तिच्या डायरीतून (१)
एक काळ होता जेंव्हा दोन दिवस काही न लिहिता गेले की चलबिचल व्हायची त्याची. ती लपवायचा पुरेपूर प्रयत्न करायचा तो; पण कळायचं मला. आता मात्र दोन दोन महिने लिहीतच नाही काही, तरीही स्वारी निवांत. म्हणतो…
एक काळ होता जेंव्हा दोन दिवस काही न लिहिता गेले की चलबिचल व्हायची त्याची. ती लपवायचा पुरेपूर प्रयत्न करायचा तो; पण कळायचं मला. आता मात्र दोन दोन महिने लिहीतच नाही काही, तरीही स्वारी निवांत. म्हणतो कसा, 'अगं मी विचार नाही करत आता एवढा. गोष्टी सोडून द्यायला शिकलोय मी.'
तो हे असं काही म्हणतो तेंव्हा त्याच्या वरवरच्या वाक्यापेक्षा त्याने लिलया दडवलेले बिटविन द लाईन्स शोधायचे असतात हे अनुभवानं शिकलेय मी. अर्थात शिकलेय वगैरे म्हणायला त्याचा अभ्यास ठरवून नाही केला कधीच; पण मला प्रश्न पडतात आणि समोरचा प्रत्येक वेळी कोड्यातच पडेल असं त्याचं वागणं. त्यामुळे जमतं मग आमचं. त्याची कोडी सोडवता सोडवता तीन वर्षं होत आली आता पण ना त्या कोड्यांना अंत ना माझ्या प्रश्नांच्या डोहाला तळ.
त्याचं इतरांसारखं प्रेडिक्टेबल नसणंच मला आवडलं होतं पहिल्यांदा. तो फूटबॉल उत्तम खेळतो हे मला कळलं तेंव्हा वाटलं होतं की हा मँचेस्टरचा नेक्स्ट लेव्हल फॅन वगैरे असेल; पण खेळता खेळता तो एकदा कसा घसरून पडला होता त्याचा मजेशीर किस्सा सांगताना म्हणून फुटबॉलचा जो उल्लेख त्याने केला होता तेवढाच. त्यानंतर तो विषय अपवादानेच आला. त्याच्या फोनच्या कव्हर वरती कुठल्याच फुटबॉल क्लबचं चिन्ह नाही, त्याच्या फोनच्या वॉलपेपर मध्ये उगा महागडी गाडी नाही, तोकड्या कपड्यातली मादक मॉडेल नाही, इन्स्पिरेशनल कोट वगैरे नाही. ग्रे शेडचा एक अबस्ट्रॅक्ट पॅटर्न ठेवलाय त्याने वॉलपेपर म्हणून. ग्रे रंगावर निस्सीम प्रेम त्याचं.
आम्ही एकमेकांना जरासे ओळखू लागलो होतो तेंव्हाची ही गोष्ट. आम्ही एकत्र आल्यानंतरचा त्याचा पहिलाच वाढदिवस होता. मी टीशर्ट गिफ्ट देणार होते त्याला. म्हटलं, 'चल, एकत्रच जाऊ.' माझ्या आवडीचे पाच टीशर्टस मी निवडले आणि त्याला ट्रायल रूम मध्ये धाडलं. पण बाहेर येताना सहावा वेगळाच टीशर्ट घालून हिरो बाहेर आणि त्या टीशर्टचा रंग ग्रे! आता मी इथे समोरच उभी असूनही त्याने तो घेतला कधी, घातला कधी- मला कळलंही नाही. मनासारखा टीशर्ट मिळाला म्हणून तो खुश होता; पण मी मात्र जाम वैतागले आणि विचारलं, 'का रे बाबा? काय आहे काय असं ग्रे रंगात? तुझा आठवा टीशर्ट असेल या रंगाचा. आयुष्याची शेवटी राख वगैरे होते असं काही सुचवायचं असतं का तुला यातून?'
