मराठी भाषेचा अतिरेकी आग्रह आणि अभिमान बाळगणाऱ्या आणि इतर सर्वांना...
मराठी भाषेचा अतिरेकी दुराग्रह बाळगणाऱ्या आणि इतर सर्वांना, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. काही कारणाने आज एका मराठी वृत्तवाहिनी वाहिनीवर मी इंग्रजीमुळे संवाद खुंटतो आणि इंग्रजी भाषा शिक्षणावर बंदीच आणली पाहिजे अशा अर्थाची विधाने एका अत्यंत प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तीकडून ऐकली. या विधानाने मला खूप अस्वस्थ केलं आणि हेच माझ्या पत्रास कारण..
मराठी भाषेचा अतिरेकी दुराग्रह बाळगणाऱ्या आणि इतर सर्वांना,
सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
काही कारणाने आज एका मराठी वृत्तवाहिनी वाहिनीवर मी इंग्रजीमुळे संवाद खुंटतो आणि इंग्रजी भाषा शिक्षणावर बंदीच आणली पाहिजे अशा अर्थाची विधाने एका अत्यंत प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्तीकडून ऐकली. या विधानाने मला खूप अस्वस्थ केलं आणि हेच माझ्या पत्रास कारण...
मराठी भाषा टिकली पाहिजे असे पुष्कळ लोक म्हणतात, तुम्हालाही तसे वाटत असेल आणि त्यात काही गैर आहे असे मलाही वाटत माही. पण जर ती टिकली पाहिजे हे विधान ती लुप्त होईल या भीतीमधून निर्माण होत असेल तर मात्र मला हे हास्यास्पद वाटते.
या तथाकथित 'मराठी टिकली पाहिजे' वाल्यांचे मुख्य टार्गेट असते ती इंग्रजी भाषा. आणि आपल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी ते ठरलेली उदाहरणे देतात ते आपल्या देशातल्या भाषेच्या बाबतीत दुराग्रही आणि दुराभिमानी असणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांची, आणि जर्मनी-जपान अशा देशांची. पण त्यांचे समर्थन किती पोकळ आहे हे मला त्यांना कळकळीने सांगावेसे वाटते.
दाक्षिणात्य लोक त्यांच्या भाषेबाबत आग्रही असले तरी त्यांचा इंग्रजीला विरोध नसतो किंबहुना त्यांचे इंग्रजी पहिल्यापासूनच चांगले असते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यास कोणतीही अडचण येत नाही. मात्र याउलट एक क्षण असं विचार करा की चेन्नई मध्ये तुम्ही गेला आहात आणि तुमचा रस्ता चुकला. तुम्ही त्यांच्याशी मी मराठी म्हणत मराठी मध्ये बोला आणि ते तुमच्याशी त्यांच्या भाषेत बोलतील. पोहोचाल का तुम्ही तुमच्या इप्सित स्थळी ? आणि जर आपण हिंदी मध्ये बोललो तर ते आपल्याला कदाचित उत्तरही देणार नाहीत. मला मग प्रामाणिकपणे सांगा 'अतिथी देवो भव:' म्हणणाऱ्या आपल्या देशात कुठल्या अंगाने हे सौजन्याचे आणि सुसंस्कृत पाहुणचाराचे लक्षण दिसते ?
जर्मनी आणि जपान सारखे देश त्यांच्या भाषेबद्दल आग्रह धरतात याचे मुख्य कारण त्यांचा त्यांची भाषा शिकावी असा आग्रह असतो.. इंग्रजीला विरोध नसतो. आणि मुख्य आजच्या युगामध्ये ज्याला तंत्रज्ञानांचे युग म्हणतात त्यामध्ये पुढे वाटचाल करण्यासाठी, स्पर्धेमध्ये न केवळ टिकण्यासाठी तर पुढे जाण्यासाठी लागणारे सायंटीफिक लिटरेचर हे त्यांच्या त्यांच्या भाषेत निर्माण होते आहे,आणि ते न केवळ निर्माण होते तर ते अद्ययावत असे असते. आपल्या मराठी भाषेत कुठले रिसर्च पेपर उपलब्ध आहेत ते सांगा पाहू मला ? इंग्रजी भाषेचा अभ्यास गरजेचा नाही का मग ?
इंग्रजी भाषा तिच्या इतिहासात संपूर्णपणे लुप्त होण्याचा वळणावर दोन वेळेस आली होती. व्हॅटिकन सिटीचा इंग्रजी भाषा स्वीकारण्यास किती तरी काळ तीव्र विरोध होता. पण आज मात्र कित्येक स्पॅनिश आणि इटालियन लोक त्यांच्या विचित्र उच्चारांसाह इंग्रजी भाषा बोलताना दिसतात. इंग्रजी भाषा संपवण्याचा जाणून-बुजून प्रयत्न केला जाऊनही इंग्रजी भाषा टिकली. ती का टिकली ? इंग्रजी भाषा टिकली याचे कारण त्या भाषेने सर्व भाषांना सामावून घेतले. इंग्रजी मधले मुळचे इंग्रजी असे शब्द पुष्कळ कमी आहेत. एरवी आपल्या जीवनशैली बाबत अत्यंत आढ्यताखोर असणाऱ्या इंग्रजांनीही इतर भाषांकडे एक थ्रेट म्हणून न पाहता नवे काही तरी शिकण्याची संधी म्हणून पहिले.
मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.अभिजात भाषेचा मुख्य निकष हा असतो की भाषेला किमान १५०० वर्षांचा इतिहास असावा. गेली पंधराशे वर्ष ही भाषा इतके आघात पचवूनही अंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्य निर्माण करते आहे. मग प्रामाणिकपाने सांगा, आपली भाषा नामशेष होईल ही भिती अनाठायी नाही का ? आपल्या भाषेवर प्रत्येकाने प्रेम केलंच पाहिजे हे निर्विवाद, पण म्हणून बाकीच्या भाषांचा सरसकट तिरस्कार करावा आणि आपल्या मातृभाषेचा आपला अहंगंड पोसण्यासाठी वापर करावा हे योग्य आहे का ?
पण एक मात्र आहे.. जर कोणी इंग्रजी भाषा श्रेष्ठ आणि मराठी भाषा मात्र डाऊन मार्केट म्हणून मराठी कडे मुद्दामहून दुर्लक्ष करत असेल तर मात्र माझ्या मस्तकात तिडीक जाते. मराठी भाषेचा भविष्यात उपयोग नाही म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमात पाठवणारे पालक पहिले की मला खूप वाईटही वाटतं. अमुक भाषा फर्स्ट लँग्वेज, तमुक सेकंड लँग्वेज असं म्हणत भाषेचं अवमुल्यनही मला व्यथित करून जातं. ज्या लहान वयात मूल अत्यंत ग्रहणक्षम असतं त्या वयात त्याला भाषांची गोडी लावण्याऐवजी जर त्याच्यावर हे असे संस्कार केले तर त्या भाषाशिक्षणाला अर्थ तरी काय राहीला ?
जेंव्हा जेंव्हा मी दोन भाषांची तुलना आणि त्या दोहोंपैकी आपलीच भाषा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पाहतो तेंव्हा तर मी खूपच व्यथित होतो. प्रत्येक भाषेचा इतिहास निराळा असतो. त्या त्या साहित्यामध्ये ज्या समाजजीवनाचं, संस्कृतीचं आणि कल्पनांचं चित्रण दिसून येतं आणि पर्यायानं भाषेच्या विकासाला पूरक ठरतं. ते जीवन, ती संस्कृती प्रत्येक ठिकाणी निराळी असते. मग ही तुलना केलीच कशी जाऊ शकते? पण का कोणास ठाऊक, आपल्याला एखाद्या नव्या भाषेचा गोडवा समजून घेण्यासाठी ती भाषा शिकताना पडणाऱ्या कष्टांपेक्षा तुलना करून ती भाषाच कशी कनिष्ठ दर्जाची आणि आपल्या भाषेच्या अस्तित्वासाठी मारक किंवा धोकादायक आहे हे दाखवण्यात जास्त स्वारस्य आहे. मुळात भाषेची निर्मितच कशासाठी झाली होती ? संवाद साधण्यासाठीच ना ? मग एक भाषा जास्त शिकून चार नवीन माणसं जोडण्यात मराठी भाषेचा अपमान किंवा नुकसान कुठे होते हेच मला समजत नाही.. उलट चार नवीन शब्द समजल्याने आपण ते आपल्या भाषेत आणि बोलीभाषेत वापरू शकतो. आपल्यापुरती का होईना मराठी भाषा समृद्ध करू शकतो. शिवाय विविध भाषांमधलं साहित्य नवी दृष्टी देतं. नवे विचार व्यक्ती म्हणून आपली परिपक्वता वाढवतात. मग आपल्या प्रगतीचा मार्ग आपणंच का रोखावा ? आणि आपण फक्त प्राणी नाही आहोत. मनुष्य-प्राणी आहोत. विविध भाषा शिकण्याचं त्या बोलण्याचं आणि त्यातून व्यक्त होण्याचं सद्-भाग्य आपल्याला लाभलंय. मग अशा अनाठायी दुराग्रहापोटी आणि दुराभिमानापोटी आपण स्वत:लाच हतभागी का बनवून घ्यायचं ?
फार काही मोठं मत मांडण्याएवढी प्रगल्भता माझ्यापाशी नाही पण इतकंच सांगेन की भाषा ही प्रामुख्याने संवादासाठी असते, भाषाश्रेष्ठ्त्वाच्या वादासाठी नव्हे. कुठल्याही भाषेला विरोध करण्यापेक्षा ती आत्मसात करण्याचा सूज्ञपणा आपण दाखवू शकू इतके सुसंस्कृत आपण नक्कीच आहोत असं मला वाटतं. समोरचा आपली भाषा शिकत नाही मग आपण तरी का त्यांची भाषा शिकायची या प्रश्नाकडे पोकळ दंभाने बुरसटलेल्या नकारात्मकत वूत्तीने न पाहटा आपण त्यांची भाषाही शिकूया आणि त्यांना आपली भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहित करुया अश्या सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवे. शेवटी हा सगळा दृष्टिकोनाचाच प्रश्न आहे..
आपला नम्र (?)
सौरभ राघवेंद्र.