ओढ पिंपळाची.
<!--[if gte mso 9]>
“कालच्या वादळात पिंपळ पडला रे. खूप ओकं बोकं वाटतंय. तू घरातला करता पुरुष आहेस, येऊन पिंपळ लावून जा.” ती सत्तर वर्षांच्या पाठमोऱ्या अरविंदला पत्र वाचून दाखवत होती. “तू गेला नाहीस ना?” तिने त्याला विचारलं.
“नाही” मान खाली घालूनच अरविंद म्हणाला. “पन्नास वर्षांपूर्वीचं पत्र आहे ते. आज लावू, उद्या लावू म्हणत तो दिवस कधी उजाडलाच नाही. त्यावेळी लावला असता, तर आज पन्नास वर्षांचा झाला असता पिंपळ.” आपल्याकडून एक गोष्ट राहून गेल्याची सल अरविंदच्या चेहऱ्यावर, आवाजात प्रखरपणे जाणवत होती.
असं होतं कधी कधी- किंबहुना असं होतंच कधी तरी- एखादी घटना घडते आणि आपलं जगणं आपला जीवच गमावून बसतं. आयुष्य उरतं खरं- पण ते वाळलेल्या वृक्ष्याच्या जमिनीत रुतून बसलेल्या हट्टी मुळांसारखं. जीवनाच्या पलीकडे पसरलेलं जगणं. श्वास सुरु आहे म्हणून जिवंत आहे, नाहीतर सारंच वरवरच, आभासी, पोकळ आणि व्यर्थ. अशा जगण्याचं करायचं काय ? या प्रश्नाचं उत्तर देतो गजेंद्र अहिरेंचा “पिंपळ” हा चित्रपट.
हा चित्रपट म्हणजे एका अरविंदाची गोष्ट. कोकणातल्या भरल्या घरात लहानाचा मोठा झालेला, विटी-दांडू, कबड्डी, लगोरी असे खेळ खेळत वाढलेला अरविंद. शिकतो. मोठा होतो. गाव सोडून निघून जातो. जाताना आई म्हणतो, “आभाळ भरून आलंय.” तो उत्तरतो, “होईल मोकळं!” भोप्याला म्हणतो, “जायला हवंच ना रे?” आणि त्याचं तरी काय चूक ? त्याच्या विस्तीर्ण पंखांसाठी ते आभाळच छोटं होतं. गरुडझेप घ्यायचं बळ त्याचं, आणि वय पण. घरट्यातून बाहेर पडायला नको, पण त्याची घरट्याची ओढ मात्र कधी सुटली नाही.
शहरातल्या शाळेत शिकायला गेला, तेंव्हा त्याला वाटायचं शहरात भला मोठा पूर यावा, म्हणजे लाकडाची बाकं तरंगायला लागतील. मग त्यातल्या एका बाकाचं फळकुट धरून तो येईल पुराच्या पाण्यातून पोहत पोहत- त्याच्या गावाच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत. तो मोठा झाला इंजिनीअर झाला. धरणावर गेला. शुक्रवार यायचा अवकाश- आपल्या गाडीवरून तो गावाकडे बेभान सुटलाच म्हणून समजा. यावेळी त्याला घराची ओढ होतीच, पण त्याच्या बायकोची- सीमाची सुद्धा.
पत्र लिहायचे एकमेकांना. कविता असायच्या त्यात. तो असायचा तिथे धरणावर आणि ही इथे अर्धवट कवितेसोबत झगडत झुरणारी. बाहेर पाउस सुरु असताना खिडकीच्या थंड काचेवर गाल टेकवून बसलेली ती त्याला म्हणते, “तू घाई करू नको, सावकाश ये. तुलाही कळेल काय असतं ओढ लागणं काय असतं एकलेपण.”
त्यांना मुलं झाली, ती मोठी झाली. त्यांच्या पंखात बळ संचारलं. त्यांना सातासमुद्रापारच्या परदेशानं खुणावलं. त्यांनीही झेप घेतली. त्यांची लग्न झाली, अरविंदला नातवंड झाली. त्यांचा संसार तिकडेच.
सीमा होती, तोवर अरविंदचं आयुष्य तिच्याभोवतीच फिरलं. तिच त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू, तिचं त्याच्या आयुष्याचा परीघ. पण एकाएकी सीमा गेली, आणि अजून एक पिंपळ ढासळला. मळभ दाटून आलं, पण पाउस नाही कोसळला. सीमा गेल्यानंतर दहा वर्ष अरविंद एकटाच राहिला, पण अखेर मुलांच्या हट्टापुढे तो नमला, आणि सात समुद्र पार करायला तयार झाला.
तो तयार झाला खरा, पण तो तिकडे गेला का? या प्रश्नचं उत्तर शोधायला “पिंपळ” पाहायला हवाच.
आपली सगळ्यांचाही एक पिंपळ असतो, आपल्या गतायुष्याचा आठवणींनी बहरलेला. वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये, वास्तूमध्ये पसरलेला. केलेल्या, न केलेल्या, घडलेल्या, घडायच्या राहून गेलेल्या, अर्ध्या-कच्च्या तुरट स्वप्नांच्या, आकांक्षांच्या, सुखाच्या-दुःखाच्या असंख्य आठवणींच्या बळावर वाढलेला. पण हा पिंपळ कोसळला तर ?
तो कोसळला की आयुष्याच ओकंबोकं होऊन जातं.
-सौरभ राघवेंद्र.