मिम्स वगैरे (१)
सध्या फावल्या वेळात तर कधी मुद्दाम वेळ काढून मिम्स बनवतोय मी. आधीपासूनच फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सऍप वगैरे गोष्टींवर मिम्स पाहायचो, शेअर-टॅग वगैरे सगळं करायचो मी, पण मिम बनवणं वगैरे माय कप ऑफ टी वाटल…
सध्या फावल्या वेळात तर कधी मुद्दाम वेळ काढून मिम्स बनवतोय मी. आधीपासूनच फेसबुक, इन्स्टा, व्हाट्सऍप वगैरे गोष्टींवर मिम्स पाहायचो, शेअर-टॅग वगैरे सगळं करायचो मी, पण मिम बनवणं वगैरे माय कप ऑफ टी वाटला नव्हता मला कधीच. शिवाय माझी विनोदबुद्धी केवळ हसण्यापुरतीच मर्यादित. त्याच्याही पुढं कधी गेलंच तर अगदीच चारातला एकच विनोद थोडा बरा म्हणावा असा. उरलेल्या तीनातले दोन पाणचट आणि एक एक्सप्लेन करावा लागेल इतका टेक्निकल आणि जड. त्यामुळे मिम्सकडे आणि त्या बनवणाऱ्या लोकांकडे, 'राव! सुचतंच कसं यांना!' आशा आश्चर्यानंच पाहायचो मी. मात्र चार एक महिन्यांपूर्वी आम्हाला काफ़िलाचं प्रमोशन करायचं होतं म्हणून काही तरी हटके करू असं म्हणून विचार करत असताना माझ्याकडून "कॉफील? छे! काफ़िला!' असं पहिलं-वाहिलं मिम बनवलं गेलं. मग ती बनवण्यासाठी लागणारी बैठक उमजत गेली आणि मग विविध विषय घेवून मिम बनवणं सुरू झालं ते सुरूच आहे.
मिम ही संकल्पना खरं तर जीवशास्त्रातली. इंग्लिश शास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्सनं त्याच्या 'अ सेल्फीश जिन' या पुस्तकात मिम हा शब्द प्रथम वापरला होता. शरीरशास्त्रात 'जिन' ह्या घटकाचं जे कार्य असतं, तेच कार्य सामाजिक पातळीवर 'मिम' या घटकाचं आहे असं डॉकिन्सचं मत. (संदर्भ: ब्रिटनिका) मिमची संकल्पना मूलतः वैचारिक असली तरी व्यावहारिक संदर्भानं मिम हा असा घटक आहे जो (जिन अथवा जनुकाप्रमाणेच) विशिष्ट माहितीचं हस्तांतरण होण्यासाठी कारणीभूत असतो. मी सध्या सेल्फीश जिन वाचतो आहे, ते वाचून झालं तर पुढे मागे त्याविषयी लिहिनही, पण तूर्तास आपण मिम या शब्दाच्या 'नोशन' किंवा सध्या रूढ असलेल्या इंटरनेट मिम या अर्थाचा धागा पकडूनच पुढं जावं असं मला वाटतंय.
मूळ 'मिम'प्रमाणंच इंटरनेट मिम्सनासुद्धा स्वतंत्र इतिहास आहे, तो चांगला वीस एक वर्ष जुना देखील आहे; पण त्याच्याही फार खोलात न जाता थोडक्यात सांगायचं तर मिम म्हणजे एक विशिष्ट (आणि क्वचित वैश्विक) अभिव्यक्ती असणारं एक साधं टेम्प्लेट.
त्या टेम्प्लेट मधून जे व्यक्त झालंय ते जवळ जवळ सर्वांनाच कळू शकतं; पण त्यावरचा जो मजकूर आहे तो मात्र सर्वांना कळेलच असं नाही. इथं शेअर केलेलं मिम पहा! जे लोक माझ्याशी व्हाट्सऍपवर रोज बोलतात त्यांना हे मिम पहिल्या पहिल्याच हसू येतं, पण ज्यांचा आणि माझा व्हाट्सऍपवर विशेष संवाद होत नाही त्यांना मात्र, 'मी पटकन टाईप करण्याच्या नादात स्पेलिंग्जच्या पुष्कळ चुका करतो' असं सांगावं लागतं आणि त्याही पुढे ज्यांना 'सौरभ' ही व्यक्ती केवळ नावानिशी माहिती आहे, त्यांना हे चित्र आणि मिमचं टेम्प्लेट पाहून हसू येईल, न येईल- पण हा जो सौरभ आहे तो स्पेलिंग्ज सहसा चुकवतो अशी माहिती नक्कीच मिळते. (शेवटी गुड जोक इज इन्फॉर्मेटिव्ह असं म्हणतात आणि हो, ही अतिशयोक्ती आहे, मी स्पेलिंग्जच्या एवढ्याही चूका नाही करत!)
