" ह्या आगतिकतेचा अर्थ काय ... ? "
" पुणे तिथे काय उणे " या काहीश्या अहंकारातूनच जन्मलेल्या प्रश्नाचं एक उत्तर मला अलीकडेच मिळतंय. इथे एक अत्यंत महत्वाची उणीव आहे, ती म्हणजे सहनशीलता.
" पुणे तिथे काय उणे " या काहीश्या अहंकारातूनच जन्मलेल्या प्रश्नाचं एक उत्तर मला अलीकडेच मिळतंय. इथे एक अत्यंत महत्वाची उणीव आहे, ती म्हणजे सहनशीलता.
पुण्यातली वाहतूक व्यवस्था किती भयानक आहे हे तर जगजाहीर आहे पण या समस्येचं गांभीर्य वाढवतात ते निष्काळजी आणि असहनशील चालक.
रस्त्यावर उभे राहायला सोडा, श्वास घ्यायलादेखील जागा नसते इतकी गाड्यांची गर्दी. आणि हे दिसत असूनही मागून हे लोक मोठ-मोठ्या आवाजात हॉर्न वाजवतात. थोडीशी जागा रिकामी झाली की ती आपल्यासाठीच आहे अशी समजूत चारपाच चालक करून घेतात आणि तिथे आधी कुणाची गाडी जाणार ह्यावरून स्पर्धा करू लागतात.
वन-वे चे भान न ठेवता , समोरून येणाऱ्या गाड्यांचेही भान न ठेवता पेशव्यांनी त्यांच्या तीर्थरूपांना जहागीर म्हणून रस्ता दिल्यासारखे बेफामपणे वाटेल तिथे गाडी अक्षरशः 'घुसवतात'. सिग्नल म्हणजे आळीपाळीने रंग बदलणारी रस्त्याची शोभा वाढवणारी वस्तू असे यांना वाटते. हे ही कमी म्हणून की काय पादचाऱ्यांच्यासाठी राखीव पदपथावरून (मराठीमध्ये फुटपाथ) गाडी चालवतात.
या वागण्यामागचे कारण मला अद्याप समजले नाही ! एखाद्याला खरेच घाई असेल तर आपण समजू शकतो पण रस्त्यावर उभ्या सगळ्याच वाहनचालकांना एकदम आणि इतकी कसली घाई निर्माण होते, हे ती बिचारी सिग्नलदेवताच जाणे..
इतकी वाहने या शहरात आहेत, त्यामुळे अव्यवस्था होणं स्वाभाविक आहे; पण थोडीशी अडचणही आपल्याला कशी सहन होत नाही हेच मला समजत नाही. ज्या आगतिकतेने इथे हॉर्न वाजवले जातात, केवळ आपलीच गाडी पुढे दामटण्यासाठीची पराकाष्ठा केली जाते, आपल्या या वागण्यामुळे इतरांना त्रास होईल का हा विचारही केला जात नाही तेंव्हा मला खरंच माणसाच्या या बदलत्या स्वभावाची काळजी वाटू लागते.
पण प्रश्न केवळ वाहतुकीच्या समस्येपुरताच नाही आणि केवळ पुण्यासाठीच लागू आहे असंही नाही. थोडसं सामंजस्य अंगी जाणीवपूर्वक बाणवलं तर वाहतुकीच्या समस्येची तीव्रता कमी होईलही पण, थोडीही अव्यवस्था सहन होत नाही, समोरच्या व्यक्तीचा विचार करण्याची कुवत नाही, आपल्या आयुष्याच्या परिघाच्या बाहेर घडणाऱ्या गोष्टींबद्दल संवेदनशीलता नाही.. या अशा मी व माझे या परिघात रेंगाळणाऱ्या मानवी स्वभावाची थोडीशी चिंता वाटते कधी कधी...
सहनशीलता आणि सद्भावाची जागा ह्या अनाठायी अगतिकतेने आणि असहनशीलतेने घेऊ नये एवढीच इच्छा...
इतकेच.
-सौरभ राघवेंद्र.