लै मार खायेगी तू!
<!--[if gte mso 9]>
“तेरे मां की चू*! तेरे मां का दा*! बैठ जा गाडी पे *डी! ****द”
भर रस्त्यात तो तिला शिव्या देत होता. जोरजोरात हाणत होता. ती रडत होती. भेकत होती. त्याच्या एका फाटक्यासरशी विरणारं उसनं अवसान आणून त्याचा विरोध करत होती. त्याच्या कडेवरच्या आपल्या मुलाकडे बघून तरी माझ्यावर दया कर अशी विनवणी करत होती.
“गाडी पे बैठ जा *डी, वरना लै मार खायेगी तू.” तिच्या कानशिलात सणकावून त्यानं निर्वाणीचा इशारा दिला. तिला गाडीवर बसायचं नव्हतं कदाचित, पण तिच्याकडे पर्याय नव्हता. बापाकडून भर रस्त्यात होणारी आईची विटंबना बापाच्या कडेवरचं दोन वर्षाचं मूल मूकपणे पाहात होतं. त्या मुलासाठी तरी आपण गाडीवर बसायला हवं असं तिच्या मनाचा एक कोपरा तिला सांगत असावा. पण मनाचा दुसरा कोपरा मात्र ती गाडी घरी जाऊन थंड पडल्यावर पुढ्यात वाढून ठेवलेल्या बंद दाराआडच्या अमानुष मारझोडीचं, पुरुषी बलाच्या आणि आसक्तीच्या विकृत परिसीमेचं विदारक आणि भयावह चित्र दाखवत असावा; पण अखेर मातृहृदयानं कुठून कुठून हिम्मत गोळा केली आणि त्या भयाचा सामना करण्यासाठी ती आई, ती स्त्री त्या गाडीवर बसली.
हा प्रकार पाहत असताना एका क्षणासाठी माझं रक्त सळसळलं. मस्तकात तिडीक गेली. त्या माणसाच्या कानशिलात दोन लगावून द्यायची इच्छा झाली. त्याचा उन्माद कितीही पराकोटीला जाऊन पोहोचलेला असला तरी त्याचा सामना करण्याची शारीरिक कुवत होती माझ्यात, त्याच कुवतीच्या जाणिवेवर आणि जोरावर त्या स्त्रीवरचे अत्याचार त्या क्षणापुरते थांबवण्यासाठी पुढे सरसावलो मी; पण पुढच्याच क्षणी विचार आला- आत्ता मी हा प्रकार थांबवेन, ह्याला जमिनीवर लोळवेन. ते तिघे इथून निमूट निघून जातील. पण पुढं? पुढं काय?
पुढं सरसावलेलं माझं पाउल तिथेच थबकलं.
क्रोधाच्या वणव्याची विषण्ण राख झाली. प्रतिकाराची क्षमता नसलेल्या एका जीवावर निसर्गदत्त क्षमतेचा अमानुष वापर करून अनैसर्गिकरित्या होणारी मारझोड आपण केवळ पहातच राहिलो ह्या अपराधबोधाचा तीर मी जोपासलेल्या सर्व जाणिवांचा, प्रतिमांचा, आदर्शांचा आणि मूल्यांचा छेद घेत मनाच्या गाभाऱ्यापर्यंत खोलवर गेला आणि तिथेच रुतून बसला.
माझी निष्क्रियता खरंच सम्यक आणि समतोल विचारातून निष्पन्न झालेली कृती होती, की सुचलेला विचार माझ्या निष्क्रियतेला नैतिकतेच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी माझ्या शब्दप्रभू मनाने शोधून ठेवलेली पळवाट होती?
