•mr•

Gully Boy च्या निमित्तानं

ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये आणि गलीबॉय मध्ये एक खूप मोठा फरक आहे, आणि तो फरक आहे, ज्या कलाकारावर चित्रपट बेतलेला आहे, त्या कलाकाराच्या पार्श्वभूमीचा. गलीबॉयच्या नायकाची- मुरादची पार्श्वभूमी असू शकते तितकी सामान्य आहे. इतकी सामान्य की त्याच्या कुटुंबियांना स्वप्नात सुद्धा त्यांचं वास्तवच दिसावं. मुरादला त्याच्या स्वप्नांना वास्तवानं कुंपण घालावं हे मान्य नव्हतं. मुरादच्या आकांक्षांना जखडणाऱ्या बेड्यांची मर्यादा अमान्य होती. म्हणूनच त्याच्या आयुष्यात त्याने लिहिलेल्या गाण्यात तो म्हणतो- ‘कौन बोला मुझसे ना हो पायेगा, अपना टाईम आयेगा.

वाहरू सोनावणे नावाचे एक प्रख्यात मराठी कवी आहेत, त्यांची एक कविता आहे- “आई, पहिली लढाई आपलीच.” ह्या कवितेमध्ये वाहरू आपल्या आईला उद्देशून म्हणतात की ‘आई, तुझा जीव आत ओढतो, माझा जीव बाहेर.’ ही ओळ मला त्या प्रत्येक मनुष्यासाठी प्रातिनिधिक वाटते ज्याला परिस्थितीने आखून दिलेली चौकट किंवा तथाकथित सिस्टीम मोडून वेगळं काही तरी करू पहायचं आहे. गली-बॉय मध्ये रणवीरनं साकारलेला ‘मुराद’ हा सुद्धा त्या लोकांपैकीच एक.

मुराद- धरावी नंबर सतरा मध्ये राहणाऱ्या एका चौकोनी कुटुंबातला मोठा मुलगा. वडील ड्रायव्हर, आई गृहिणी. तो बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याच्या आई-वडिलांना त्याच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत.वडिलांना वाटतं, त्यानं आपल्यासारखंच ड्रायव्हर व्हावं, तर आईला वाटतं त्यानं लिहावं, शिकावं आणि एखादी पांढरपेशी नोकरी करावी; पण एका छोट्या घटनेचं निमित्त होतं आणि मुरादला त्याच्या वडिलांच्या जागी ड्रायव्हरची नोकरी करावी लागते. पुढे ही घटना त्याचं आयुष्याच बदलून टाकते.

कलाकारांच्या आयुष्यावर बेतलेले आणि सत्य किंवा काल्पनिक कथा मांडणारे अनके चित्रपट बॉलीवूडमध्ये येऊन गेले. अलीकडेच येऊन गेलेला मंटो, इम्तियाज आलीचा रॉकस्टार, फरहान अख्तरचा ‘रॉक ऑन’, १९७३ साली झळकलेला अभिमान, २०१३ साली आशिकी चित्रपटाचा दुसरा भाग... यादीच करायची म्हटली तर याच्यावर एखादा वेगळा लेखच लिहावा लागेल.

ह्या सगळ्या चित्रपटांमध्ये आणि गलीबॉय मध्ये एक खूप मोठा फरक आहे, आणि तो फरक आहे, ज्या कलाकारावर चित्रपट बेतलेला आहे, त्या कलाकाराच्या पार्श्वभूमीचा. गलीबॉयच्या नायकाची- मुरादची पार्श्वभूमी असू शकते तितकी सामान्य आहे. इतकी सामान्य की त्याच्या कुटुंबियांना स्वप्नात सुद्धा त्यांचं वास्तवच दिसावं. मुरादला त्याच्या स्वप्नांना वास्तवानं कुंपण घालावं हे मान्य नव्हतं. मुरादच्या आकांक्षांना जखडणाऱ्या बेड्यांची मर्यादा अमान्य होती. म्हणूनच त्याच्या आयुष्यात त्याने लिहिलेल्या गाण्यात तो म्हणतो- ‘कौन बोला मुझसे ना हो पायेगा, अपना टाईम आयेगा.

