•mr•

शेखर'राव'

<!--[if gte mso 9]>

“काय शेखरराव! ओळखलंत का?” मी हसत हसत विचारलं.

“राहुल का?” शेखरच्या चेहऱ्यावर गोंधळल्याचे भाव त्याच्या नाका-डोळ्यांइतके स्पष्ट दिसत होते.

“नाही.” मी म्हटलं.

“मग?” शेखर ओशाळला.

“सौरभ.” मला त्याच्या अवस्थेकडे पाहून हसू आवरेना.

“अरे! सौरभ. तुम्ही!! या या.” त्यानं हस्तांदोलन केलं. “दाढी वाढवल्या, केस वाढवल्यात. वळखलंच न्हाय अज्याबात. कधी आलाय"सा?”

“काल आलो.” मी म्हटलं.

“व्हय काय?” आपल्या गिऱ्हाईकाकडे वळत शेखर म्हणाला. मी कोण हे ओळखायच्या नादात आपण एका माणसाची दाढी करतो आहोत याचा त्याला विसर पडला होता.

“सौरभ हायेत. आधी यायचे आमच्याकडं. पुण्यात असत्यात, आठ वर्ष झाली.” शेखरने त्या गिऱ्हाईकाच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नचिन्हांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे वळून म्हणाला, “सौरभ साहेब, एवढी दाढी करतो, अन् मग बोलतो तुमच्या संगं.”

“हो, हो, आरामात.” मी शेखरला आश्वस्त केलं आणि बाजूलाच पडलेलं वर्तमानपत्र उचलून ते चाळता-चाळता आजूबाजूला नजर फिरवू लागलो.

पाचवीमध्ये असल्यापासून बारावी संपेपर्यंत शेखरच्या ‘लेटेस्ट सलून’चा मी ठरलेला गिऱ्हाईक. आमच्या शाळेमध्ये केस वाढवलेले अजिबात चालायचे नाहीत. त्यामुळं महिनाभऱ्यातल्या एखाद्या रविवारच्या सकाळी आमची गाठभेट ठरलेलीच असायची. शाळेच्या नियमात बसवून मी त्याला माझे केस असे काप, तसे काप असं सांगायचो, पण मी कितीही सांगितलं, तरी तो ‘काप’ मात्र शेखर त्याला हवा तसाच ठेवायचा आणि तो ही असा असे की पुन्हा केस कापायची वेळ येईपर्यंत केस विंचरण्याच्या कार्यक्रमातून मला सुट्टी मिळे.

त्याच्याकडून शेवटचे केस कापून घेतले त्याला जवळजवळ आठ वर्षे उलटून घेतली. मी त्याच्याकडे जात असलेल्या आठ वर्षात त्याच्या दुकानातल्या कात्री आणि वस्तऱ्याची जागा एका इंचानेही बदललेली नसायची पण माझ्या अनुपस्थितीच्या आठ वर्षांत शेखरनं त्याच्या ‘लेटेस्ट सलून’चं ‘स्टाईल कॉर्नर’ नावाच्या मेन्स ओन्ली पार्लर मध्ये जे रुपांतर केलं होतं त्या रुपांतराकडे मी अक्षरशः आ वासून पहात होतो!

त्याच्या सलूनच्या दर्शनी भागाला झाकणाऱ्या अर्ध्या काचेच्या आणि अर्ध्या पत्र्याच्या पार्टिशनची जागा खालपासून वरपर्यंत सुबक नक्षीचं कोरीवकाम असलेल्या अर्धपारदर्शी काचेच्या तावदानाने घेतलेली होती. लहान मुलांचे केस कापता यावे म्हणून त्यांच्या बैठकीची तात्पुरती उंची वाढवण्यासाठी फळ्यांचा वापर कराव्या लागणाऱ्या उसवत गेलेल्या रेक्झीनच्या आवरणाची मोठ्या चिकटपट्टीने लाज राखणाऱ्या लोखंडी खुर्च्यांच्या जागी लिव्हर दाबता क्षणी वर खाली होणाऱ्या अत्यंत मऊ कुशनिंग असलेल्या हायड्रॉलिक खुर्च्या आल्या होत्या.

