•mr•

हारपर्स वूड

एक अमेरिकन टीव्ही सिरीज आहे. नुकताच वयात आलेला एक मुलगा त्या सिरीजचा मेल प्रोटॅगोनिस्ट. साठच्या दशकातल्या उत्तरार्धातल्या एका टिपिकल अमेरिकेन सबअर्बन घरात तो रहात असतो. त्याचा एक खास मित्र अस…

एक अमेरिकन टीव्ही सिरीज आहे. नुकताच वयात आलेला एक मुलगा त्या सिरीजचा मेल प्रोटॅगोनिस्ट. साठच्या दशकातल्या उत्तरार्धातल्या एका टिपिकल अमेरिकेन सबअर्बन घरात तो रहात असतो. त्याचा एक खास मित्र असतो आणि एक खास मैत्रिण. आपल्याकडे पुण्यात जसं तळजाई आहे, तशीच त्यांच्या इथे हारपर्स वुड नावाची एक छोटी जंगलवजा जागा असते. कळायला आणि खेळायला लागल्यापासून नेमानं जायची, त्यांची आवडती जागा. खूप साऱ्या आठवणी असतात त्यांच्या, त्या जागेशी जोडलेल्या. आई-बाबांसोबत एन्जॉय केलेले छोटेखानी पिकनिक्स, लपंडावापासून अमेरिकन फुटबॉल आणि बेसबॉलपर्यंत कितीतरी खेळांचे रंगलेले डाव, अंधार दाटेस्तोवर मनसोक्तपणे फिरवलेली सायकल. अशाच एका संध्याकाळी त्याला कळतं की व्हिएतनाम युद्धात तिचा दादा मारला गेला. सगळ्यांनाच त्या बातमीचा धक्का बसलेला असतो. तिला भेटायचं असतं त्याला. ती कुठे असेल असा प्रश्न त्याला पडतो पण उत्तर मिळायाच्या आधीच आपसुकच त्याची पावलं हारपर्स वुडकडे वळतात. स्ट्रीटलॅम्पच्या प्रकाशामुळे रस्ते पिवळसर दिसत असतात, थंडी वाढत असते. तो पोहोचतो तेंव्हा शून्यात नजर लावून एका मोठ्या दगडावर ती बसलेली त्याला दिसते. नकळतं वय त्यांचं. काय बोलावं, काय नाही, उमजत नाही त्यांना. तो जाऊन तिच्या शेजारी बसतो, आपलं जॅकेट तिला देतो. त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन ती बसून राहते आणि तो ही.

साठच्या दशकाचा उत्तरार्धात आणि सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात अमेरिकेचं सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालं होतं. अनिश्चितता आणि आशवादाच्या दोन बिंदूच्या दरम्यानची आंदोलनं अनुभवणाऱ्या त्या काळात तो मोठा होत होता, ती ही मोठी होत होती. त्यांना मोठं व्हायचंच नव्हतं असं नाही, पण त्यांना लहान राहायचं नव्हतं असही नव्हतं. मोठा गोंधळाचा काळ होता तो, पण आठवणींच्या काही खूणा मागे ठेऊनच आपण मोठे होऊ अशी खात्री होती, त्याला, तिला, सगळ्यांनाच. आपण कितीही पुढे गेलो, कितीही मोठे झालो, तरी मागे वळून पाहायला या आठवणी आहेत असा विश्वास होता. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण गेलो तरी घरी येऊ तेंव्हा बाकी काही असेल, नसेल - हारपर्स वूड नक्की असेल याचीही त्यांना खात्री होती, पण तो सत्तराव्या दशकाचा पूर्वार्ध होता. शाश्वती द्यावी अशी एकच गोष्ट त्या काळात होती- अशाश्वती.

आणखी एका संध्याकाळी त्याला कळतं की हारपर्स वूड जमीनदोस्त होणार आहे. तिथली झाडं जाणार आहेत, छोटा तलाव मुजवून टाकणार आहेत. तिथे आता महाकाय मॉल उभा राहणार आहे. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. हारपर्स वूड जाणं म्हणजे कोणी तरी आपला अंगठा तोडून कायमचा घेऊन जातंय असं त्याला वाटलं, तिला वाटलं. त्यांच्या मित्र-मैत्रिणींना वाटलं. जीवाचा आटापिटा करून असं होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले, पण सगळेच व्यर्थ! 'कन्स्ट्रक्शन साईट' या नावखाली इतरांना तिथे जायची मनाई करण्याच्या दिवस उजडण्यापूर्वीची रात्र. सगळे ठरवतात आपण एकदा लपंडाव खेळून घेऊ इथे, लहान असताना खेळायचो, तसाच!

प्रत्येकाच्याच आयुष्यात आपापली एक हारपर्स वूड असतेच असं वाटतं मला, असावीच रादर. एखादं खास ठिकाण असावं, चार माणसं असावीत, कडू-गोड आठवणी असाव्यात, पूर्ण-अपूर्ण स्वप्नं असावीत. मागं वळून बघणं, हळवं होणं एखाद्याला 'टू मच सेन्सिटिव्ह आणि इमोशनल' किंवा 'सो मिडल क्लास' वाटलं तर वाटू द्यावं, पण म्हणून पाहणं थांबवू नये.

तो म्हणतो, "मोठं व्हायला वेळ लागत नाही. आहे आहे म्हणेपर्यंत तुम्ही निघूनही जाता, पण तुम्ही आहात तोपर्यंत या आठवणी तुमच्यासोबत राहतात. मी आता मागं वळून पाहतो तेंव्हा मला एक शहर आठवतं, एक रस्ता आठवतो, इतर घरांसारखं एक घर आठवतं. बाहेरून पाहिलं तर किंचितही फरक न दिसणाऱ्या अशा घरांत, मावळतीच्या प्रकाशात टीव्हीच्या निळसर उजेडानं उजळलेल्या उबदार लाकडी लिव्हिंग रूम मध्ये स्वतःची, स्वतंत्र गोष्ट असणारे लोक होते. सुख-दुःखाच्या धाग्यांनी बांधलेली कुटुंबं होती, हसता हसता डोळ्यांत पाणी उभं करणारे हळवे क्षण होते! या सगळ्या आठवणींकडे मी आज पाहतोय. मला आनंद झालाय, मला दुःख होतंय आणि मी इथवर आलो त्याचं आश्चर्यही वाटतंय !"

- सौरभ राघवेंद्र.