अपना टाईम आयेगा.

हे वाक्य म्हणायला खूप छान वाटतं, थिएटर मध्ये ऐकताना आपल्या अंगावर शहारे आणतं; पण ज्या पद्धतीचं आयुष्य मुराद किंवा मुराद सारखे इतर लोक जगात असतात, त्यांच्या आयुष्यात केवळ ‘अपना टाईम आएगा’ एवढंच म्हणून भागात नसतं. ‘अपना टाईम’ आपण स्वत: आणावा लागत असतो, आणि तो एक निर्णय, तो एक क्षण मुराद सारख्या ‘शाणा लालां’चं आयुष्य बदलवून टाकत असतो. तो निर्णय घ्यायला त्या क्षणाला सामोरं जाऊन, ‘ऐसा मेरा ख्वाब है जो दर को भी सातायेगा’ असं नजरेत नजर भिडवून सांगायला धाडस असावं लागतं. ते धाडस मुरादमध्ये होतं म्हणून मुरादचा गलीबॉय होऊ शकला.

एखाद्या फिनिक्सप्रमाणं राखेतून आकाशाकडे झेपावलेल्या कित्येक यशोगाथा आपण ऐकतो, वाचतो, इतरांना सांगतो; पण अशी एखादी यशोगाथा निवडून ती पडद्यावर मांडणं ही एक वेगळीच गाथा आहे, आणि ती मांडण्यात, ती गोष्ट सांगण्यात झोया अख्तर कमालीची यशस्वी झालेली आहे

मुराद, त्याची आई, त्याचे वडील, आलिया भटने साकारलेली साफीना, मुरादचे मित्र ह्या सगळ्या पात्रांचं भावविश्व हे धारावी सारख्या भागांचं प्रातिनिधिक भावविश्व असल्याचं मला कधी कधी वाटतं. गलीबॉयच्या निमित्तानं झोया अख्तर आणि रिमा कागती या दोन लेखिकांनी त्या भावविश्वाचा अत्यंत अचूक वेध घेतलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही; पण भावविश्वाचा अचूक वेध घेणं आणि ते पडद्यावर जसाच्या तसं साकारणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, आणि ह्या दोन भिन्न गोष्टींमध्ये सुसूत्रता जुळवून आणणं हे ह्या चित्रपटाचं खरं यश आहे असं मला वाटतं.

धारावीची झोपडपट्टी बॉलीवूडमध्ये अनेक वेळेला झळकलेली आहे. ऑस्कर विजेत्या सलामडॉग मिलेनिअरची कथासुद्धा ह्याच झोपडपट्टीच्याझ पार्श्वभूमीवर बेतलेली होती, पण धारावीमध्ये एक फेरी मारून आलं की स्लमडॉग मध्ये दाखवलेली धारावी, धारावी नावाच्या एका मोठ्या चित्राचा छोटासा भाग आहे हे आपल्याला जाणवतं.

कार्ल मार्क्सनं समाजाचं दोन भागात विभाजन केलं होतं- आहे रे वर्ग आणि नाही रे वर्ग. धरावीमध्ये राहणारे लोक हे प्रामुख्यानं नाही रे वर्गात मोडतात, पण आहे रे वर्ग मिरवणाऱ्या लोकांकडे नसलेल्या कित्येक गोष्टी धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांकडे आहेत आणि हे केवळ मीच नाही तर धारावीच्या झोपडपट्टीला भेट दिलेले कित्येक परदेशस्थ प्रवासी सांगतात.

