर्यंत त्याची ओळख निर्माण करून दिली होती तो चेहराच आता त्याच्या प्रगतीच्या मार्गामधला अडसर बनत होता. ‘लाईट कॉमेडी’ करणारा अभिनेता असा शिक्का बसलेल्या वयाच्या चाळीसाव्या वर्षीही विशीतल्या तरुणासारख्या दिसणाऱ्या बॅरीच्या वाट्याला गंभीर आणि पोक्त पात्रांच्या भूमिका येईनाश्याच झाल्या.

१९७८ साली प्रदर्शित झालेल्या ‘क्राऊन कोर्ट’ या टी. व्ही. मालिकेनंतर थेट १९८२ सालची ‘लेगसी ऑफ मर्डर’ ही टी. व्ही. मालिका ‘८६ साली पुन्हा चित्रित झालेले “माइंड..” चे काही भाग आणि १९९३ सालचा “द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड” या चित्रपटामधली बझार्डची भूमिका या पलीकडे त्याने कुठलीच भूमिका साकारली नाही. “द मिस्टरी ऑफ एडविन ड्रूड (१९९३)” हा त्याच्या चित्रपट कारकीर्दीमधला शेवटचा सिनेमा ठरला.

बॅरी त्याच्या कारकीर्दीच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये पुन्हा एकदा आर्थिक डबघाईला आला होता. शासनाकडून बेरोजगार लोकांना दिल्या जाण्याऱ्या भत्त्यावर तो काही काळ जगत होता असा पुसटसा उल्लेखही मध्यंतरी माझ्या वाचनात आला होता. १९९० सालच्या उत्तरार्धात उदरनिर्वाहासाठी त्याने लाईसेस्टरशायर इथे क्रेस्ट टॅक्सीज् नावाच्या कंपनीमध्ये टॅक्सी-ड्रायव्हर म्हणून नोकरी स्वीकारली. ‘अॅडव्हेंचर्स ऑफ अ टॅक्सी ड्रायव्हर’ साकारणाऱ्या बॅरीच्या नशिबी पुन्हा एकदा टॅक्सी आली ती या अशा दुर्दैवी पद्धतीनं .

त्या काळामध्ये बॅरी क्लेमॅग्ना ब्रूक्स या खेड्यातल्या आपल्या बंगल्यात आयुष्य व्यतीत करत होता. त्याचं दारू पिणंसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलं होतं. पण तरीही त्या काळात त्याच्यामधली अभिनय करण्याची आकांक्षा मात्र तशीच टिकून होती आणि त्या संबंधाने तो आपल्या एजंटशी संपर्कही ठेवून होता. पण १९९३ नंतर बॅरीच्या वाट्याला कधीच कुठलीच भूमिका आली नाही. इतकंच नव्हे तर ९ फेब्रुवारी १९९७ चा उल्लेख वगळता दरम्यानच्या काळात त्याच्याबद्दलचा साधा उल्लेखही अभावानेच आहे. त्या ९ फेब्रुवारी १९९७च्या उल्लेखाची कथा अशी :

८ फेब्रुवारी १९९७ ची सकाळ. बॅरी पोलीस स्टेशन मध्ये आला आणि आपली टॅक्सी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवून घेण्याची विनंती त्याने पोलिसांना केली. तो गेल्यानंतर काही वेळाने पोलिसांना त्याची टॅक्सी सापडली आणि ही बातमी घेऊन दुसर्‍या दिवशी म्हणजे ९ फेब्रुवारी १९९७ रोजी ते बॅरीच्या घरी गेले. तेंव्हा बॅरी घरीच होता, फक्त इतकंच की तो जिवंत नव्हता- त्याचा मृत्यू झाला होता.

पोलिसांच्या रिपोर्ट प्रमाणे बॅरीच्या शरीरामध्ये कायदेशीर प्रमाणाच्या साडे-चार पट जास्त प्रमाणात अल्कोहोल आढळून आलं होतं. त्यामुळे त्याचा मृत्यू हा अल्कोहोलच्या अतिसेवनामुळं झाल्याचं नमूद केलं गेलं. पण तरी देखील या तर्कामध्ये शंका घेण्यासाठी पुष्कळ जागा होतीच. काहींचं म्हणणं असं होतं की त्यानं आत्महत्या केली होती. इतकी दारू त्याने जाणूनबुजून प्यायली. त्यानं नुकतंच लिहिलेलं छोटेसं मृत्युपत्र या विधानाची वैधता पटवून देण्यास सहाय्यभूत होतं. त्याचा खून झाला असल्याचाही काही जणांचा संशय होता. त्याला पुष्टी देण्यासाठी त्याच्या डोक्यावर मार लागल्याचा खुणा आणि कापली गेलेली घराची टेलिफोन लाईन हे पुरावे होते. त्याच्या मृत्यूच्या खटल्यासंदर्भात काही दिवसांनी त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावून अठरा वर्षाच्या एका तरुणाला अटक देखील झाली होती. हा तरुण बॅरीचा खूप चांगला मित्र असल्याचे मानले जात होते. पण या अटकेची निष्पत्ति पुढे या मुलाला ठोस पुराव्याभावी ‘बाईज्जत बरी’ करण्यात झाली..

