•mr•

प्रश्नांची उत्तरं

ज्या प्रश्नांची उत्तरं एका गुगल सर्चसरशी मिळू शकतात, असे प्रश्न विविध गृप्सवर हटकून विचारणाऱ्या मंडळींना नेमकं काय बरं म्हणावं? प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट आहे, जिज्ञासू वृत्तीचं लक्षण आहे वगैरे…

ज्या प्रश्नांची उत्तरं एका गुगल सर्चसरशी मिळू शकतात, असे प्रश्न विविध गृप्सवर हटकून विचारणाऱ्या मंडळींना नेमकं काय बरं म्हणावं? प्रश्न पडणं ही एक चांगली गोष्ट आहे, जिज्ञासू वृत्तीचं लक्षण आहे वगैरे वगैरे विज्ञानाभिमुख संस्कार आपण सगळे छान मिरावतो खरे; पण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरंही आपणच शोधायची असतात, न पेक्षा किमान त्या दिशेने तसा प्रयत्न करायचा असतो हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरतो बहुधा. 'वदे वदे जायते तत्त्वबोधम्' हे खरं असलं तरी तत्त्वबोध होण्याच्या दृष्टीने संवाद साधण्यासाठी आपलाही थोडा तरी अभ्यास हवाच ना? भारत डिजिटल झाल्यापासून "उचललं बोट दाबली कळ" ही प्रवृत्ती जरा जास्तच बळावलीए असं वाटायला लागलंय आता मला. आणि कसंय शेवटी, प्रश्न विचारायला हरकत काहीच नाही. "सफरचंद खाली का पडतं?" ह्या प्रश्नाची उकल करता करता थेट गुरुत्वाकर्षणाचे सिध्दांत मांडले होते न्यूटननं. त्यामुळे कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणती इनसाईट दाखवून देईल याबद्दल आपण केवळ कल्पनाच करू शकतो, पण म्हणून उगाचच प्रश्न विचारत बसणं हे फार शहाणपणाचं लक्षण आहे अशातलाही भाग नाही. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची तुम्ही ज्यांच्याकडून उत्तरं घेता त्यांनी, "उत्तर देणार नाही, शोध तुझं तू" असं सांगितल्यावर आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधायची आपली तयारी असायला हवी, किंबहुना ती असेल तरच तो प्रश्न जाहीररीत्या विचारावा असं मला वाटतं.

एनिवे, आज सकाळी मोदक आणि दुपारी झोप जास्त झाल्यानं आता झोप येत नाहीये मला. त्यामुळं झोप येण्यासाठी काय करावं असा प्रश्न पडलाय. त्याचं उत्तर शोधायला हवं...

अडिओस !