प्रसंग (पूर्वार्ध)
त्या रात्रीही, आमच्या सोसायटीच्या प्रांगणात, माझी रोजच्यासारखीच शतपावली सुरु होती. पावसाची एक सर नुकतीच पडून गेलेली, हवेत छान गारवा. पानांची सळसळ, पलीकडे वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि शांत सभोवताल.…
त्या रात्रीही, आमच्या सोसायटीच्या प्रांगणात, माझी रोजच्यासारखीच शतपावली सुरु होती. पावसाची एक सर नुकतीच पडून गेलेली, हवेत छान गारवा. पानांची सळसळ, पलीकडे वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि शांत सभोवताल... पण या आल्हाददायक वातावरणाला गालबोट हे लागावयाचे होतेच.
मी माझ्या घड्याळात सव्वा-दहा वाजलेले पहिले तेंव्हा थोडा वेळ इथेच बाकावर बसावे आणि मग घरी जावे असा विचार करून बाकाच्या दिशेने निघालो. काही पावले पुढे जातो तोच मला रस्त्यावरून काही लोकांचा मोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला. कान देऊन ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की ते लोक भांडत होते. नेमकं काय चालू आहे या कुतूहलाने मी गेटपाशी जाऊन रस्त्यावरची माणसे मला दिसतील पण त्यांना मात्र मी दिसणार नाही अशा पद्धतीने उभा राहिलो.
रस्त्यावर सात जणांचा जमाव होता. त्यांपैकी सहा जणांनी 'आम्ही-नुकतेच-कुठल्या-तरी-जत्रेतून-आलो-आहोत' असे वाटावे अशा थाटाचे कपडे घातले होते. त्यांच्यापैकी दोघे प्यायलेलेही होते कदाचित. सगळ्यांच्या शर्टची वरची बटनं उघडी होती. ते सहा जणं कर्णकर्कश्श हॉर्न असणार्या आणि फटफटीसारखा आवाज करणाऱ्या यामहाच्या दोन गाड्यांवर होते. एका गाडीवर अर्थातच तिघं. गाडीच्या नंबरप्लेट वर कुठल्या तरी ग्रुपचं नाव लिहिलं होतं. सकृतदर्शनी ते सहा जणं अत्यंत तावातावानं एका मुलाशी भांडत होते. ज्या मुलाशी ते भांडत होते त्याच्याकडे मी पाहिलं. काळ्या रंगाच्या अॅक्सेस वरून तो मुलगा नुकताच खाली उतरला होता. त्याच्या बोलण्यावरून तो बऱ्यापैकी संयमी, सभ्य वाटत होता आणि कपड्यांवरून चांगल्या घरचा.
कानावर पडलेल्या माहितीवरून त्यांच्या भांडणाचं कारण माझ्या लक्षात आलं तसं मी डोक्याला हात लावला. निमित्त झालं होतं ते त्या मुलाने हॉर्न वाजवल्याचं आणि त्यांनी पुढे जाण्यासाठी जागा न दिल्यानं त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेल्यावर हॉर्न ऐकू आला नाही का असं विचारल्याचं. मी स्वत:शीच हसलो आणि काय बिनडोक लोक आहेत कशावरही भांडतात असं म्हणत मी मागं वळून घरी जायला निघालो तोच त्यांच्या वादावादीचा आवाज वाढला आणि कुठली तरी गाडी पडल्याचा आवाज झाला.
मी मागं वळून पाहिलं तर त्या मुलाची गाडी त्यांनी खाली पाडली होती. कुठ्ल्याही सभ्य माणसाला ऐकवणार नाहीत अशा गलिच्छ शिव्या ते त्याला देत होते. त्यांच्यातल्या एकाने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि पलीकडे वाहत्या पाण्यात फेकून दिला. एकाने त्याच्या कानशिलात भडकावली. काय होतं आहे त्या मुलाला कळायच्या आधीच दुसर्याने त्याच्या मानेवर आणखी एक फटका मारला. तिसर्याने तर त्याला पाठीमागून इतक्या जोराने लाथ मारली की तो मुलगा तोल जाऊन जमिनीवर पालथा पडला. त्याच्या हनुवटीला खरचटून त्यातून रक्त येऊ लागलं. त्याने उठण्याचा प्रयत्न केला तोच आणखी एकाने त्याच्या कंबरेवर लाथ मारली आणि त्याला पुन्हा खाली पाडलं.
सहा जणांच्या अरेरावी करणाऱ्या त्या जमावासमोर तो एकटा मुलगा बिचारा गोंधळून गेला होता. अर्वाच्य शिव्या ऐकणे आणि कोणत्याही प्रतिकाराशिवाय मारहाण सहन करणे याच्या पलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. रस्त्यावर पालथा पडलेला तो बिचारा असहाय्य मुलगा आणि अंगात पाशवी वारं संचारलेले ते सहा निर्बुद्ध लोक. हा प्रसंग नेमका कुठे जाईल याची कल्पनाही मला करवत नव्हती. त्याची ही अशी अवस्था पाहून मी कमालीचा अस्वस्थ झालो. त्याला काही तरी मदत करावी निदान त्यांच्या भांडणात मध्यस्थी करून ते थांबवता येतं का ते तरी पाहावं या विचारानं मी पुढे सरसावलो, तेवढ्यात आमच्या सोसायटीचा वॉचमन दोघा माणसांना घेऊन तिथे पोहोचला. तिघं जणांना अचानक आलेलं पाहून ते सहा लोक काहीसे नरमले. वॉचमननं त्यांना ‘आता निघताय का पोलिसांना बोलावू ?’ असा दम भरल्यावर ते तिथून निघून गेले. जाता जाता त्यांच्यापैकी एक जण जमिनीवर पडलेल्या त्या मुलाच्या अंगावर थुंकून गेला.