अर्ध्या पुरुष उंचीच्या आरशांची जागी एव्हाना सव्वासहा फुट उंच आरशांची वर्णी लागली होती आणि त्या आरश्यांच्या पुढच्या ड्रॉवर्स आणि त्यामध्ये भरून ठेवलेल्या सामग्रीचा भार वाहणाऱ्या लाकडाच्या मजबूत ड्रेसिंग टेबलांची जागा काचेच्या नाजूक टेबलांनी घेतली होती. केशकर्तनाच्या सामग्रीने दोन आरशांच्या मध्ये उभ्या काचेच्या कपाटात आपली स्थाननिश्चिती केली होती. त्या कपाटामध्ये पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, त्या सामग्रीनेसुद्धा आपला कायापालट केला होता.

मला चांगलं आठवतं मी दहावीत असेपर्यंत शेखर कडे दोन कात्र्या असायच्या आणि एक वस्तरा. त्याची ही तीन हत्यारं आणि लाल रंगाचे दोन कंगवे या मर्यादित सामग्रीच्या सहाय्यानं तो आमच्या मास्तरांच्या हातात सापडणार नाहीत आणि आम्ही अगदीच माकडछापही दिसणार नाही एवढे बारीक केस करून द्यायचा. मी अकरावीत प्रवेश केला तेंव्हा शेखरकडे पाहिलं ‘मशिन’ आलं होतं. मला अजूनही आठवतं. तपकिरी रंगाचं ते मशिन अत्यंत कौतूकानं माझ्यासमोर नाचवत त्याने मला विचारलं होतं, “आज मशिन मारू का?” मी अर्थातच त्याला संमती दर्शवली होती. आठ-नऊ वर्षांपूर्वी डोक्यावरून फिरणाऱ्या त्या मशिनची घरघर अनुभवणं हा माझ्यासाठी एक नवीन आणि अर्थातच गमतीशीर अनुभव होता, पण तो अनुभव देणारं आठ वर्षांपूर्वीच ‘नवं मशिन’ शंभर वर्ष जुनं वाटावं, इतक्या तऱ्हेची सामग्री काचेच्या त्या पारदर्शी कपाटाची शोभा वाढवत होती. ते पाहून शेखरने केशकार्तनाच्या सामग्रीचं दुकानच जणू थाटलं होतं असं वाटत होतं.

जी गत केस कापण्याच्या आयुधांची तिच गत आयुधांच्या व्यक्तिरिक्त दाढी करण्यासाठी साठी लागणाऱ्या साहित्याची. एक काळ होता जेंव्हा अफ्टर शेव्हचं एक लोशन आणि नवरत्न तेलाची मोठी बाटली यांच्या पलिकडं कुठल्याच कॉस्मेटिक उत्पादनं बनवणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांना शेखरच्या सलून मध्ये प्रवेश नसे; पण आता मात्र तो कॉस्मेटिक कंपन्यांच्या उत्पादनांचा गिऱ्हाईकांवर प्रयोग करता करता ती उत्पादने हा त्यांना विकतो सुद्धा की काय अशी शंका यावी एवढ्या प्रमाणात त्या उत्पादनांचा साठा शेखरने आपल्या सलूनमध्ये जमवला होता. हरतऱ्हेचे शॅम्पू, रंगीबेरंगी तेलं, केसांना लावायचं वेगवेगळ्या प्रकारचं जेल, दहा प्रकारचे हेअरस्प्रे, केसांना लावायच्या रंगांच्या नानाविध शेड्सचा जाडजूड कॅटलॉग आणि ‘हेअरस्टाईल’चे वेगवेगळे ‘ऑप्शन्स’ दाखवणारं एक तेवढंच जाड पुस्तक!

‘लेटेस्ट सलून’चं ‘स्टाईल कॉर्नर’मध्ये झालेलं हे अनपेक्षित स्थित्यंतर माझ्या पचनी पडतं न पडतं तोच, प्रश्नांकित चेहऱ्यानिशी खुर्चीत बसलेल्या गिऱ्हाईकाने दाढीचे साठ रुपये शेखरच्या हातावर टेकवले आणि ते पाहून मात्र मी क्लीन बोल्ड झालो. साठ रुपये! केवळ दाढी साठी साठ रुपये घेत असेल, तर शेखर केस कापण्याचे किमान एकशेवीस रुपये घेत असावा असा अंदाज मी बांधला आणि आठ वर्षांपूर्वी माझे केस कापणे आणि दाढी करणे या सोपस्कारांसाठी त्याच्या हातावर टेकवलेले अनुक्रमे बारा आणि आठ असे मिळून वीस रुपये आठवून शेखरकडे मी मला माहिती असलेला हाच का तो शेखर अशा भावाने पाहिलं. माझं चक्रावणं त्याच्या सहज लक्षात आलं आणि त्यानं नुसतंच स्मित केलं.

