सांजवेळ च्या निमित्ताने...
छान वाटतंय पुन्हा लिहिताना. नवा ब्लॉग, नवे वाचक, नव्याने पुन्हा वाचणारे जुने वाचक, नवे विषय, नवा आशय, नवे लेख, नव्या कविता... सर्वात महत्वाचं, एक नवी सुरुवात. नियती, आयुष्य आपल्याला पुन्हा एक नवी स…
छान वाटतंय पुन्हा लिहिताना. नवा ब्लॉग, नवे वाचक, नव्याने पुन्हा वाचणारे जुने वाचक, नवे विषय, नवा आशय, नवे लेख, नव्या कविता... सर्वात महत्वाचं, एक नवी सुरुवात. नियती, आयुष्य आपल्याला पुन्हा एक नवी सुरुवात करण्याची संधी देतं या गोष्टीचंच मुळी मला खूप कौतुक वाटतं. चुकलेलं, गोठलेलं, साठलेलं, ठेवलेलं, कधी कधी मनापासून जपलेलं सारंच एका तीरावर सोडून देतो आपण आणि नव्या प्रेरणेने, नव्या आनंदाने आणि त्याच जोमाने सळाळणाऱ्या उत्साहानिशी पुन्हा नदीमध्ये सूर मारतो. पुन्हा एकदा नवा किनारा शोधावयास आणि पुन्हा प्रवासात जमवलेलं सारंच तिथे सोडून देऊन पुन्हा नवी सुरुवात करावयास...
खरं सांगू का, हे असं अमुक एका गोष्टीसाठी किंवा तमुक एका गोष्टीसाठी वगैरे लिहावयाची मला अजिबात सवय नाहीये. पण का कोणास ठाऊक पण “ सांजवेळ ” साठी मुद्दाम काही तरी लिहावं असं मला सारखं वाटत होतं म्हणूनच हे छोटासा लेख.
मी का लिहितो असा प्रश्न मला कधीच कुणी विचारला नाही पण तरीही याचं उत्तर माझ्यापाशी आहे बरं का ! मी लिहितो कारण मला लिहावयास आवडतं. मला सतत काही तरी सांगायचं असतं. माझं कुणी तरी ऐकून घ्यावं असं वाटत असतं. जणू व्यक्त होणं हे माझी गरजच आहे.
कधी कधी मग वाटतं मला की आमच्या रानडे आजोबांना इथून तुमच्याशीही जोडावं, कधी उमजलेलं एक छानसं गुपित हळूच तुम्हाला सांगावं, कधी रुक्ष, परखड आणि तिखट शब्दात मला न आवडणाऱ्या गोष्टींवर सडकून टीका करावी, तर कधी हळुवारपणे छोटीशी कविता करावी. एखाद्याला पत्र लिहावं किंवा मग एखादी एकाकी संध्याकाळ शब्दात बांधावी...
जाता जाता तुम्हा सर्वांना एक विनंती करू इच्छितो मी...
माझ्या आजपर्यंतच्या सर्वच लिखाणाला तुम्ही सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. Refelction या इंग्रजी ब्लॉगने तर मला जगभरातून हजारो नवे वाचक जोडून दिले. त्यामुळे विनंती हीच की कृपया माझ्यावर नाही पण माझ्या लिखाणावर असेच उदंड प्रेम करत राहा. तुमचा प्रतिसाद ही माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी लिहितो ते कोणी तरी आपण होऊन वाचते आहे ही जाणीव माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्वाची आहे. त्यामुळे कृपया असेच वाचत रहा.
सदैव तुमचाच,
-सौरभ राघवेंद्र