•mr•

ती अरुंद वाट

ती अरुंद वाट कधी दिसलीच नव्हती मला !

ती अरुंद वाट कधी दिसलीच नव्हती मला !

त्या वाटेच्या दुतर्फा एक गल्ली अवघडून बसलेली आहे,

त्या गल्लीत हाडामांसाची माणसं राहतात,

अंधाऱ्या दोन खोल्यात चुली पेटतात,

पहाटे-पहाटे बंब तापतात-

हे सगळं ओघानं आलंच,

पण मुख्य रस्त्यावरून इतकी वर्षं ये जा करूनही

मी अनभिज्ञच होतो त्यांच्या असण्यापासून.

त्यांच्याही काही अडचणी असतील,

त्यांनीही दुःख सोसलं असेल,

त्यांचे त्यांचे काही आनंदाचे सोहळे असतील,

त्यांनी सुखही भोगलं असेल

पण भरवस्तीत राहूनही डोळ्यांआडचं अलिप्त जगणं-

कसं जमत असावं त्यांना ?

मी आजूबाजूच्या दोघा-तिघांना विचारलं,

पाऊलं नसतील कदाचित, किमान नजर तरी फिरली असेल त्यांची तिथून.

पण मी दाखवल्यानंतर माझ्यासारखंच तेही हेच म्हणाले-

ती अरुंद वाट कधी दिसलीच नव्हती मला !

ती एक म्हणत असते नेहमी, तिला व्हेन्ट आउट व्हायचं असतं पण कोणाकडे वेळच नसतो ऐकायला-

एव्हरीवन इज फार टू फकिंग बिझी असं म्हणते सिगारेटचा धूर माझ्या दिशेने उडवत.

तेंव्हा धुरामुळे उसळून आलेली खोकल्याची उबळ दडपून "स्क्रू देम, लेट्स गो

फॉर अ राईड बेबी" असं म्हणत मला बिलगून बसेल तेंव्हा आता इकडेच घेऊन येईन

मी तिला.

ओळखीच्याच ठिकाणी गाडी उभी करून ही अनोळखी वाट चालून येऊ आम्ही.

आपल्या गाऱ्हाण्यांचीच नव्हे, जिवंत अस्तित्वाचीही दखल न घेता आपल्यासमोरून जाणारे लाखो लोक आहेत,

ही जाणीव घेऊन जगणाऱ्या लोकांकडे पहात सिगारेट शिलगावताना लायटरशी खेळेल, तेंव्हा तिच्या डोक्यातही थोडा प्रकाश पडेल कदाचित.

पण खरंच, ह्या मुख्य रस्त्यावरून अगणित वेळेस गेलो असेन मी,

ती अरुंद वाट कधीच दिसली नव्हती मला.

भर पावसात गाडी घसरण्याचं निमित्त होऊन मी पडलो आणि आडोसा म्हणून समोरच्या दुकानाशी जाऊन थांबलो म्हणून, नाही तर आजही-

आजही ती अरुंद वाट दिसली नसतीच मला.

- सौरभ राघवेंद्र.