ते सहा लोक दिसेनासे झाल्यावर वॉचमन त्या मुलापाशी गेला. त्याने त्याला गाडी उभी करून दिली, प्यायला पाणी दिलं आणि आता तू ही जा इथून असं बजावून स्वत: आपल्या केबिन मध्ये निघून आला. तो मुलगा उठला. त्याने कपडे झटकले, गाडी चालू केली. थोडसं अंतर पुढे जाऊन तो एका झाडाखाली थांबला.
त्याच्या हाताला, पायाला चिखल लागला होता. कपडे एक-दोन ठिकाणी फाटले होते. गाडीचा आरसा त्याने आपल्या दिशेने फिरवला आणि त्यात तो स्वत:च प्रतिबिंब निरखू लागला. त्याच्या गालावर, मानेवर त्याला इतक्या जोरानं फटकावलं गेलं होतं की त्या ठिकाणी मारणाऱ्या व्यक्तीच्या हाताचे वण उठून दिसत होते. हनवटीमधून ओघळणाऱ्या रक्ताने त्याचा शर्ट माखला होता. त्याने ती जखम आपल्या रुमालाने घट्ट दाबून धरली.
आरशात स्वत:ला पाहताना या अशा अवस्थेत घरी कसं जावं हा प्रश्न त्याला पडला असावा बहुतेक. घरी गेल्यावर त्याच्या आईने त्याला विचारलं असतं, “काय रे बाळा, काय झालं हे सगळं ?” आणि त्या प्रश्नासरशी त्याने- त्याला आई-बहिणीवरून दिल्या गेलेल्या शिव्या ऐकताना, त्या हरामखोरांच्या लाथा-बुक्क्या कुठलाच प्रतिकार न करता झेलताना मोठ्या कष्टाने रोखून धरलेला अश्रूंचा बांध त्या माउलीच्या काळजी आणि वात्सल्यानं भरलेल्या “बाळा” या शब्दापुढे मात्र एका क्षणात फुटला असता.
त्या मुलाशी जाऊन काही तरी बोलावं असं एका क्षणी वाटून गेलं मला, पण अशा वेळी लोकांना एकांतात राहू देणं बरं असा विचार मी केला शिवाय माझी आणि त्याची न ओळख ना पाळख. मी त्याच्याशी बोलायला गेलो तर मला पाहून तो काय आणि कशी प्रतिक्रिया देईल याचाही मला काही अंदाज बांधता येईना. शेवटी त्याच्याशी मी बोलावं की न बोलावं आणि बोलावं तर नक्की काय बोलावं या संभ्रमात असताना हलकासा पाउस सुरु झाला आणि पाहता पाहता पावसानं जोरही धरला.
पाऊस वाढला तसं त्या मुलानं आकाशाकडं पहिलं आणि जोरानं एक शिवी हासडली. अंमळ मोठ्यानेच हसडलेली ती शिवी ऐकून एव्हाना पेंगुळलेला आमचा वॉचमन खाड्कन जागा झाला. पुन्हा काही सुरु झाले की काय या भीतीने तो बाहेर धावून गेला. त्याच्या सुदैवाने पुन्हा काही चालू झाले नव्हते पण 'आपल्या सोसायटीसमोर पुन्हा तमाशा नको' या विचाराने त्या मुलाला त्याला इथून जा नाहीतर... अशा शब्दात इशारा दिला. कसलीच प्रतिक्रिया न देता त्या मुलाने आपली गाडी चालू केली आणि तो तिथून गेला.
तो दिसेनासा झाल्यावर मी ही घरी निघून आलो, पण त्या मुलावर बेतलेल्या या प्रसंगाचा विचार मात्र काही केल्या माझ्या मनातून जात नव्हता. वाटलं या प्रसंगातून सावरायला असा किती वेळ लागेल त्याला? तुमच्या वाईटातल्या वाईट दिवसालही चोवीस तास असतात असं कोणी तरी म्हटलंय; पण काही प्रसंगच मुळी असे असतात की वेळेची गतीही गोठून गेलेल्या हिमनदीच्या अभेद्य अस्तराखालून वाहणाऱ्या पाण्यापेक्षाही संथ होऊन जाते.
एव्हाना रात्रीचे अकरा वाजून गेले होते. त्याच्या आई-वडीलांना आता त्याची वाट पाहता पाहता काळजीही वाटू लागली असेल. फोन लावत असतील ते त्याला; पण त्यांना थोडीच ठाऊक की त्या माथेफिरू लोकांनी त्याचा फोन पलीकडच्या नाल्यात फेकून दिला होता.
थोड्याच वेळात तो घरी पोहोचेल. पोहोचल्यावर बेल वाजवायच्या आधी आपण घरी नेमके काय सांगायचे याची त्याने मनाशी पुन्हा एकदा पक्की उजळणी केली असेल. घराचे दर उघडल्यावर सचिंत चेहऱ्याच्या त्याच्या आई-बाबा आणि ताईला ती ठरलेली उत्तरे देऊन, भूक नसल्याचे सांगत तो आपल्या खोलीत झोपण्यास निघूनही गेला असेल. पण त्याला झोप थोडीच येईल ? जिव्हारी लागलेल्या अपमानाने आतल्या आत धुमसणाऱ्या भक्तांवर निद्रादेवीच कोप होतो असे म्हणतात.
- सौरभ राघवेंद्र