इथे राहणाऱ्या लोकांच्या माना कदाचित झुकलेल्या असतील, त्यांच्या डोळ्यात विजीगीषेची चमक उरलेली नसेल, प्राप्त चाकोरीबाहेर आयुष्य विस्तारण्याच्या इच्छेची ज्योत कदाचित विझली असेल; पण आहे रे वर्गात राहणाऱ्या लोकांच्या संडास आणि बाथरूम पेक्षा सुद्धा लहान आकाराच्या घरात राहणाऱ्या ह्या कुटुंबियांना आपण आहोत तिथे आनंदी कसं राहायचं हे खूप चांगलं ठाऊक आहे. झोपडपट्टीमध्येच गुंडगिरी फोफावते ह्या उच्चभ्रू समजूतीला सणकून छेद देणारा प्रामाणिक संघर्ष इथल्या छोट्या छोट्या खोल्यांमधून पेटता असतो. गगनचुंबी इमारतीमध्ये स्वतंत्रपणे राहणाऱ्या लोकांपेक्षा इथे राहणाऱ्या लोकांची सहजीवनाची जाणिव किती प्रखर आहे हे इथे येऊन गेल्याशिवाय तुम्हाला क्वचितच कळेल; मात्र हे सगळं तेंव्हाच जेंव्हा धारावीच्या झोपडपट्टीत तुम्ही पाहुणे म्हणून येता.

एक पाहुणा मधून धरावीमध्ये येणं हा अनेक लोकांसाठी जीवनानुभव असतो. इथून जाताना आपल्यापाशी जे आहे त्यासाठी आपण किती नशीबवान आहोत, ही जाणिव मनामध्ये घेऊन हे लोक इथून जातात, इतरांच्या दु:खांबद्दल, अडचणींबद्दल अधिक संवेदनशील होतात. ह्या अनुभवाने मुळातच श्रीमंत असलेले ते, अजून श्रीमंत, समृद्ध होतात; पण धारावीत राहणारी, इथेच लहानाचं मोठं झालेली एखादी व्यक्ती धारावीची वेस ओलांडून बाहेरच्या जगात एक पाहुणा म्हणून जाते आणि रात्रीच्या वेळी कधी बंद तर कधी चालू असलेल्या रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशातून मार्ग काढत घरी येते, तेंव्हा? तेंव्हा काय होतं? तेंव्हा जे काही काही होतं, त्या प्रश्नाचं उत्तर गलीबॉय मध्ये अनेक ठिकाणी आपल्याला सापडतं असं मला वाटतं.

हिंदी चित्रपतसृष्टीला झोया अख्तर हे नाव नवं नाही. झोया अख्तर भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर पाय रोवून उभ्या असणाऱ्या मोजक्या स्त्री-कलाकारांपैकी एक कलाकारा. कामसूत्र, तलाश, दिल धडकने दो, लक बाय चान्स, लस्ट स्टोरीज, जिंदगी न मिलेगी दोबारा आणि अर्थातच गलीबॉय असे एकापेक्षा एक चित्रपट तिने सादर केले आहेत. दिग्दर्शिका म्हणून स्वतंत्र काम करण्यापूर्वी तिनं अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य दिग्दर्शक तसंच निर्मितीसंस्थासोबत काम केलेलं आहे. झोया अख्तरनं गलीबॉयचं दिग्दर्शन केलं आहेच, पण ह्या चित्रपटासाठी तिने सहलेखाकाची भूमिका सुद्धा निभावलेली आहे. ह्या चित्रपटाची दुसरी सहलेखिका आहे रिमा कागती. रिमा कागती ही सुद्धा आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण केलेली कलाकारा. हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड पासून करिअर सुरु केलेली रिमा पहिल्यापासून झोया अख्तर आणि फरहान अख्तर सोबत राहिलेली आहे. पडद्यामागच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी लगान, दिल चाहता है, लक्ष्य, जिंदगी मिलेगी ना दोबारा असे अनेक चित्रपट तिच्या खात्यामध्ये जमा आहेत.

गालीबॉय पाहून थिएटर मधून बाहेर पडताना घेऊन येण्याजोग्या ज्या गोष्टी आहेत, त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटातले संवाद. मुरादच्या मामाची भूमिका साकारणाऱ्या विजय मौर्य यानं ह्या चित्रपटात संवादलेखनाचं एक वेगळं शिखर गाठलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मुराद आणि त्याच्यासारख्या मुलांच्या तोंडी असणारी भाषा आणि चित्रपटातल्या पात्रांच्या अंतरंगात शिरून त्या भाषेचं होऊ शकणारं आविष्करण ह्या दोन गोष्टी विजय मौर्यनं अत्यंत यशस्वीपणे निभावून नेलेल्या आहेत. ह्या भाषेचा गोडवा ही भाषा बोलतो त्यालाच कळावा.