त्याच्या वाढदिवसाचं त्याला विशेष अप्रूप नसतं, पण मला होतं, आजही आहे. त्यामुळे निदान त्या दिवशी तरी तो प्रश्न टाळायला हवा होता असं वाटतं मला आता; पण त्यावर त्याने शांतपणे उत्तर दिलं. तो म्हणाला होता, 'नाही गं, असं नाहीए काही. जसा तुला निळा आवडतो, तसाच मला हा.'मी फटकळ. त्याचं तसं नाही. तो कमालीचा संयत. बोलण्यातही आणि ऐकून घेण्यातही. माझा तो प्रश्न त्याला लागला असावा बहुधा; पण माझा स्वभाव म्हणून त्याने समजूनही घेतलंही असावं कदाचित. असो.
पुढे केंव्हा तरी पावसाळ्याच्या दिवसात एका टेकडीवर बसलो होतो आम्ही. काहीच न बोलता भरून आलेल्या आभाळाकडे तो टक लावून पहात होता. त्याचं असं शांत राहणं अंगावर येतं कधी कधी. तो अगदी शेजारी असूनही माझ्याशिवाय तिथे कोणीच नाही असं वाटतं मला. एकटेपणाचा शहारा सरसरतो अंगभर. भिती वाटते मला एकटेपणाची. त्याला वाटत नसेल का? त्याचं हे असं कोड्यात पाडणं मला नेहमीच आवडतं असं नाही, कारण त्याची सगळीच कोडी सोपी नसतात आणि प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मलाही स्वस्थ बसवत नाही. चिडचिड होते मग माझी. एरवी न सांगताच पुष्कळसं आपसुकच उमाजण्याएवढा समंजस तो; पण मग कधी कधी वाटतं की त्याच्या अशा वागण्यानं तो मला प्रश्नांच्या गर्तेत अजून आत-आत ढकलतोय हे समजतच नाही का त्याला ? तो हे मुद्दाम असं वागतो असं नाहीए. पण, पण..?
मी बोलते मग त्याला काही तरी, तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचं संयत उत्तर माझ्या एक घाव दोन तुकड्याच्या स्वभावाला पटत नाही बिलकुल. वाजतं मग आमचं. मी म्हणते तू सांगतच नाहीस काही तर कळेल कसं मला, आणि तो! त्याला बिचाऱ्याला काय सांगायचं आहे हेच कळत नाही. 'आय डोन्ट नो यार!' हे म्हणून तो थेट विषयच संपवून टाकतो.
तो मला म्हणाला होता एकदा, 'तुम्हा स्त्रियांसारखं थेट व्यक्त होता न येण्याचा शाप आहे आम्हा पुरुषांना.' त्याच्या त्या वाक्याचा नेमका अर्थ माझ्या अजूनही लक्षात आलेला नाहीए. चालता चालता सहज एखादं फुल खुडावं तसं बोलता बोलता सहजच घातलेलं आणि अद्यापही न उलगडलेलं कोडंच आहे ते वाक्य माझ्यासाठी. 'तुम्हा स्त्रियांसारखं आणि आम्हा पुरुषांना!' म्हणायचं काय होतं नेमकं त्याला? मी स्त्री आहे हे त्याला माहिती आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं की तो पुरुष आहे हे त्याला आता खरं खरं जाणवायला लागलंय?
तो म्हणतो खरं तसं; पण तो विचार करतच नाही असं नाही. उलट विचार करायला लागला की समुद्राचाही थांग लावतो तो! त्यामुळे तो असं काही तरी बोलून गेला म्हणजे त्याने गहन विचार केला असेलच काही तरी; पण मग मीच का अस्वस्थ होतेय इतकी? मीच त्याच्याकडे पाहताना एक पुरुष म्हणून कधी पहिलंच नाहीये का? का मग त्याच्यातला तथाकथित पुरुष त्यानेच कधी समोर येऊ दिला नाही माझ्या? की आलाच नाही तो? आणि पुरुष म्हणजे तरी कोण नक्की? आणि, आणि मला स्त्री म्हणताना त्याला नेमकं काय अभिप्रेत आहे?