“या साहेब. बसा खुर्चीवर.” तो मला म्हणाला.

“अरे वा! नवीन खुर्च्या वाटतं” खुर्चीवर बसता बसता मी म्हटलं, “आणि खूपच सुधारलंय की तुमचं ‘लेटेस्ट सलून’”

“काय दादा गरीबाची थट्टा करताय काय!” शेखर ओशाळला.

“अरे! थट्टा कुठे! खरं तर सांगतोय.” मी खरंच सांगत होतो.

“हां, म्हंजी तसं थोडं फार बदल केल्यात बगा. पन अजून लई काय काय करायचं बाकी हाय.” शेखरनं समोरच्या आरश्यात माझ्या आणि स्वत:च्या प्रतिबिंबाकडे पाहात स्वत:च्याच नजरेत नजर स्थिर करून मला सांगितलं.

“अजून काय करायचं आहे? सगळं तर केलं!” जिथून शेखरने सुरुवात केली होती, तिथून आजपर्यंत त्याने गाठलेला पल्ला मला अत्यंत रास्त आणि योग्य वाटला.

“अजून दुकानात ए. शी. बसवायचाय. शिवाय अजून एक गाळा घ्यावा म्हनतोय आता. नवीन ब्रॅंच!”

“अरे वा!” मला शेखरचं मनापसून कौतुक वाटलं. “पण हे सगळं कधी झालं? कधी केले हे बदल सगळे?”

“त्याचं बघा दादा” शेखर पलीकडच्या खुर्चीत बसून मला सांगू लागला “दुकान सुरु केल्यापासून पहिली आठ वर्षं तर गाळ्याचं कर्ज फेडण्यात गेली. कर्ज फिटतं तोवर चौकात एक नवीन सलून सुरु झालं. त्याच्याकडं ए. शी. व्हता, टी. व्ही. व्हता. शंभर प्रॉडक्ट्स व्हते. माझी काही गिराईकंभी पळवली त्यानं सुरवातीला. तेंव्हा मला वाटलं आपला धंदा संपला आता.”

शेखर त्याच्या प्रतिबिंबाकडे स्थिर दृष्टीने पहात होता जणू त्याला दुकानासोबत त्याच्यामध्येही होत गेलेली स्थित्यंतरं आता त्या आकृतीमध्ये दिसू लागली होती.

“धंदा बसून चालणार नव्हतं. पोरगी लहान होती, तिचं शिक्षण हुतं, बाच्या आजारपणाचा खर्च व्हता. मग पुन्यांदा कर्ज काढलं आणि हळू हळू दुकान लेटेष्ट करायला सुरु केलं. पहिल्यांदा बाहेरची काच बदलली, मग आरसे आणि मग हळू हळू सगळंच बदलत आनलं. शेवटचा बदल बघा तीन वर्षांपूर्वी केला. तवाच कर्ज भी फिटलं. बा ग्येला दोन वर्षांपूर्वी पन अॅटॅक आला म्हणून, आजारपनानं न्हवं. पोरीलाभी आता तुमच्याच शाळेत घातलंया.”

"अरे वा!” मी शेखरचं कौतुक केलं तसं तो मनमोकळा हसला, “पण मला सांग, नवीन सुरु झालेलं ते सलून- त्याच्याकडं सुरुवातीपासूनच सगळं होतं शिवाय तुझी गिऱ्हाईकं त्यानं पळवली म्हणतोस. मग हे सगळं जमलं कसं?”

