निवृत्त
“सर आहेत का?” मी विचारलं.
“सर आहेत का?” मी विचारलं.
“बाबा कोणी तरी भेटायला आलंय तुम्हाला.”
सरांच्या मुलीने त्यांना बोलावलं.
सरांना भेटायला म्हणून निघालो तेंव्हा
सर भेटतील वा नाही याबद्दल मी साशंक होतो. आमची शेवटची भेट होऊन जवळ जवळ तिन वर्षं उलटलेली, शिवाय
मी पाठवलेल्या मेलला त्यांच्याकडून उत्तरही आलं नव्हतं. फोन नंबर मिळवावा
म्हणून ओळखीतल्या चार लोकांकडे चौकशी केली तेंव्हा तो मिळाला तर नाहीच उलट बऱ्याच
जणांनी मला सांगितलं की शहाणा असशील तर त्यांच्याकडे जाऊ नको- शिकवत होते तेंव्हाच
ते विक्षिप्त होते, रिटायर झाल्यावर कसे असतील देव जाणे! नाही म्हणायला हा विचार
माझ्याही मनात येऊन गेला होताच; पण एकदा भेटून यायला काय हरकत आहे असं म्हणत त्या
विचाराकडे मी दुर्लक्ष केलं, थेट त्यांचं घर गाठलं आणि दरवाजा ठोठावला.
“सर मी सौरभ!” मला भेटून सरांना आनंद
वगैरे होणार नाही याची खात्री मला होती; पण भेटल्यावर सर किमान ओळख दाखवतील एवढं
मात्र मी गृहीत धरलं होतं.
सरांनी भुवया आक्रसून माझ्याकडं पाहिलं
आणि मी सरांकडे पाहिलं. कंबरेला आखूड टॉवेल गुंडाळून उघड्या अंगाने सर लोखंडी
दरवाज्यापलीकडे उभे होते. कॉलेजमध्ये असताना सरांना मी दाढीच काय, साधी मिशी
ठेवेलेलं सुद्धा कधी पाहिलेलं नव्हतं, पण आता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत
होतं की दाढी कशी करावी ह्या गोष्टीचाच त्यांना विसर पडला असावा. त्यांचा चेहरा
निर्विकार होता. चेहऱ्याला आलेली सूज- प्यावी किती ह्याचं गणित हुकल्याची साक्ष देत
होती. मला ओळखल्याचा लवलेशही त्यांचा डोळ्यात नव्हता.
"सर मी विद्यार्थी तुमचा.”
अवघडलेल्या शांततेला वाट मोकळी करून द्यावी म्हणून मी चार शब्द उच्चारले आणि
पुन्हा सरांकडे पाहिलं. सरांचं मदिराप्रेम कॉलेजमध्ये सर्वश्रुत होतं. शिक्षकानं
दारू पिणं ह्या गोष्टीचा एरवी गवगवाच व्हायचा; पण आम्हा मुलांची पिढीसुद्धा पुष्कळ
प्रगल्भ. त्यामुळं पेल्यातली माहिती पेल्यातच ठेवावी एवढी समज आमच्याही ठायी होती.
कॉलेजमध्ये असतना एका प्रोजेक्टच्या निमित्तानं मी सरांची मदत मागितली होती. सर
म्हणाले होते की कॉलेज मध्ये इतर कामांमुळं त्यांना वेळ देता येणं शक्य होणार
नाही, एखाद्या शनिवारी दुपारी घरी ये. वेळ काढून सरांच्या घरी गेलो तेंव्हा सर त्यांच्या
पवईच्या एका मित्राशी फोन वर बोलत होते. “कधी येतोयस लेका पुण्याला? संगमला बसू
एकदा. बिल माझ्याकडे.” बोलता बोलता त्यांनी माझ्याकडे बघून डोळा मारला. थोडसं
अवघडून मी ही गालातल्या गालात हसलो. फोन झाल्यावर सर म्हणाले, “गम्मत रे. तो येणार
नाही माहितीये मला.” टेक्निकल विषयांच्या संदर्भात सरांनी काही सांगितलं तर आम्ही मुलं
त्यांच्या वाक्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवत असू; पण ‘गम्मत रे..’ ह्या वाक्यावर
मात्र माझा तेंव्हाही विश्वास बसला नव्हता आणि आता तो बसणं अशक्यच होतं.
“हो ओळखलं मी.” सर म्हणाले. त्यांना
भेटण्यासाठी घराबाहेर पडलो तेंव्हा, ‘सर पेठेत राहतात. त्यामुळं त्यांच्या
स्वभावात फारसा बदल होणार नाही’ असा विचार करून मी स्वत:शी गमतीने हसलो होतो आणि
तो झाला असता काय किंवा नसता काय मला विशेष फरक पडला नसता, कारण मला सरांचे जे
अनुभव आले होते, ते खूपच चांगले होते. मला आठवतं, एका रिसर्च पेपरवर मी काम करत
होतो. विषय होता नॅनो-टेक्नॉलॉजी आणि आय.सी. इंजिन. ज्या दिशेने मी काम करत होतो,
त्या दिशेने त्या वेळी विशेष संशोधन झालेलं नव्हतं आणि मी इंजीनीअरिंगच्या दुसऱ्या
वर्षात असल्यामुळं माझा एकूणच अनुभव अत्यंत त्रोटक होता. माझ्या पेपरची एकूण
गती-प्रगती पाहून शेवटी मी मी सरांना म्हटलं होतं, “सर आय हॅव रिच्ड अ डेड एंड.
