पुलवामा २०१९. भाग १, वार्तांकन.
उद्वेग. श्रद्धांजली.
उद्वेग. श्रद्धांजली.
ह्या दोन शब्दांपलीकडे मला काहीच सुचत नाहीये. शहीद जवानांचा केवळ आकडा वाचूनच मन विषण्ण झालंय. काही वेळापूर्वी सौभाग्याचं लेणं मिरवणाऱ्या त्या जवानांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे आई-वडील, त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांचं दु:ख आणि क्रंदन ह्याचा तर मी अजून विचारही केलेला नाही!
* * *
काल संध्याकाळी जम्मू कडून श्रीनगरच्या दिशेने जाणाऱ्या सी.आर.पी.एफ. च्या सत्तर गाड्यांच्या ताफ्यावर विस्फोटकांनी भरलेली गाडी आदळवून विस्फोट करवण्यात आला. ताफ्यामध्ये एकूण २५०० लोकांचा समावेश होता. ह्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या आत्ताच्या घडीला बेचाळीसच्या घरात जाऊन पोहोचली आहे. हा विस्फोट आय. ई. डी. म्हणजे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझीव्ह डिव्हाईसेस वापरून करण्यात आला. ह्या हल्ल्यानंतर काही वेळातच काश्मीरमधल्या अवंतीपूरा भागातल्या गोरीपुरा नावाच्या भागात गोळीबार झाल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेनं दिलेलं आहे. जैश-ए-महोम्मद ह्या दहशतवादी संघटनेने एका काश्मिरी वृत्तसंस्थेला संदेश पाठवून ह्या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि जैशचा प्रवक्ता महोम्मद हसन ह्याने हल्ल्यामध्ये भारतीय सेनेची अनेक वाहने उध्वस्त केल्याची माहिती देत हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या वहनाच्या चालकाचं नाव आदिल अहमद असल्याचं जाहीर केलं. ह्या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आल्याची बातमी सी.आर.पी.एफ. चे इन्स्पेक्टर जनरल झुल्फिकार हसन ह्यांनी दिली. हा हल्ला श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर झाला होता. नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीमुळं हा महामार्ग नुकताच म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी खुला करण्यात आला होता.
पुलवामा मधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निरीक्षण नोंदवताना जम्मू-कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक काश्मीरमधल्या अस्वास्थ्याला कारणीभूत असणाऱ्या शक्तींना जबाबदार ठरवत (त्या शक्ती सर्वांना) आपल्या अस्तित्वाची जाणिव करवून देण्यासाठी उतावळ्या आणि अगतिक असल्याचं म्हटलं आहे. ह्या हल्ल्याची जैश-ए-महोम्मदनं स्वीकारलेली जबाबदारी पाहता ह्या हल्ल्याचं मार्गदर्शन सीमेक्पालीकडून झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. हल्ल्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सी.आर.पी.एफ चे डेप्युटी जनरल आर.आर. भटनागर ह्यांच्याशी संवाद साधून घटनेचा अहवाल घेतल्याचं वृत्त आहे.
हा हल्ला झाल्यानंतर राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा अशा जगभरातल्या विविध क्षेत्रांतले ज्ञात-अज्ञात मान्यवर तसंच सर्वसामान्य जनता समाजमध्यमांधून व्यक्त होऊ लागलेली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आपली ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया नोंदवली. डेस्पीकेबल आणि डास्टर्डली म्हणजेच घृणास्पद आणि विकृत अशा शब्दांत ह्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ नये असं ते म्हणाले. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होताना, ‘आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व जवानांच्या पाठी भारत आज कृतज्ञतेनं उभा आहे.’ अशी ग्वाही देत ह्या हल्ल्याचं सुयोग्य उत्तर देण्यासाठी सारा भारत एकजूट असल्याचं ते म्हणाले. देशातल्या शांततेचा भंग करणाऱ्या साऱ्या मनसुब्यांना उधळून लावण्याच्या भारताच्या दृढसंकल्पाची त्यांनी पुनरोक्ती केली. भारताचे अर्थमंत्री अरुण जेटलींनी ह्या हल्ल्याचा भ्याड आणि निषेधपूर्ण असा उल्लेख करत हल्ल्यात जखमी जवानांच्या स्वास्थ्याप्राप्तीसाठी प्रार्थना केली. ‘दहशतवाद्यांच्या सदैव लक्षात राहील असा धडा शिकवू’ असा इशाराही त्यांनी दिला. भारताच्या रक्षामंत्री निर्मला सीतारमन कामकाजासाठी स्वीडन मध्ये गेलेल्या होत्या. शुक्रवारी तातडीनं कामकाजासाठी स्वीडन मध्ये गेलेल्या भारतामध्ये परतल्या आणि आता पंतप्रधानांसोबत अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकी मध्ये त्या सहभागी होतील.