शब्दांच्या रूढ अर्थांशी तो किती फटकून आहे हे नव्याने संगायला नकोच. मग 'त्याला' अभिप्रेत असणारी स्त्री कशी आहे? व्यक्त होता येणं हा एवढाच गुणधर्म दिसतो का त्याला स्त्रीत्वाचा? मी त्याला हे असं थेट विचारलं तर तो उलट मलाच प्रश्न विचारेल, 'माझं मत खरंच महत्त्वाचं आहे का एवढं? तुला- स्वतःला काय वाटतं? तू काय व्याख्या करतेस स्त्रीची? पुरुषाची? 'तू', म्हणजे तुझं नाव, तुझं आडनाव, तुला पढवण्यात आलेली पुस्तकं, तुला आपल्याशा वागणाऱ्या कल्पना, संकल्पना, समाजाचे संस्कार, आई-अजीच्या गोष्टी हे सगळं, सगळं झिडकारून, फेकून देऊन जी शिल्लक राहतेस 'त्या' तुला काय वाटत? दे हे सगळं झिडकारून आणि पहा माझ्याकडे,स्वतःकडे आणि मग सांग, काय वाटतं? कोण असतो पुरुष? कसा असतो पुरुष? कोण असते स्त्री? कशी असते स्त्री?' कसं झिडकारायचं हे सगळं? काय सांगू मी? डोळ्यातली अगतिकता टिपून 'बरं, सांगते' असं म्हणण्यापलीकडे माझ्याही हाती उरत नाही मग काही.
पण मीही फक्त ऐकून घेणाऱ्यातली अजिबात नाही. नंतर केंव्हा तरी हिंमत करून याच चालीवर मीही एकदा त्याला असाच एक प्रश्न विचारला होता भलताच. म्हटलं, 'दे झिडकारून सगळ्याच कल्पना आणि बघ स्वतःकडे, माझ्याकडे आपल्या नात्याकडे. आणि सांग मला, प्रेम करतोस का माझ्यावर?' माझ्या फटकळपणाची कधी नव्हे तेवढी भिती वाटली होती मला त्या संध्याकाळी. त्याचा स्वभाव थोडा का होईना ठाऊक होता मला. या प्रश्नाच्या डोहात तो उतरला तर याही डोहाचे तळ पाहिल्याशिवाय वर येणार नाही हे माहिती होतं मला आणि तळाला चिकटून बसणारा नाहीए तो. तो वर येईल याची खात्री होतीच मला, पण वर येताना तो काय पाहून आणि काय घेऊन येईल, या विचाराने मात्र तो प्रश्न विचारता क्षणी माझ्या पोटात गोळा आला होता.
त्याच्या पेटंट संयमाने त्याने माझा प्रश्न ऐकून घेतला, काही क्षण एका कोपऱ्यात नजर रोखली आणि मग माझ्याकडे पाहून अत्यंत निरागसपणे तो मला म्हणाला, 'माहिती नाही गं. शोधावं लागेल मला!'
त्यानंही त्याचं संचित खरंच झिडकारलं असेल का तेंव्हा? परिचिताचं संचित असूनही ते आता आपल्या उपयोगाचं नाही कारण हे संचित म्हणजेच आपण, त्या संचितापलिकडे आपण कोणीच नाही, काहीच नाही. या काहीच नसण्याच्या जाणिवेतून घोंगावणाऱ्या रितेपणाचं वादळ आणि तो आभाळाकडे रोखून पहात असताना मला जाणवलेलं एकटेपण यां दोन्हीचा पोत समानच आहे असं का वाटतंय मला? ह्या कुठल्या कोड्यात ढकलून दिलंय मला त्याने?
मला कळतच नाहीए आता काय बोलावं, कोणाशी बोलावं आणि काय विचारावं! भरून आलेल्या राखाडी आभाळाकडे त्याचं ते टक लावून पाहणं..! त्या आभाळमध्ये त्याला त्याच्याच मनाची घुसमट दिसली असेल का? तो ही या घनगर्दीच्या पलीकडे घेऊन जाणारा एखादा मार्ग शोधत होता का ? की मीच हे संदर्भ उगाचच लावतेय? त्याला विचारलं तर तो म्हणेल, 'सोड ना अगं! मी विचार नाही करत आता एवढा. गोष्टी सोडून द्यायला शिकलोय मी. तू पण शिकून घे!'
तो बोलला तर सुटेल हे कोडं कदाचित, पण तो आता बोलतही नाही. लिहिलं म्हटलं काही तर लिहितही नाही. आणि मला तर आता हे कोणाला विचारताही येत नाही! व्यक्त होता न येण्याचा शाप त्याने याच अवस्थेला म्हटलं असेल का? पण मग मी तर स्त्री आहे, आणि तो पुरुष. मग, मग याचा अर्थ...?
- सौरभ राघवेंद्र.