गलीबॉयनं धारावीच्या छोट्या छोट्या घरांमधली भाषा उलगडून दाखवलीच, पण धरावीचं संगीत सुद्धा तेवढ्याच किंबहुना किंचित जास्तच प्रभावीपणे मांडलंय असं मला वाटतं. १९७० साली न्यूयॉर्कमध्ये सुरु झालेल्या ओल्ड-स्कूल हिप-हॉप आणि रॅप संगीताच्या लाटेनं धारावीमधल्या तरुणांना आकर्षित केलं नसतं तर नवलंच. आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलची जागरूकता, प्रस्थापित समाजाबद्दल कधी चीड तर कधी तिटकारा ह्या गोष्टींचा समावेश ह्या संगीत प्रकारात होतो. गलीबॉय मधली, ‘दुरी’, ‘मेरी गली मे’, जे.एन.यु. विद्यापीठात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ‘जिंगोस्तान’ आणि ‘आझादी’ ह्या आणि अशा इतर अनेक गाण्यांमध्ये हिप-हॉपहा संगीत प्रकार ज्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो त्या सगळ्या वैशिष्ट्यांचा आकर्षक समावेश आहे.

हिप-हॉप किंवा रॅपचा उदय संगीताचा एक प्रकार म्हणून झालेला असला तरी काळाच्या ओघात ती एक संस्कृती बनून गेली. किंबहुना प्रस्थापित संस्कृतीला प्रत्युत्तर देणारी एक संस्कृती, जिला इंग्लिश मध्ये काऊंटर कल्चर म्हणतात, म्हणून नावारूपाला आली आणि धारावी मधल्या तरुणाईनं ती यथावकाश आत्मसातही केली. त्यांचं राहणीमान, त्यांच्या वेशभूषा, त्यांची अभिरुची ह्या गोष्टींवर हिप-हॉप कल्चरचं जे गारुड जाणवू येण्या इतकं ठळक आहे. धरावी मधल्या गल्ल्यांमध्ये तयार होणारं संगीत सगळ्याच लोकांच्या कानाला मानवणारं नाही, कारण ज्या मातीमधून हे संगीत निर्माण झालं आहे, त्या मातीचा गंध- उग्र, सौम्य, मादक, विचित्र- तो जसा आहे तसाच ह्या संगीतामधून दरवळतो; पण ज्या माध्यमातून हा गंध दरवळतो ते ठेका, शब्द आणि गोष्ट हे व्यक्त होण्याचे तिनही प्रकार आपल्याला चांगलेच परिचयाचे असल्यामुळं ह्या संगीताच्या प्रकराकडं आपण करूया असं म्हणून दुर्लक्ष करू शकत नाही, हे हि तितकंच खरं.

मुरादचं संगीत ह्याच पठडीमधलं आहे. त्याला जे दिसलं, तेच त्यानं सांगितलं. ना उणं ना अधिक. म्हणूनच गलीबॉय त्याच्या तोंडी असलेली सगळीच गाणी मुराद आणि त्याच्यासारख्या अनेकांच्या धगधगत्या वास्तवाची आग घेऊन पडद्यावर अवतरतात. ‘दुरी’सारख्या गाण्यातून मुराद, ‘इस दुनिया की क्या स्टोरी है’ असा थेट प्रश्न विचारात ‘राईट मी बिल्डींग आस्मानोंको छूरी, लेफ्ट मे बच्ची भूकी सडकोंपे रो री’ असं म्हणत विषमतेचे असे अनेक दाखले तो मांडतो, पण त्याचवेळी एका उच्चभ्रू मुलीला रडताना पाहून त्याला सुचलेल्या, ‘मै ये बेहते आसू पोछू, उतनी मेरी औकाद नही’ ओळीमधून आपली तरल संवेदनशीलता सुद्धा दाखवून देतो.

