•mr•

रिच !

सोशल मिडिया मला नवा नाही. मला चांगलं आठवतं- माझं पाहिलं सोशल अकाऊंट मी सहावीमध्ये असताना सुरू केलं होतं, ऑर्कुट नावाच्या एका वेबसाईटवर. वयाची मात्र बारा वर्षंच पूर्ण झाली असताना, ऑर्कुटवर अका…

सोशल मिडिया मला नवा नाही. मला चांगलं आठवतं- माझं पाहिलं सोशल अकाऊंट मी सहावीमध्ये असताना सुरू केलं होतं, ऑर्कुट नावाच्या एका वेबसाईटवर. वयाची मात्र बारा वर्षंच पूर्ण झाली असताना, ऑर्कुटवर अकाउंट काढता यावं म्हणून अठरा वर्षं पूर्ण झालेली भासवणारा मेल आयडी बनवून मी ऑर्कुटच्या 'अठरा वर्षं पूर्ण हवीत' या अटीला फाट्यावर मारलेलं होतं. अर्थातच, हे असं करणारा मी एकटाच होतो असं नाही. माझ्या शाळेतल्या मित्रांनी आणि मैत्रिणींनीही ऑर्कुटवर येण्यासाठी असाच काहीसा उपद्व्याप केलेला होता.

माझी दहावी होईपर्यंत मी ऑर्कुट नित्य-नेमानं वापरत होतो.नंतर अकरावी सुरू झाली आणि त्याच दरम्यान फेसबुकही आलं. यथावकाश मीही फेसबुकवर आलो, पण ऑर्कुटविषयी जी आपुलकी मला वाटायची ती फेसबुकविषयी कधीच वाटली नाही, आजही वाटत नाही. डिजिटल स्थित्यंतराच्या काळात ऑर्कुट हळूहळू मागं पडत गेलं, मग ते बंदही पडलं. नंतरच्या काळात फेसबुकचा वापर असा काही फोफावला की सोशल मिडिया म्हणजेच फेसबुक हे समीकरण रूढ आणि दृढ झालं. फेसबुक, ऑर्कुट, सोशल मिडिया आणि त्यांची कंटेंपररी हिस्ट्री हे माझ्या आवडीच्या विषयांपैकी काही विषय आहेत. या विषयांवर खूप काही लिहिता येऊ शकतं, पण मला आत्ता जो मुद्दा मांडायचा आहे त्या मुद्द्याचा कंटेक्स्टमध्ये त्या दिशेने लिहिलं तर हा लेख भलतीकडेच जाईल.

तर, मला आत्ता जो मुद्दा मांडायचा आहे, तो या सोशल मिडियाच्या कोअर फिलॉसॉफीविषयीचा आहे. लोकांचा एकमेकांशी संबंध असतोच, पण त्या संबंधांना डिजिटल आयाम मिळावा, लोकांना व्यक्त होण्यासाठी डिजिटल माध्यम वगैरे मिळावं अशा हेतूने खरं तर सोशल मिडियासारख्या गोष्टी नावारूपाला आल्या होत्या. ऑर्कुटच्याही आधी मायस्पेस नावाची एक वेबसाईट होती. मला तीही आवडायची (पण पुन्हा विषयांतर नको म्हणून) मुद्द्याकडे वळताना सांगायची गोष्ट म्हणजे सध्याचा सोशल मिडिया व्यक्त होण्याच्या माध्यमापेक्षा जाहिराती विकण्याचंच माध्यम झालेलं आहे.

अर्थातच मी यात फार नवीन काही सांगतोय अशातला भाग नाही. सोशल मिडिया हा जाहिरातीचा अड्डा झालेला आहे हे ओपन सिक्रेटच आहे, पण आपल्या फीडमध्ये जिथे जाहिराती आणि 'रेकमेंड' केलेले फोटो, व्हीडीओ आणि पोस्ट दिसतात तिथे खरं तर तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींची अभिव्यक्ती दिसणं अपेक्षित असतं; पण असं होत नाही. माझ्या तुटपुंज्या गणिताप्रमाणं आज जर माझ्या फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये शंभर व्यक्ती असतील, तर मी शेअर केलेला व्हिडीओ, फोटो किंवा लिहिलेला लेख पहिल्या चोवीस तासांत 'जनरली' फार तर दहा लोकांपर्यंतच पोहोचतो. अर्थात त्यावर कोणी कमेंट केली, मग रिप्लाय दिला आणि त्या पोस्टचा 'एंगेजमेंट रेशो' वाढला तरच त्या पोस्टचा 'रिच' वाढतो, नाही असं नाही- पण ती पोस्ट शंभरच्या शंभर लोकांना दिसत असावी असं मला आजपर्यंत एकदाही जाणवलेलं नाही.

जाहीराती, बिझनेस मॉडेल, सायकॉलॉजीकल प्रोफायलिंग, त्यानुसार टारगेटेड ऍड वगैरे सगळं मान्य आहे मला, पण मी शेअर केलेली एखादी गोष्ट जर माझ्या लिस्टमधल्या फक्त दहाच टक्के लोकांना दिसत असेल तर या माध्यमाचा मला व्यक्त होण्यासाठी मूळात उपयोगच काय ? माझी अभिव्यक्ती कोणापर्यंत पोहोचावी, कधी पोहोचावी, ती पोहोचण्याचे पॅरॅमिटर काय असावेत हे जर अल्गोरिदम ठरवणार असेल तर माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्यही या मिडियासारखंच आभासी म्हणावं का? याचा अर्थ मला प्रसिद्धीची (लाईक्स-कमेंट्स, शेअर्स आणि सबस्क्राईब्सची) हाव आहे असं आजिबात नाही; पण मला जे सांगायचं आहे, मांडायचं किंवा शेअर करायचं आहे ते "आम्ही जग जोडतो" असं म्हणत ढोल बडवणाऱ्या मंडळींनी 'सौरभ'च्या डिजिटल जगाचा भाग असणाऱ्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायला हवं की नको? आयडिअली हवं, पण असं होत नाही, किमान होताना मला स्वतःला तरी दिसत नाही, हल्ली तर 'नियमाला अपवाद' म्हणूनही नाही. असो.

या विषयाला धरून मी लवकरच सविस्तर आणि सखोल लेखन करेनच आणि जेंव्हा मी ते करेन तेंव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचलं तर वाचा जरूर, तोपर्यंत जाहीराती आणि रेकमेंड केलेले व्हिडिओ आहेतच !

- सौरभ राघवेंद्र.