•mr•

Untitled

 काही लेख असे असतात जे सुचतात तेंव्हा लिहिले नाहीत आणि नंतर लिहू असं म्हणून 'नंतर' लिहायला घेतल्यावर कितीही डोकं खाजवलं, आता सुचेल- मग सुचेल असं म्हणत वहीच्या मागच्या मागच्या पानावर कितीही वेळ…

 काही लेख असे असतात जे सुचतात तेंव्हा लिहिले नाहीत आणि नंतर लिहू असं म्हणून 'नंतर' लिहायला घेतल्यावर कितीही डोकं खाजवलं, आता सुचेल- मग सुचेल असं म्हणत वहीच्या मागच्या मागच्या पानावर कितीही वेळ रेघोट्या ओढत बसलं किंवा मग फोन लॅपटॉपवर लिहीताना ब्लिंक होणाऱ्या कर्सरकडे तासभर पाहत बसलं तरीही पुन्हा सुचत म्हणून नाहीत. ह्या फोटोच्या अनुषंगानं लिहिलेला लेखही त्या काही लेखांपैकीच एक!

मागे, माझे शाळेतले मित्र आणि मी एका छोट्या विकेंड ट्रिपवर गेलो होतो. तेंव्हाचा हा फोटो. साताऱ्यात काही डोंगर-पठारांवर पवनचक्क्या आहेत, तिथला. ह्या फोटोत विशेष म्हणावं असं फार काही नाहीए खरं तर, पण हा फोटो माझ्यासाठी विशेष आहे, कारण या फोटोमधलं घर पाहिलं की प्रत्येक वेळेस मला माझ्या लहाणपणीच्या माझ्या एका आवडत्या कार्टून सिरीजची आठवण येते. 'करेज द कावर्डली डॉग!' असं त्या सिरीजचं नाव.

हा लेख मला खरं तर मागच्या महिन्यात लिहायचा होता. तो लिहिताना सोशल मिडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ‘अमुक अमुक तुम्हाला आठवत असेल, तर तुमचं बालपण “ऑसम” होतं !’ किंवा ‘इफ यु आर अ नाईनटीज् किड...’ टाईप पोस्ट्सचा दाखलही द्यायचा होता आणि इफ यु आर अ नाईनटीज् किड आणि हा फोटो पाहून तुम्हाला, ‘करेज द कावर्डली डॉग’ची आठवण झाली तर, तुमचंही बालपण “ऑसम” होतं!!” असं 'बोल्ड' स्टेटमेंट करुन त्यावर, 'नसेल आठवत तर राहू द्या, एका फोटोवरून तुमचं बालपण जज-बिज होत नसतं! चिल घ्या आणि युट्यूबवर एपीसोड्स मिळतात का पहा! ईट्स नेव्हर टू लेट टू बी अ किड अगेन' अशी काहीशी बडबड करून मलाही न काळलेली लाईफ फिलॉसॉफी झाडून थोडी हवा करावी असंही माझ्या मनात होतं; पण कुठंच काय! लेख लिहिण्याच्या नादात लॅपटॉपच्या चार्जरची पिन लॅपटॉपला जोडायलाच विसरलो, यथावकाश लॅपटॉपची बॅटरी गळपटली, मग स्वतःच्या वेंधळेपणाला दूषणं देत लॅपटॉप सुरू केला तेंव्हा आपण आपलं लिखाण सेव्ह न केल्याचं लक्षात आलं आणि आता हा लेख पूर्ण करायचा तर पुन्हा पाहिले पाढे पंचावन्न शिवाय गत्यंतर नाही म्हटल्यावर, "लेख गेला उडत" असं (पर्यायी असभ्य भाषेत) म्हणून मी उठून आलो!