इंटरनेट, फोटो एडिटर, इमेज शेअरिंग या गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यानंतर मिम्स बनवणं आता पुष्कळ सुलभ झालंय. मिम्स बनवण्यासाठी स्वतंत्र साईट्स आहेत, त्या त्या साईट्सचे मिम्सचे स्वतंत्र डेटाबेसेस आहेत. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टी (उदाहरणार्थ, सध्याचं गो करोना) सगळ्यांना रेडिली उपलब्ध आहेत. त्यामुळं मिम बनवण्यासाठी जी प्रक्रिया असते तिचा वेळ लक्षणीयरित्या कमी झालेला आहे. मिम बनवण्याची तांत्रिक बाजू जो आत्मसात करतो; त्याच्याकडे जर पर्याप्त विनोदबुद्धी असेल तर तो मिम्सचं अक्षरशः गुऱ्हाळ सुरू करू शकेल इतक्या शक्यता मिम-मेकिंगमध्ये उपलब्ध आहेत.
विनोदनिर्मिती करणं हा इंटरनेट मिम्सचा प्राथमिक हेतू बनलेला आहे असं माझं आत्तापर्यन्तचं निरीक्षण मला सांगतं. कित्येक मिम्सवर माझे मित्र-मैत्रिणी आणि मी पोट दुखेपर्यंत हसलो आहोत, मात्र मिम्सचा उपयोग इथवरच थांबत नाही. मिम्स हे आताशा नवीन बिझनेस मॉडेल बनलंय. मिम्स बनवणारे इन्स्टाग्राम हॅन्डल्स वेगवेगळ्या प्रमोशन्स मधून मुबलक पैसे कमावतात. मिम्स बनवणाऱ्या आणि त्या एप्रिशिएट करणाऱ्या विविध कम्युनिटीज् तयार होऊन त्यांच्यात विविध प्रकारची वैचारिक देवाणघेवाण सुरू झालेली आहे. शिवाय ह्या असंख्य मिम्समुळे सामाजिक घटनांकडे विनोदबुद्धीने पाहण्याचा निकोप दृष्टीकोन जोपासला जातो आहेच पण त्याचवेळी व्यंग आणि विसंगती एका क्लिकसरशी 'फॉरवर्ड' करता येतील अशा पद्धतीने मांडता येऊ लागल्या आहेत.
नवी गोष्ट काही तासात शिळी होणाऱ्या इंटरनेटवर मिम्ससाठी रोज नवं कंटेंट जनरेट करण्याच्या नादात जुन्या गोष्टी नव्या संदर्भानं पुढं आल्याची- मेरे अब्बा हार्मोनियम खाते थे किंवा बुलती है मगर जनेका नाही अशी हिंदी वाक्यं किंवा अशी ही बनवाबनवी आणि तत्सम चित्रपटातले अनेक सिन्स उदाहरणं म्हणून पुष्कळ बोलकी आहेत. एखाद्या विशिष्ट प्रसंगात कॅमेरामध्ये कैद झालेला अज्ञात व्यक्तीचा भावनिक उद्रेकही मिम्सनी 'युनिव्हर्सल' केलेला आहे. 'मादर*त हूं जो मै यहा आया' असं म्हणत पॅराग्लायडिंग करणारा मनुष्य, किंवा हात उलटा करून 'जजबात पलट दिये' असं म्हणणारा पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी किंवा उद्धटपणे वागणारी राणू मंडल अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकू!
मिम्स विषयीचा माझा अभ्यास नुकताच कुठे सुरू झालेला आहे. त्याविषयी लिहिण्यासारखं पुष्कळच आहे, आणि वेळ मिळेल तेंव्हा मी ते लिहीनही पण तूर्तास आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, थिअरी ऑफ ह्युमर आणि मिम्स या तीन गोष्टींची सांगड घालून काही नवा प्रयोग करता येतो का याचा मी शोध घेतोय. या प्रक्रियेत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर यु आर मोअर दॅन वेलकम. बाकी पुन्हा लिहीनच!
-सौरभ राघवेंद्र.