क्षुब्ध
कमला मिल- मी कधी पाहिली नाही. लोअर परेल- तिकडे जाण्याच्या योगही कधी आला नाही. तिथे लागलेली आग- त्या आगीची झळ मला बसली नाही. ज्या आगीत होरपळलेले दुर्भागी जीव- मी त्यांना ओळखत नाही. लोटच्या लोट उठलेल…
कमला मिल- मी कधी पाहिली नाही. लोअर परेल- तिकडे जाण्याच्या योगही कधी आला नाही. तिथे लागलेली आग- त्या आगीची झळ मला बसली नाही. ज्या आगीत होरपळलेले दुर्भागी जीव- मी त्यांना ओळखत नाही. लोटच्या लोट उठलेल्या विषारी धुरात गुदमरून प्राणाला मुकलेले लोक- माझे आणि त्यांचे कुठचेच ऋणानुबंध नाहीत.
पण तरी मी क्षुब्ध होतो.
एजून एक घटना. कालचीच. आज त्या घटनेची बातमी झाली. कात्रज जवळचा कुठलासा भाग. तिथे एका टेम्पो का कुठल्याशा अवजड वाहनाचा ब्रेक निकामी होतो. चालकाचं नियंत्रण सुटलेलं ते अवजड धूड उसाचा रस विकणाऱ्या एका विक्रेत्याच्या दुकानात शिरतं. कामातून थोडी उसंत म्हणून दुपारच्या उन्हात उसाचा रस प्यायला आलेले काही मित्र-मैत्रिणी. त्या चौघांच्या हा टेम्पो चाल करून जातो. तिघे वाचतात, पण मुलीचा पाय घसरतो आणि ती पडते. टेम्पो तिला चिरडून टाकतो. त्या मुलीला मी ओळखत नाही, पाहिलंही नाही.
पण तरी मी क्षुब्ध होतो.
एल्फिन्स्टन पूल. नाममात्र निमित्त झालं आणि जिवंतपाणी मारणयातनेचा अनुभव देणारी चेंगराचेंगरी सुरु झाली. त्या चेंगराचेंगरी मध्ये सापाला ठेचून ठेचून त्याचं विष बाहेर काढावं तसं कैक लोकांचा प्राण शरीरातून अक्षरश: निघून गेला. त्या पुलावर मी कधी पायाही ठेवला नव्हता. त्या लोकांचा चेहरासुद्धा मी कधी पाहिला नव्हता.
पण तरी मी क्षुब्ध होतो.
हरयाणातल्या गुरगावमध्ये एका प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय शाळेत सात वर्षाच्या विद्यार्थ्याचा गळा चिरून खून होतो. त्या मुलाला मी ओळखत नाही. त्याच्या पालकांचा आकांत मला समजत नाही. पण तरी मी क्षुब्ध होतो.
अनंत चतुर्दशीचा दिवस. डी.जे. ची भिंत भली मोठी भिंत- कलेच्या देवतेसमोर बीभत्स नृत्य करणाऱ्या मादिरोन्मत्त रेड्यांच्या गर्दीत, ज्ञानेश्वर नावाचा कोणी ट्रॅक्टरचा ड्रायव्हर सांभाळत सांभाळत चालवत असतो. त्या आवाजाने एका वृद्ध मनुष्याच्या छातीत दुखू लागते. हृदय-विकाराचा तीव्र झटका येतो. घराचे अॅम्ब्यूलन्स बोलावतात. पण भक्तगणांच्या गर्दीसमोर ती अॅम्ब्यूलन्स नमते घेते. गणपणी त्या वृद्धाला बोलावून घेतो. मी गणपतीची पूजा करत नाही. ते वृद्ध माझे सख्खे आजोबा सुद्धा नाहीत, मुळात ते माझे कोणीही नाहीत.
पण तरीही मी क्षुब्ध होतो.
श्वेता. नुकताच वाढदिवस होऊन गेलेला असतो. संध्याकाळीच फोन वर बोलून झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायचं ठरलेलं असतं. घरी जाताना हाय-वे वर ट्रक धडक मारून जातो. तिला चाकाखाली चिरडतो. ठरलेली भेट कधी होतच नाही. श्वेता मात्र माझ्या ओळखीची.
मी क्षुब्ध होतो.
मरण स्वस्त झालंय.
काही तरी चुकतंय.
मेज्जर चुकतंय, जे थांबवायला हवं.
मी क्षुब्ध होतो.
मी क्षुब्ध होणंच थांबवायला हवं.
-सौरभ राघवेंद्र.