आता एक महिना मागे वळून (सारकॅझम इंटेंडेड) माझ्या आयुष्याकडे पाहताना मला असं वाटतं की मी (पर्यायी असभ्य भाषेत) "लेख गेला उडत" असं म्हणायला नको होतं, कारण तो लेख खरंच इव्हेंच्युअली माझ्या प्रिफ्रंटल कॉर्टेक्स मधून खरोखरच उडून गेला. माझं म्हणणं आणि तो लेख उडून जाणं 'कावळा बसायला आणि फांदी तुटायला' या न्यायापलिकडे सिंक्रोनस आहे असं मला अजिबात वाटत नाही, पण अखेर फांदी तुटली, कावळा उडाला! परिणाम तोच! तेंव्हाचा फ्लो गेला तो गेलाच!

त्या लेखात मला खरं तर माझ्या लहानपणीच्या कार्टून्सविषयी (थोडक्यात) भरभरून लिहायचं होतं आणि आजच्या पोराटोरांच्या नशिबी आमच्या बालपणीची कार्टून्स काशी नाहीत हे सांगताना "आमच्या वेळी..!" या दोन भयंकर शब्दांनी सुरू होणारी पल्लेदार वाक्य खरडायची होती. आमची वेळ, अर्थात 'आमचा काळ' वगैरे म्हणावा एवढीही जुनी नाही. मी पंधरा-सोळा वर्षाचा असतानाची म्हणजे फार तर फक्त दहा वर्षांपूर्वीचीच ती ही वेळ, पण दहा वर्षं या 'अनेक शब्दांसाठी एक' म्हणून प्रचलित 'दशक' हा शब्द आठवतो तेंव्हा मात्र नसूनही उगाचच एखादा केस पिकल्याचा किंवा पाठीत एखादी कळ उसळल्याचा भास होतोच.

एनिवे! आपण आता लहान नाही आहोत या जाणिवेचे भास आणि त्या भासांच्या जाणिवेतून मनाचा तळ पार ढवळून-बिवळून काढणारं दुःख 'असो, चालायचंच' असं म्हणून महत्प्रयासानं बाजूला ठेवलं तरी 'आपल्या बॅच पर्यंतच जे होतं ते, आपल्या नंतर आपली शाळा बिघडली राव' असं वाटणाऱ्या पिढीचा एक (स्वयंघोषित) प्रतिनिधी म्हणून 'रम्य ते (माझंच) बालपण' असं पदोपदी ठासून सांगणारा एक लेख विस्मृतीत गेल्यानं आधुनिक मराठी साहित्य एका अत्यंत महत्वाच्या दस्तऐवजाला मुकलं! या जाणिवेचं क्षालन कसं करावं हा प्रश्न मात्र राहून राहून वर येतोच हें नाकारुन खोट्या विनम्रतेचा आव मी आणणार नाही.

पण तरीही, काय ते एक एक दिवस होते तुम्हाला सांगतो! काय ती एक एक कार्टून्स!! 'करेज द कावर्डली डॉग!' हे आत्ता या फोटोच्या निमित्तानं आठवलं म्हणून! नाही तर 'भू-भू इज माय हिरो'ची थिम मिरवणारं 'स्कुबी डूबी डू' माझं ऑल टाईम फेव्हरेट कार्टून! त्याचा टायटल ट्रॅक ऐकला की आजही मला मी अजून शाळेतच आहे असं वाटतं. माझ्या, "आपणही एक कुत्रं पाळावं त्याचं नाव स्कुबी ठेवावं" या (अद्याप स्वप्नच राहिलेल्या) निरागस स्वप्नाची सुरूवात 'स्कुबी डूबी डू'पासुनच झालीये, पण पाळीव कुत्रं हा आमच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय असल्यानं, सदर प्रपोजल "तू तुझा बंगला बांधशील, तेंव्हा तुझं तू पाळ" या शेऱ्यासह विथ लव्ह माझ्या टेबलावर वारंवार परत आलेलं आहे! मी अद्याप कुत्रं माझ्या घरी आणू शकलो नसलो तरी दोन तीन मांजरं मी अशीच घेऊन आलेलो आहे, पण त्यांना जरा जास्तच मोकळीक दिल्यानं आणि त्यांच्या दुधाची सोय आमच्या व्यतिरिक्त इतरांनीही वेळोवेळी केल्यानं आमचं सख्य फार लांबलं नाही हा भाग निराळा.