मुरादचं पात्र जेवढं साधं दिसतं, ते साकारणं तेवढंच कठीण आहे, आणि विशेषत: जी उर्जा, जो उत्साह घेऊन रणवीर सिंग वावरत असतो, त्याच्यासाठी मुराद सारखं संयत पात्र मुळातून समजून घेऊन साकारणं किती आव्हानात्मक गेलं असेल याचा विचार मुरादला पडद्यावर वावरताना पाहिल्यावर एकदा तरी येऊन गेल्याशिवाय रहात नाही. अनेकांनी रणवीर सिंगचं हे आत्ता पर्यंतचं सर्वोत्तम सादरीकरण आहे असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे. आलिया भटनंही साफीनाच्या पात्राच्या सगळ्या छटा ज्या बेमालूम सफाईनं सादर केलेल्या आहेत त्याला बिलकुलच तोड नाही. एक अभिनेत्री म्हणून तिच्या बॉलीवूडमधल्या प्रवासात हा चित्रपट मैलाचा अजून एक दगड ठरू शकतो हे नक्की.

हिंदी भाषिकांचा वरचष्मा असलेल्या बॉलीवूडमध्ये मराठी चेहेरे दिसणं ही गोष्ट आता तशी नवीन राहिलेली नाही. कसदार अभिनय, निर्मितीतंत्राची उत्तम जाण आणि रंगभूमीची दैदिप्यमान पार्श्वभूमी अशा तिन जमेच्या बाजू लाभलेल्या मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा निर्विवाद ठसा वेळोवेळी उमटवलेला आहे. ह्या चित्रपटात झळकलेले दोन प्रमुख मराठी चेहरे म्हणजे अमृता सुभाष आणि ज्योती सुभाष. अमृता सुभाषनं रणवीर सिंग च्या आईची भूमिका निभावली आहे, तर ज्योती सुभाष ह्यांनी रणवीर सिंगच्या आजीची. चित्रपटाच्या एकूण रासायनामध्ये त्यांचं बेमालूम मिसळणं हे त्यांच्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवून जातं हे खरंच, पण ज्या क्षमतेच्या त्या दोघी अभिनेत्री आहेत, त्या क्षमतेला ह्या चित्रपटात विशेष वाव दिला गेलेला मात्र तसा आढळून येत नाही.

गलीबॉय मधले आणखी दोन लक्षवेधी चेहरे म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी हा पहिला, तर कल्कीचा दुसरा. एम.सी. शेरची भूमिका साकारणारा सिद्धांत त्याच्या कारकिर्दीतल्या पहिल्या चित्रपटात काम करतो आहे असं एका क्षणासाठीही वाटत नाही. कल्कीबद्दल तर लिहावं तेवढं थोडंच आहे. एक अभिनेत्री म्हणून स्कायच्या भूमिकेत तिला अभिनयासाठी विशेष वाव नसला, तरी मिळालेल्या भुमिकेमधून ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहायला हरकत नाही. पाच विविध भाषांवर प्रभुत्त्व लाभलेली, लेखन, काव्य आणि रंगभूमीची पार्श्वभूमी लाभलेल्या कल्कीला बॉलीवूडनं स्टेरीओटाईप करणं थांबवून तिच्या गुणवत्तेला वाव देणाऱ्या भूमिका द्याव्यात असं कुठे तरी ह्या चित्रपटाच्या निमित्तानं वाटत राहतं.

चित्रपट जिवंत करण्यामध्ये जिवंत अभिनयाचा जेवढा वाटा असतो, तेवढाच वाटा कॅमेराच्या माध्यमातून जिवंत झालेल्या निर्जीव प्रतिमांचा आणि प्रतिमासृष्टीचा असतो. कुठंही विस्कळीत न वाटणारी पटकथा आणि प्रत्येक दृश्यात नजर खिळवून ठेवणारी अप्रतिम सिनेमॅटोग्राफी ह्या गोष्टींच्या अत्यंत सहज मिलाफानं हा चित्रपट पाहण्याचा अनुभव नितांत सुंदर होऊन जातो. मुरादचं छोटसं घर, धारावी मधल्या छोट्या छोट्या गल्ल्या, धारावीच्या आतल्या आणि बाहेरच्या जगामध्ये असणारा विरोधाभास दाखवण्यासाठी उभी केलेली अकृत्रिम प्रतिमासृष्टी खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे.