देअर इज नो वे फॉरवर्ड.” त्यावर सरांनी मला विचारलं, “सौरभ, आर यु शुअर? देअर इज ऑल्वेज
अ वे फॉरवर्ड.”
आणि त्यानंतरच्या पुढच्या पंधरा
मिनिटात सरांनी मला त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाची गाथा कथन केली होती. त्यांच्या
लहानपणीची परिस्थिती, सुटण्याची शक्यताच नाही असे काही घरगुती प्रश्न, त्यांच्या
आई-वडिलांचं दीर्घ आजारपण आणि त्यात त्यांनी चोखपणे बजावलेली सेवा, ह्या सगळ्यात
त्यांनी अनुभवलेलं टोकाचं नैराश्य आणि त्यातून त्यांचं बाहेर येणं!
त्यांच्या
आयुष्यातलं एक-एक वादळ त्यांनी माझ्यासमोर मोकळं केलं होतं. सोसलेले आघात, गमावलेली
मणसं, वाहत्या
जखमा.. कोण सांगतं एवढं सगळं आणि ते ही इतर शे-पाचशे विद्यार्थ्यांमधल्या एका सर्वसामान्य
विद्यार्थी कुठल्याशा रिसर्च प्रोजेक्ट मध्ये डेड एंड दिसतोय असं म्हणतो आहे
म्हणून!
त्यांच्या मोकळेपणाचं कौतुक करावं,
त्यांच्या संघर्षगाथे समोर नतमस्तक व्हावं की एवढं सगळं होऊन सरांच्या चेहऱ्यावरची
स्मितरेषा स्थिर असते म्हणून अचंबित व्हावं..!सरांच्या पाच फूट आणि वर काही इंचांच्या हसऱ्या
आणि चपळ आकृतीकडे पाहून, त्यांचा मिश्कील हजरजबाबीपणा ऐकून एखाद्याला कदाचितच
वाटलं असेल की त्यांच्या स्मितहास्यापाठी एवढं सगळं धगधगत आहे.
“सर मला एका प्रोजेक्टसाठी तुमचं
मार्गदर्शन हवं आहे.” मी त्यांच्या घराच्याबाहेर उभा होतो. आमच्या मधल्या लोखंडी
दरवाजा उघडण्याचे कष्टही त्यांनी घेतले नव्हते. त्यांचा एकूण मूड माझ्या लक्षात
आला आणि त्यामुळं लवकरात लवकर थेट मुद्द्यावर येणंच मला योग्य वाटलं.
“नाही. मी आता रिटायर झालोय. मी असलं
काही करत नाही.” सरांनी एका वाक्यात उत्तर दिलं. सरांना भेटायला गेलो होतो तेंव्हा
मी दोन्ही उत्तरांची तयारी ठेऊन गेलो होतो. सरांनी मदत करण्याची तयारी दाखवली
असती, तर मला आनंद झाला असता; पण नाही म्हटलं असतं तरी फार वाईट वाटलं नसतं.
त्यांचं मत बहुमुल्य होतं खरं, पण त्यांच्या सल्ल्यावाचून माझं विशेष अडणार नव्हतं
हे ही तेवढंच खरं; पण त्यानिमित्तानं भेट तरी होईल असा विचार करून मी सरांकडे गेलो
होतो.
“सर तसं नाही, माझी कंपनी आहे स्वत:ची,
आणि एक प्रोजेक्ट आला होता माझ्याकडे. त्यासंदर्भात तुमचा प्रोफेशनल गायडन्स हवा
होता.” सरांच्या मार्गदर्शनासाठी माझी कंपनी सरांना ते मागतील तेवढा आर्थिक मोबदला
देईल हे मी स्पष्ट केलं. ‘तुम्हाला गाईड करण्यात माझा वेळ जाईल, त्यातून मला काय
आउटपुट?’ असा प्रश्न सरांना विचारावा लागू नये एवढाच त्या स्पष्टीकारणामागचा हेतू.
“नाही. मी आता नाही करत असलं काही.
प्लीज.” पुन्हा नकार. नकार ऐकणं, पचवणं विशेष अवघड नसतं; पण तो कोणाकडून येतोय आणि
का येतोय हे मात्र महत्त्वाचं असतं. मला वाटलं होतं, सर नाही म्हणतील तेंव्हा, ‘तुम्ही
मुलं येऊन मदत घेऊन जाता. तुमचं काम झाल्याशी तुम्हाला मतलब असतो. न तुम्हाला
आमच्या सल्ल्याची किंमत असते ना आमची’ असं काही तरी कारण देतील असा माझा अंदाज
होता. शिक्षकांच्या बाबतीत मी स्वत: तरी असं कधीच वागत नाही, पण तरीही सरांनी हे
असं माझ्या तोंडावर बोलून दाखवून नकार दिला असता तरी तो ऐकून घेताना फार वाईट
वाटलं नसतं.
