•mr•

सदाशिव पेठ...

लग्नात जेंव्हा नवरदेव उखाणा घेतो तेंव्हा जशी त्याच्या भाजीत भाजी मेथीची ठरलेली असते, अगदी तशीच पुणे म्हटलं की पेठेत पेठ सदशिव पेठ ही ठरलेलीच असते. आणि का असू नये ? शनिवार वाडा आणि सदाशिव पेठेमधले क…

लग्नात जेंव्हा नवरदेव उखाणा घेतो तेंव्हा जशी त्याच्या भाजीत भाजी मेथीची ठरलेली असते, अगदी तशीच पुणे म्हटलं की पेठेत पेठ सदशिव पेठ ही ठरलेलीच असते. आणि का असू नये ? शनिवार वाडा आणि सदाशिव पेठेमधले काही मोजक्याच मिनिटांचे अंतर पाहता सदाशिव पेठेचा इतिहास हा पेशव्यांइतकाच जुना आहे हे सांगणेच न लागे.

सदाशिव पेठेत राहावयास आम्ही काही ठरवून आलो होतो, अशा मधला भाग नाही. इथे राहावयास मिळणे हा केवळ योगायोग होता, पण मिळालेली जागा म्हणजे मात्र बावनकशी सोनं म्हणावं तशी आहे. अत्यंत हवेशीर तीन बेडरूम्सचं प्रशस्त घर ते हे स्वतंत्र पार्किंगसह, समोर टिळक रस्ता मागच्या बाजूस बाजीराव रस्ता, समस्त स्त्रीवर्गाची आवडती जागा म्हणजे तुळशीबाग आणि पूर्वीच्या काळी पेशव्यांची आणि आता अनेक प्रेमी युगुलांची आवडती सारस बाग अगदी हाकेच्या अंतरावर. स्वारगेट बस-स्थानक तर रिक्षात बसता तोच हजार होणार. पुण्यामधले गजबजलेले आणि उत्साहानं सळसळणारे कर्वेनगर, कोथरूड, फर्ग्युसन कॉलेज रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड सारे अगदी दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर !

सदाशिव पेठेत देवळे फार ! आता माझ्या घराच्या भोवती जर शंभर मीटर त्रीज्येचं वर्तुळ जर कोणी काढलं तर त्या वर्तुळामध्येच सहा मंदिरे आहेत ! अर्थात यामागे सुद्धा एक कारण आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत इथे पुष्कळ वाडे होते. प्रत्येक वाड्यामध्ये एक मंदिर हमखास असे. त्यामुळे ही इतकी सारी मंदिरे. भारत देशात क्वचितच आढळणाऱ्या नारद मुनी आणि व्यास मुनींचे मंदिर सदाशिव पेठेतच आहे. आणि इथल्या मंदिराची नावे तरी किती भारी! खुन्या मुरलीधर, पत्र्या मारुती, पासोड्या विठोबा, चिमण्या गणपती... इत्यादी इत्यादी.

एस. पी. कॉलेज, भावे हायस्कूल, हुजूरपागा, आर.एस.एम. अशा भावी पुणेकर तयार करत आलेल्या कितीतरी वर्षांचा इतिहास असणाऱ्या शैक्षणिक संस्था इथे नावारूपाला आल्या. मराठी नाट्यपरंपरेच्या अनेक जुन्या साक्षीदारांपैकी एक भरत नाट्य मंदिर तर इथे १८९४ सालापासून दिमाखात उभे आहे. त्याला लागून असणाऱ्या इतिहास संशोधांच्या इमारतीचा स्वत:चा असा इतिहास आहे. सांस्कृतिक परंपरेत भर घालण्यासाठी आता टिळक स्मारकही अनेक वर्षांपासून सज्ज आहे. नवकोट नाना उर्फ नाना फडणविसांचा विश्रामबाग वाडासुद्धा सदाशिव पेठेतलाच.पण हे वाचून जर कोणाला वाटत असेल की सदाशिव पेठ घडली ती या वास्तूंमुळे-इमारतींमुळे तर ते अर्धसत्य किंबहुना अर्ध्याच्याही अर्धे सत्य होईल. सदाशिव पेठेतल्या वास्तूंपेक्षा या वास्तूंमध्ये वास्तव्य करणारे लोक सदाशिव पेठेच्या सांस्कृतिक संपन्नतेस कारणीभूत होते.

ज्या रस्त्यावरून मी रोज फिरायला जातो त्या रस्त्यावर एक मोठा वाडा आहे. त्या वाड्यात राहत होते, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ! फडक्यांच्या वाड्याला लोकमान्य टिळकांचे पाय वारंवार लागले होते असे म्हणतात. ज्या रस्त्यावरून टिळक चालत त्या रस्त्यावर आपण चालतो, त्या वाड्यात आपण जातो या गोष्टीमधला आनंद काय वर्णावा. बरे, टिळकांचे सुरुवातीचे घरही त्याच रस्त्यावरू थोडे पुढे गेल्यावर होते असे मी कोठे तरी वाचले होते.

