•mr•

उगाचच

फेसबुकच्या भिंती उगा चाळताना

फेसबुकच्या भिंती उगा चाळताना

एका म्युच्युअल फ्रेंडने

आपल्या सवंगाड्यांना टॅग केलेली एक पोस्ट

न्यूजफीडच्या गर्दीमधून वाट काढता काढता

अलगदशी सरकून जाते

कनेक्शन्सच्या ओलाव्यासाठी

गुळगुळीत स्क्रीनवर चाचपडणाऱ्या

नकळत एखादी पोस्ट लाईक होऊ नये म्हणून

काहीसं अंतर राखूनच असलेल्या माझ्या

उजव्या अंगठ्याखालून.

कोण कुठे गेलं होतं आणि

कुणी कशाची ढेकर दिली होती

याचा इतिवृत्तांत चिरंतन करणाऱ्या

इतर अगणित पोस्ट्स प्रमाणे

दुर्लक्षच करणार असतो मी त्या पोस्टकडे

पण क्षणासाठी मला भास होतो

त्या म्युच्युअल फ्रेंडने

टॅग केलेल्या नावांच्या गर्दीमध्ये

तिच्या नावाचा

आणि मी घुटमळतो काही क्षण

त्या पोस्ट भोवती,

उगाचच.

- सौरभ राघवेंद्र