Maharashtra is a functioning anarchy
गेल्या काही दिवसांपासून मी पहात, ऐकत आणि अनुभवत असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळं माझं मन कमालीचं उद्विग्न झालंय. या उद्विग्नतेमधून या परिस्थितवर सडकून टीका करणारं काही तरी लिहायला हवं असंही मला प्रकर्षानं वाटत होतं, पण सद्य वातावरण पाहता टीका वाचणारे कमी आणि ती टीका आहे असा वास लागला रे लागला की येऊन चावणारेच जास्त आहेत, त्यामुळं हात दाखवून अवलक्षण नको म्हणून योग्य मजकूर सुचेपर्यंत तो लिहू नये असं मला वाटत होतं, तोच जॉन गिलब्रेथचं एक वाक्य बदललेल्या स्वरूपात माझ्या कानावर आलं आणि तो लेख मी लिहिला नाही तरी चालेल अशी खात्री मला पटली. ते वाक्य असं होतं
"Maharashtra is a functioning anarchy"
गेल्या काही दिवसांपासून मी पहात, ऐकत आणि अनुभवत असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळं माझं मन कमालीचं उद्विग्न झालंय. या उद्विग्नतेमधून या परिस्थितवर सडकून टीका करणारं काही तरी लिहायला हवं असंही मला प्रकर्षानं वाटत होतं, पण सद्य वातावरण पाहता टीका वाचणारे कमी आणि ती टीका आहे असा वास लागला रे लागला की येऊन चावणारेच जास्त आहेत, त्यामुळं हात दाखवून अवलक्षण नको म्हणून योग्य मजकूर सुचेपर्यंत तो लिहू नये असं मला वाटत होतं, तोच जॉन गिलब्रेथचं एक वाक्य बदललेल्या स्वरूपात माझ्या कानावर आलं आणि तो लेख मी लिहिला नाही तरी चालेल अशी खात्री मला पटली. ते वाक्य असं होतं-
"Maharashtra is a functioning anarchy"
वरकरणी हे वाक्य गुळगुळीत वाटू शकतं, पण आता मजा बघा. अनार्की म्हणजे अराजक. त्यामुळे महाविकास आघाडीचा एखादा समर्थक तावातावाने भांडत माझ्या अंगावर आला तर त्याला 'फंक्शनिंग' हा शब्द दाखवता येऊ शकतो आणि, "बाबारे, हे अराजक चालवणं 'महा'कर्मकठीण, तुमचा उद्धव करंगळी वर करून ('करंगळी वर करून नक्की काय?' या विचारानं ऐकणाऱ्याच्या मस्तकावरची शीर फडफडे पर्यन्त एक ड्रामॅटिक पॉज घेऊन पुन्हा) तुमच्या उद्धवानं करंगळी वर करून आराजकाचा हा गोवर्धन लीलया उचलून धरलाय की!" असं सांगता येऊ शकतं.
त्याचवेळी एखादा आघाडीचा विरोधक आणि केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाचा समर्थक तावातावाने माझ्याकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडू, महाराष्ट्र आणि गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ, महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड, महाराष्ट्र आणि स्वीडन, महाराष्ट्र आणि चंद्र, महाराष्ट्र आणि मंगळ अशी तुलनात्मक आकडेवारी घेऊन, "सौरभ, डिसफंक्शनल महाराष्ट्राला 'फंक्शनिंग' म्हणताना तुझ्या जिभेवर फोड कसा येत नाही?" असा कळकळीचा प्रश्न सात्विक संतापाने विचारतो तेंव्हा, "मित्रा, अरे, फंक्शनिंग म्हटलं तरी अनार्की म्हणजे अराजकच म्हणतोय की नाही मी?" असं म्हणून त्यालाही समजावता येऊ शकतं.
आता यांच्याशिवाय सोशल आणि मॉरल काँशन्स आपल्याच बापाचा माल असल्याच्या तोऱ्यात कुणालाच नको असलेल्या अकलेची शेती करणाऱ्या स्वयंघोषित बुद्धिजीवी लोकांना असलं चटपटीत वाक्य आवडायची आणि सद्य परिस्थितीत मी ते निर्भीडपणे व्यक्त करायचं धाडस दाखवलं म्हणून माझा सोशल स्टेटस प्रोमोट व्हायचीच शक्यता अधिक. त्यामुळे 'लखू रिसबुड आणि कंपनी'कडून माझ्या नावे बिल फाडलं जायची शक्यताही नगण्य.
याव्यतिरिक्त फेसबुक आणि ट्विटर आणि इंस्टा आणि ब्लॉग वगैरे गोष्टींवरती जे इंटलेक्च्युअल मास्टर्बेशन सुरू असतं त्यापासून अलिप्त असणाऱ्या, मरणयातना सहन करणाऱ्या डेली वेज लेबर्स पर्यंत ही टीका तशीही पोहोचणार नाहीच, त्यामुळे त्यांच्या समर्पक युक्तीवादाची किंवा आक्रमक प्रतिसादाचीही भिती नाही!
शेवटी राहता राहतात ती या कोलाहलात आवाज हरवून गेलेली, टीव्ही, सोशल मिडियावर किरकोळ फुटेज मिळणारी माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं आणि त्यांचे प्रश्न. आता आमच्यासारख्यांनी हे वाचलं काय किंवा नाही काय, दोन्ही सारखंच! कारण, मिळकत निम्मी होऊनही वर्क फ्रॉम होम सुरू असलेल्या आम्हा मंडळींना अनार्की म्हणजे ऑफिसच्या कामातला गोंधळ आणि तरीही (कीप द शीट) फंक्शनिंग ही वरून आलेली ऑर्डर या पलीकडे जगच माहिती नसल्यानं 'फंक्शनिंग अनार्की' या वाक्याच्या आधी नाव महाराष्ट्राचं आहे, देशाचं आहे, उत्तराखंडमध्ये जळणाऱ्या जंगलाचं आहे, ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधल्या वादळाचं आहे की टोळधाड पडलेल्या राजस्थानातल्या एखाद्या शेताचं आहे याने यत्किंचितही फरक पडत नाही, त्यामुळे यावर व्यक्त वगैरे होण्यात वेळ खर्च करणं आम्हाला मानवतच नाही!
सो, इन कन्क्ल्युजन, सडकून टीका करण्याचा जो माझा मानस होता तो पुरं करणारं हे एकच वाक्य-
"Maharashtra is a functioning anarchy"
इच्छा फक्त इतकीच आहे की इत:परही जर मानवजात पृथ्वीवर खरंच तग धरून राहिली तर काही शे वर्षांनी डिजिटल उत्खनन करून गतकाळाचे अवशेष धुंडाळणाऱ्या मंडळींना हे वाक्य मिळावं; भयावह, बिकट आणि गंभीर वस्तुस्थितीमुळे मनस्थितीत कितीही उद्विग्न आणि व्यथित झालेली असली तरीही- जरा कुठे खुट्ट झालं तरी उठसुठ दुखावल्या जाणाऱ्या आणि त्या दुःखासरशी अंगावर तुटून पडणाऱ्या अहिंसेची दीक्षा जगाला दिलेल्या भारतातल्या भावनाप्रधान समाजात अस्वस्थ मनोवस्थेतून व्यक्त होताना करावी लागणारी तारेवरची कसरत त्यांना दिसावी. इतकंच झालं तरी पुष्कळ आहे बाकी मी, माझी टीका, चार शब्दांच हे वाक्य मग खड्ड्यात गेलं तरी माझी काहीच हरकत नाही. बाकी,
"Maharashtra is a functioning anarchy"
- सौरभ राघवेंद्र.