माझी कुत्रं पाळावं ही इच्छा 'स्कुबी डू' मुळे जागी झालेली असली म्हणून मांजर पाळावं असं वाटायला 'टॉम अँड जेरी' कारणीभूत होतं असं मात्र नाही. टॉम अँड जेरी पाहून खरं तर मांजरापेक्षा उंदीरच पाळावा असं वाटायची शक्यता जास्त (मला अद्याप तरी असं वाटलेलं नाहीए, कधी वाटलंच तर उंदीर पाळून त्याचं इन्स्टाग्राम पेज बनवून तुम्हाला लिंक नक्की शेअर करेन. तेंव्हा मात्र डू लाईक-फॉलो-साबस्क्राईब आणि शेअर बरं!) बाकी, टॉम अँड जेरी बद्दल मी फार काही लिहिणार नाही, कारण त्याच्याविषयी काय लिहावं हेच मला कळत नाही. अर्थात टॉम अँड जेरी वगळता इतर विषयांबद्दल जाऊचदे, कार्टून्सबद्दलही काय लिहावं ते मला कळतं असं माझं अजिबातच म्हणणं नाही, पण टॉम अँड जेरीचा कॅनव्हास एवढा मोठा आहे, की माझे सो कॉल्ड शब्दरंग संपून जातील अशी माझी शंकामुक्त आणि खात्रीयुक्त भीती आहे. विथ दॅट सेड दो, टॉम अँड जेरी मधल्या सगळ्या विनोदी जागांच्या पलीकडे जाऊन आवडणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे जेरीची लाईफ फिलॉसॉफी.

अर्थात जेमतेम चारच इंचाच्या जेरीचा विचार केला तर आहार-निद्रा आणि भयाच्या पलिकडचं आयुष्य न पाहिलेला जेरी लाईफ आणि फिलॉसॉफी या दोन शब्दांचा एकत्र सोडाच, स्वतंत्र विचार तरी करू शकतो का अशी मला शंका वाटते, पण टॉम आणि जेरीच्या लीला तटस्थपणे पाहताना भरल्या घरात मनसोक्त दूध पिऊन मऊ-बास्केट-मुलायम-ब्लॅंकेटवालं आयुष्य जगणारा टॉम उठसुठ जेरीच्या मागे लागतो आणि जेरी आकांताने आपला जीव वाचवत पळत असतो, टॉमवर उलटे हमले करून त्याला नेस्तनाबूत करत असतो तेंव्हा "टॉम रन्स फॉर फन, जेरी रन्स फॉर लाईफ" हा विरोधाभास जाणवला की मग मात्र काहीसं अस्वस्थ व्हायला होतं. ह्या अस्वस्थतेचा आणि सायकलिंग करताना येणार घाम शोषून घेणाऱ्या ब्रँडेड किटमध्ये, सायकलच्या हँडलवर फिक्शचर, त्या फिक्शचरमध्ये फोन, फोन वर माझे सायकलिंग आणि हेल्थ स्टॅटिस्टिक्स रेकॉर्ड करणारं स्ट्रॅव्हा किंवा तत्सम ऍप अशा थाटात माझी एकवीस गिअरची सायकल सरळ रस्त्यावरून घेऊन जाताना पलीकडच्या बाजूने विरुद्ध दिशेने चढ चढून येताना दम लागला म्हणून वीस वर्षं जुनी कुरकुरणारी सायकल हातात धरून चालत येणारे एखादे आजोबा मला दिसतात तेंव्हा वाटणाऱ्या अस्वस्थतेचा पोत सारखाच असतो. सायकल ती शेवटी सायकल, धावणं तेही शेवटी धावणंच, पण "हे सगळं कशासाठी?" या प्रश्नांचं प्रत्येकाचं उत्तर मात्र वेगळं. तटस्थपणे पाहिलं तर कधी कधी या उत्तरावर हसता येतं किंवा मग या उत्तराचंच हसू येतं इतकंच ते काय समाधान! एनिवेज!