त्याच्या मृत्युनंतर त्याचं गोल्डर्स ग्रीन इथं दहन करण्यात आलं. दहन विधीनंतर काही दिवसांनी त्याची रक्षा त्यांच्या मूळ ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आली. ती कुठे हलवली गेली हे आज कोणालाच ठाऊक नाही. या जगाशी त्याला जोडणारा शेवटचा दुवा देखील कायमचा नाहीसा झाला.

तर, असा होता बॅरी एव्हान्स. आयुष्यभर चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा बॅरी, जाताना मात्र सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेला. त्याने चुकून जास्त दारू प्यायली होती, की त्याने आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता- आज इतक्या वर्षांनंतरही याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही. आज त्याचं मेमोरिअल वगैरे तर सोडाच पण त्याच्याबद्दलचे उल्लेखही अभावाने मिळतात. जे काही उपलब्ध आहे ते त्याच्या दुर्दैवी मृत्युनंतर केलं गेलेलं वार्तांकन आणि त्या संबंधाने झडलेल्या चर्चा.

“डॉक्टर...” मधला मायकल काय किंवा “हिअर वी..” मधला जिमी आणि “माइंड...” मधला जेरेमी काय बॅरी त्याच्या अभिनय कौशल्यात तो कुठेच आणि कधीच तसूभरही कमी पडला नव्हता. कमी पडली ती सिनेसृष्टी जिने त्याच्या अभिनय कौशल्याला पुरेसा वाव मिळू दिला नाही. त्याच्या वाट्याला जर कॉमेडीच्या जोडीने काही गंभीर वळणाची पात्रं आली असती तर कदाचित आज बॅरी जिवंत असता. एखादा आकर्षक पुरस्कार त्याने पटकावला असता. रेड कार्पेट वर तो अभिमानाने चालला असता आणि लोकांनी त्याच्यावर केलेलं अमाप प्रेम पाहून त्याचं- त्याच्या सख्ख्या आई-वडिलांनी आपल्याला टाकून दिल्याचं बोचरं दु:ख कदाचित काहीसं हलकं झालं असतं.

बॅरीच्या आयुष्यावर नियतीने आणि काळाने मिळून अत्यंत दुर्दैवीपणे पडदा पाडला. मला आठवतं “माइंड..” चे जेवढे मला मिळाले तेवढे सगळे एपिसोड्स मी पाहिले होते, त्याच्या भूमिकेवर, अभिनयावर मी जाम खूष होतो आणि या संदर्भाने त्याला पाठवण्यासाठी एक छोटासा ई-मेल सुद्धा मी लिहिला होता. तो पाठवण्यासाठी मला त्याचा ई-मेल आय.डी. मिळतो का हे शोधावं म्हणून मी त्याची माहिती काढायला गेलो तेंव्हा मला त्याची ही शोकांतिका समजली. हे सगळं समजल्यावर मला अक्षरशः धक्का बसला होता. आणि ज्या टप्प्यावर मला ही माहिती मिळाली होती- मला बॅरीसाठी खूप जास्त वाईट वाटलं होतं.

बॅरी सारखी उदाहरणं पाहिली की जाणवतं- चित्रसृष्टीच्या या मोहजालामधल्या तारकांच्या लखलखत्या उजेडाचा प्रदेश सोडला की उरदडपवून टाकणारा जो भयाण काळोख उरतो त्या काळोखाने बॅरीसारख्या कित्येक कलावंतांच्या कथा विनासायास दडवून ठेवलेल्या आहेत. एके काळी रंगमंच गाजवलेल्या, पडद्यावर राज्य केलेल्या पण काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेल्या अनेक कलावंतांना नियती इथे आणून सोडते. एका गडद काळोख्या कोपर्‍याचा आधार घेऊन मग हे कलावंत स्वत:मध्ये मग्न होऊन आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत बसतात.

गतस्मृतीमध्ये हरवलेल्या आणि स्वत:ची ओळख विसरलेल्या त्यांच्या डोळ्यात कोणी पहायला जावं तर यांच्याकडे पाहणाऱ्याच्या अंगावर भीतीने काटा यावा अशी त्यांची अवस्था असते. या अशा प्रदेशात सापडलेल्या कित्येक कथा तर इतक्या करूण असतात की त्या समजल्यावर जर त्या आपल्यापर्यंत आल्या नसत्या तर बरं झालं असतं असं वाटणारी अशी एक स्वार्थी लहर मनात उचंबळून जाते; पण मग वाटतं या कथा जर मी शोधल्या नाहीत, किंवा जर या कथांनी मला शोधलं नाही तर मग काळाच्या प्रवाहात वाहून त्या अशा एखाद्या तीरावर जाऊन विसावतील की तिथून त्या आपल्यापर्यंत पुन्हा कधीच येणार नाहीत. कधीच.

बॅरीची कथा ही या कथांपैकीच एक होती.

-सौरभ राघवेंद्र.