फोटो
सहज म्हणून काढलेला फोटो.. आठवतही नसतं आपल्या फोनच्या गॅलरीत पडून आहे
सहज म्हणून काढलेला फोटो.. आठवतही नसतं आपल्या फोनच्या गॅलरीत पडून आहे
म्हणून. कधी तरी वेळ मिळतो आणि चाळता चाळता सापडतो ! मग विचारचक्रं फिरायला
लागतात.
कधी काढला असेल? कुठं काढला असेल? आणि मुख्य म्हणजे का
काढला असेल ? कधी आणि कुठं ह्या प्रश्नांची उत्तरं काय फोटोच्या
प्रॉपर्टीमध्ये अशीही मिळतातच, पण 'का?' ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र किती
तरी वेळेला काही केल्या आठवतच नाही आजिबात.
म्हणजे बघा ना.. आता ह्या फोटोमध्ये टिपण्यासारखं असं काय आहे ? नारळाचं एक झाड आहे, ते पण पूर्ण दिसत नाहीये.
एखादा दुर्मिळ पक्षी वगैरे जाऊदे साधा कावळा जरी असेल असं म्हणावं तर तो
ही नाही. तसा मागे एकदा पावसाच्या थेंबांना एका फ्रेम मध्ये क्लिक करता
येतं का ते पाहण्यासाठी एक प्रयोग करून बघितला होता, तो जमला पण होता
चांगला. पण हा तश्या प्रायोगिक फोटोंसारखा फोटोही नाही. नाही म्हणायला
संध्याकाळच्या सोनेरी रंगाची ओझरती छटा आहे म्हणून थोडा फार माहोल तरी
बनतोय काही ह्याच्यात, पण तेवढंच. त्यामुळं विशेष असं काही दाखवण्यासाठी हा
फोटो नक्कीच काढलेला नाही, एवढं खरं.
कदाचित मग त्या वातावरणात, त्या क्षणी जो निवांतपणा मी अनुभवत होतो तो
टिपता येतो का हे पाहायला काढला असेल हा फोटो. मला नेहमी वाटतं- आपण व्यक्त
व्हावं, पण आत खोलवर जोपर्यंत काही जाणवत नाही ना तोपर्यंत थांबावं. हा
फोटो माझ्या निवांतपणाची अभिव्यक्ती असेल कदाचित. किंवा नसेलही. वेळ जात
नाही बसल्या बसल्या म्हणूनही काढला असेल बहुतेक. (मलाच धड पूर्ण विश्वासानं
सांगता येत नाहीये, त्यामुळं) कोणी सांगावं?
असो.
तर शेवटी काय!
असंच असतं आयुष्य.
-सौरभ राघवेंद्र.