इन अ हिंडसाईट, माझ्या बालपणी मी पाहिलेल्या कार्टून-विश्वात इतरही काही कार्टून सिरिज मधून मांजरं येऊन गेली, पण लक्षात मात्र थोडीच राहिली. स्वॅट कॅट्स मधले बडे मियाँ-छोटे मियाँ त्या लक्षात राहिलेल्या मांजरांपैकी दोन मांजरं. स्वॅट कॅट्सच्या कृपेनं, आपल्याकडे तिकडच्या सिरियल्स आणि फिल्म्सच्या डबिंगची क्वालिटी सुधारायला भरपूर स्कोप आहे असं माझं मत लहानपणीच तयार झालं, पण फायटर जेट उडवणारे हे बडे-छोटे मात्र मला माझ्या त्या मतापेक्षा अधिक जवळचे वाटतात. या दोघांशिवाय माझं अजून एक ऑल टाईम फेव्हरेट मांजर म्हणजे भविष्यातुन एकविसाव्या शतकात आलेला "डोरेमॉन!" खरं सांगतो "मै हुं एक उडता रोबो, डो-रे-मॉन" हे गाणं मी अजूनही गुणगुणतो. डोरेमॉन मला अनेक कारणांसाठी आवडतं, मनापासुन आवडतं. वेंधळा नोबिता, गोड शिझुका, दमदाटी करणारा झियान, आढ्यताखोर सुमिओ, आपापले विशिष्ट स्वभावगुण असणारे या मंडळींचे आई-वडील लोक्स आणि या सगळ्यांमध्ये अडकलेला बिचारा "जिंदगी सवार दू, एक नई बहार दू!" असं म्हणणारा 'प्यारासा चमत्कार" डोरेमॉन! या मंडळींचे उद्योग पहावे तेवढे थोडेच. ऑन अ लाईटर नोट (फुकट आहे म्हणून) एक सल्ला देतो- ज्यांना ज्यांना डीप किंवा फ्युचरिस्टिक टेक मध्ये स्टार्टअप सुरू करायचे आहेत त्यांनी डोरेमॉन जरूर पहावं. एक से बढकर एक गॅजेट्स आहेत त्यात. खूप साऱ्या आयडियाज मिळतील.

मी जेंव्हा रिलीजिअसली कार्टून्स पाहायचो तेंव्हा डोरेमॉन हंगाम नावाच्या चॅनेलवर दिसायचं. मी हल्ली टिव्ही पाहणंच सोडून दिलंय पण जेवढं मला माहितीये, हल्ली म्हणे डिझनीवरही फक्त डोरेमॉनच दिसतं. डिझनीचा विषय तूर्तास जाऊदे, पण हंगामाचा विषय निघाला आहे म्हटल्यावर "शरारत से भरा, प्यारा प्यारा" शिनचॅन विसरून कसं चालेल? डोरेमॉनप्रमाणंच खरं तर शिनचॅनचेही एपिसोड्स आणि आणि त्याच्या मूव्हीज बऱ्याच आहेत, पण आपल्याकडे "आमची मुलं बिघडतील" या सबबीखाली त्यांत बरीच काटछाट केल्याचं सांगतात. अर्थातच, त्याच्या वायच्या मानानं शिनचॅन खरंच आणि जरा जास्तच "शरारत से भरा" आहे, पण ऍट द सेम टाईम, नको तिथे पाजळल्या जाणाऱ्या प्रगल्भतेबद्दल आपल्याकडचे पालक आपल्याच पाल्यांना अंडरएस्टीमेट करतात असं निदान मला तरी वाटतं. बाकी हा शिनचॅन कितीही प्यारा आणि शरारती असला तरी त्या सिरीजच्या निर्मीतीविषयीची (दंत?)कथा मनाला चटका लावून जाते. असं सांगितलं जातं की एका जपानी मध्यमवर्गीय कुटुंबात शिनचॅन सारखाच, त्याच्याच वयाचा एक लहान मुलगा खरोखरच होता. खेळता खेळता अशाच एका दिवशी त्याचा (कार) ऍक्सिडेंट झाला आणि त्यातच त्याचा मृत्य झाला. पुढे त्याच्या आईने आपल्या मुलाची आठवण म्हणून शिनचॅनची सिरीज बनवली!