मुळातच एका रॅपरच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा असल्यामुळं, रॅप आणि हिप-हॉप ह्या संगीत प्रकारातल्या गाण्याची ह्या सिनेमामध्ये मुक्त उधळण आहे, पण म्हणून कुठेही अति झालं आणि हसू आलं असा प्रकार होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी सगळ्यांनीच घेतल्याचं चित्रपट पाहताना लक्षात येतंच, शिवाय ह्या चित्रपटातली पुष्कळ गाणी ही मुळातच रॅप आणि हिप-हॉप संगीत प्रकारातून व्यक्त होणाऱ्या कलाकारांनी लिहिली आणि बनवली असल्यामुळं ह्या साऱ्या अनुभवात कुठेही कृत्रिमता येत नाही. ह्या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताबद्दल विशेष असं सांगण्यासारखं काही नाही, पण जे आहे ते उत्तम आहे हे ही तेवढंच खरं.

एकूणच, ज्या उत्सुकतेनं चाहते गलीबॉयची वात पहात होते, त्या उत्सुकतेला उथार्थ ठरवण्याची क्षमता ह्या चित्रपटात आहे हे नक्की. ह्या चित्रपटाच्या, चित्रपटातल्या पात्रांच्या आणि त्याही पुढे जाऊन मुरादच्याही आयुष्याच्या पलीकडे जाऊन ह्या कथेकडे पाहिलं, तर ह्या कथेत काळाचाही स्पर्श न झालेलं एक तत्त्व, एक मूल्य सापडतं असं मला वाटतं आणि ते मूल्य आहे संघर्ष आणि त्यातून साकार होणाऱ्या नावनिर्मीतीचं.

एखाद्याच्या आयुष्यामध्ये केंव्हा कुठली परिस्थती ओढवेल ह्याचं कुठलंच ठोक गणित नाही. अवेळी येऊन भिजवून गेलेल्या पावसाच्या सरींसारखी संकटं येतात आणि माणसाला विकल करून जातात. अशावेळी प्राप्त परिस्थितीचं काय करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. मुरादच्या वडिलांसारखं जे आहे त्याला कुठलाच विरोध न करता ते मुकाट्यानं स्वीकारून आला दिवस ढकलत पुढे न्यायचा, की मुरादच्या आईसारखं आपलं अपूर्ण झालेलं स्वप्न आणि आपल्याला न गवसलेला आनंद आपल्या मुलाच्या डोळ्यांमध्ये शोधायचा, की मुराद सारखं ‘जिंदा मेरा ख्वाब ही, कैसे तू दाफानायेगा ’ असं म्हणून प्राक्तनालाच खुन्नस द्यायची- हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं.

ह्यात एखादा मार्ग योग्य किंवा एखादा मार्ग अयोग्य असतो असं आजिबातच नाही. इथे फक्त एक कृती असते, आणि त्या कृतीचे परिणाम असतात; पण त्या मोक्याच्या क्षणी ती कृती करताना, आयुष्यातला तो एक महत्वाचा निर्णय घेताना, केवळ एकच गोष्ट लक्षात ठेवायची असते, ती म्हणजे संपूर्णपणे वेगळं, नवं आयुष्य आपल्यापासून कायम केवळ एकाच निर्णयाच्या अंतरावर असतं आणि असे निर्णय घेण्याची संधी आपल्या आयुष्यात रोज रोज येईलच असं नाही.

मुरादच्या आयुष्यात ती संधी आली, ती त्यानं घेतेली, आणि ‘अपना टाईम आयेगा’ असं म्हणत आज तो गलीबॉय बनून रुपेरी पाड्यावर झळकला

त्याच गलीबॉयच्या सुंदर अनुभवासाठी झोया अख्तर आणि तिच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार.

सौरभ राघवेंद्र.