पे-ट्रोल
मी लहान होतो तेंव्हा एक विनोद फार प्रसिद्ध होता. विमानाचं तिकीट काढूनही विमानात न बसता 'मी एअरलाईनला कसं फसवलं!' असं म्हणत बढाया मारण्यासाठी आय.क्यू.ची जी कमाल मर्यादा लागते त्या मर्यादेच्या अंमळ आ…
मी लहान होतो तेंव्हा एक विनोद फार प्रसिद्ध होता. विमानाचं तिकीट काढूनही विमानात न बसता 'मी एअरलाईनला कसं फसवलं!' असं म्हणत बढाया मारण्यासाठी आय.क्यू.ची जी कमाल मर्यादा लागते त्या मर्यादेच्या अंमळ आतलाच एक मनुष्य त्याला भेटेल त्या व्यक्तीला सांगत असतो, "या पेट्रोलचा भाव साला कितीपण वाढला तरी आपल्याला अजिबात फरक नाही पडत!!" त्यावर समोरची व्यक्ती त्या मनुष्याला म्हणत असे, "तुम्ही काय राव! मोठी माणसं! श्रीमंत लोक!! तुम्हाला कशाला फरक पडतोय?" उत्तरदाखल आपल्या कौतुकावर गालातल्या गालात हसून तो मनुष्य म्हणत असे, "छे हो!! श्रीमंतीचा मुद्दा नाही! पेट्रोलचा भाव कितीही वाढला तरी मी मात्र शंभर रुपयांचंच पेट्रोल टाकतो!"
पेट्रोलच्या वाढत्या किमती किंबहुना 'पेट्रोल' हा एकूणच विषय विनोदापेक्षा खरं तर अभ्यासाचाच जास्त, पण म्हणून विनोदाला या विषयाचं वावडं असावं असं मात्र नाही. ह्या पेट्रोलनं युद्धं पेटवली, आंतरराष्ट्रीय राजकारणात उलथापालथी घडवून आणल्या, लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम घडवून आणले, तुम्हा-आम्हा सामान्यांच्या खिशाला कात्री लावूनही प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर रांगेत उभं राहायला भाग पाडलं, 'कधी मोर्चा नेला नाही' असं म्हणून अदृश्य लांबशी शेंडी खेळवणाऱ्या एखाद्या शांत माणसाच्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्या पोऱ्याने हातचलाखी करून शंभर रुपये घेऊन पेट्रोल मात्र सत्तरचं टाकलं तर त्या शांत माणसाला भर पंपावर त्या पोऱ्याशी कचकावून भांडायला शिकवलं!
परिणामी, या सगळ्या अनुभवांच्या शेवटी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची ही अगतिकताच मुळी विनोदाचा विषय बनली आणि 'काका! पेट्रोल कितीचं टाकू?' या अत्यंत नैसर्गिक प्रश्नावर "शिंपड मेल्या तीस रुपयांचं. जाता जाता पेटवूनच देतो गाडी एकदाची!" हे अस्सल सदाशिव पेठी उत्तर कोणाला तरी सुचलं! ह्याच आगतिकतेपोटी एरवी इतर जवळजवळ कोणत्याही बाबतीत कोणीही शतक गाठलं की सहसा आनंदून जाणारे आपण, आज पेट्रोलच्या तवंगावर तरळणारं पेट्रोलच्या किमतीला पडलेलं शतकोत्तरी जाण्याचं स्वप्नं पाहिल्यावर मात्र एकदा तरी, "ज्या दिवशी मी माझ्या गाडीत शंभर रुपये लिटरने पेट्रोल भरेन, त्या दिवशी भर रस्त्यात गाडी थांबवून, एका हाताने हेल्मेट उंचावून दुसऱ्या हाताने गर्दीतल्या सर्वांना फ्लाईंग किस वाटेन!" असं म्हणतोच.
