•mr•

वाळू निसटत जाते..

वाळू निसटत जाते. मन हळवं होतं. पावलाशी घुटमळून लाट परत जाते आणि आणि सगळेच स्पर्श दाटून येतात क्षणात.

वाळू निसटत जाते. मन हळवं होतं. पावलाशी घुटमळून लाट परत जाते आणि आणि सगळेच स्पर्श दाटून येतात क्षणात. अव्याहत चक्राचा आपण एक भाग आहोत, ऐन भरात आलेल्या आपल्या तारुण्याची लाटही अशीच ओसरून जाईल आणि आपणही असेच विरून जाऊ एके दिवशी- पायाखालची वाळू सरकते.

आपल्या आधी काय होतं, आपल्या पाठी काय असेल !?

किनाऱ्याशी होता होईल तेवढी लगट करू पाहणारी लाट- परतीच्या प्रवासाचा ठसा उमटवते वाळूवर. आपल्या पाठी कदाचित, हा किनारा असाच हळवा राहील, नारळी-पोफळीच्या बागांत घुमलेला उत्कटतेचा हुंकार चिरंतन होऊन राहिल- अशी इच्छा! पण पुढची लाट येणार असते, तिच्या पुढची, तिच्या पुढची आणि तिच्याही पुढची.

निर्जीव मोती होऊन आठवणी शिंपल्यात बंद होतील, पाण्यात भिजून जातील, वाळूत हरवून जातील- मग भलताच कोणीतरी येऊन वेचून जाईल हे सगळं. त्याला ह्या चक्राशी ना देणं ना घेणं. मग निर्मितीचा हा अट्टाहास.. कोणाचा आणि का ?

थांब म्हटलं तर थांबेल हे सगळं काही क्षणांसाठी ?

वाळू निसटत जाते आणि मन हळवं होतं...

- सौरभ राघवेंद्र