शिनचॅन आणि डोरेमॉन ह्या इजा आणि बिजा पाठोपाठ येणारा हंगामा फ्रेटर्निटीतला तिजा म्हणजे "कोचिकामे" मधला कामेनरी पोलीसस्टेशन मधला कानकेची रियोत्सु! सभ्यतेचे बुरखे पांघरलेल्या असभ्य लोकांच्या जगात निर्लज्ज नागवेपणानं वावरणारा एक मोकळा माणूस! रियोत्सुचं पात्र मला आवडण्यापाठी माझ्याकडे 'नैकानि कारणानि' आहेत, पण त्याचा स्वभावातला हट्टीपणा, मनाला येईल ते टोक गाठण्याची त्याची वृत्ती, 'निर्लज्जं सदासुखी' हा बाणा आणि या त्रिगुणांच्या आत दडलेला त्याचा हळवेपणा या चार गोष्टी मला मनापासून आवडतात. "कोचिकामे"च्या जवळपास सगळ्याच एपिसोड्सची पठडी कॉमेडी आहे. त्यातले अनेक एपिसोड्स आपल्याला खळखळून हसवतात, पण त्यातल्या काही मोजक्या एपिसोड्सची भावगर्भता कधी अंगावर येते आणि कधी डोळ्यांतून गालावर उतरते हे आपल्यालाही कळत नाही.

तर हा असा रियोत्सु म्हणा किंवा डोरेमॉन आणि शिनचॅन म्हणा.. ही मंडळी आपल्या भेटीला आली जपान नावाच्या छोट्याशा अत्यंत समृद्ध देशामधून. जपान देशाला ऍनिमेटेड कार्टून्सची किंवा (थोडक्यात) ऍनिम्सची जणू मोठी परंपरा आहे. त्या परंपरेविषयी आणि तिच्या लोकप्रियतेविषयी मी लिहायला घेतलं तर या लेखाचं 'वाढता वाढता वाढे' म्हणत वाढत जाणारं स्वरूप आवरणं मला कठीण होऊन जाईल, पण विषय निघालाच आहे तर फुल न फुलाची पाकळी म्हणून जपानवाटे ऍनिमेटेड कार्टूनच्या स्वरूपात आलेला 'यंग सायंटिस्ट' कितरेत्सु, छोटासा निंजा- 'निन्जा हातोरी' यांचा उल्लेख माझ्याच्याने टाळवत नाही. यांच्याशिवाय पोकेमॉन, डिजिमॉन आणि बेब्लेड यांची आपल्याकडची क्रेझ हा तर पुस्तकाचाच विषय व्हावा!

पोकेमॉन, डिजिमॉन आणि बेब्लेडपैकीं मी मात्र डिजिमॉन आणि बेब्लेड फारसं पाहिल्याचं मला आठवत नाही. इव्हन पोकेमॉनही मी लहानपणी पाहिलं नव्हतंच, मी ते इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात. अर्थात त्याचीही एक गंमत आहे. मी शाळेत होतो तेंव्हा एक तर पोकेमॉन बऱ्याच जणांना आवडत असे आणि माझा 'जे आवडे लोकांसी , ते नावडे आम्हांसी" या मुहूर्तावरचा. त्यामुळे प्रवाहाविरुध्द पोहोण्याच्या कैफेखातर "पोकेमॉन" पाहणार नाही असा प्रण मी केलेला होता. पुढे "तू टीव्ही खूप पाहतोस" या सबबीखाली आई-बाबांनी एकमताने (सेट टॉप बॉक्स प्रचलित नसलेल्या काळात) केबल बंद केल्यानं तो प्रण टिकून राहिला. अर्थात त्यानंतर काही महिन्यांनी आमच्याकडे पुन्हा केबल, मग सेट टॉप बॉक्स आले, पण दरम्यानच्या काळात मी टिव्हीपासून लांब गेलो ते अखेर गेलोच होतो. त्या दुरव्यामुळे माझ्या टीव्हीवर आवर्जून कार्टुन पाहण्याची सवय पुष्कळ कमी झाली. नन-द-लेस ही कमी मी इंटरनेटच्या मुक्त वापरानं भरून काढली हा भाग निराळा, पण लहान असणं, शाळेतल्या शेवटच्या तासांना कार्टून्सचे वेध लागणं, वेळ चुकू नये म्हणून धावत पळत घरी पोहोचणं यातली मजाच वेगळी होती. ती अनुभवायला मिळणं हे मोठया भाग्याचं होतं-आहे असं मला वाटतं.