काय झालं असतं जर मी पुढे जाऊन त्या माणसाला चार फटके दिले असते तर? चवताळलेला तर तो होताच, इतकंच की त्याच्या बायकोच्या ऐवजी त्याच्यातल्या जनावराला माझ्यामध्ये त्याचं सावज दिसलं असतं आणि दिसलं जरी असतं तरी त्याच्यामधल्या उच्छादासकट त्याच्यातल्या जनावराला आणि त्याला जमिनीवर लोळवण्याची कुवत होतीच की माझ्याकडे. त्याला मी लोळवला असता. पुढे? ते तिघे तिथून निघून त्याच्या घरी गेले असते. घरी गेल्यावर त्याने माझ्याकडून झालेल्या सार्वजनिक अवहेलनेचा राग पुन्हा तिच्यावर काढला असता तर? त्यांच्या मुलावर काढला असता तर?
समोर उभी व्यक्ती एक स्त्री आहे जी आपला प्रतिकार करू शकत नाही हे ठाऊक असूनही ज्याचा पुरुषी अहंकार भर रस्त्यात तिला मारझोड करण्याएवढ्या पराकोटीची उन्मत्त अवस्था गाठू शकतो, तो माझ्याकडून त्याच रस्त्यात, आणि तोही त्याच्याच स्त्री समोर झालेली स्वत:ची ही अशी विटंबना पचवू शकला असता? माझा प्रतिकार करण्याची समर्थता आपल्या ठायी नाही याच्या जाणीवेने तो घटनास्थळावरून निघून गेला असता, पण ह्या प्रसंगाला “तू निमूट गाडीवर बसली असतीस तर मला मार खावा लागला नसता असं म्हणत” त्याने त्याच्या बायकोलाच जबाबदार कशावरून धरले नसते?
त्या मनुष्याने जमिनीवर लोळण घेतल्यावर घरी जाऊन याचा राग आपल्यावर निघणार ह्या कल्पनेने आधीच भयभीत झालेल्या त्या स्त्रीने अधिकच भितीग्रस्त होऊन माझ्याकडे अभय मागितले असते- म्हणाली असती, “दादा मला घरी जायची भिती वाटते, मी आता काय करू, मी कुठे जाऊ?” या प्रश्नाला मी काय उत्तर दिले असते? आणि ह्याच्या विपरीत- हा आमाच्या नवरा बायकोचा अंतर्गत प्रश्न आहे. तो मला मारेल नाही तर अजून काही करेल. तुम्ही मध्ये आलातच का? माझ्या नवऱ्याला हात लावलातच का असा प्रतिप्रश्न केला असता तर? त्या प्रश्नाला मी काय उत्तर दिले असते?
मी त्यांना पोलिसांकडे घेऊन गेलो असतो- आपण ऐनवेळी काच खाऊन नवऱ्याच्या प्रतिष्ठेपोटी त्या बाईने फिर्यादी होण्याचे मुळातूनच नाकरून मीच तिच्या नवऱ्याला भर रस्त्यात अकारण मारहाण केली अशी वल्गना केली असती तर माझ्या बाजूने साक्ष द्यायला बघ्यांची गर्दी धावून आली असती? त्या मनुष्याने माझा चेहरा, माझ्या गाडीचा नंबर, माझं घर लक्षात ठेवून, आधी बायकोला बघून घेतो- मग तुझ्याकडे येतो असं म्हणून चार-आठ गावगुंड घेऊन आमच्या घराच्या उंबऱ्याशी येऊन ठेपला असता तर? एकट्या-दुकट्याचा सामना मी करू शकलो असतो- पण ही अख्खी टोळी!
एकदा वाटतं माझं त्यांच्या भांडणामध्ये न पडणं योग्यच होतं, माझे विचार अतार्किक आणि वस्तुस्थिती-पराङग्मुख नव्हते, पण मग दुसऱ्या बाजूने विचार येतो- जे घडत होतं त्याला तोंडच न देता माझा नाकर्तेपणा लपवण्यासाठी कर्त्या विचारवंतांची भूमिका घेऊन विचारांच्या दुर्बळ कुबड्यांनी माझ्या लंगड्या अहंकारानिशी जबाबदारीपासून पावलोपावली लांब-लांब चालत गेलो?
