•mr•

शिक्षकांप्रति...

प्रिय शिक्षकवृंद,

प्रिय शिक्षकवृंद,

सा.न.वि.वि.

आपल्या नात्याला औपचारिकतेची झालर लावणारा दिवस म्हणून आज लिहितो आहे. नाही तर तशी तुम्हा सर्वांची आठवण आम्हा विद्यार्थ्यांना रोजच येत असते...

आपले नाते सुरु झाले ते बालवाडी पासून. अ आ इ चे धडे गिरवीत आमची स्वारी वरच्या वर्गांमध्ये कधी गेली हे आमच्या रोजच्या दंगामस्ती मध्ये  साधे लक्षातही आले नाही. पाचवी, सहावी सातवी अशा इयत्ता सर करत करत जेंव्हा दहावीची परीक्षा होते आणि सदिच्छा समारंभ येऊन उभा ठाकतो, तेंव्हा शाळेचा शेवटचा निरोप घेताना समजते की,   ‘ अरे ! आता शाळा संपणार  ! ’ आणि निरोपाच्या वेळी जाणवते ते एक सखोल दडपण. काहींच्या डोळ्यातून झिरपणारे तर काहींच्या कंठाशी आलेले. आतापर्यंत कधीच न वाटलेली असुरक्षितता तेथे प्रथमच जाणवते. तो क्षण अनुभूती देऊन जातो कि शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या पंखाखाली घेतो म्हणजे नेमके काय असते...

मला खरे तर आत्ता लिहावयास काहीच सुचत नाहीये. अनेक आठवणी अनेक प्रसंग माझ्या मन:पटलावरून सरकत आहेत. एखाद्या गायकाला एखादी सुंदर तान सुचावी पण सूरच गवसू नयेत अशी ही अवस्था. तुम्ही दिलेली कौतुकाची थाप, आपुलकीने केलेली चौकशी, प्रसंगी पकडलेले कान हे प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. काही जणांच्या ते लक्षात राहतात, काही जणांच्या विस्मृतीच्या गर्तेत विलयास जातात. पण शिक्षक मात्र आम्हा विद्यार्थ्यांना विसरले असतील असे क्वचितच घडते !

बोलता बोलता आमच्याच एका गुरुजींनी सांगितलेली काही वाक्य आठवली मला. ते म्हणाले तुम्ही सारे मोठे होता. कोणी डॉक्टर होतो, कोणी सरकारी कचेरीत लागतो, कोणी इंजीनीअर आणि पुष्कळ काही. नंतर काही वर्षांनी हातातली काठी टेकत रस्त्यावरून जात असताना माझाच कोणी एक विद्यार्थी दृष्टीस पडतो. सातव्या यत्तेतला तो दंगेखोर जोशी त्याच्या कुटुंबाला घेऊन ऐटीत मोटारीमधून उतरत असतो. अचानक आमची नजरानजर होते आणि क्षणार्धात तो माझ्यापाशी येतो आणि वाकून नमस्कार करतो. आठवणींची उजळणी होते, ते आनंदाचे काही क्षण पकडायच्या आताच निसटून जातात. पण एक समाधान मात्र मनी कायम राहते. मग वाटत राहते की हीच आमच्या आयुष्याची खरी कमाई. न मागता दिलेली गुरुदक्षिणा !

शाळेच्या विषयांबाहेर जाऊन आयुष्यामाधली छोटी छोटी सत्ये आमच्या बालसुलभ बुद्धीस समजावून सांगणारे हेच गुरुजी सरतेशेवटी जेंव्हा स्वत:च्या आयुष्याचा विचार करत असतील तेंव्हा मात्र त्यांना काय गवसत असेल या प्रश्नाने मी अनेकदा अस्वस्थ झालो आहे. मानसिक समाधानाने कुटुंब चालत नाही हे उमजण्याइतके ते नक्कीच सुज्ञ होते. मग अशावेळी पगारवाढीसाठी निषेधाचे रंग पांघरून सरकारविरोधी घोषणा देत चाललेला मोर्चा बातम्यांमधून कानी येताच मन आपसूकच व्यथित होते.

आज म्हणे शिक्षकांना गलेलठ्ठ पगार सरकार देऊ करते. अमुक वेतन आयोग, तमुक वेतन आयोग... पण ज्या तपस्व्याने त्याच्या  ‘ शिष्यांना ’ सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून तप केले त्या तपस्व्याला त्या आयोगाबरोबर समाजात मानाची आणि आदराची जागा मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे हे किती सहजतेने विसरतो आपण.

शिक्षकदिनाच्या दिवशी केवळ अर्ध्या आणि एका तासासाठी कोण्या एका वर्गावर जाऊन काहीतरी बोलले म्हणजे आपण तो दिन साजरा केल्याचे समाधान उरी बाळगून आपण घरी जातो. पण या अश्या लुटुपुटूच्या शिक्षकान्पैकी किती जणांना खऱ्याखुऱ्या शिक्षकाप्रमाणे त्यागाची आणि समर्पणाची भावना ठेवून समोरच्या विद्यार्थ्यावर निरपेक्ष प्रेम करायला जमते कोण जाणे ? आणि आजचे असे कितीसे शिक्षक या पेशाकडे नोकरी पेक्षा जबाबदरी म्हणून पाहतात, कोणास ठाऊक ?

पण आपसूक सुचत गेलेल्या सृष्टीगीतास, एखाद्या कवितेस सहज आणि सुंदर यमक आपसूकच जुळत जावे तसे सुंदर शिक्षक आम्हास लाभले. मागे वळून पाहताना वाटते या सर्वांनी आम्हाला खूप काही शिकवले. अक्षरांच्या ओळखीपासून ते बीज-गणितामधल्या समीकरणांपर्यंत. शिक्षक म्हणून नेमून दिलेले कर्तव्य त्यांनी पार पाडलेच पण आमच्यावर अनेक संस्कार करून जबाबदारीदेखील निभावली. आयुष्यात एक लयबद्धता आणली. 

आज मागे वळून पाहता मला या गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की आई-वडीलांनंतर आपल्या आयुष्यास घडविण्याची जबाबदारी ज्या हातांवर असते ते हात इतके सक्षम होते, प्रेमळ होते आणि मजबूत होते की आज या तथाकथित धकाधकीच्या जीवनातही जिथे आपल्या माणसांना स्मरणे कठीण होऊन बसते, तिथे या शिक्षकवृन्दाच्या आठवणी मनावर अजूनही तितक्याच रेखीवपणे कोरल्या गेल्या आहेत. या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्हांस या शिक्षकदिनाच्या औपचारिकतेची गरज न तेंव्हा वाटली, न आजही वाटते...

आणि म्हणूनच आयुष्यात बाकी काही जमेल अथवा न जमेल, एक आज्ञाधारक विद्यार्थी बनू शकल्याचे मोठे समाधान या शिक्षकवृन्दामुळेच आम्हास लाभू शकले याचाच मला आनंद होतो. ह्या ऋणामधून उतराई होण्याचे धाडस मी कधी करणार नाही, पण हे ऋणानुबंध असेच ठेवण्याची जबाबदारी मात्र समर्थपणे पेलता यावी असा आशीर्वाद या शिक्षकवृन्दाने आम्हा सर्वांसच द्यावा अशी त्या सर्वांस विनंती करतो.

तुमचाच,

अनेकांपैकी एक,

सर्वसामान्य विद्यार्थी,

सौरभ राघवेंद्र.