सर सेवानिवृत्त झाले होते हे मला आधीपासूनच
माहिती होतं. ज्या मनुष्याची व्यावसायिक कारकिर्दीचा निम्मा भाग मोठ्या
कंपन्यांमध्ये नोकरी करण्यात गेला आणि उरलेला अर्धा होऊ घातलेल्या इंजिनीअर्सना
नोकरीयोग्य बनवण्यात गेला त्या मनुष्याला सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य मानवेल असं
मला बिलकुल वाटलं नव्हतं. कुठल्या तरी कंपनीसाठी कन्सल्टन्सी किंवा स्वतंत्र
संशोधन अशा कुठल्या एखाद्या विषयात सर गुंतलेले असतील असा माझा अंदाज होता. बाकी
काही नाही तरी किमान त्यांच्या विद्वत्तेचा आणि अनुभवाचा आदर ठेऊन त्यांच्याकडे
अडचणी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतील असा कयास मी बांधलेला. सरांनी
त्यांच्या कारकिर्दीत इंजिनीअर म्हणून नोकरी केली असली, शिक्षकी पेशाकडे वाळण्यामागे
त्यांची प्रेरणा काहीही असली तरी त्यांच्याकडं पाहून कोणीही सांगू शकला असता की हा
मनुष्य हाडाचा शिक्षक आहे आणि असा शिक्षक कधीच निवृत्त होत नसतो.
“बरं, ठीक आहे. मी येतो.” मी निरोप
घ्यायच्या आधीच सरांनी माझा निरोप घेऊन दार लावून घेतलेलं होतं. त्या दिवशी आमच्या
चार ओळींच्या अर्धवट संभाषणामधून मला जाणवलं की सर केवळ सेवेतूनच नाही तरशिक्षकीच्या पेशातूनही निवृत्त झाले आहेत. ‘शिक्षक’
या उपाधीप्रति मला कमालीचा आदर आहे. माझ्या स्वत:च्या शालेय आणि महाविद्यालयीन
आयुष्यात जे कोणी शिक्षक आले त्यातले मोजके अपवाद वगळता प्रत्येक शिक्षकाने आणि
शिक्षिकेने ह्या उपाधीप्रति असलेला माझा आदर दृढच केलेला आहे. गे ‘सर’ही त्या
शिक्षकांपैकीच एक. त्यांच्या वागण्याचा मला एवढ्या गांभीर्यानं विचार करावासा
वाटला तो त्यामुळंच असावा कदाचित. सरांचा नंबर वगैरे मिळेल का हे विचारण्यासाठी
गाठलेल्या ओळखीतल्या काही लोकांना ही गोष्ट सांगितल्यावर, “म्हटलं होतं ना!” हे
उत्तर आणि कुत्सित हास्य एवढंच काय ते पदरात पडलं. नाही म्हणायला एका गृहस्थांनी
डिप्रेशन, ट्रीटमेंट, दारु अशा दोन चार शब्दांची खैरात केली. मी एक दीर्घ श्वास
सोडला आणि स्वत:शीच ‘जाउदे’ असं म्हणून मार्गस्थ झालो, पण पुढचे कित्येक दिवस हा
सगळाच प्रसंग माझ्या मनात रेंगाळत राहिला.
असे प्रसंग अनुभवणं हे दुर्दैवच
म्हणायला हवं. कोणाही व्यक्तीला त्याचं वैयक्तिक आयुष्य कसं जगावं हे ठरविण्याचा
अधिकार असतो आणि त्यासाठी त्या व्यक्तीला इतर कुणाच्याच परवानगीची, प्रमाणीकरणाची
गरज नसते, असण्याचं काही कारणही नसतं; पण मग ती व्यक्ती माणसांच्या गर्दीतला इतर
चेहऱ्यानसारखा एक अनोळखी चेहरा म्हणून न राहता कुठलं तरी नातं घेऊन आपल्याशी संबंध
जोडते, काही तरी देऊन ऋणानुबंध निर्माण करून जाते तेंव्हा मात्र त्या व्यक्तीचं
अध:पतन पाहून वाईट वाटतं. आयुष्यातल्या वेड्यावाकड्या वळणांवरून आपलं मार्ग शोधत
शोधात धडपडणाऱ्या किती तरी व्यक्ती मी पहिल्यात, सरही खचितच त्या व्यक्तींपैकी एक
होते, पण ह्या प्रवासाच्या थकव्याला त्यांनी कधीच कडवट चव येऊ दिलेली नव्हती, त्यांचा
“सौरभ, आर यु शुअर? देअर इज ऑल्वेज अ वे फॉरवर्ड.” असं सांगणारा उमदा स्वभाव पाहता
ती चव सर येऊ देतील अशी अपेक्षाही मला नव्हती, पण ती आली. असं व्हायला नको होतं.
असो.
-सौरभ राघवेंद्र.