ह्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचं चित्र त्यांच्या प्रतिक्रियांमधून निर्विवादपणे उमटलं. काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी ह्या हल्ल्यामुळं अत्यंत अस्वस्थ झाल्याची भावना व्यक्त केली आणि जखमी जवानांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. काँग्रेसच्या पूर्वाध्यक्षा सोनिया गांधींनी ह्या बार्बरस म्हणजे अत्यंत क्रूर, निष्ठुर अशा शब्दात ह्या हल्ल्याची निर्भत्सना करून आपण अत्यंत दु:खी, उद्विग्न झाल्याचं सांगितलं. माणुसकीच्या एकही मूल्याशी सुसंगत नसलेल्या ह्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांना त्यांच्या ह्या विकृत कृत्याची किंमत चुकवावी लागेल अशी अशा व्यक्त केली. काँग्रेस पक्षाच्या संवाद विभागाचे प्रमुख प्रवक्ते रणजीत सुरजेवाला ह्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, हा हल्ला भारतीय जनता पक्षाचं अपयश असल्याचं म्हटलं. गेल्या पंचावन्न महिन्यात चारशे एकोणैंशी जवान शहीद झाल्याचा दाखला देऊन ‘छप्पन इंचांची छाती’ आणि ‘लाल ऑंख’ कुठे आहे असं विचारात नरेंद्र मोदींवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ‘ममता बॅनर्जी’, ओडीसाचे मुख्यमंत्री ‘नवीन पटनाईक’, दिल्लीचे मुख्यमंत्री ‘अरविंद केजरीवाल’, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ‘शरद पवार’, शिवसेनाप्रमुख ‘उद्धव ठाकरे’, मनसेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ ह्यांच्यासह विरोधी जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांच्या पक्षप्रमुखांनी आणि इतर मान्यवर नेत्यांनी आपल्या विधानांमधून ह्या हल्ल्याचा निषेध करत आपण ह्या हल्ल्यामध्ये शहीद सी.आर.पी.एफ जवानांच्या कुटुंबाच्या दुखा:त एकमुखाने आणि एकवाक्यतेने सहभागी असल्याचं जाणवून दिलं. अंतरराष्ट्रीय पातळीवरही युनायटेड नेशन्स तसंच सर्व प्रमुख देशांकडून ह्या हल्ल्याचा निषेध केला गेला. अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, विकी कौशल, प्रियांका चोप्रा, अजय देवगण, आमिर खान, सलमान खान अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी ह्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.
* * *
पुलवामा मध्ये घडवून आणलेला हल्ला केवळ उरीच्या हल्ल्यानंतरचाच नाही, तर स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे. हा हल्ल्याची व्याप्ती केवळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या भारतीय सशस्त्र सेनेच्या सत्तर वाहनांएवढीच मर्यादित नाही. ती त्यापेक्षा कैक पटीने विस्तृत आहे. समोरच्या देशाशी कुठलंच युद्ध सुरु नसताना एखाद्या देशाच्या सशस्त्र सेनादलाला बेसावध क्षणी पकडून अशा पद्धतीनं मृत्यूमुखी धाडण्याच्या कृत्याची केवळ एकाच प्रकारे संभावना होऊ शकते- अॅन अॅक्ट ऑफ वॉर- युद्ध छेडण्यासाठी जाणूनबुजून केली गेलेली कृती. असे हल्ले अनेक पातळ्यांवर अनेक प्रश्न उभे करत असतात; पण ह्या विशिष्ट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमच्या-आमच्या जीवनाशी निगडीत असणारा एकच प्रश्न उपस्थित होतो. सहनशीलातेचा प्रश्न.
केंव्हापर्यंत? कुठपर्यत? आणि का?
(क्रमश:)
-सौरभ राघवेंद्र.