पेट्रोलमुळे निर्माण झालेले विनोद इथेच संपत नाहीत. वैयक्तिक अनुभवांची चौकट ओलांडून आजूबाजूला घडणाऱ्या घाटनांमध्येही त्यांचा वास असतोच. उदाहरणार्थ, पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवर अधिकारवाणीने भाष्य करणारा एखादा जागा चुकलेला अवलिया आपल्याला भेटला की पुलंच्या चार दोन हमखास ओळी आपल्याला आठवून जातात आणि ओठांच्या कडांवर छानसं हसू दुमडतंच. त्यात भरीस भर म्हणून पेट्रोलच्या किमतींविषयी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी वेळोवेळी घेतलेल्या आणि वेळ पाहून बदललेल्या भूमिका पाहिल्या की आईन्स्टाईनच्या "विश्वाविषयी माहिती नाही, पण माणसाचा मूर्खपणा नक्कीच अनंत आहे" या वाक्याची आठवण आपल्याला एकदा तरी होतेच आणि दुमडलेलं हसू अजूनच खुलतं, हास्यामध्ये बदलतं.
खरं तर आपल्याला हसू का यावं याचा काहीच नेम नाही. आपल्या प्रियतमेच्या नाजूक लाजण्याची गंमत वाटून गोडी-गुलाबीने आपण हसतो, आणि अगदी तेच किंवा तसेच दुसऱ्याचे गोड-गुलाबी अनुभव चार-चौघात कळले की त्यावर मात्र मनमुराद आणि खळखळून हसतो. हातातल्या मोबाईलच्या नादात चालता चालता पाय घसरून तोंडावर पडणाऱ्या मनुष्याला पाहताना आपल्याला आवरू म्हटलं तरी हसू आवरत नाही आणि आपल्यावर गुदरलेला असाच एखादा ओशाळवाणा प्रसंग दुसऱ्याला सांगताना तो विनोदाच्या अंगानं सांगण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आपण आनंदी असतो तेंव्हा आपल्या चेहऱ्यावर हसू असतंच, दुःखाचा अतिरेकही आपल्या आयुष्यात- तिरकस भलं, पण शेवटी हसूच घेऊन येतो.
जगण्यातलं दुःख कोणालाच चुकलेलं नाही. गदिमांच्या 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' या ओळी नियती, दैव वगैरे गोष्टी बाजूला ठेऊन निव्वळ मनुष्य आणि पेट्रोल या दोघांमध्ये असलेल्या नात्याच्या चष्म्यातून पाहिल्या तरी तेवढ्याच खऱ्या वाटतात. पराधीनता म्हणा किंवा इतर कोणतंही कारण घ्या, त्या-त्या कारणामुळे निर्माण झालेल्या दुःखाच्या मूळाची, आयुष्याविषयीच्या अनेक गूढ-गहन प्रश्नांची वगैरे उकल करणाऱ्या तत्वज्ञानाचा वसा सांगणाऱ्या मनुष्याने हास्याच्या, "आपल्याला हसू का येतं?" याही प्रश्नाची उकल करण्याचे पुष्कळ प्रयत्न केलेत, ठोकताळे निर्माण केलेत, आपल्या हसण्यापाठी दडलेल्या नैसर्गिक भावनेला वैज्ञानीक दृष्टिकोनाचं स्वतंत्र अधिष्ठान दिलंय. ते द्यायला हवंही, मात्र आपल्याला हसू यायला आणि जाता जाता चार-दोन विनोद सांगून एखाद्याला हसवायला हास्यविनोदापाठी दडलेलं विज्ञान माहिती असायला हवं अशी निकड नसते ही मोठया दिलश्याचीच गोष्ट म्हणायला हवी.
तेंव्हा "आपल्याला हसू का येतं?" या प्रश्नाचया उत्तराविषयी चिंतन न करता आपण मनमोकळं हसू शकतो आणि इतकंच नव्हे तर त्याहीपुढे जाऊन आपण पेट्रोल पंपावर जाऊन स्वतःच्या खिशातून 'पे' करू स्वतःलाच 'ट्रोल' करून घेऊन वर स्वतःच्याच आगतिकतेवर आणि वैफल्यावर हसू शकतो या जाणिवेतही मोठं समाधान आहे असं मला वाटतं. किंबहुना आपली दुःखं हसण्यावरी नेण्याच्या वृत्तीतून आणि अभिव्यक्तीतून मिळणारं कदाचित हे समाधानच आहे ज्यायोगे तिकडे पेट्रोल कितीही भडकलं तरी आपण मात्र न भडकता, 'जाऊदे चल!' असं म्हणून पेट्रोलच्या टाकीच्या आत भडकलेल्या दुःखांवर झाकण लावून आयुष्याला किक मारून आजूबाजूला कुतूहलाने पहात आपली मार्गक्रमणा करत असू!
असो!
- सौरभ राघवेंद्र.