•mr•

रुंजी

रुंजी घालत राहतेस माझ्या मनामध्ये

रुंजी घालत राहतेस माझ्या मनामध्ये

अनुरूप बोलांची वाट पहात

गाभाऱ्यामध्ये घुमत राहणाऱ्या

एखाद्या अर्धवट स्वरावलीप्रमाणं.

विशेष असा कुठला ताल नाही, लयही नाही

रागाचं अथवा थाटाचं अवडंबरही नाही.

आपसूकच येऊन उभ्या राहिलेल्या

तुझ्या आठवणींप्रमाणंच हे स्वर-

मुक्त आणि स्वतंत्र.

रोजच्या धकाधकीची गवसणी पांघरलेल्या तांबोऱ्याला

अडगळीमधून काढावं मग सावकाशीनं,

तारांना तणावं थोडं, थोडं सैल सोडावं

आणि हलक्याच हातानं छेडावं एक-एका तारेला

तुझ्या आठवणी मला छेडतात, अगदी तसंच.

ओळखूच येऊ नये मग- मी माझा मलाच

त्या स्वरांपासून वेगळा असा कोणी तरी

आणि लाखखून जावा अस्ताचालापाठी दडलेला गंधार

तसाच जसा नव-प्रत्यय येतो तुझा

त्याच त्या आठवणींची

मी उजळणी करतो तेंव्हा.

-सौरभ राघवेंद्र.