•mr•

संवाद

संवादासाठी आसुसलेल्या लोकांचं मला वाईट वाटतं कधी कधी, कधी काळजी वाटते. कित्येकदा त्यांना कसलासा न्यूनगंड मोकळ्या संवादापासून मागं खेचत असतो तर दुसरीकडे तो न्यूनगंड कॉम्पेनसेट करणारा एखादा चाळा हे ल…

संवादासाठी आसुसलेल्या लोकांचं मला वाईट वाटतं कधी कधी, कधी काळजी वाटते. कित्येकदा त्यांना कसलासा न्यूनगंड मोकळ्या संवादापासून मागं खेचत असतो तर दुसरीकडे तो न्यूनगंड कॉम्पेनसेट करणारा एखादा चाळा हे लोक आपला छंद म्हणून मिरवतात आणि त्या छंदाच्या माध्यमातून लोकांशी संवाद सुरू करण्याचा ह्यांचा प्रयत्न सुरू होतो. त्यांचा छंद आणि क्रमप्राप्त अभिव्यक्ती सर्वमान्य, सर्वसामान्य असेल तर या लोकांचं आयुष्य थोडं सुकर बनतं नाही तर मग त्या छंदामध्ये आणि पर्यायानं स्वतःमध्ये ही माणसं गुरफटून जातात.

असं गुरफटणं त्यांना सर्वसामान्य लोकांपासून, त्यांच्या जगापासून, आयुष्यापासून दूरवर घेऊन जातं. ज्यांना असं दूरस्थ असणं आवडू लागतं, ज्यांना या एकाकीपणाच्या नशेची चटक लागते त्यांना आपल्या अशा गुरफटून जाण्यात वेगळ्याच प्रकारची वेदना वगैरे आहे असे भास होऊ लागतात आणि त्यांचं जगणंच अनेक अर्थांनी आभासी होऊन जातं.

असे कितीतरी लोक पाहिले आहेत मी भोवताली. त्यांच्याजवळ पोहोचायचं म्हटलं तरी ते शक्य होत नाही. आमच्या वेदनेचा पोत तुम्हाला ठाऊकच नाही त्यामुळं तुम्ही लोक आम्हाला समजून घेऊच शकत नाही असं म्हणत थेट आम्ही आणि तुम्ही असा वर्गभेद हे लोक निर्माण करतात आणि त्यातून आपण कोणी तरी वेगळे असल्याची भेदमूलक जाणीव त्यांच्या आभासी आयुष्याच्या तळाला चिकटते. अशा तळातून उमलणाऱ्या त्यांच्या अभिव्यक्तीची पालवीसुद्धा जन्मतःच करपून गेलेली असते.

या लोकांच्या स्वभावाच्या विविधी तऱ्हा आकळल्या की त्यांच्या अभिव्यक्तीवरून यांच्या स्वभावाचा, मनस्थितीचा अंदाज बांधता येतो. संवादासाठी, प्रेमाच्या हळूवार स्पर्शासाठी आसुसलेलं त्यांच्यातलं निरागस मूल आपल्याला दिसतं; पण मग तिथंपर्यंत पोहोचू न देण्याचा किंवा केवळ समदुःखी व्यक्तींकडेच मोकळं होऊन आपलं दुःख कुरवाळून घेण्याचा यांचा आटापिटा पाहिला की दयाही येते बिचाऱ्यांची. त्यांचं भासमान आयुष्य त्यांना अर्थपूर्ण नातं निर्माण करण्यापासून अडवून धरतं हे त्यांचं त्यांनाही कळत नसावं बहुधा.

त्यांच्या या अवस्थेला समाजही तितकाच जबाबदार असावा; आहेच कदाचित. संवादाच्या गरजेची मूलभूत उर्मी आत, खोलवर दडवून जगायला भाग पाडणारी व्यवस्था दुर्दैवीच म्हणावी लागेल. प्रत्येकाच्या मूलभूत गरजा समान असल्या तरी त्यांची पूर्तता रचनेच्या उतरंडीमधल्या ज्याच्या त्याच्या तुलनात्मक स्थानाप्रमाणं होत असेल तर समानतेचं मूल्य ही रचना या गरजा अधोरेखित करण्यापर्यंतच मानते का असा प्रश्न निर्माण होतो आणि सकल समाज म्हणून विचारांमध्ये आणि कृतीमध्ये असलेली ही तफावत या बिचाऱ्या जीवांच्या मूळावरच उठतेय की काय असा प्रश्न मला पडतो.

असे व्यथित जीव सभोवताली असताना मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात कैक वेळा वैयक्तीक कारणांमुळे आनंदी होतो तेंव्हा यांच्या अस्तित्वाची जाणीव मला अनेक कारणांसाठी अस्वस्थ करते, पण इथेही या अस्वस्थतेसाठी तुलनात्मक विचारांची शिकवण देणारा समाजच कारणीभूत आहे असंही कुठे तरी वाटतं. ज्याला त्याला शेवटी ज्याच्या त्याच्या खिडकीतून दिसलं तेच ज्याचं त्याचं सत्य!

त्यामुळं मला ही रचना बदलायला हवी असं जेंव्हा वाटतं, तेंव्हा या सत्याचा शोध अनिवार्य आहे की काय असा प्रश्न पडतो. ज्या विचारपद्धतींचा संस्कार आपल्यावर झाला आहे, प्रत्येक गोष्टीला परिमाणं चिकटवून तुलना करण्याचा जो विकार आपण आपल्याला जडवून घेतला आहे त्या संस्कारांपासून, त्या विकारापासून आपण आणि पर्यायनं आपला समाज सहजपणे मुक्त होऊ शकतो का? असाही प्रश्न मनात चमकून जातो.

निसर्गाचा, समाजाचा अविभाज्य घटक म्हणून या प्रश्नांना आपण उत्तरदायी आहोत; पण तरीही ऊन कुठे अन् कुठे सावली, दुष्काळ तिथे अन् इथे पालवी या ओळी गुणगुणत या शोधयात्रेची वाट आपण नेहमीच चुकवत राहिलो आणि असंच असायचं असं म्हणून त्या त्या स्थितिला वस्तुस्थिती बनवून आपलं आपलं आयुष्य आपण भोगत आणि उपभोगत राहिलो तर जगाच्या आणि पर्यायानं स्वतःच्या समस्यांमध्ये आपण केवळ भरच घालत राहू एवढं मात्र नक्की !

- सौरभ राघवेंद्र.