•mr•

संध्याकाळ

मध्यंतरी कवी गुलझार यांची एक कविता वाचनात आली होती. त्या कवितेमधल्या ओळींमधून प्रेरणा घेऊन लिहिलेला हा लेख. दुर्दैवाने कवितेचे नाव आठवत नाही. त्याबद्दल क्षमस्व.

(मध्यंतरी कवी गुलझार यांची एक कविता वाचनात आली होती. त्या कवितेमधल्या ओळींमधून प्रेरणा घेऊन लिहिलेला हा लेख. दुर्दैवाने कवितेचे नाव आठवत नाही. त्याबद्दल क्षमस्व.)

शांत होती ती संध्याकाळ. वाऱ्यासोबत झुलणारी पाने, मिटत्या फुलांचा मोहक गंध, मावळत्या सूर्याची उबदार आभा,मंदिरातून येणारा स्तोत्रपठणाचा लयबद्ध आणि मंजुळ ध्वनी, पिलांकडे परत येणारे पक्षीसारे काही होते, अगदी प्रेमातपाडणारे.

फक्त तू हवी होतीस.

मला आठवते अशीच एक संध्याकाळ आपण दोघांनी व्यतित केलेली, एकत्र. मावळत्या सुर्याच्या सोनेरी किरणांनी उजळलेला तुझा चेहरा, वाऱ्याशी हितगुज करणारे मोकळे केस, चमकणारे बोलके डोळे आणि नकळत झालेला तुझा तो स्पर्श.

आजही जपला आहे तो क्षण जसे तु ही जपले आहेस मी तुला दिलेले मोरपीस...

खरं सांगू, मी कोणी कवी नाही.चांदण्याचे सुखनाकधी माझ्या हृदयात भरून वाहिले ना दुःखाचे निर्झर कधी असावातून ओघळले. केवळ नात्याचे एकच वस्त्र विणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मी तुझ्यासवे.

नियतीचा खेळच हा सारा कदाचित, या उसवलेल्या आठवणीच्या वस्त्रांवर रेशमाचे तलम धागे कमीच, केवळ गाठीच उरल्याहेत आताशा..

माहिती नाही किती वेळ मी असाच उभा आहे येथे, तुझ्या विचारात आकंठ बुडून. पण जाणवते एवढेच की सरतेच आहे अजूनही तीच संध्याकाळ. मनातले दु:ख मनातच विरते आहे. एकटेपणाचे धुके निवळते आहे. तरीही खूप काही सांगावयाचे आहे तुला, अजूनही...

स्तब्ध झालेले शब्दांचे दव आता डोळ्यांमधूनच ओघळतील बहुतेक. वाटते मग कधी तरी तू येशीलच. तो नाजूक स्पर्श, ओघळणारे अश्रू पुसशीलच.

कधी येशील तू ?

आता ही सांजवेळ सरत आलीये. गाभाऱ्यामधील दिवे मंद होताहेत. जणू त्यांनाही लागली आहे येणाऱ्या रात्रीची चाहूल. आता सारेच कसे शांत होईल. वारा वाहणार नाही. पक्षी उडणार नाहीत. दूरवर कुठे तरी लांब, दिसतोय एक दिवा–संथपणे झगडतना. आपल्यामधला प्रकाशइतरत्र शोधण्यासाठी. पण मला ठाऊक आहे, रात्रीचा काळोख आता त्यालाही विझवून टाकेल.

तू आली नाहीस...

मी तुला कारण नाही विचारणार;पण हा दिवा विझला तेंव्हा किमान एकदा तरी पहावयाचे होतेस तू वळून.विझताना चमकलेल्या या दिव्याने, विझता विझता धुराच्या दीर्घ श्वासातही तुझेच नाव घेतले होते...

-सौरभ राघवेंद्र.