“त्याचं असं झालं दादा, सांगतो तुमास्नी..” माझ्या प्रश्नासरशी त्याच्या डोळ्यात आलेली उत्साहाची चमक पाहून माझ्या लक्षात आली की त्यानं हुषारीनं योजलेली एक एक क्लुप्ती ऐकवायला योग्य व्यक्ती त्याला सापडली होती. तो म्हणाला, “त्याच्याकड व्हतं सगळं, पण त्यानंभी ते कर्जावर घेतल्यालं आनी लय काय काय घेतल्यालं वो त्यानं. टी.व्ही. व्हता, ए.शी. व्हता. भारीतलं बेशीन व्हतं. मग व्हायचं असं की एका गिराइकासाठी बी त्याला ते सगळं सुरु ठेवायला लागायचं. मग त्याचं पैसं फिटायला नग? म्हणून मग त्यानं पैसंभी अव्वाच्या सव्वा लावायला सुरु केलं. सुरवातीला लोकांना भारी वाटायचं, पन मागाहून त्यांना वाटायला लागलं की आपलं शेकऱ्या बी हेच करतंय की, ते बी स्वस्तात. कशाला पायजे मग ए.शी. आन बी. शी.? मग लोकं पुन्हा माज्याकड यायला लागली अन् तवाच मी फर्निचर बी बदललं. त्ये भारी वाटलं लोकांना. मग मी काय म्हटलं, आपलं कर्ज काय, फार न्हाय हाय. आणि अगदीच लागलं पैसं तर घेऊ दाजी कडनं मागून, पन मानसं याय्ल्यात नवका मग दर तोच ठिऊया.”

“भलताच हुशार रे शेखर तू!!” त्याच्या बिझनेस अक्युमेनची मला गम्मत वाटली.

“आवं हुशारी काय त्यात, कॉमन सेन्स व्हता. त्याचं दारात, नवीन फर्निचरमधी लोकांची केसं कापत व्हतो मी वर्ष भर. आंनी त्या वर्षभरात त्ये नवीन दुकान भी बंद पडलं. तवा मात्तर मग एका महिन्यात माझं दर मी पहिल्यांदा वाढिवलं. आता दर तीन महिन्यांनी पाच रुपये वाढवतोय. लोकांस्नीभी सवय हुतीया आता केसांवर जास्त पैसे खर्च करायची. त्यात दाढी वाढवायची ष्टाईल आल्यापास्न तुम्हाला सांगतो, लोकं दाढीच्या तेलावर बी पैसे खर्च करायला लागल्यात.”

“मस्त की मग! छान छान. असच छान चालुदे सगळं.” मी म्हटलं.

“व्हय बगा दादा, पन आता थांबायचं न्हायाय मला. आता लई मोटं व्हायचंय. माझ्या शिकल्या सावरल्या पोरीनं लग्नाच्या भर मांडवात अभिमानानं सांगाया पायजे की माझा बाप लोकांची केसं काप्तुया, एवढं मोठं.” ह्या वाक्यासरशी त्याच्या आवाजात कंप आला आणि तो चटकन आरशासमोरून उठला. तो पाठमोरा उभा असला तरी त्याच्या डोळ्यात दाटून आलेलं पाणी मात्र माझ्या नजरेतून सुटलं नाही. कोपऱ्यात बनवून घेतलेल्या काचेच्या बेसिनशी चाळा करणारऱ्या शेखरच्या आकृतीच्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे मी पाहात होतो.

