•mr•

वीणाताईंची स्मृतीसभा

मागच्याच आठवड्यामध्ये शुक्रवारी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मृती-सभेच्या कार्यक्रमाला जाणे झाले. डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे जुन २९, २०१६ रोजी निधन झाले होते. गंधर्व महाविद्यालयामधील स्वरमंदिरामध्ये झालेल्या या सभेला तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, पंडित संजीव अभ्यंकर असे अनेक मान्यवर, वीणाताईंचा शिष्यवृंद आणि अनेक जाणकार श्रोते उपस्थित होते

मागच्याच आठवड्यामध्ये शुक्रवारी ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्या स्मृती-सभेच्या कार्यक्रमाला जाणे झाले. डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे जुन २९, २०१६ रोजी निधन झाले होते. गंधर्व महाविद्यालयामधील स्वरमंदिरामध्ये झालेल्या या सभेला तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे, पंडित संजीव अभ्यंकर असे अनेक मान्यवर, वीणाताईंचा शिष्यवृंद आणि अनेक जाणकार श्रोते उपस्थित होते.

संगीताच्या वातावरणामध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या वीणाताईंनी ग्वाल्हेर घराण्याची धुरा समर्थपणे पेललीच पण त्याचसोबत जयपूर आणि किराणा घराण्याचीही वैशिष्ट्ये आत्मसात केली. सर्व प्रकारचे संगीत ऐकले पाहिजे असे त्यांचे मत होते.

पंडित श्री. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पंडित श्री. शंकर श्रीपद बोडस यांच्या घरी जन्मलेल्या छोट्या वीणाची आठवण सांगतना त्यांच्या कानपूर (उत्तर-प्रदेश) मधील बालपणापासूनच्या सखी- वीणा शुक्ला म्हणाल्या- “मी पंडितजींकडे (वीणाताईंचे वडील) शिकायला जात असे तेंव्हा छोटी वीणा पडद्यापाशी उभी राहून ऐकत असे. त्या पडद्यापाशी येणे आणि पुन्हा आत पळत जाणे त्यांना फार आवडत. काही कारणामुळे माझ्या शिक्षणामध्ये खंड पडला आणि काही वर्षानंतर जेंव्हा मी पुन्हा कानपूरळा आल्यावर पंडितजींकडे शिकायला गेले तेंव्हा पंडितजी म्हणाले की त्यांना काही शिकवायला जमणार नाही. तू वीणाकडे जा. तेंव्हा माझ्या मनात विचार आला, ‘वीणा ? वोह चूलबुली नटखटसी वीणा ?’ पण जेंव्हा मी वीणा कडे गेले आणि तिला पाहिलं तेंव्हा ती एक अत्यंत अनुशासनप्रिय आणि उत्तम गायिका बनलेली होती.”

वीणा सहस्रबुद्धे यांचे पती डॉ. श्री हरी सहस्त्रबुद्धे यांनी वीणाताईंच्या कुटुंबियांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत साध्या पण परिणामकारक अशा भाषणात ते म्हणाले, “वीणा तिच्या आजारपणाला खूप धैर्याने सामोरी गेली.” हरिभाऊ पुढे म्हणाले की वीणाताई खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंबक्’ होत्या. त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना आपल्या कुटुंबाचा एक भाग बनवून घेतले होतेच पण त्यांच्या अनेक रसिक श्रोत्यांनाही त्यांच्या या आपलेपणाचा सुखद अनुभव आला होता. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात वीणाताई ज्या उंचीवर पोहोचल्या होत्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना हरिभाऊंनी त्या परिश्रमाचे कुटुंबीय साक्षीदार असल्याचे नमूद केले.

नाट्य-संगीत अकादमी पुरस्कार प्राप्त वीणाताई यांना साथ-सांगत करणाऱ्या वादकांनीही त्यांच्यासोबतच्या हृद्य आठवणी आपल्या मनोगतामधून व्यक्त केल्या. दृक-श्राव्य माध्यमाचा वापर करून वीणाताईंच्या परदेशामधील सहयोग्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.अत्यंत भावुक वातावरणामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात वीणाताईंनी गायलेल्या श्री रागाची ध्वनी-चित्रफीतही ऐकवण्यात आली.

शास्त्रीय संगीताचा खरा अर्थ समजणाऱ्या आणि मूळ स्वरूपाशी तडजोड न करता तो अत्यंत समर्पकपणे मांडणाऱ्या काही मोजक्या गायिकांपैकी वीणाताई एक होत्या. वीणाताई जरी आज आपल्यामध्ये नसल्या तरी त्या त्यांच्या आठवणींच्या आणि स्वरांच्या माध्यमातून कायम आपल्या मनामध्ये असतील हे नक्की. परमेश्वर वीणाताईंच्या आत्म्यास शांती देवो.

सौरभ राघवेंद्र.