सदाशिव पेठेने एस. एम. जोशी आणि ज्येष्ठ समाजवादी नेते ना.ग.गोरे अशांसारख्या थोरांचेही वास्तव्य अनुभवले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे घर पत्र्या मारुतीच्या अगदी जवळ आहे. ज्येष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे, संस्कृत सुभाषितकार नवरे हे देखील सदाशिव पेठेमधलेच. बाबासाहेब पुरंदरे यांचे सुरवातीचे अनेक वर्षे सदाशिव पेठेत वास्तव्य असल्याचे माझ्या वाचनात आले आहे. 

ज्येष्ठ गायक राम मराठे देखील सदाशिव पेठेत राहत. पु. ल. देशपांडे सुद्धा त्यांच्या आयुष्यातली काही वर्षे एस. पी. कॉलेज मागील बाजूस पेठेतच वास्तव्यास होते असे माझ्या वाचनात आले होते. प्रसिद्ध नाट्यकर्मी चित्तरंजन कोल्हटकर आणि प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते राजा गोसावी देखील सदाशिव पेठेधलेच. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे घरही पेठेतच. इथल्या नारद मंदिरात त्यांचे कीर्तन अगदी जवळून ऐकण्याची दुर्लभ संधी येथे मिळते. इथे राहणाऱ्या प्रतिथयश व्यक्तींची नावे लिहायचे मी म्हटले तर किमान अजून तीन ते चार परिच्छेद तरी मला लिहावे लागतील, एवढे सारे लोक या सदाशिव पेठेने घडताना पाहिलेत.

या सगळ्याचा विचार करतांना मला माझीच गम्मत वाटते. ज्या वाटेने पेशवे, क्रांतिवीर फडके, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेवराव रानडे, रमाबाई रानडे यांच्या साराख्या व्यक्ती चालल्या त्या वाटा तुडवताना, ज्या घरामधून पु.ल. देशपांडे, भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे यांच्या रात्र रात्र चालणाऱ्या अनौपचारिक आणि संगीत मेहफिली जमल्या अशा घरासमोरून चालताना, ज्यांचे नाव घेतले तरी सारे रसिकजन नतमस्तक होतात अशा थोर नाट्यकार्मिंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाट्यमंदिरामोर उभे राहताना, ज्या कार्यालयामध्ये सावरकरांनी गुप्त सभा घेतल्या त्या वास्तूमध्ये जाऊन त्यांचे आणि इतर थोर क्रांतीवीरांचे दुर्मिळ फोटो पाहताना, संध्याकाळच्या वेळी व्यास मंदिरामाधले वेदपठण ऐकताना, सुरेल कीर्तन ऐकताना खूप प्रसन्न वाटते. वाटते किती सुदैवी आहोत आपण.

अनेक लोकांना सदाशिव पेठत वाहतुकीच्या समस्या, कचऱ्याचे प्रश्न, छोटे रस्ते, विक्षिप्त रहिवासी, मजेशीर पाट्या या गोष्टी दिसतात. मला देखील हे दिसते पण मी याच्याकडे पाहत नाही. इथला गोंगाट माझ्या कानावर पडतो पण मी तो ऐकत नाही. मी माझ्या मनातल्या मनात पहात असतो ते इथले जुने वाडे. मला ऐकू येतात त्या जात्यावरच्या ओव्या. मग संध्याकाळी होणारी दिवेलागणी, त्यानंतर पसरणारा उदबत्त्यांचा सुगंध, कानावर पडणारे लयबद्ध संस्कृत श्लोक. मला जाणवतात त्या इथे वावरलेल्या लोकोत्तर विद्वान व्यक्ती, त्यांच्यामधल्या चर्चा, वादविवाद, मेहफिलिनी रंगवलेल्या उत्तररत्री... गेल्या चार वर्षात मी वर्तमानापेक्षा भूतकाळातच जास्त जगलोय असं मला वाटतं...

इथं राहून मला आता चार वर्षं होतील, पण सदाशिव पेठ मला अजून पूर्णपणे कळली आहे असं मला वाटत नाही. इथले रस्ते मला पाठ झाले आहेत पण ज्या मार्गावरून या सदाशिव पेठेने वाटचाल केली ते मार्ग मी आजही शोधतोच आहे. इथे होऊन गेलेल्या लोकांची कर्तृत्वे पाहता मी एक नगण्य व्यक्ती आहे जी योगायोगाने इथे येऊन पडली आहे असे जाणवू लागते. माझे इथे येणे नकळत झाले होते, पण इथून जाताना मात्र मी समृद्ध होऊन जाइन ही जाणीवच खूप श्रीमंत आहे. 

-सौरभ राघवेंद्र.