शेखर त्याच्या रोजच्या आयुष्यासारखाच अत्यंत साधा आणि सर्वसामान्य मनुष्य. त्याच्या आयुष्यात पाचव्या किंवा सहाव्या मजल्यावरचा टू किंवा वन बी.एच.के फ्लॅट नाही. एका अंधाऱ्या बोळात जाऊन संपणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दाटीवाटीनं उभ्या घरांच्या रांगेत शेवटून दुसऱ्या की तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तीन वडिलोपार्जित खोल्यांमध्ये त्याची चूल पेटते. त्याची चूल पेटत्या ठेवणाऱ्या गृहिणीची आणि त्याची गाठ परमेश्वाराने वगैरे बांधलेली नाही कारण तो अधिकार त्यांच्या समाजातल्या बुजुर्ग व्यक्तींनी आपल्याकडे राखून ठेवलेला होता. नाही म्हणायला त्याने दोन वर्षांपूर्वी एक दुचाकी घेतली, पण दारासमोर उभी करयाला जागा नसते, म्हणून ती त्याच्या सलून समोर उभी असते. त्याच्या आयुष्यातलं संगीत म्हणजे तो केस कापत असताना सुरु असलेल्या रेडियोने पकडलेली गाणी आणि कात्री-कंगव्याची अव्याहत खटखट. त्याच्या आयुष्यात रामायण, महाभारत, पुराणं, किंवा साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झालेल्या कथांच्या जागी त्याच्या केशकर्तनालायांत येणाऱ्या ग्र्हकांनी त्याने न विचारताच सांगितलेल्या त्यांच्या त्यांच्या व्यथा आहेत. आयुष्य, जीवनाचा अर्थ, तत्त्वज्ञान अशा बोजड विषयांच्या जागी, “ते रांड्याचं काल काय म्हणालं माह्त्येय काय...” अशा पालूपदानं सुरु होणाऱ्या गावगप्पा आहेत. त्याच्या आयुष्यात पु.लं नाहीत, त्याच्या आयुष्यात अत्रे नाहीत, त्याच्या आयुष्यात तेंडूलकरांची नाटकं नाहीत, कुसुमाग्रजांच्या कविता नाहीत. सकाळी उठून सार्वजनिक शौचालयाच्या वाटेवरून आपल्या चपलांचा एकमेव जोड झिझवून आल्यवर घरातल्याच एका कोपऱ्यात बनवलेल्या कामचलाऊ नहाणींत अंघोळ उरकून फळकुटावर ठेवलेली सलूनच्या कुलुपांची किल्ली उचलली की त्याचं आयुष्य सुरु होतं आणि रात्री दहा वाजता ती कुलूपं लावून किल्ली त्या फळकुटांवर जाऊन पडली की त्या दिवसापुरतं त्याचं आयुष्य तिथे थांबतं, दुसऱ्या दिवशी पुन्हा उजाडून हाच दिनक्रम पुनश्च जगण्यासाठी.

पण पुढच्या पानावरचा मजकूर ठाऊक आहे म्हणून आधीचं पान उलटताना नाउमेद झाल्याचं शेखरला मी कधीच पाहिलं नाही. त्याच्या ‘स्टाईल कॉर्नर’मध्ये येणारे ग्राहक त्याच्या आयुष्यात रंग घेऊन येतात. प्रत्येकजण आपापल्या नजरेनं पाहिलेल्या जगाचं वर्णन त्याच्याकडे करतो. कोणी त्याच्याकडे ऑफिसमधल्या चुगल्या करतो, कोणी बायकोच्या तक्रारी सांगतो. एखादा मुलगा शाळेत कसे केस कापायला सांगितलेत हे समजावून सांगतो तर एखादा म्हातारा उगाचच आपल्याला उभ्या आयुष्यात न झेपलेल्या आयुष्याच्या तत्त्वज्ञानाचे डोस पाजतो. शेखर कुठलीच प्रतिक्रिया न देता हे सगळं शांतपणे ऐकून घेत असतो आणि आपण बोलताना शेखर आपल्याला अकारण जज करत नाहीये हे लक्षात आल्यावर बोलणारा मनुष्य जरा अजूनच मोकळेपणाने बोलतो. ह्या सगळ्यात शेखरच्या मनात साठून राहिलेल्या गोष्टी मात्र त्याच्या मनातच साठून राहतात. आठ-नऊ वर्षातून मग एकदा एखाद्या दिवशी केस कापण्यापेक्षा ऋणानुबंध जपावे म्हणून एखादा ग्राहक त्याच्या सलूनची पायरी चढतो आणि तेंव्हा मात्र शेखर त्याच्या कात्रीइतकाच बोलका होतो.

माझ्या त्याच्याशी झालेल्या एकूण संभाषणामधून मला असं जाणवलं की कन्याप्राप्तीनंतर शेखरचं आयुष्यच बदलून गेलं. तिच्या निरागस हास्यामध्ये, तिच्या मऊसर स्पर्शामध्ये आपल्या आयुष्यात काही तरी करण्याची, अजून काही तरी करण्याची, अजून थोडं जास्त काही तरी करण्याची उमेद त्याला मिळत गेली आणि त्याच्या आयुष्यातल्या नित्याच्या यांत्रिक घरघरीत त्याला एक वेगळंच संगीत ऐकू येऊ लागलं. त्याच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला त्याच्या प्रवासाला निश्चित दिशा मिळाली. आयुष्य जगायचं तर आहेच, पण का आणि कशासाठी या प्रश्नाचं उत्तर त्याच्या कन्येच्या रुपानं अंधारलेल्या तीन खोल्यांच्या संसारात एक चिरस्थायी प्रकाश बनून आलं, नवी स्वप्नं घेऊन आलं आणि त्यानंतर शेखर बदलला, तो कायमचाच.