माझ्या आणि ह्या कार्टून्सच्या सहप्रवासाकडं मी मागं वळून पाहतो तेंव्हा माझं लहानपण, टीव्ही आणि कार्टून्सच्या बाबतीत दोन टप्प्यांत विभागलं गेलंय असं मला जाणवतं. त्यातला दुसरा टप्पा हंगामा, डिझनी आणि निक या तीन चॅनेल्सनी समसमान व्यापलेला होता, तर पहिल्या टप्प्यात फक्त आणि फक्त कार्टुन नेटवर्कच होतं! कार्टून नेटवर्कवर मी पुष्कळ कार्टून्स पाहिलेली आहेत. त्या कार्टून्समध्ये ज्याची आठवण होऊन हा लेख मी लिहायला घेतला ते करेज द कावर्डली डॉग आणि मग ओघानं येऊन गेलेली स्कुबी डू, टॉम अँड जेरी, स्वॅट कॅट्स ही कार्टून्स आहेतच, पण त्यांच्याशिवाय कच्चा पालक खाऊन शक्ति मिळवणारा पोपॉय, स्वतःची प्रयोगशाळा असणारा डेकस्टर, मोजोजोजो विरुद्ध लढणाऱ्या पॉवरपफ गर्ल्स, केसांचा कोंबडा करणारा जॉनी ब्रव्हो, सिल्व्हेस्टर अँड ट्विटी, एड-एड अँड एडि, फ्लिनस्टोन्स, जीआयजो, रिची-रिच ही कार्टुन्सही आहेत. याशिवायही अनेक कार्टून्स अशीही आहेत ज्यांची नावं मला आत्ता आठवत नसली तरी त्यातल्या कित्येक फ्रेम्स माझ्या डोळ्यांसमोर आजही जशाच्या तशा आहेत!

आणि खरं सांगू का, कार्टून्स मला आजही, अजूनही खूप आवडतं. इन फॅक्ट, येत्या काही दिवसांत मी डिझनीचं रिसेस आणि पूर्वी हंगामावर दाखवलं जाणारं डिटेक्टिव्ह कॉनन पहायचं म्हणतोय. बाकी येता-जाता डोरेमॉन, शिनचॅन आणि कोचिकामेचा एखादा एपिसोड मी पहात असतोच. मागच्याच महिन्यात मी निकलोडिअन वरच्या काही जुन्या सिरीज पुन्हा एकदा पहिल्या होत्या. इव्हन मिस्टर बिनचे काही ऍनिमेटेड एपिसोड्सही मला त्याच्या ओरिजिनल रनइतकेच आवडतात. माझं कार्टून्सचं वेड पाहून आई कधी-कधी गमतीने मला म्हणायची, "कार्टून्स जास्त पाहशील तर तूही असाच एखाद्या कार्टून सारखा दिसायला लागशील, बरं!" मला त्याने अर्थात फारसा फरक पडायचा नाही. उलट आपल्या अंगात एनिवे असेही ना-ना किडे आहेत हे माहिती असल्यानं त्यांना एखाद्या साजेसा मजेशीर (आणि आकर्षक) चेहऱ्याचा कॅमोफ्लांज मिळाला तर मला तो आजही हवाच आहे.

