•mr•

रामकृष्ण चरणी रत लागो रे ...

संध्याकाळचे साडेसहा-सात वाजलेले. हवेमध्ये स्तब्ध गारवा. हलकेच वारा वाहतोय. उदबत्यांचा सुगंध वाऱ्याबरोबर वाहतोय. पक्षी घरट्यात विसावले आहेत. अशी ही प्रसन्न सांजवेळ. घरामध्ये दिवेलागणी झ…

संध्याकाळचे साडेसहा-सात वाजलेले. हवेमध्ये स्तब्ध गारवा. हलकेच वारा वाहतोय. उदबत्यांचा सुगंध वाऱ्याबरोबर वाहतोय. पक्षी घरट्यात विसावले आहेत. अशी ही प्रसन्न सांजवेळ. घरामध्ये दिवेलागणी झालेली आहे आणि नारद मंदिरात लोकांचा वावर सुरु झाला आहे. तानपुरे लागले आहेत, हार्मोनीअम सज्ज झाला आहे. तबलाही लावून झाला आहे. आणि आता ऐकू येऊ लागतो तो हरिनामाचा गजर आणि सुंदर निरूपणं...

नारद मंदिर. इथे कीर्तने होतात. घराच्या अगदी समोर असणारे नारद मंदिर आणि तिथे रोज संध्याकाळी चालणारे कीर्तन, सवयीचा भाग झाला आहे आताशा. संध्याकाळी सहाच्या ठोक्याला चालू होणारे कीर्तन गेली कित्येक वर्षे असेच चालू असावे आणि इथून पुढेही असेच चालू राहावे.

अनेक कीर्तनकार येऊन जातात इथे. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळ्यांपासून ते कीर्तनाचे रीतसर शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या मुलांपर्यंत. कोणीही कीर्तनकार असो, सर्वांना उभे राहण्यासाठी एकच व्यासपीठ. कोणी मोठा आला म्हणून त्याच्यासाठी वेगळी सोय केली असे कधी झाल्याचे माझ्या स्मरणात नाही. परमेश्वराच्या पायरीशी सगळे सारखेच.

इथे आलेला एखादा सुस्वरात परमेश्वराचे भाक्तीगान गातो तर काहींच्या मते स्वर इकडे तिकडे झाले तरी भक्ती महत्वाची असे म्हणत कोणी पट्टी, ताल आणि चाल यांचे गणित विसरून गाऊ लागतो. कधी मंदिराचा आवर गर्दीने तुडुंब भरलेला असतो तर कधी दोन-तीन आज्ज्यांच्या छोटासा ग्रुप वळण्यासाठी वाती घेऊन आलेला असतो. पण कीर्तन मात्र अव्याहतपणे चालू असते.

कधी कोण्या कीर्तनकारचा आवाज इतका छान असतो की त्याचे कीर्तन संपूच नये असे वाटत राहते. काहींचे निरुपण एवढे सुंदर असते की कितीही ऐकले तरी कंटाळा येत नाही. ज्यांच्यामध्ये हे दोन्ही गुण जुळून आलेले असतात असे कीर्तनकार आले की परिसर गर्दीने भरून जातो. इथे चालणारे कीर्तनाचे वर्ग म्हणजे तर मधुर संगीत ऐकण्याची खूप मोठी पर्वणी. तीस चाळीस स्त्रिया आणि पुरुष एक स्वरात आणि एकाच भक्तिभावाने रामकृष्ण चरणी... गाऊ लागले कि काळाचे भान कुठल्या कुठे हरवून जाते.

खरं सांगू, कीर्तनाची एवढी गोडी मला लागेल असं कधी वाटलंही नव्हत. देव, धर्म, उपासना या अशा गोष्टींपासून मी कायमच लांब राहिलो. मुंज झाल्यावर केवळ एखाद्याच संध्याकाळी संध्या केली असेल. जानवे घालणे तर केंव्हाचे सोडून दिलेले. पण निर्मळ भक्तीचा ओलावा लाभलेले हे स्वर ऐकले की माझं मन शांत होतं.

आठवतं मला. असेच पावसाळ्याचे दिवस होते. आभाळ भरून आलं होतं. पावसाची भुरभूर सुरु झाली होती. सहाच्या सुमारास मुसळधार पाउस सुरु झाला. दिवे गेले. मी माझ्या खोलीतल्या मोठ्या खिडकीमध्ये बसलो होतो. आणि अचानक पेटीचे स्वर कानावर आले. मला गम्मत वाटली. एवढ्या भर पावसात कोणी येणार नाही हे ठाऊक असतानाही मंदिराच्या मोकळ्या गाभाऱ्यात कोणाचे स्वर घुमत आहेत याची उत्सुकता होती.

मी छत्री घेऊन खाली गेलो. बिल्डींगच्या गेटपाशी उभा राहून त्या मंदिरात पाहिले. पंच्याहत्तरी गाठलेले एक आजोबा आपल्या पुढ्यात पेटी घेऊन उभे होते. एकटेच. पावसामुळे तबलजी पण आला नव्हता. मी त्यांच्याकडे पाहत होतो. इस्त्री केलेला पांढरा सदरा, पांढरा पायजमा घातलेल्या आजोबांची बोटे त्या पेटीवरून लीलया फिरत होती.

त्यांनी गायला सुरुवात केली. आवाजात गोडवा होता. मनात भक्ती होती, परमेश्वराप्रती प्रेम होते. ते गातच राहिले. गाता गाता मध्येच डोळे उघडत. माणसांच्या अभावी रिकामा गाभारा त्यांना दिसत असावा. पण त्याचा खेद मात्र त्यांच्या डोळ्यात दिसत नव्हता. जणू त्यांना ठाऊक होते की परमेश्वर त्यांना ऐकतो आहे.

साडे आठ च्या सुमारास पाउस ओसरला. त्यांनी कीर्तन थांबवले. त्यांची पेटी घेतली. मंदिराबाहेर काढलेले झिजलेले चप्पल चढवले आणि शांतपणे निघूनही गेले.

मला त्यावेळी काही तरी खूप विलक्षण वाटत होतं. कोसळणारा पाउस, रिकाम्या गाभारऱ्यात घुमणारा ओला आणि मधुर आवाज... सृष्टी काही वेळ जणू स्तब्ध झाली होती. जणू त्या कोण्या एका आजोबांच्या चेहऱ्यावरचे ओसंडून वाहणारे चिरंतन समाधान काही क्षण माझ्या मनात विसावण्यास आले होते. हे क्षण, ती संध्याकाळ संध्याकाळ आणि एकटेच गाणारे ते आजोबा माझ्या कायम स्मरणात राहील.

सौरभ राघवेंद्र.