केवढं मोठं स्वप्न तरळत होतं त्याच्या डोळ्यांमध्ये! शिकली सावरलेली पोरगी- म्हणजे त्याला त्याच्या मुलीला पुढे खूप शिकवायचं होतं. लग्नाचा मांडव! म्हणजे या बापच्या हळव्या मनानं नववीतल्या पोरीच्या लग्नाचं स्वप्न आत्ताच मनोमन पाहून ठेवलं होतं आणि ते लग्न सुद्धा कुठं? एखाद्या चांगल्या मोठ्या घरंदाज स्थळी आणि तो बंध बांधण्यासाठी म्हणून लागणाऱं वधूपक्षाचं वजन शेखर आपल्या धंद्यात नाव आणि पैसा कमावून मिळवणार होता! “मला मोटं व्हायचंय. माझ्या शिकल्या सावरल्या पोरीनं लग्नाच्या भर मांडवात अभिमानानं सांगाया पायजे की माझा बाप लोकांची केसं काप्तुया, एवढं मोठं.” या त्याच्या एका वाक्यात दाटून आलेली निरागसता, त्याची ध्येयासक्ती आणि त्याचा निश्चयी बाणा मलासुद्धा कौतुक आणि अभिमानमिश्रित दोन क्षणांसाठी स्तब्ध करून गेला आणि मला पुन्हा एकदा वाटून गेलं मला ठाऊक असणारा शेखर तो हाच का?

केस कापण्याच्या आयुधांशी खुडबुड करणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहणारा मी ह्या प्रश्नासरशी काहीसा अंतर्मुख झालो आणि गेलं, "काही तरी भारी करायचं राव!" असं म्हणत स्टार्ट अप नावाचं एक छोटेखानी दुकान उघड ठेऊन जग बदलवून टाकणारी एखादी क्रांतिकारी कल्पना आपल्या डोक्यात चमकेल असं म्हणत ती कल्पना सुचेपर्यंत कालापव्ययाशिवाय फार काही न करणारे आम्ही तरुण कुठे आणि समोर जे होतं तेवढ्या आणि तेवढ्यातूनच स्वत:चं विश्व निर्माण करू पाहणारा चाळीशी ओलांडलेला शेखर कुठे!

बाहेरून पाहणाऱ्या आमच्या स्टार्ट अप जनरेशनला त्याच्या विश्वात विशेष असं काहीच दिसत नाही. तिथे अद्ययावत तंत्रज्ञान नाही, आर्टिफिशीअल इंटेलिजन्स, डेटा मॅनेजमेंट, थ्री-डी प्रिंटींग, न्यूरल नेटवर्क अशा वलयांकित जार्गन्सची भरमार नाही. शेखरचं ‘स्टाईल कॉर्नर’ जगाला क्रांतिकारी कल्पना देऊन जगाला ‘अ बेटर प्लेस’ बनवण्यात लौकिक अर्थानं कोणता हातभारही लावणार नाही.

वडिलांचं आजारपण, मुलीचं शिक्षण आणि तटपुंजी कमाई या तीन समस्यांना रोज सकाळी सात वाजल्यापासून उभ्याने हसत हसत, दुकानात आलेल्या लोकांशी गप्पा मारत, कात्री-वस्तरा आणि कंगव्याच्या सहाय्याने तोंड देत कर्जाचा डोंगर फेडून पुन्हा एकदा कर्ज घेऊन आणि त्याचीही सव्याज परतफेड करून आता आपली अजून एक शाखा असावी अशा महत्वाकांक्षेने रात्री दहा वाजता ‘स्टाईल कॉर्नर’चं शटर झाकणाऱ्या शेखरने पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत खाल्लेल्या खस्ता, पचवलेलं अपयश, मानापमानाचे प्रसंग आणि घेतलेलं श्रम यांच्या सुरस आणि चटकदार गोष्टी ऐकायला आणि त्या जगाला ऐकवायला एकही मुलाखतकार त्याच्या दुकानात येणार नाही आणि गल्लीतल्या, गावातल्या अन् राजकाराणतल्या उपयोगशून्य आणि कृतीशून्य वायफळ गप्पांमध्ये रस असणारे त्याचे रोजचे ग्राहकही त्याला याबद्दल कधी विचारणार नाहीत. कारण लोकांच्या दृष्टीनं, " शेकऱ्या नवं?ते केसं कापतंय त्येच नवं ?" एवढीच त्याची ओळख आहे आणि ती याहूनही वेगळी असावी तरी का? ज्या देशात श्रमप्रतिष्ठेचं तत्त्व रुजावं म्हणून आपल्या राष्ट्रपित्याला संडास स्वच्छ करावे लागले त्या देशात एका नाभिकाच्या श्रमांना कोण विचारतो!