याचा अर्थ मी फक्त कार्टून्सच पहिली आहेत किंवा आजही फक्त कार्टून्सच पाहतो असं मात्र नाही. पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारा माझ्या वयाचा सर्वसामान्य मुलगा जे आणि जेवढं काही म्हणून पाहू शकतो ते सगळं मीही पाहिलेलं आहे, पण ज्या अगत्यानं कार्टून्सविषयी मला बोलावं आणि लिहावं असं मला वाटतं, ते आगत्य अभावानंच इतरांच्या वाट्याला येतं असं मला वेळोवेळी जाणवलंय आणि म्हणूनच कदाचित माझ्या कार्टून्सच्या या वेडाचं मला स्वतःलाच अनेकदा आश्चर्य वाटतं. 'आपण मोठे होत आहोत' ही अस्वस्थ जाणीव या वेडाच्या मुळाशी असावी कदाचित.

ऐंशीच्या दशकात अमेरिकेमध्ये एक टीव्ही सिरीज येऊन गेली होती. एकोणिसशेसाठच्या उत्तरार्धात अमेरिकेत अनेक पातळ्यांवर क्रांतिकारी बदल होऊन गेले. हे बदल अनुभवणाऱ्या एका कुटुंबाची गोष्ट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न ही सिरीज करते. या सिरीजमधला केव्हीन बोलता बोलता, आपल्या भोवताली होणारे बदल, या बदलांच्या पार्श्वभूमीवर आपल्यामध्ये, 'स्वतः'मध्ये होत जाणारे बदल, पाहता पाहता सरलेला काळ आणि सरत्या काळासरशी मोठे होत जाणारे आपण या वस्तुस्थितीविषयी एक वाक्य बोलून जातो.

'आपण मोठं होणं थांबवू शकत नाही, आपण आता लहान नाही आहोत या जाणिवेचा आपण स्विकार करू शकतो आणि त्याबद्दल आपण फार तर स्वत:ला क्षमा करू शकतो', अशा आशयाचं ते वाक्य. हे वाक्य ऐकलं आणि या वाक्याचा काँटेक्स्टमध्ये माझं कार्टून्सविषयीचं वेड पाहिलं की मी आता लहान राहिलेलो नाही या जाणिवेचा स्वीकार करणं मला अजूनही जमत नसावं असं मला वाटतं, पण याचा खेद मात्र मला आजिबात नाही. आपण मोठे झालेलो आहेत या जाणिवेच्या स्विकाराभोवतीचा झगडा संपला की आपण लहान रहात नाही. आपण खरोखरीच मोठे होते, एक क्षणात होतो. अशावेळी 'गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी' टाईप घिसीपीटी क्लिशेड् वाक्यही नाकाशी एक दीर्घ उसासा घेऊन येतात. मग तो उसासा नाकाशी येईपर्यंत अजून चार एपिसोड्स जास्त पाहिले तर बिघडलं कुठे असं वाटून एखाद्या जुन्याच सिरीजचं पारायण पुनश्च सुरू होतं!

मध्यंतरी इंटरनेट सर्फ करता करता अमुक अमुक कार्टून सिरीजने आपल्याला काय दिलं, अशा आशयाचं एक आर्टिकल माझ्या वाचनात आलं होतं. ते आर्टिकल अर्थातच छान होतं, पटण्यासारखं होतं, पण एका 'देण्याचा' उल्लेख मात्र त्या लेखात नव्हता. लहान असताना आपण हसतो तेंव्हा ते हसू निखळ असतं, निरागस असतं, मोकळं असतं. आपण मोठे होते जातो, धावपळ सुरू होते, हसू कळवंडतं. जिवाच्या आकांतानं धावणाऱ्या जेरीप्रमाणं आपणही आपल्या क्षमतेनुसार धावत असतो. या धावपळीत आपल्या बालपणीच्या मोकळेपणाचा, साधेपणाचा पुन:प्रत्यय वेडेवाकडे चाळे करणारी ही काल्पनिक मंडळी आपल्याला देऊन जातात. सरळमार्गी कालचक्रात नेहमीच जमून येणारी ही एक सम अजून एक आवर्तन तरुन जाण्याचा उत्साह देऊन जाते आणि पुरतं तेवढंच! खरंच!

अजून काय लिहावं ?

- सौरभ राघवेंद्र.