एकही उत्तर नाही, फक्त प्रश्नच आहेत माझ्याकडे.
ज्या स्त्रीला आपण भर रसत्यात झोडतो आहोत त्याच स्त्रीचं पोर आपल्या पाठीशी आहे याचा त्या कर्त्या बापाला विसर पडावा? आपला नवरा कसा आहे याची अनुभवसिद्ध जाणिव असूनही आपल्या पोटच्या मुलासाठी त्या श्वापदाबरोबरचा संसार तोडण्याचं धाडस त्या स्त्रीमधल्या दुर्गेला स्फुरू नये? त्या स्त्रीच्या माहेरच्या, सासरच्या लोकांना राग वगैरे जाउद्या- त्या स्त्रीची साधी दयाही येऊ नये? तिच्यावर होणाऱ्या मारहाणीची, तिच्या आक्रंदनाची शेजाऱ्यापाजाऱ्यांना दखलही घ्यावी वाटू नये एवढी सवय होऊन जावी? वर्तमानपत्रांमधून झळकणाऱ्या हजारांपैकी एकाही स्वयंघोषित समाजसेवकाला, अळी आणि गल्लीतल्या पुढाऱ्यांना तिचा हा दुर्दैवी वर्तमान ठाऊकच असू नये? आणि ठाऊक असूनही केवळ नवरा बायकोचं भांडण ही एकमेव सबब त्यांना त्यांच्या समाजसेवेच्या व्रताचं वस्त्र उतरवून बघ्याची भूमिका घेण्यासाठी पुरेशी ठरावी?
आपला विरोधच न करू शकणाऱ्या, मग भले ती स्त्री असो व पुरुष, नामोहरम करणारा पुरुषार्थ आहे तरी कोणत्या जातीचा? काय त्याचं कुळ? कुठंय त्याचं मूळ? काय करायचं ह्या अशा सैतानी आणि अनैसर्गिक वृत्तीचं? कायद्याचा धाक कुठपर्यंत दाखवायचा आणि कायदा म्हणजे शेवटी कोण? आपणच की! जी वृत्ती इथे, अधिकउणी तिथे.
संवेदना मृतप्राय झाल्यात की खरोखरीच मेल्यात आपल्या? रडत-भेकत फटके सोसणाऱ्या त्या स्त्रीचं शोकाविव्हळ क्रंदन आपल्या संपूर्ण मानवजातीचीच शोकांतिका नव्हे का? आणि त्या क्रंदनाला जबाबदार ठरणारा पुरुषार्थ आपल्या मानवजातीच्या तरल संवेदनशीलतेला झाकोळून टाकणारं शतकानुशतकं न सुटलेलं ग्रहण?
ह्या ग्रहणाच्या दुष्ट छायेत घडणारे हे प्रसंग संवेदनशीलतेची मिणमिणती ज्योत घेऊन फिरणाऱ्या तुम्हा-आम्हाला क्वचित दिसतात खरे पण हा देखावा आपल्या नजरेसमोरून निसटताना आपल्या मध्यममार्गी आणि मध्यमवर्गी मूल्यांचं जे ओंगळवाणं दर्शन आपल्यालाच दाखवून जातो तेंव्हा वाटत राहतं- मरणाऱ्या आणि मारणाऱ्या देवभोळ्या लोकांनी गायलेली नियतीची कृपाष्टकं त्या अज्ञ आणि बिचाऱ्या जीवांना मोक्षाची देणगी देऊन जातात खरी; पण त्यांच्या जखमेचं रक्त वाहत रहातं ते आपल्या भाळी संवेदनशीलतेचा शाप घेऊन मुक्तीचा मार्ग शोधत फिरणाऱ्या एकाकी मनांमधून.
-सौरभ राघवेंद.