समाजाचा हा दुर्दैवी बाणा शेखरच्याही अंगवळणी पडलेला आहे. मी त्याला विचारलं होतं की, काय रे बाबा एवढं सगळं केलंस, कष्ट उपसलेलस- कधी कोणाला सांगावसं नाही वाटलं का? तेंव्हा तो मला म्हणाला होता, “सांगायचं काय हाय दादा त्यात. येगळं कुटं काय केलं मी! माझ्या जागी दुसरा कोनी अस्ता तर त्यानं भी केलंच अस्त की ह्ये.” त्याच्या या अत्यंत प्रामाणिक आणि व्यावहारिक उत्तरावर देण्यासाठी कुठचीच प्रतिक्रिया माझ्या शब्दरत्नालंकृत मनामध्ये चमकली नाही आणि जरी शेखरच्या लक्षात आली नसली तरी माझी निशाब्द्ता ही त्याच्या मोठेपणाची, यशाची आणि त्याचं मार्गक्रमण योग्य दिशेनं होतं आहे या जाणीवेची स्पष्ट पोचपावती होती.

रात्री दहा वाजता घरी परतायच्या आधी दिवसभरातले सगळे आर्थिक व्यवहार जमाखर्चाच्या वाहीन नित्यनेमाने लिहिणारा शेखर सरतेशेवटी आयुष्याचा जमाखर्च कसा मंडेल आणि कागदावर उमटलेल्या ताळेबंदाकडे कसा बघेल हा विचार मात्र राहून राहून माझ्या मनात येतो. त्याच्या मुलीचं सुस्थळी लग्न लावुन देणं, एकाच्या ऐवजी तीन ठिकाणी आपल्या शाखा सूरु करणं, मागच्या गल्लीतला वाडा पाडून उभ्या होत असलेल्या इमारतीमध्ये छोटासा फ्लॅट घेणं अशा किती तरी स्वप्नांचा भार पेलत असते त्याची नजाकतीने फिरणारी कात्री. त्याच्या कष्टांची, परिश्रमाची प्रतिष्ठा नाकारणाऱ्या समाजाचा उजळ माथा जेंव्हा त्याच्याच ‘स्टाईल कॉर्नर’ची पायरी चढून त्याच्या खुर्चीत निपचित पडून स्वत:ची यथासांग हजामत करून घेत असतो तेंव्हा ते दृश्य पाहताना मला आता विलक्षण समाधान वाटतं कधी कधी आणि हे समाधान दुतोंडी समाजाची बोचरी दाढी आणि मिशी गुळगुळीत होत असते आणि त्या दृश्यात समाजाचा प्रतिकात्मक पराजय अध्याहृत असतो म्हणून नव्हे, तर त्या दृश्यात स्वत:च्या उज्ज्वल भविष्याकडे धाव घेऊ पाहणाऱ्या एका उमेदी व्यक्तीमात्त्वाची यशस्वी कलाकारी मला दिसते म्हणून!

हा सगळा विचार माझ्या मनात सुरु असतानाच शेखर त्याचे दोन्ही हात पाठीमागे बांधून माझ्या पाठीशी येऊन उभा राहिला आणि त्यानं मला विचारलं, “नेहमीसारखेच नव्हं?” मी म्हटलं, “हो नेहमी सारखेच.” त्याने मग त्याचे दोन्ही हात पुढे आणले. त्याच्या डाव्या हातात लाल रंगाचा कंगवा होता आणि उजव्या हातात माझ्या केसातून फिरलेली जुनी कात्री. त्याच क्षणी मला मनोमन खात्री पटली, की मी ज्या शेखरला ओळखत होतो तो शेखर हाच!

-सौरभ राघवेंद्र.